आजा नच ले.
By admin | Published: May 9, 2014 11:58 AM2014-05-09T11:58:55+5:302014-05-09T11:58:55+5:30
भल्याभल्यांना नाचायला शिकवणारे तरुण कोरिओग्राफर, लोकांना आपल्या तालावर सहज नाचवणं त्यांना कसं जमतं ?
Next
>भल्याभल्यांना नाचायला शिकवणारे तरुण कोरिओग्राफर, लोकांना आपल्या तालावर सहज नाचवणं त्यांना कसं जमतं ?
बॉलिवूड, टॉलिवूड, हीपहॉप, सालसा, बॅले, हे शब्द टीव्हीवरच्या रिअँलिटी शोंनी घरोघर पोहचवले आणि घरोघरच्या मुलामुलींनाच नाही तर
त्यांच्या ‘ममी-पपां’ना पण वाटू लागलं की आपण नाचावं. तसंही ऑफिसमधले ‘कार्पोरेट इव्हेण्ट’ मुलांच्या शाळा-कॉलेजातल्या पाटर्य़ा यात नाचून सहभागी होणं कंपलसरी होऊ लागल्याचा हा काळ घरोघर येऊन ठेपलाच.
कुणाला तर फिटनेससाठी नाचून पहायचंय तर कुणाला स्मार्टनेससाठी. कुणाला शिकायचाच आहे सालसा कपल डान्ससाठी. तर कुणाला करून पहायचंय कडक आयटम नंबर. डान्स शिकणं हे स्टाईल स्टेटमेण्ट होण्याचं आणि प्रतिष्ठेचं लक्षण होऊन बसलं. आणि त्यातून ताल असणार्या अनेक पायांना करिअरची एक संधीच मिळाली.
हौशीनं सालसा, जॅझ, बॅले, हीपहॉप आणि बॉलिवूड स्टाईल डान्स शिकणारे अनेकजण ‘डान्स टीचर’ झाले, मोठमोठय़ा कपंन्यातल्या बडबड्या अधिकार्यांना आपल्या तालावर नाचवत त्यांना डान्स शिकवू लागले.
ते इव्हेण्ट मॅनेज करू लागले, काहींनी खास लहान मुलांसाठी तर काही फक्त महिलांसाठी क्लासेस सुरू केले.
स्वत: डान्स शिकत असताना, नाचण्याचं थ्रिल अनुभवत असताना दुसर्यांना डान्स शिकवत अनेकजण स्वत:च ‘कोरिओग्राफर’ झाले.
जोषात नाचणार्या पावलांनी निवडलेली ही नव्यानं निर्माण झालेली वाट, त्या वाटेवर चालणार्या तरुण कोरिओग्राफर मित्रमैत्रिणींशी या खास गप्पा.
बॉस, लेट्स डान्स.
कॉर्पोरेट्समध्ये बड्या पदांवर काम करणार्यांना आठ-पंधरा दिवसांत कसा डान्स शिकवतात?
तेव्हा मी नुकताच दहावी उत्तीर्ण झालो होतो. पुढची वर्षं महत्त्वाची असल्याने साहजिकच घरच्यांचं ‘अभ्यास कर, अभ्यास कर’ असं पालुपद सुरू होतं. त्यात माझा भाऊ इंजिनिअर, तर बहीण एमबीए. मला मात्र अभ्यासापेक्षा नेहमीच डान्स जवळचा वाटला. मायकल जॅक्सननं पार वेड लावलं होतं. त्याच्यासारखं नाचायचं एवढंच कळत होतं. अखेर न राहवून मी एक डान्स क्लास जॉइन केला. स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागलो, चमकू लागलो, बक्षिसे मिळवू लागलो. घरच्यांचा डान्सला असलेला विरोधही मग मावळू लागला.
पुढे मुंबईत सहा महिने प्रशिक्षण घेतलं. आणि २00९ मध्ये ‘डान्स एक्स्ट्रीम’ ही स्वत:ची इन्स्टिट्यूट सुरू केली. मला विचाराल काय असतो, डान्स? तू कोरिओग्राफ करतोस म्हणजे काय करतोस.
