टेक चार्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:04 PM2017-08-02T15:04:20+5:302017-08-03T03:08:51+5:30

शिक्षणव्यवस्थेला दोष देणं, पालकांचं टेन्शन घेणं, मार्केटला शिव्या घालणं हे सगळं करत बसाल, तर तुमचे हाल कुत्रा खाणार नाही. 

Take charge! | टेक चार्ज!

टेक चार्ज!

आयबीएम सारख्या बलाढ्य कंपनीत दीर्घकाळ काम करून अमेरिकेतून भारतात परतलेले ख्यातनाम तज्ञ डॉ.भूषण केळकर यांच्याशी गप्पा

सध्या शिकत असलेल्या आणि येत्या २-३ वर्षांत इंजिनिअर होणाºया मुलांना तुम्ही काय सांगाल?
- जे खरंच आता मनापासून शिकत आहेत आणि पुढच्या २-३ वर्षांत इंजिनिअर म्हणून बाहेर पडणार आहेत त्यांच्यासाठी येत्या काळात भरपूर संधी असणार आहेत. तंत्रज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत वेगानं पोहचतंय. थ्रीजी-फोरजी तर आता आहेतच, पण इंटरनेटच्या वेगाबरोबर त्यांच्या वापरकर्त्यांची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यामुळे देशांतर्गत डिजिटल मार्केट प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. फक्त यासाठी योग्य मार्ग वेळीच निवडायला हवा. केवळ कोडिंग, टेस्टिंग डोक्यात असेल तर मी तर म्हणेन आत्ताच जागे व्हा. नाहीतर खूप अवघड आहे. सध्याचा विचार करता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी यात भविष्यात चांगल्या संधी आहेत. अमेरिकेत सायबर सिक्युरिटी विषयात असणाºया तज्ज्ञांची संख्या एक लाखावर आहे. लोकसंख्येत भारत अमेरिकेच्या जवळपास चौपट आहे आणि आपल्या देशात हीच तज्ज्ञांची संख्या दोन वर्षांपूर्वी आठ हजार इतकी होती. येत्या काळात आधारकार्ड नियमित उपयोगात येईल. आता जीएसटी वापरात आला आहे. तंत्रज्ञानावर आधारित विकासाचे अनेक प्रकल्प येऊ घातलेत आणि या सगळ्यात आपल्याला तज्ज्ञांची गरज आहे. केवळ आजचा विचार न करता उद्याच्या बदलांचा अंदाज घेऊन आजच त्या दृष्टीने कामाला लागा.

इंजिनिअर तर झालो पण नोकरी नाही अशी अनेकांची अवस्था आज दिसते, त्यांनी कसा विचार करायला हवा..
- शिक्षण झालंय आणि नोकरी चालू आहे किंवा नोकरीचा शोध चालू आहे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा हा काळ आहे. आपली आवड लक्षात घेऊन लगेचच त्यांनी निर्णय घ्यायला हवा. त्यांना आहे त्यातच पुढे जायचं असेल तर नवे कोर्स शिकण्याला पर्याय नाही. पण त्याशिवाय खरंतर संधी खूप आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यादृष्टीने लगेच सुरुवात करायला हवी. विशेषत: विश्लेषण (अ‍ॅनालिसिस), व्यवस्थापन (मॅनेजमेण्ट), माध्यम (मीडिया) यांच्याशी निगडित खूप संधी आज आहेत. नजीकच्या काळात त्या अजून खूप संधी उपलब्ध होतील असं दिसतं. उदाहरणच द्यायचं झालं तर ‘सोशल मीडिया अनॅलिसिस’. त्यावरून होणारं मानवी भावनांचं विश्लेषण जाहिरात क्षेत्रातील कंपन्यांना, राजकीय पक्षांना निवडणूक धोरण ठरवताना फायदेशीर ठरले आहे. त्यामुळे भविष्यात अशा संधी खूप असणार आहेत. फक्त आता त्या दिशेने पुढे जायला हवं.

‘आयटीमध्ये जॉब लगेच मिळतात’ असा विचार करून वेगवेगळ्या शाखांमधील इंजिनिअर्स कामासाठी हे क्षेत्र निवडतात. पण आयटीत नोकºया नाहीत, अशी चर्चाही सतत होते..
- या इंजिनिअर्सना मी सांगतो की असा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. कारणं दोन आहेत. एक म्हणजे, नजीकच्या काळात मेकॅनिकल, सिव्हिल यांसारख्या मूलभूत शाखांचं मार्केट विस्तारतंय. आतापर्यंत त्यातल्या त्यात बरी मुलं ही चांगल्या पगाराची पटकन मिळणारी नोकरी याचा विचार करून आपली मूळ शाखा सोडून आयटीमध्ये येत होती; अजूनही येत आहेतच. पण त्यामुळे मेकॅनिकल, सिव्हिल क्षेत्रात खºया अर्थाने चांगल्या लोकांची वानवा आहे आणि येणारा काळ बघता त्यांना लोकांची गरजही आहे. या शाखांशी निगडित मार्केटच्या विस्ताराचा वेग आयटीपेक्षा कमी आहे त्यामुळे अनेकांचा गैरसमज होतो. आता हळूहळू तोही वाढतोय. ‘विचार करा’ असं सांगण्यामागचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही ते काम करताना आनंदी असणार आहात का याचा विचार करा. मला वाटतं तो आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याचा खूप प्रभाव तुम्ही करत असलेल्या कामावर, त्याच्या दर्जावर पडत असतोच.

