घाम तर गाळतोय, पण फिटनेस दिसतच नाही. असं का?
By admin | Published: May 8, 2017 03:12 PM2017-05-08T15:12:04+5:302017-05-08T15:12:04+5:30
फिटनेस कमावयचाय, तर चुकीच्या गोष्टी टाळा आणि करा या सहा गोष्टी.
Next
- मयूर पठाडे
प्रत्येक बाबतीत आपण आरंभशूर असतो. एखादी गोष्ट मनात आली की मोठा आव आणि ताव आणून आपण ती सुरू करतो, पण आपला हा उत्साह किती दिवस टिकतो हे आपल्यालाही चांगलचं माहीत असतं. व्यायामाच्या बाबतीत तर हा आरंभशूरपणा हमखास पाहायला मिळतो. व्यायाम तर आपण डंके की चोटपर सुरू करतो, जिममध्ये जातो, पहिल्या दिवसापासून डंबेल्स वगैरे उचलायला लागतो, पण होतं काय? फिटनेस तर दिसत नाहीच, पण व्यायामात सातत्यही राहात नाही. याचं कारण चुकीची सुरुवात आणि भलत्या अपेक्षा.
आपल्या व्यायामात सातत्य का राहात नाही? आपण मधेच का सोडून देतो व्यायाम? त्यापासून बर्याचदा अपेक्षित फायदा का होत नाही? फायदा जाऊ द्या, बर्याचदा त्यापासून तोटाच का होतो?
जाणून घ्यायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला माहीतच हव्यात.
लक्षात ठेवा.
1- फाजील आत्मविश्वास नको
हे काय, मी सहज करेल, असा चुकीचा आणि फाजील आत्मविश्वास नको. कोणतीही गोष्ट टप्प्याटप्याने आणि योग्य तर्हेने करायला हवी. व्यायामाला सुरुवात करतानाही सध्याच्या तुमच्या फिटनेसची लेव्हल कोणती आहे, ते पाहूनच व्यायामाची सुरुवात करावी. सुरुवातीलाच अति व्यायाम केला, तर ‘जाऊ द्या’ म्हणून काही दिवसांतच ‘घरी बसण्याची‘ वेळ येते. कंटाळाही येतो आणि तुमची अंगदुखी तर तुम्हाला व्यायामाला जाऊच नका असंच सारखं बजावायला लागते.
2- एक्सरसाइज रुटिन प्लान करा
समोरची व्यक्ती रोज दोन तास व्यायाम करते, किलो किलोनं वजन उचलते किंवा रोज दहा किलोमीटर चालते, पळते म्हणून आपणही तसंच करायला गेलं तर हाती काहीच पडणार नाही. आपल्याला नेमकं काय हवंय याचा एक ढोबळ आराखडा तयार करा. तो अगदी लिहून काढला तरी चालेल. निदान पहिल्या काही आठवड्यांसाठी तरी ही पद्धत फार उपयुक्त ठरते. त्यानंतर अपेक्षित बदल दिसू लागल्यावर आणि स्टॅमिना वाढल्यानंतर पुढच्या टप्प्यासाठी पुन्हा नवीन प्लान तयार करा.
3- योग्य जागा, योग्य साधनं आणि योग्य सुरक्षा
व्यायामासाठीची जागा योग्य आहे का, त्यासाठीची योग्य साधनं आपण वापरतो आहोत ना आणि त्यापासून आपल्याला काही दुखापत तर होणार नाही ना, याची काळजी घ्यायलाच हवी. शक्यतो योग्य प्रशिक्षकाकडून ट्रेनिंग घेतलं तर केव्हाही उत्तम.
समजा तुम्ही रनिंगला सुरुवात केली, तर कुठल्या जागी आपण पळतोय, रनिंगचे योग्य शूज आपल्याकडे आहेत की नाहीत हे तपासायला हवं. साधं हॉटेलात किंवा सिनेमाला गेलो तरी आपले किती पैसे खर्च होतात हे पाहा. मात्र शूजवर किंवा व्यायामाच्या योग्य साधनांसाठी खर्च करायचा म्हटलं की लगेच आपल्याला खिशाची आठवण येते.
4- उतावीळपणा नको
व्यायामाला सुरुवात करीत नाही, तोच अनेक जण रोज आरशासमोर उभे राहून आपल्या बॉडीत किती सुधारणा झाली, आपलापेक्षा इतर जण किती ‘फिट’ आहेत याची तुलना करायला लागतो. मात्र थोडा धीर धरायला हवा. सगळ्याच गोष्टी एकदम खायला गेलं तर अपचन होतं. व्यायामाचंही तसंच आहे. इतरांकडे पाहून व्यायाम करण्यापेक्षा आपल्या शारीर क्षमतेनुसार हळूहळू त्यात वाढ करायला हवी.
5- एकावेळी एकच गोष्ट
एकाच वेळी खूप गोष्टी करण्याच्या फंदात पडू नका. म्हणजे एकाच वेळी मला स्टॅमिनाही पाहिजे, एंड्यूरन्सही हवा, स्ट्रेंग्थही हवी आणि फ्लेक्झिबिलिटीही. असं होत नाही. त्यासाठी हळूहळू प्रय} केले पाहिजेत. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, सध्या आपण जेवढा व्यायाम करतोय, त्याची तीव्रता त्यापुढच्या आठवड्यात दहा टक्क्यांपेक्षा अधिक नको. म्हणजे समजा तुम्ही रोज दोन किलोमीटर पळता, पुढच्या आठवड्यात अंतर वाढवताना ते 2.2 किलोमीटरपेक्षा अधिक नको. एकाच वेळी मला वेगही वाढवायचाय आणि अंतरही वाढवायचंय, असं तर अजिबात नको. अगोदर अंतराचं ध्येय गाठल्यानंतर, त्यात सातत्य आल्यानंतर वेगाकडे लक्ष द्या. सगळ्याच बाबतीत हा नियम लागू आहे.
6- कोणाबरोबर तुम्ही राहता?
फिटनेसचं तुमचं ध्येय आहे, पण ज्यांनी कधीच व्यायाम केला नाही, व्यायामाच ज्यांना मनापासून वावडं आहे, त्याची जे कायम खिल्लीच उडवतात, अशाच लोकांसोबत तुम्ही जास्त काळ राहात असलात तर आपली मनोवृत्तीही लवकरच तशी नकारात्मक बनू शकते. त्याऐवजी ज्यांचं ध्येय आपल्यासारखंच आहे, अशा लोकांशी थोडा याराना ठेवला, तर व्यायामातलं आपलं सातत्य कायम राहू शकतं.
- तेव्हा या गोष्टींकडे लक्ष द्या आणि राहा कायम फिट.