वाफेच्या आकर्षणातून शेतकऱ्याच्या मुलानं तयार केली ‘गोड’ ऊर्जा
By admin | Published: March 24, 2017 04:00 PM2017-03-24T16:00:45+5:302017-03-24T16:00:45+5:30
देशातली ही सर्वसामान्य माणसं.त्यांच्या त्यांच्या गरजेतून त्यांनीकाही संशोधन सुरू केलं. रुढार्थानं यातील कोणीही संशोधक नाही. काही तर अगदी अल्पशिक्षित
खव्याची गोडी -
देशातली ही सर्वसामान्य माणसं.त्यांच्या त्यांच्या गरजेतून त्यांनीकाही संशोधन सुरू केलं. रुढार्थानं यातील कोणीही संशोधक नाही. काही तर अगदी अल्पशिक्षित. पण ही संशोधनं त्यांच्यापुरती
मर्यादित न राहता हजारो लोकांसाठी उपकारक ठरली. त्यांच्या या नाविन्यपूर्ण शोधानिमित्त
राष्ट्रपतींनीही त्याचा गौरव केला आणि राष्ट्रपती भवनात त्यांच्या या उपयुक्त संशोधनाचं प्रदर्शन भरवलं.
अशा प्रतिभावंतांची ही ओळख..
#Innovationscholars- 7
दुधापासून खवा कसा बनवतात?
त्याची पारंपरिक पद्धत म्हणजे दुध कढईत घालून भरपूर उकळवायचं. त्यासाठी त्याला खालून भरपूर उष्णता द्यायची. दुधाचा बऱ्यापैकी घट्ट गोळा होईपर्यंत दुध आटवत राहायचं. दुध, तयार होणारा खवा जळू नये, कढईला लागू नये यासाठी तो सतत हलवत ठेवायचा. त्यानंतर बऱ्याच वेळानं आणि मोठ्या कष्टानं हा खवा तयार होतो.
घरच्याघरी आपण हा खवा बनवणार असू, तर ठीक, पण जेव्हा मोठ्या प्रमाणात खवा तयार केला जातो, तेव्हा त्यासाठी दुधाबरोबरच खूप मोठ्या प्रमाणावर लाकडं आणि पाणीही लागतं. तयार झालेला खवा गार करण्यासाठी आणि तो चांगला राहावा यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करावा लागतो.
दुधापासून खवा तयार करण्याची खूप मोठी इंडस्ट्री भारतात आहे. खवा तयार करण्यासाठी आता आधुनिक पद्धत वापरली जात असली, त्यासाठी मोठमोठ्या बॉयलर्सचा वापर होत असला, तरी त्यातही मोठ्या प्रमाणात लाकडं जाळली जातातच.
आता आधुनिक पद्धतीत बॉयलरद्वारे तयार होणाऱ्या वाफेच्या ऊर्जेचा वापर खवा बनवण्यासाठी होतो. मात्र वाफ तयार होण्यासाठी या बॉयलर्समध्येही लाकडंच जाळली जातात. तयार झालेली ही वाफ वेगवेगळ्या पाईप्सद्वारे बऱ्याच ठिकाणी फिरवली जाते आणि त्या त्या ठिकाणी खव्यासाठी कढयाही ठेवलेल्या असतात. पण याही पद्धतीत मोठ्या प्रमाणात लाकडांचा नाश होतो, तयार झालेल्या वाफेची गळती होते. पाण्याची नासाडी तर महामूर..
समजा शंभर लिटर दुधाचा खवा तुम्हाला बनवायचा आहे, तर त्यासाठी सुमारे शंभर किलो लाकूड जाळावं लागतं, चार हजार लिटर पाण्याची गरज त्याला लागते आणि त्याशिवाय इतर विविध कारणांसाठी लागणारी वीज वेगळीच.
या साऱ्याच गोष्टींची इतक्या मोठ्या प्रमाणात होणारी नासाडी टाळायची तर त्यासाठी काय करता येईल?
राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातला सुभाष ओला नावाच्या तरुणाला या प्रश्नानं छळलं.
का म्हणून इतकी लाकडं, पाणी आणि वीज वाया घालवायची?
- या प्रश्नाचा भुंगा त्याच्या डोक्यात घुसला आणि मग तो सुटलाच.
खरं तर सुभाष एका शेतकऱ्याचा मुलगा. त्याचे वडील बोअरवेल खोदायचंही काम करायचे. सुभाष अभ्यासात हुशार असला तरी घरच्या परिस्थितीमुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडून कामधंद्याला लागावं लागलं. वडिलांबरोबर तोही बोअरवेल खोदायचं काम करू लागला. बरोबरीनं शेतीही करत होताच. हातातोंडाची गाठ घालता घालता मेटाकुटीला यायचा. म्हणून कॉम्प्युटरचे पार्ट एकत्र करून ते असेम्बल करयाचं कामही करू लागला.