इंजिनिअर झाल्यावर अनेकजण म्हणतात, कामात मन रमत नाही, रुटीन, तेच ते काम असतं हे कोडं कसं सोडवायचं?
- आपण काम आवडतं म्हणून करण्यापेक्षा केवळ ते जमतं म्हणून स्वीकारतो. माझ्याच उदाहरणावरून मी सांगतो. मी आयआयटी केलं. नंतर आयबीएमसारख्या कंपनीमध्ये काम केलं. ते मला जमत नव्हतं का? तर नक्कीच जमत होतं. त्यामुळेच तर मी इतकी वर्षं तिथे टिकलो. पण मला शिकवायचं होतं. मला ते आवडतं. त्यामुळे मग मी नोकरी सोडली आणि आता मी मुलांना शिकवतो. माझं साधं म्हणणं आहे. रात्री आठला घरी गेल्यावर वाटलं पाहिजे की ‘वाह! आज मजा आली!’ नाहीतर ‘चला गेला एक दिवस एकदाचा’ असं रडगाणं नको.

‘भविष्यात जॉब्ज कसे असतील, विशेषत: आयटी क्षेत्रात याचा आज अंदाज बांधणंही शक्य नाही’ असं अनेक तज्ज्ञांचं मत येतंय. या गोष्टीकडे तुम्ही कशाप्रकारे बघता?
- आज उबर, ओला या चारचाकी सेवेचा प्रभाव आपण बघतोय. आतापर्यंत कोणाच्या ध्यानीमनीही नव्हतं की असा काही व्यवसाय निघेल, त्यात इतक्या वेगळ्या प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. आज ते घडतंय. आता लोकं गाडी खरेदी करण्याआधीही विचार करतील. मला हवी तेव्हा जर गाडी चालकासकट मिळत असेल तर काय वाईट आहे? या सगळ्याचा विचार आपण केला नव्हता. कॅश आॅन डिलिव्हरीसारखी सुविधा, गुगल मॅप अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा आपण विचारही केला नव्हता त्या आज आहेत, त्यामुळे अनेकांना नोकºया आहेत. आज मार्कझुकेरबर्गच्या घरी स्वत:चा बॉट आहे जो त्याला घरकामात मदत करतो. पुढच्या काही वर्षांत तुमच्याकडेही काहीतरी असेल ज्यामुळे इस्त्री करणारा माणूस, घरकामासाठी येणारी बाई यांची तुम्हाला गरज लागणार नाही. ही कामं पुढच्या काळात राहणार नाहीत. सेवांचं स्वरूप बदलतं आहे..

अशा माहीत नसलेल्या जॉब मार्केटसाठी स्वत:ला तयार करण्यासाठी तरुण मुलांनी काय करावं?
- उत्तर सोप्पं आहे. कॉलेज, युनिव्हर्सिटी यांच्या पलीकडे जाऊन शिक्षण घ्यायला हवं. ज्ञान महत्त्वाचं. कॉलेज किंवा तुमचं महाविद्यालय नाही. कोर्सेस करा. आयटी क्षेत्रासाठी निरनिराळे आॅनलाइन कोर्सेस आज उपलब्ध आहेत. फ्री आहेत. फी असलीच तर ती काही फार नाही. जमतील आणि मुख्य म्हणजे आवडतील तितके आॅनलाइन कोर्सेस करा. भविष्यात तुमची गरज कुठेही पडू शकते. त्यातून तुम्हाला तुमच्या आवडीचं काम मिळणार आहे. हे सर्व जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर करा. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आपल्या शिक्षणव्यवस्थेतून काहीतरी होईल, मार्ग सापडेल याची अपेक्षा अजिबात ठेवू नका. आज शाळांमध्ये मुलांची कल चाचणी होत नाही. मुलांना काय आवडतं हे जाणून घेतलं जात नाही. सतत चर्चा होत असलेला हा सगळा विषय आहे. त्यात परत आपण नको शिरायला. मी म्हणेन की तक्र ार करणं बंद करा. ‘यू टेक चार्ज!’ तुमचं तुम्ही ठरवा आणि कामाला लागा.

