असा मी ‘आसामी’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 06:00 AM2017-11-30T06:00:00+5:302017-11-30T06:00:00+5:30

कुठं धुळे जिल्ह्यातलं शिंदखेडा. कुठं परभणी. आणि आता कुठं आसाम राज्यात नागाव जिल्ह्यातल्या काशियाढोली गावात नोकरीसाठी पोहचलोय. अहिराणी, मराठी, हिंदी, इंग्रजीचा हात धरत थेट आसमिया, बंगाली बोलतोय.. किती समृद्ध केलं या प्रवासानं काय सांगू...

Such as 'Assamese' | असा मी ‘आसामी’

असा मी ‘आसामी’

Next

विवेक सुनील महाजन शिंदखेडा (जि. धुळे)

जगात जर्मनी आणि भारतात परभणी!
याच परभणीत मी कृषी अभियांत्रिकीच्या पदवीच्या तृतीय वर्षाला शिकत होतो. त्यावेळी ग्रंथालयातून हट्टाने घेऊन वाचलेलं पु.लं.चं ‘व्यक्ती आणि वल्ली’ आणि ‘असा मी असामी’ अजून आठवतो. पण काळ मलाच शब्दाश: कधीतरी ‘आसामी’ बनवेल हे त्यावेळी कुणी सांगितलं असतं तरी खरं वाटलं नसतं.
पण आज माझ्यात आसामीपणा आज एवढा रुजलाय की कोणी ‘कि खोबोर असे? असं विचारताच ‘भाल असु आरू’ असं आपसूकच तोंडी येतं.
आसमिया ही भाषा गोड. तिनं मला आपलंसं केलं आणि मी तिला. या भाषेचं रोपटं मनात रुजवलं ते माझ्या शाखेचे आर्म गार्ड परमान्द सैकीया यांनी. ते एक सेवानिवृत्त आर्मी मॅन. आपलं गाव सोडून शहरात परराज्यातच नाही तर देशाच्या वेगवेगळ्या सीमेवर आपलं कर्तव्य बजावून ते आज माझ्यात शाखेत बॅँकेच्या सेवेत आहेत.
माझं गाव शिंदखेडा. धुळे जिल्ह्यातील तालुक्याचं गाव. शिंदखेड्यात स्थायिक झालोत ते १९९९ ला त्याआधी अंकलेश्वरला होतो. (गुजरात) वडील तिकडे एका कंपनीत कामाला होते. अंगणवाडी/बालवाडीत गुजराती भाषेचे धडे गिरवलेलं मला स्पष्ट आठवतंय. त्यानंतर श्ािंदखेड्यात वडिलांचा पानदुकानाचा व्यवसाय सुरू केला.
पहिली ते चौथी जि.प. शाळेतूृन नंतर पाचवीसाठी एमएचएसएस हायस्कूलमध्ये माझं संपूर्ण शिक्षण झालं. एकाच गावात शिक्षण होऊ शकलं असतं. पण इयत्ता पाचवीत दिलेली ‘नवोदय’ची परीक्षा पास झालो आणि जगण्याला मिळाला एक टर्निंग पॉइंट’. सहावी ते बारावी सलग सात वर्षे होस्टेल लाइफ, जवाहर नवोदय विद्यालय, अक्कलकुवा, जि. नंदुरबार या आदिवासी बहूल भागात. प्रज्ञान ब्रह्मं हे नवोदयचं ब्रीदवाक्य. पहाटे पाच ते रात्री दहा सारं शेड्यूल फिक्स. त्यात क्लास, खेळ, व्यायाम, जेवण सगळंच. आपला वेळ आपल्याच व्यक्तिमत्त्व विकासासाठी किती योग्य पद्धतीने वापरता येतो हे सर्वप्रथम इथं शिकलो. नवीन वातावरणानं स्वत:चं काम स्वत: करण्याची सवय लावली. नेतृत्व करण्यास शिकवलं वेगवेगळ्या उपक्रमात.
पुढे पदवीचं शिक्षण कृषी विषयात घ्यावं असं आजोबांचं, आईवडिलांचं मत होतं. मीसुद्धा तयार झालो. पदवी अभ्यासक्रमासाठी पैसे पुरवण्यासाठी वडिलांची आर्थिक परिस्थिती तेवढी भक्कम नव्हती. म्हणून शिंदखेड्याच्या सेंट्रल बँकेच्या शाखेतून शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी मामांनी साहाय्य केलं आणि दाखल झालो ते परभणीत. पुन्हा होस्टेल. यावेळी ‘सह्याद्री’.
