जिद्दी
By admin | Published: January 18, 2017 06:48 PM2017-01-18T18:48:12+5:302017-01-18T18:48:12+5:30
धोनी. एक नाव. आयकॉन. रोल मॉडेल. क्रश. स्टार. यापलीकडे काय असतो क्रिकेट खेळांडूसाठी? छोट्या शहरांतल्या मोठ्या स्वप्नांसाठी?
- विश्वास चरणकर
‘त्याची’ ओळख ‘आॅन फिल्ड’ साऱ्या रेकॉर्ड्सना पुरून उरेल अशीच आहे..
डोक्यावर बर्फ ठेवून खेळतो तो..
कॅप्टन कूल. शांत. निवांत. हसरा. स्टायलिश. आणि तितकाच आक्रमक. दे ठोक अॅटिट्यूडनं त्यानं किती जणांचं भिरभिरं करून टाकलं..
एकेकाळी त्याच्या रांचीच्या गल्ल्यांत जसा फुफाटा उडायचा तशीच धुळधाण केली त्यानं अनेक बॉलर्सची मैदानावर..
बॉलर्सचीच कशाला त्यानं अनेक जुनाट धारणांची, खेड्यापाड्यातल्या तरुणांच्या गुणवत्तेला नाकारणाऱ्यांची, कमी लेखणाऱ्यांचीही अशीच धुळधाण केली. आणि स्वत:सह इतरांसाठीही एक नवीन वाट खुली केली. एक नवा ब्रॅण्ड तयार केला.. स्मॉल टाऊन ब्रॅण्ड. धोनी ब्रॅण्ड.
क्रिकेटच्या कपड्यांची कडक इस्त्री मोडून त्यानं गल्लीबोळातल्या क्रिकेटला स्वप्न दिलं. ‘पहचान’ दिली. नकाशावरच्या इवल्याटिवल्या गावातून क्रिकेटच्या पॅशनसाठी जगणाऱ्या अनेकांना इंडियन कॅपचं स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणाही दिली..
त्यामुळेच त्यानं जिंकलेले वर्ल्ड कप, जिंकून दिलेल्या, खेचून आणलेल्या मॅचेस, त्याची कप्तानीची रेकॉर्ड्स, त्याची व्यक्तिगत शतकं, त्याचा हेलिकॉप्टर शॉट, त्याची जाहिरातीची करोडोंची कॉण्ट्रॅक्ट्स, त्याच्या घराच्या गॅरेजमध्ये रांगेनं उभ्या महागड्या बाइक्स..
ही सारी तर त्याची ओळख आहेच..
पण त्याहून मोठी त्याची एक ओळख म्हणजे त्याचं स्मॉल टाऊन असणं. म्हणजेच रांचीसारख्या छोट्या शहरातला, मध्यमवर्गीय घरातला, स्पोटर््स कोट्यातून सरकारी नोकरीच्या नादात तिकीट चेकर म्हणून चिकटलेला एक तरुण काही वर्षांत भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन होतो. आपल्या गावरान अंगभूत शहाणपणाच्या आणि जिद्दीच्या जोरावर सारा गेम प्लॅनच बदलून टाकतो. रांगडा गडी असा काही करिश्मा दाखवतो दुनियेला की त्याच्या दुनियेची दखल घेता घेता त्या दुनियेलाच जग सलाम ठोकू लागतं..
जिद्दीचं, गुणवत्तेचं, शांतपणे आक्रमक होण्याचं आणि खेड्यापाड्यातल्या चिवट जिद्दीचं धोनी हे एक रूप.
खेळायचं कधी आणि थांबायचं कुठं हेही त्याला पक्कं कळतं. त्याच्या उपजत व्यवहारज्ञानातून अलीकडेच त्यानं कप्तानीचा राजीनामा देऊन टाकला. नव्या मुलांसाठी वाट तर मोकळी केलीच, पण स्वत:वरचा जबाबदारीचा ताण कमी करत व्यक्तिगत खेळासाठी स्वत:ला मोकळं केलं..
