जग गेलं खडय़ात असं का म्हणतंय हे पुस्तक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 03:19 PM2018-11-22T15:19:12+5:302018-11-22T15:20:19+5:30
‘अ सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक’ असं अजब नाव असलेलं हे पुस्तक, आहे भन्नाट!
- प्रज्ञा शिदोरे
सेल्फ हेल्प बुक्स. म्हणजे स्व मदत पुस्तक. हे करा की ते होईल, यशाचे पन्नास मंत्र वगैरे सांगणारी ही पुस्तकं. या पुस्तकांपासून मी तशी चार हात लांबच असते. पण या पुस्तकाचं नावच इतकं दचकवणारं आणि भलतंच की वाटलं काय हे पुस्तक. ‘अ सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक’ हे असं नाव. हे काय पुस्तकाचं नाव असावं का? एकदम फारच ‘वान्नबी’ टाइप्स. पण नाव असं अजब असलं तरी जगात हे बेस्टसेलर ठरलंय. असेल उगाच काहीतरी रँडम फिलॉसॉफी झाडणारं पुस्तक असं वाटलं मला. पण काही दिवसांपूर्वी त्याचा मराठी अनुवाद पाहिला आणि सहज वाचायला घेतलं.
मार्क मेन्सन हा या पुस्तकाचा लेखक. त्याचं हे पुस्तक म्हणजे ‘सकारात्मकता विकणार्या सेल्फ हेल्प इंडस्ट्री’ला दिलेलं सणसणीत उत्तरच आहे. त्याच्या मते, लोक उगाचच खोटं खोटं सांगत असतात. पॉझेटिव्हिटी वगैरे! ते सगळं ऐकून, वाचून आपण सत्यापासून लांब जातो. स्वतर्ला नीट ओळखू शकत नाही आणि त्यामुळे आपली गोची होते.
जरा तिखट आहे मत; पण आहे विचार करायला लावणारं!
या पुस्तकाचा गाभा असा की तुम्हाला खरंच काय आवडतं ते ओळखायला शिका, बाकी सगळं गेलं खड्डय़ात! मार्क म्हणतो, जेव्हा आपण स्वतर्शी खरं बोलायला लागू, स्वतर्ला खरं सांगू तेव्हा आपल्यात असलेली कमतरता मोडून काढण्याचं बळही आपल्याला मिळेल. आपण प्रत्येकवेळा ‘माझं आयुष्य प्रॉब्लेम फ्री कसं असेल’ याच विचारात असतो. आयुष्य असं नसतं. कोणीच कधीच प्रॉब्लेम्स शिवाय जगत नाही. तेव्हा समस्यांपासून दूर पळण्यापेक्षा कोणती समस्या सोडवायला आवडेल अशा समस्यांची नीट निवड करा आणि त्याला भिडा!
हे पुस्तक वाचून झाल्यावर तुमच्या डोक्याला अजिबात शॉट लागणार नाही, पण तुम्हाला जगण्याचा नवीन दृष्टिकोन मिळेल एवढं नक्की. मार्कमेन्सन या पुस्तकाबद्दल आणि त्याच्या फिलॉसॉफीबद्दल काय बोलतो हे सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा आणि ऐका .
‘घंटा फरक न पडून घेण्याची बेमालूम कला’ हे या पुस्तकाचं मराठी नाव आहे, तेही वाचता येईल!