पदवीच्या शेवटच्या सेमिस्टरला असताना इन प्लाण्ट ट्रेनिंगसाठी वॉटरशेड आॅर्गनायझेशन ट्रस्ट या सामाजिक संस्थेसोबत जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथे काम करण्याची संधी मिळाली. मनरेगा या योजनेच्या उत्तम आणि पारदर्शक अंमलबजावणीसाठी ही संस्था तांत्रिक साहाय्य करते. मनरेगाचा प्रस्ताव बनवणं व झालेल्या कामाचं मोजमाप करण्यासाठी मी त्याकाळात अनेक गावात जात होतो. शेतकºयांच्या बांधावर, कधी डोंगरावर झालेल्या कामाचे मोजमाप करत होतो. गाव आलं की बारा भानगडी आल्या. बांधाबांधावरून भांडणं व्हायची. पण तेव्हा पदवीही पूर्ण न झालेले आम्ही एनजीओचे ‘साहेब’ म्हणून मी व माझा मित्र रघुनाथ जगताप मध्यस्थी करायचो. मोजमाप झाल्यावर गावकºयांची (मजुरांची) मीटिंग घेऊन त्यांना कामाचा मोबदला मिळाला की नाही हे दाखवायचो. कामाचे आणि मृद व जलसंधारणाचे फायदे सांगायचो. आपल्या या शिक्षणासाठी कर्जाद्वारे गुंतवणूक केल्याचा अभिमान वाटावा असे काही क्षण याकाळात वाट्याला आले.
पदवी झाली. बदललं शहर. आता औरंगाबाद. बँकिंगच्या स्पर्धा परीक्षांची तयारी केली. बँकिंग परीक्षा उत्तीर्ण झालो. ज्या बँकेतून शैक्षणिक कर्ज घेतलं होतं, त्याच बँकेत कृषी वित्त अधिकारी म्हणून सेवेत दाखल झालो.
पण यावेळी शहरच नाही तर राज्यदेखील बदललं.
आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यात काशियाढोली या एका खेड्यात सेंट्रल बँकेच्या शाखेत मी आता कार्यरत आहे.
बँकेत फिल्ड जॉब असल्यामुळे नेहमी गावोगाव आणि खेड्यात फिरतो. लोकांशी संवाद करताना त्यांची भाषा म्हणजेच आसमिया, बंगालीही शिकतो आहे. त्यांची भाषा माझ्या हिंदीशी मेळ खात नव्हती. इकडे खेड्यात आजही इतर राज्यांप्रमाणे हिंदीचा तेवढा स्पर्श नाही. म्हणून एक चांगला संवाद होण्यासाठी आसमिया भाषा शिकतोय आजही आसमिया भाषेत दिलेला ग्राहकांचा अर्ज/किंवा तक्रार काहीसा वेळ घेऊन वाचू शकतो. माणसं आणि भाषा दोन्ही आपले वाटू लागले आहेत.
या प्रवासात शहरं बदलत गेली. कधी होस्टेल, रूम तर आता पेइंग गेस्ट. भाषा बदलली. अहिराणी, गुजराती, मराठवाडी आणि आसामी शिकलो. बदलणाºया शहरांनी आपलेसं केलं. बदलणाºया परिस्थितीसोबत बदलत गेलो. या शहरांनी स्वावलंबी बनायचं शिकवलं. आत्मविश्वासही दिला. या संपूर्ण बदलात कुठेही हिंमत खचू नये हे शिकलो आईकडून. जेव्हा जेव्हा अपयश आलं किंवा नकारात्मक वाटलं तेव्हा तेव्हा मला माझ्या मामांनी प्रा. दीपक माळी व अरविंद माळी यांनी मार्गदर्शन केलं. आता माझी भावंडंही बदलाच्या या प्रवासात आहेत.. त्यांचीही साथसोबत आहेच.
घरट्यात राहून पोट भरत नाही म्हणतात, मला तर पोटानं किती वेगळं जग पहायला मिळतंय..


(सध्या आसाममधील नागाव जिल्ह्यातल्या काशियाढोली गावात वास्तव्य.)

Web Title: Such as 'Assamese'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.