विज्ञानाची कुठलीच पार्श्वभूमी त्याला नाही, पण लहानपणापासूनच वाफेचं आणि वाफेच्या शक्तीचं त्याला मोठं अप्रूप होतं. शाळेत जाताना रस्त्यानं जाणाऱ्या दुचाकी, मोटरसायकल्स जेव्हा तो बघायचा, तेव्हा त्या वाहनांपेक्षाही त्यांच्या सायलेन्सरकडेच याचं जास्त लक्ष असायचं. त्यातून येणाऱ्या गरम हवेचं काय करता येईल असा विचार त्याच्या डोक्यात चालू असायचा. याच कुतुहलातून आणि ‘प्रयोगातून विज्ञान’ करत वाफेच्या ऊर्जेवर फिरू शकणारं एक छोटं चाक त्यानं विकसित केलं. त्या ऊर्जेवर सहा वॅटचा बल्ब प्रकाशित होऊ शकत होता. त्यावेळी तो आठवीत होता!
एकदा जयपूर गेला असताना सुभाषनं खवा बनवणारी फॅक्टरी पाहिली. त्यावेळी तिथे वाया जाणारी एवढी मोठी वाफ आणि ऊर्जा पाहून तो अस्वस्थ झाला. लहानपणी असणारं वाफेचं अप्रूप पुन्हा उफाळून आलं आणि तो झपाटलाच.
तब्बल दहा वर्षं त्यानं त्यावर अभ्यास केला. अनेक प्रयोग केले, त्यासाठी झपाटल्यागत मिळेल तिथून ज्ञान मिळवलं. पण पाहिजे तसं यश त्याला मिळत नव्हतं. पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च होत होता. ‘कार्टं घरादाराचं दिवाळं काढून सर्वांना एक दिवस रस्त्यावर आणील’ म्हणून वडीलही त्याच्यावर वैतागायचे. आईनं मात्र सुभाषला नेहमीच साथ दिली. त्यातूनच त्यानं एक नवी पद्धत विकसित केली. ही पद्धत मात्र बाजारात असणाऱ्या आधुनिक तंत्रांपेक्षाही अधिक उपयुक्त आणि प्रगत होती.
वाया जाणाऱ्या वाफेचं प्रमाण जवळजवळ नगण्य होतं. खवा बनवण्यासाठी जाळाव्या लागणाऱ्या लाकडांचं आणि पाण्याच्या नासाडीचं प्रमाणही खूपच कमी झालं होतं.
खवा बनवण्यासाठी त्यानं एक नव्या पद्धतीचं बॉयलर बनवलं. त्याचं आयुष्य पूर्वीच्या तुलनेत खूपच चांगलं होतं. त्यातून तयार होणारी वाफ रिसायकल करता येऊ शकत होती. ज्याठिकाणी अगोदर तासाला एक हजार लिटर पाण्याची गरज लागत होती, तिथे आता फक्त काही लिटर पाणी पुरेसं होऊ लागलं. पाणी आणि ऊर्जेची तब्बल साठ टक्क्यांपेक्षाही अधिक बचत होऊ लागली. शिवाय या यंत्राची किंमतही पुर्वीच्या तुलनेत बऱ्यापैकी कमी होती. खवा सतत हलवत राहिलं नाही तर तो खाली लागतो. त्यासाठी प्रत्येक कढईवर किमान एका माणसायची गरज अगोदर लागायची. सुभाषच्या नव्या तंत्रानं मनुष्यबळाची ही गरजही कमी झाली. खव्याची गोडी त्यामुळे खऱ्या अर्थानं अधिकच वाढली.
इतकंच नाही, दुधापासून खवा तयार करण्यासाठी सुभाषनं तयार केलेल्या या बॉयलरचा आणि त्यानं विकसित केलेल्या तंत्राचा वापर इतरही अनेक उद्योगांत होऊ शकतो.
हॉस्पिटल्स, प्लायवूड इंडस्ट्री, टेक्सटाईल, खाद्यपदार्थ, औषध निर्मिती, पेपर मिल्स, हॉट वॉटर बॉयलर जनरेटर, लॉँड्री.. यासारख्या कित्येक उद्योगांसाठी सुभाषचं हे संशोधन खूपच उपयुक्त आहे. त्यातून केवळ ऊर्जेचीच नासाडी थांबणार नाही, तर या सर्व उद्योगांना त्यानं एक नवी दृष्टीही दिली आहे.
शेतकऱ्याच्या या मुलाचा भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही थेट राष्ट्रपती भवनात त्याचा पाहुणचार करून हृद्य सत्कारही केला.
- प्रतिनिधी