हे असं साऱ्यांत गुंतून मोकळं राहणं, मोकळं राहतानाही जबाबदारी उचलत दे ठोक परफॉर्म करणं कसं जमतं त्याला, हे कोडं आहेच..
पण त्या कोड्याची उकल कुणी एक्सपर्टनचं का करावी?
त्याच्याकडे पाहत क्रिकेट पाहणाऱ्या, त्याच्याकडून प्रेरणा घेणाऱ्या, त्याच्या शॉट्संचं अनुकरण करणाऱ्या आणि त्याच्या डोक्यातल्या गेम प्लॅनचं गणित आपल्या डोक्यात शिरतंय का हे शोधणाऱ्या छोट्या शहरांतल्या तरुण क्रिकेटर्सनाच विचारलं की, तुम्ही काय शिकलात धोनी नावाच्या या खेळाडूकडून तर..
ते काय सांगतात?
‘आॅक्सिजन’ने हेच शोधायचा प्रयत्न केलाय..
औरंगाबादचा अंकित, कोल्हापूरची अनुजा आणि पुण्याची देविका सांगताहेत क्रिकेटर म्हणून धोनीतलं काय त्यांना ‘मोटिव्हेटिंग’ वाटतं..
(लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत.vishwas.charankar@gmail.com)
डोक्यात कॅलक्युलेटर औरंगाबादचा क्रिकेटपटू अंकित बावणे. सध्या तो महाराष्ट्राच्या रणजी संघातून खेळतोय. गेल्या आॅक्टोबर महिन्यातच त्याची महेंद्रसिंह धोनीशी भेट झाली. दिल्लीच्या कर्नेलसिंग स्टेडियमवर महाराष्ट्र आणि झारखंडचा सामना सुरू होता. यावेळी झारखंड संघासोबत दस्तुरखुद्द धोनी आला होता. आंतरराष्ट्रीय सामने नसतील तर धोनी झारखंड संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर आवर्जून उपस्थित असतो. या सामन्यादरम्यानच अंकितला धोनीशी बोलण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राच्या तीन विकेट्स लवकर पडल्या. तेव्हा अंकितने ७८ धावा करून डाव सावरला होता. लंच टाइममध्ये धोनी झारखंडच्या खेळाडूंसोबतच आला. सारे खेळाडू जेवायचं म्हणून रांगेत प्लेट्स घेऊन उभे. त्याच लाइनमध्ये उभं राहून धोनीनं प्लेटमध्ये वाढून तर घेतलंच पण बाकीचे बसले तसे तो जमिनीवर फतकल मारून बसला. अंकित सांगतो, मी पाहतच राहिलो. सद्यस्थितीतला देशातील सर्वोत्तम खेळाडू, जगातील सर्वोत्तम कर्णधार अशी ज्याची ओळख, ग्लॅमर त्याच्या पायाशी आणि यश टप्प्यात असतं तो माणूस इतका साधासुधा. सहज गप्पा मारत बसला जेवायला. अंकित सांगतो, धोनी समोर उभा होता. पण तो आपल्याकडे बघेल की नाही असंच वाटत होतं. पण झारखंडच्या खेळाडूंसोबतचं धोनीचं मनमोकळं वागणं पाहून धाडस करून त्याच्याजवळ गेलोच. त्यानं एक छानसं स्माइल दिलं. मनावर दडपण होतंच. पण हिंमत करून बोललो. विचारलंच की, इथं रणजीत बॉलर्स इतकं फास्ट बोलिंग करतात, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या वेगवान गोलंदाजांना खेळताना तुमच्या मनात काय विचार असतात? एका वाक्याचा माझा प्रश्न; पण धोनीनं जवळपास दहा-पंधरा मिनिटे जगातील कोणता गोलंदाज कशा पद्धतीनं बॉल टाकतो, आणि त्याला कशा पद्धतीनं खेळलं पाहिजे हे अतिशय बारकाव्यानं समजावून सांगितलं. ते सारं महत्त्वाचं