काठपदराची स्टायलिश साडी

By admin | Published: November 17, 2016 04:55 PM2016-11-17T16:55:52+5:302016-11-17T16:55:52+5:30

शॉपिंगसाठी हातात पैसे नाहीत, मग आजी-आईच्या काठपदराच्या, सिल्कच्या साड्या मागा आणि त्यांनाच एक वेगळा लूक द्या. कारण साडी हे एक नवं स्टाइल स्टेटमेण्ट बनतेय..

Stylish sari of Kathpadura | काठपदराची स्टायलिश साडी

काठपदराची स्टायलिश साडी

Next
- श्रावणी बॅनर्जी

तुळसीविवाह झाले, आता लग्नसराई सुरू होणार.
त्यासाठीचं शॉपिंगही सुरू होणार. विशेषत: मुली. मैत्रिणीचं, बहिणीचं लग्न असेल तर तिच्यापेक्षा यांचीच तयारी जास्त. 
त्यात गेली काही वर्षे शरारा, लेहंगा, घागरा, लाछा यांची फॅशन जोरात होती. पण ते दिवस आता सरलेत.
आता चर्चे आहेत, ते पुन्हा आपल्या पारंपरिक साड्यांचे.
आणि सध्या जरा हातात रोख रक्कम कमी आहे. शॉपिंग टाळणार असाल तर एक सोपा उपाय आहे, आईच्या-आजीच्या काठपदराच्या, सिल्कच्या साड्या मागा. आणि नेसा. कारण तेच सध्या जास्त फॅशनेबल आहे. त्यामुळे उगीच पैसे खर्च करण्यापेक्षा ते वाचवून जास्तीत जास्त सुंदर आणि ट्रेण्डी दिसण्याची एक मोफत संधी काळाच्या या तुकड्यानं आपल्याला दिलेली आहे.
त्यामुळे स्वत:च्या किंवा दुसऱ्या कुणाच्या लग्नासाठी शॉपिंग करायचा मनात विचार असेल तर साडी ही एक परफेक्ट निवड आहेच. फक्त त्या साडीला जरा ट्रेण्डी, मॉडर्न आणि स्टायलिश टच मात्र देता येऊ शकतो.
त्यासाठी सध्या ‘इन’ असलेल्या फॅशन्सची ही एक लिस्ट मदतीला असलेली बरी..

१) करीनावाला कॉण्ट्रास्ट

साडी एकदम सिल्कची, मोठ्या काठांची, पारंपरिक अशीच हवी. करीना कपूर अनेकदा तशी साडी नेसते. पण त्या साडीच्या रंगापेक्षा अत्यंत वेगळा, कमालीचा कॉण्ट्रास्ट रंगाचं ब्लाऊज त्यावर घालायचं. तशी देखणी साडी, आणि कॉण्ट्रास्ट कलर हे कॉम्बिनेशन अत्यंत सुंदर आणि वेगळं दिसतं.

२) दीपिका स्टाइल हाय कॉलर
दीपिका पादुकोणने आपल्या साडीच्या कमाल लूकने सध्या हा ट्रेण्ड कमालीचा गाजवला आहे. हाय कॉलर ब्लॉऊज ती वापरते. आणि त्यासोबत स्लिव्हजलेस ब्लाऊज. साडी पारंपरिक असो की नेटची की शिफॉनची. या प्रकारात ती एकदम ट्रेण्डी दिसते.

३) थ्री फोर्थ आणि बोट नेक
पुन्हा तेच. साडी पारंपरिक. सिल्कची. साऊथ सिल्क. पण तिला जोड द्यायची ती थ्री फोर्थ मोठ्या बाह्यांची. आणि गळा मात्र बोट नेक. मोठं गळ्यातलं. ही स्टाइलही वेगळा लूक देते.

४) कंगणाचा क्रू नेक आणि गजरा

क्रू नेक असं म्हणून जरा गूगल करून पहा. मॉडर्न, वेस्टर्न कपड्यांवर हा गळा शोभून दिसतो. पण कंगणा राणावत असंच काहीतरी हटके करण्यात माहीर आहे. अलीकडचे तिचे साडीतले फोटो पहा. भरजरी, काठापदराची साडी, ब्लाऊजचा क्रू कट, आणि केसांत गजरा. अत्यंत सुंदर दिसते. त्यासोबत कधी थ्री फोर्थ, कधी हाय नेक, बंद गळा ही सारी कॉम्बिनेशन्स ती अत्यंत सुंदर कॅरी करते.

५) सोनम कपूरची जॅकेट स्टाइल

सोनम कपूर तर काय फॅशनिस्टाच. तिच्या स्टाइल सेन्सला तोड नाही. मात्र तीही अनेकदा साड्याच नेसते. पण साड्यांची एक खासियत आहे. त्या साड्यांवर ती जॅकेट्स घालते. लांब गुडघ्याएवढे किंवा छोटे. ते सुंदर दिसतात. आपल्या खास फंक्शनला खास दिसण्यासाठी हा जरा वेगळा लूक ट्राय करता येऊच शकतो.

६) मोती आणि चांदीची नाजूक कारागिरी

फार काही वेगळं, बोल्ड असं करता येत नाही, कारण घरच्यांच्या नजरा असतातच आपल्यावर. त्यावर उपाय म्हणून हा एक जरा वेगळा उपाय. साडी काठपदरी असेल तर त्यावरचं ब्लाऊज भरजरी करता येऊ शकतं. त्यावर मोतीकाम, चांदीचं नाजूक वर्क हल्ली करून मिळतं. त्यानं साध्या साडीलाही वेगळा लूक येतो.

७) कलमकारीची कमाल
प्लेन साड्या या सध्या चर्चेत नाहीत. पण हळूहळू ती फॅशन पुन्हा येते आहे. प्लेन साड्या, सिल्क किंवा प्युअर कॉटनच्या. आणि त्यावर कलमकारी, कच्छी वर्क केलेलं ब्लाऊज हे कॉम्बिनेशनही कमाल दिसतं.

८) चेक्सची साडी
८० च्या दशकातली ही फॅशन आता परत येते आहे. त्याकाळी चेक्सच्या साड्या लोकप्रिय होत्या. आता ती फॅशन फिरून येते आहे.

९) धोती स्टाइल
रेडी टू वेअर साड्यांमध्येही सोनम कपूरनेच लोकप्रिय केलेली धोती स्टाइल फॅशन नव्यानं येऊ घातली आहे.

१०) मोठ्ठं कुंकू, मोहनमाळ, कांजीवरम
या रेखा स्टाइल साडीला तर काही तोडच नाही. टिपिकल ट्रॅडिशनल लूक हवा असेल तर हे कॉम्बिनेशन हवंच!
 

 

Web Title: Stylish sari of Kathpadura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.