इंजिनिअर व्हायचं असं अनेकजण आणि त्यांचे पालक खूप आधीपासून ठरवतात, त्यांची तयारी आठवीपासून सुरू होते, जेईईची तयारी करतात.. कसं बघायला हवं या विषयाकडे?
- याचे दोन भाग आहेत. पहिला म्हणजे जेईईच्या परीक्षेचं स्वरूपच असं आहे की त्यासाठी अधिक काळ अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे अगदीच आठवी-नववी नाही पण दहावीपासून साधारण अंदाज घेऊन त्यादिशेने जाणं योग्य ठरेल. दुसरा मुद्दा म्हणजे आईवडिलांच्या इच्छेचा. ‘एकतर माझं चांगलं चाललंय त्यामुळे तू माझ्यासारखा हो; नाहीतर माझं स्वप्न पूर्ण झालं नाही आता तू ते पूर्ण कर’ या दोन विचारांमुळे अनेकदा पालकांच्या इच्छा लादल्या जातात. तंत्रज्ञान तुमच्या मुलाला आकर्षित करतं का? तुम्हाला उत्तेजित करतं का? हे पालकांनी ओळखणं आवश्यक आहे आणि हे नववी-दहावीमध्ये कळू शकतं. या पिढीने ‘आपल्याला खरंच काय हवंय’ हे जाणणं फार गरजेचं आहे.

असाच गोंधळ अभियांत्रिकी शाखा कशी निवडायची याविषयीही आहे, त्याबद्दल काय सांगाल? मुळात ती निवडण्याची योग्य वेळ कोणती?
- योग्य वेळ निश्चितच अकरावी, बारावी. अभियांत्रिकी शिक्षणाविषयी बघायचं झालं तर एक ठरवून दिलेली कार्यपद्धती आणि त्यानुसार होणारं काम या गटात मेकॅनिकल, सिव्हिल या शाखा येतात. कम्प्युटर सायन्स हे तुलनेनं अधिक सर्जनशील आहे. त्यामुळे मूलभूत पण ठोस अशा कामाची आवड असेल तर बाकी शाखांचा विचार करावा. सततच्या बदलाची आवड असेल तर कम्प्युटर सायन्सचा विचार करू शकता. अर्थात हे अगदीच ढोबळ आहे आणि कुठल्या शाखेपेक्षा आधी तुम्हाला काय आवडतं हे बघणं गरजेचं.


अनेकांना भीती वाटते, आपलं काही चुकलं तर?
आपल्या शिक्षणव्यवस्थेतून काय करू नका हेच शिकवलं जातं. त्यातून कसलीच नवनिर्मिती होत नाही. आम्ही नवीन काही करू शकतो ही ऊर्मी नाहीशी होते. चुका महत्त्वाच्या असतात. पेनसेल्वेनिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये तर अभियांत्रिकी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठी 'Failure 101' नावाचा विशेष कोर्स आहे. ज्यात अधिक चुका करणाºया विद्यार्थ्यांना अधिक चांगली श्रेणी दिली जाते. विद्यार्थ्यांनी धोका पत्करून अधिक प्रयोगशील व्हावं हे त्यातून अपेक्षित आहे. स्वीडन, इस्राईल या देशांमध्ये होत असलेली प्रगती हे त्यांच्या अशाच प्रकारच्या शिक्षणव्यवस्थेचं यश आहे. आपल्याकडे व्यवस्थेतून किती बदल घडेल माहीत नाही; त्यामुळे पालकांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. लवकरात लवकर स्वत:ला जाणून घ्या आणि स्वत:चं करिअर घडवा, एवढंच मी सगळ्याच गटातल्या मुलांना सांगेन.


एक चांगला इंजिनिअर बनण्यासाठी पाच गोष्टी करायला हव्यात :
1 पालकांनी टोकाच्या भूमिका घेऊन आपली मतं लादणं बंद करावं. कारण सुरवात तिथूनच होते.
2 व्यवसायाला संधी आहे का हे पाहण्यापेक्षा मला संधी आहे का हे पाहून निर्णय घेतला पाहिजे. थर्ड क्लास इंजिनिअर होण्यापेक्षा फर्स्ट क्लास कलाकार होण कधीही उत्तम हे पालकांनी आणि मुलांनी, दोघांनीही समजून घेतलं पाहिजे.
3 क्षेत्राला असलेला वाव, तुमची आवड, कौशल्य आणि क्षमता ह्यांची योग्य सांगड घालून निर्णय घ्यायला हवा.
4 भविष्याचा अंदाज घ्यायला शिकलं पाहिजे. अजून चार वर्षांनी, पाच वर्षांनी काय परिस्थिती असेल याचा विचार करून पुढचा निर्णय घेतला पाहिजे.
5 कोणावरही अवलंबून न राहता स्वत: योग्यवेळी निर्णय घेऊन त्यासाठी तयारी करायला हवी. आता आयटी क्षेत्राबद्दल सांगायचं झालं तर coursera, edX, codecademy  वरून कोर्स करता येऊ शकतात. व्हर्च्युअल इंटर्नशीप सारखे पर्याय आहेत. topcoder, गूगल सारख्या कंपन्यांच्या निरिनराळ्या स्पर्धा आहेत. CloudCrowd सारखे आॅनलाइन काम करण्याचे पर्याय आहेत.

Web Title: Take charge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.