तर होतंच, पण मी त्याच्या साध्या आणि सरळ स्वभावावर फिदा झालो. एवढा मोठा खेळाडू, पण त्याला कसलाही अभिमान नाही. ट्वेंटी-२0 वर्ल्डकप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी (मिनी वर्ल्डकप) हे तिन्ही वर्ल्डकप ज्याच्या खिशात आहेत, तो खेळाडू किती बारकाईनं फक्त खेळाचाच विचार करतो. ज्युनिअर्सशी कसा बोलतो हे पाहून माझाच खेळाकडे पाहण्याचा नव्हे जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. इतका यशस्वी असूनही धोनीला जर कशाचाही व्यर्थ अभिमान नाही, तर आपणही कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे याची जाणीव झाली. एक क्रिकेटपटू म्हणून भावतं ते धोनीचं प्रत्येक गोष्टीतलं ‘कॅलक्युलेशन’. अंकित म्हणतो, मैदानावर असताना त्याच्या डोक्यात अक्षरश: कॅलक्युलेटर बसवलेला असतो असंं मला वाटतं. कोणत्यावेळी काय करायचं याचं पक्कं गणित त्याच्या डोक्यात तयार असतं. तो ज्यावेळी फिल्डिंग करत असतो त्यावेळी त्याच्याकडे अनेक पर्यायी प्लॅन्स तयार असतात. पहिला अपयशी ठरला तर लगेच दुसरा प्लॅन तयार असतो. २00७ च्या वर्ल्डकपची फायनल आठवून पाहा. सामन्याच्या शेवटच्या निर्णायक षटकासाठी कोणता कर्णधार हरभजनसारख्या अनुभवी गोलंदाजाला मागे ठेवून जोगिंदरसारख्या नवख्या बॉलरवर रिस्क घेईल? सगळं जग एका पारंपरिक दिशेनं विचार करीत असताना धोनीच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार असतो. ‘थिंक डिफरण्ट’ हा त्याचा स्थायिभाव आहे. आपली फिनिशरची भूमिका आहे तरी सामन्यात विजय मिळवूनच मैदान सोडणं हे त्याच्या अंगवळणी पडलं आहे. टेक्निक तर आहेच पण त्यासोबत मेंटल आणि पॉवर गेमवर त्याचा जास्त विश्वास आहे. गोलंदाजांच्या कमजोर बाजू हेरायच्या आणि त्यावर प्रहार करायचा ही त्याची युद्धनीती. आणि त्यासोबत कमालीचा आत्मविश्वास. हे सारं आहे म्हणून ‘तो’ धोनी आहे. धोनीच्या बॅटिंग क्लिप्स मी काळजीपूर्वक पाहतो. त्याचा खूप उपयोग होतो. शिकता येतं. मोटिव्हेशनही मिळतं! ठंडा दिमाग कोल्हापूरची अष्टपैलू खेळाडू अनुजा पाटील. भारतीय ट्वेंटी-२0 संघातून खेळते. फिरकी गोलंदाजी आणि उपयुक्त फलंदाजी करून तिनं भारताला अनेक सामन्यात विजय मिळवून दिला आहे. तिच्यासाठी धोनी म्हणजे रोल मॉडेलच. धोनी फिनिशरचं काम करतो, अनुजाकडेही संघात तीच जबाबदारी येते. मिडल आॅर्डरमध्ये बॅटिंग करीत असताना चेंडू आणि धावा यांचा ताळमेळ कसा साधायचा याचं गणित आपण धोनीकडे पाहून शिकलो, असं सांगताना अनुजा अनेक उदाहरणं सहज सांगते. तिलाही वाटायचं की, धोनीबद्दल सतत बोललं जात होतं, सतत त्याचा खेळ पाहण्यात येत होता, प्रसारमाध्यमांमध्ये सतत त्याच्या नावाची चर्चा होतेय. कसा असेल धोनी? कसं इतकं प्रेशर सहन करतो? आपण धोनीला भेटल्यानंतर तिला जाणवलं