किरण चव्हाण, कष्टानं शिकत यूपीएससीचं यश कमावणारा जिद्दी मुलगा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 09:03 AM2018-05-17T09:03:06+5:302018-05-17T09:03:06+5:30
मातृभाषा बंजारा. मात्र त्यानं ठरवलं.. आपलं शिक्षण मराठीत झालं तर मराठीतून यूपीएससीची परीक्षा द्यायची. आणि यशही मिळवलं.
- संतोष मिठारी
वय वर्षे अवघे चोवीस. परिवार मूळचा विजापूरचा. घरात बंजारा भाषेतच बोललं जातं. मात्र तो वाढला मराठी वातावरणातच. नागनवाडी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) गावचा किरण गंगाराम चव्हाण. केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा तर तो उत्तीर्ण झालाच पण त्यानं ही परीक्षाही मराठीतूनच दिली होती. यूपीएससीची तयारी मराठीतून करणं हे काही सोपं नाही, असे सल्ले त्यालाही मिळाले. मात्र तो आपल्या निर्णयावर ठाम राहिलाच.
देवहिप्परगी (जि. विजापूर) हे किरणचं मूळ गाव. त्याचं कुटुंब लमाणी समाजाचं. साधारणत: १९९३ मध्ये चव्हाण कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी कोल्हापूरमध्ये आलं आणि शिंगणापूरला राहू लागलं. तिथंच किरणचं सहावीपर्यंतचं शिक्षण झालं. सातवीचं शिक्षण त्यानं कोवाड आश्रमशाळेतून पूर्ण केलं. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्यानं त्याला पुढील शिक्षणासाठी बहीण कमल आणि भावोजी रवि राठोड यांनी पणदूरला (कोकण) नेलं. कुडाळमधील शिवाजी हायस्कूलमधून त्यानं दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मोठा भाऊ शिवराय यानं महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याला नागनवाडीला (ता. चंदगड) आणलं.
महाविद्यालयीन शिक्षण सुरू होण्यापूर्वीच किरण असा अनेक शाळांत, अनेक गावांत शिकला. चंदगडच्या न. भु. पाटील कॉलेजमधून बारावी उत्तीर्ण झाल्यावर त्यानं मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. पुण्यात राहून इंजिनिअरिंग तर केलंच; पण त्याचवेळी ठरवलं की यूपीएससी करायचं. पुण्यात राहून त्यानं यूपीएससीची तयारी सुरू केली. पहिल्याच काय दुसऱ्या प्रयत्नातही यश मिळालं नाही. मात्र २०१७ साली त्यानं पुन्हा परीक्षा दिली आणि देशात ७७९ व्या रँकचं यश मिळवलं. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून जिद्द, चिकाटीच्या जोरावर त्यानं आपलं स्वप्न पूर्ण केलंच.
किरण सांगतो, ‘मी ज्या परिस्थितीत शिक्षण घेतलं, वाढलो त्या अनुभवानंच माझ्या हे लक्षात आलं की व्यवस्थेवर नुस्ती बाहेरून टीका करण्यापेक्षा त्या व्यवस्थेचा भाग व्हायला हवं, बदलासाठी काम करायला हवं. तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी अभ्यास केला.’
मात्र अभ्यासाचा हा काळही सोपा नव्हताच. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन दोन वर्षे झाली, पण तो नोकरी करत नव्हता. लोक विचारत, काय करतोस, ‘यूपीएससी’चं काय झालं? त्यात दोनवेळा यशानं हुलकावणी दिली. यादरम्यान काहींनी क्लासेसमध्ये शिकव असाही सल्ला दिला. मात्र त्यानं आपली जिद्द सोडली नाही. अभ्यासातील सातत्य, नियोजन हे अखेरीस फळाला आलंच.
किरण सांगतो, या परीक्षेची तयारी करताना मी स्वत:वरील विश्वास कायम ठेवला. दिवसातील दहा तास अभ्यासासाठी वेळ दिला. विषयांसह अवांतर वाचन, आपल्या आजूबाजूला घडणाºया घटनांचं निरीक्षण करणं हे नियमित केलं. उत्तरपत्रिका सोडविल्यानंतर त्या पुणे येथील प्रवीण चव्हाण यांच्याकडून तपासून घेतल्या. त्यांनी एखाद्या उत्तरात काही सुचवलं तर त्या मुद्द्यांचा अभ्यास केला. मला वाटतं, या परीक्षेची तयारी करताना स्वत:वर विश्वास हवाच. बेसिक पुस्तकांच्या वाचनानं अभ्यासाची सुरुवात करावी. एक-दोन प्रयत्नात अपयश आल्यास खचून जायचं नाही. सातत्य आणि चिकाटीला तर काही पर्यायच नाही.
मराठीतूनच यूपीएसएसी
लमाणी समाजातील असल्यानं माझ्या घरात सर्वजण बंजारा बोलीभाषेमध्ये संवाद साधायचे. मात्र, शाळेमध्ये मराठीतून शिकवलं जायचं. माझे मराठी उत्तम. त्यामुळे यूपीएससी परीक्षा मराठीतून द्यायची हे सुरुवातीलाच निश्चित केलं. या परीक्षेची तयारी सुरू केल्यानंतर अनेकांनी मला मराठीत अभ्यासाची पुस्तकं, अन्य साहित्य कमी आहे, जे आहे त्यात फारशी गुणवत्ता नाही, एखादी संकल्पना समजून घेणं अवघड जातं असं सांगत इंग्रजीतून तयारी करण्याचं सुचवलं. पण विविध संकल्पना, मुद्दे मराठीतून अधिक चांगल्या पद्धतीने मला समजायचे. त्यामुळे परीक्षा ते मुलाखतीपर्यंत मराठी माध्यमाचीच निवड केली. ज्या विषयांचं मराठीतील साहित्य कमी होतं, त्यासाठी मी इंग्रजी पुस्तकांचा आधार घेत होतो. मराठी भाषेतील तयारी या परीक्षेतील यशासाठी मला उपयुक्त ठरली. या प्रवासात मला वडील, आई, मोठे भाऊ, बहीण-भावोजी यांनी मोठी साथ दिली. ‘आयएएस’ होण्याचं माझे ध्येय असून, त्या दृष्टीनं मी आता तयारी करणार आहे.