सूर ताल आणि योग
By admin | Published: June 16, 2016 12:17 PM2016-06-16T12:17:53+5:302016-06-16T12:32:54+5:30
येत्या मंगळवारी जगभर साजऱ्या होणाऱ्या, प्रसन्नतेची बीजं पेरणाऱ्या एका दिवसाचा सुंदर आनंददायी मिलाप
येता मंगळवार.. म्हणजे २१ जून! चार दिवस लांब उभ्या या दिवसाकडे पहा.. त्याची एक गंमत आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि आंतरराष्ट्रीय संगीत दिवस असे दोन दिवस या एकाच दिवसात हातात हात घालून जगभरातल्या माणसांना एका वेगळ्याच ‘तालात’ घेऊन जायला सिद्ध होत आहेत... संगीत आणि योग. दोन गोष्टी. ज्या भाषेपलीकडे, प्रांतांपलीकडे आणि जातिधर्मापलीकडे जाऊन माणसांना जोडू पाहताहेत.. आणि आपलं मन आणि शरीर सुंदर-प्रसन्न आणि निकोप रहावं म्हणून जगभरातली तरुण मुलं या दोन गोष्टी ‘आपल्याशा’ करत आहेत... मनावरची मरगळ उतरावी, चैतन्य आणि उमेदीचे झरे झुळझुळावेत म्हणून योगविद्या आपलीशी करणारे जगभरात आज कितीतरी तरुण आहेत... आणि संगीताचं तर काय? सुरांना ना भाषेचं बंधन ना जमिनीवरच्या सीमांचं! त्यात आता तंत्रज्ञान मदतीला हाताशी आहे. त्या तंत्रज्ञानानं मक्तेदारीच्या सीमारेषाही तोडल्या आणि तरुण मुलं आपलं संगीत जगभर पोहोचवू लागली, जगभरातल्या संगीताला आपलंसं करू लागली.. आपलं जगणं समृद्ध करणाऱ्या, त्या जगण्यात उमेदीचे रंग आणि प्रसन्नतेचे सूर पेरणाऱ्या या दोन गोष्टींना एक कृतज्ञ नमस्कार करायला हवा.. जगात कितीही विद्वेशाची कुरूपं तयार होत असली तरीही जग आणि जगणं आनंददायी करणाऱ्या या सुंदर गोष्टींचा स्वीकार आपलंही आयुष्य उजळवून टाकू शकेल.. - आॅक्सिजन टीम्