की, त्याचं कूल असणं नेमकं काय आहे. अनुजा सांगते, गेल्या वर्षी जानेवारीतली ही गोष्ट. भारतीय महिला संघ आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघही त्याचवेळी आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. या दौऱ्यात धोनीला भेटण्याची संधी मिळाली. धोनीनं महिला संघाला आॅस्ट्रेलियन पीचवर कसं खेळायचं याच्या टिप्स दिल्या. मार्गदर्शन केलं. भारतीय महिला संघानं आॅस्ट्रेलियात ती मालिका २-१ असा विजय मिळवत जिंकली. धोनी सीनिअर खेळाडू आहे, तो आपल्याशी अंतर राखून राहील असं आमच्या संघातील प्रत्येक खेळाडूला वाटायचं. पण तो आला आणि थेटपणे आमच्यात मिसळला. सीनिअर-ज्युनिअरची भिंत त्यानं पहिल्या क्षणातच पाडून टाकली. यानंतर तो जे काही बोलला ते कायमचं काळजात साठवून ठेवण्यासारखं आहे. तो म्हणाला, ‘स्वत:ला कमी लेखू नका, स्वत:च्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा!’ हा त्याचा संदेश माझ्यासारख्या छोट्या शहरातून आलेल्या मुलीला खूपच आत्मविश्वास देऊन गेला. कायम लक्षात राहिले ते शब्द. सामन्यात काय नी बाहेर काय, प्रेशर कितीही असू दे, धोनी एकदम ‘ठंडे दिमाग’वाला असतो. तो पॅनिक होत नाही, त्यामुळे त्याचा निर्णय चुकत नाही. पराभवात पुढे आणि विजयात मागे राहणारा तो खरा नेता आहे. त्याच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. कूल आणि अग्रेसिव्हही संभाव्य भारतीय महिला संघात निवड झालेली पुण्याची देविका वैद्य. धोनीच्या पाच मिनिटांच्या भेटीनं ती हरखून गेली. दोन वर्षापूर्वी तिची आणि धोनीची झालेली भेट तिच्यासाठी अविस्मरणीय ठरली. बेंगळुरू येथे एका सामन्यात देविका चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळत होती. त्यावेळी भारतात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज खेळत होता, आणि या संघाच्या सरावासाठी धोनी चिन्नास्वामीवर आला होता. देविकाच्या संघातील सर्वच खेळाडूंना धोनीला भेटायचं होतं. सामना संपल्यानंतर त्यांना ही संधी मिळाली. त्यांनी सरावासाठी चाललेल्या धोनीकडे धाव घेतली. देविका सांगते, प्रत्येकीशी त्यानं आपुलकीने शेकहँड केला. संघाची आस्थेनं चौकशी केली. काही मुलींनी फोटो काढण्याची विनंती केली. तो लगेच हो म्हणाला. मुलींनी पटापट त्याला ‘मोबाइलबद्ध’ केला. पाच-दहा मिनिटांचाच हा वेळ. पण लक्षात आलं की, हात लावेल तिथं सोनं करण्याची ताकद असलेला हा माणूस, पण कामगिरीचा कसलाही अहंकार नाही. एकदम मोकळाढाकळा. शांत. ही शांत वृत्तीच त्याला वेगळं ठरवते. एकीकडे कूल, दुसरीकडे खेळाडू म्हणून तितकाच आक्रमक. दोन्हीतील ताळमेळ त्यानं उत्तम साधलाय. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील थोडे तरी गुण आत्मसात झाले तरी जीवनात बरंच काही मिळवता येईल.