१0 टक्के काम आणि ९0 टक्के मनोरंजन हे माझ्या कोरिओग्राफीचे सूत्र आहे. समोरची व्यक्ती आपल्याला कसा डान्स शिकवते, यापेक्षा ती आपल्याला किती एन्टरटेन करते, कम्फर्टेबल बनवते, याला डान्स शिकायला येणारे अधिक महत्त्व देतात. जग विसरून मी नाचलो, आणि तसा फील शिकणार्यांना दिला तर ते नाचायला शिकतील. माझ्याकडे डान्स शिकायला ३ ते ६0 वर्षे वयोगटातली माणसं येतात. काही जण तर आयुष्यात पहिल्यांदाच नाचणार असतात, बिचकतात. त्यांना स्वत:ला मोकळं सोडायला लावणं हे खरंतर माझं काम. मुख्यत्वे महिला. अनेक जणी व्यायाम कंटाळवाणा वाटतो अन् त्यासाठी वेळही नसतो. म्हणून डान्स करतात. त्यातून व्यायामही होतो. पण खरी गंमत असते ती विविध कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये बड्या पदांवर काम करणार्यांना त्यांच्या कंपनीच्या इव्हेण्टसाठी डान्स शिकवण्याची. आपापली पदं, रोजचे व्याप विसरून त्यांना आपल्या तालावर नाचायला लावणं, आणि त्यांनी ते एन्जॉय करणं हे खरं आमचं कसब. ते वर्कशॉपचे दिवस त्यांच्याइतका आनंद मलाही देतात. कारण प्रत्येक वेळी शिकणारा वेगळा असतो, त्याची आवड वेगळी असते. म्हणून आधी त्या-त्या माणसाला ओळखावे लागते. एखाद्या इव्हेंटसाठी ९-१0 दिवस सकाळी १0 ते रात्री १0 पर्यंत आम्ही शिकवत असतो. त्या-त्या व्यक्तीचे वय, तिने यापूर्वी कधी डान्स केला आहे का, कोणत्या प्रकारचा डान्स त्याला किंवा तिला आवडेल, अशा बर्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. त्यासाठी आम्हालाही ‘कोऑर्डिनेशन’ नावाची एक कला नव्यानं शिकावी आणि स्वत:त मुरवावी लागते.
‘कॉस्च्युम मॅनेजमेंट’ हे आणखी एक महत्त्वाचं काम. समजा, इव्हेंटमध्ये १00 जण सहभागी झाले असतील, तर त्या सगळ्यांचे कॉस्च्युम्स सांभाळावे लागतात. इव्हेंटपूर्वी कॉस्च्युम आणणे आणि नंतर ते परत करणे ही महत्त्वाची ‘ड्यूटी’च असते. याशिवाय मेकअप, आर्थिक व्यवहार, प्रमोशन्स, डेटा कलेक्शन हे सगळं ओघानं आलंच.
ही अशी कोरिओग्राफी म्हणजे लोकांशी कनेक्ट होणंच. त्यांच्याशी बोलून, त्यांच्यात मिसळून त्यांना शिकवायचं असतं. लोकांनी आपल्याला टाळलं नाही, स्वीकारलं पाहिजे म्हणून स्वत:चा ताल आणि तोल सांभाळणं. तो सांभाळतच मी सध्या माझी कोरिओग्राफी आणि इव्हेण्ट मॅनेजमेण्टची कामगिरी एन्जॉय करत जगतोय.
- दिनेश राठोड, कोरिओग्राफर
सालसा. बॅले.हीप हॉप
शिकता शिकता शिकवणं हे वाटतं तेवढं सोपं नाही!
मीसाधारणत: दहावीला असताना डान्सशी माझी ओळख झाली. ही ओळख नंतर घट्ट होत गेली. हृतिक रोशन हा माझा डान्समधील आयडॉल होता तेव्हा! त्याच्याइतका सहजसुंदर नाही; पण त्यावेळी थोडा फार डान्स मला जमत असे. पण हे सगळं घरच्या घरीच. एक दिवस अचानक आपण डान्स शिकायचा, असं मनात आलं. लगोलग कोरिओग्राफर सचिन शिंदेंना गाठलं अन् क्लास जॉइन केला. अन् काय सांगू? मीच मला नव्याने भेटलो! त्यापूर्वी नृत्यातले बारकावे, हावभाव याविषयी मला काहीच माहीत नव्हतं. डान्स शिकताना रोज मला काहीतरी नवीन शिकायला मिळालं. दिवसागणिक डान्समध्ये सुधारणा होत गेली. आत्मविश्वास वाढत गेला. एक वर्षभर प्रशिक्षण घेतलं. या काळात नृत्याव्यतिरिक्तही बरंच काही शिकायला मिळालं.
वर्षभराच्या मेहनतीनंतर मी सचिन सरांच्या ग्रुपमध्ये निवडलो गेलो. या ग्रुपला जॉइन केल्यावर समजलं की, जसा डान्स शिकताना संयम आवश्यक असतो, त्यापेक्षा अधिक तो शिकवताना असावा लागतो. म्हणूनच मला कोरिओग्राफी नेहमीच खूप इंटरेस्टिंग वाटत आली आहे. प्रत्येक गाणं म्हणजे कसं एक नवीन आव्हान असतं.. मी कोरिओग्राफी एन्जॉय करतो; मात्र ही ‘एन्जॉयमेंट’ आम्हाला सहजासहजी मिळवता येत नाही. प्रत्येक गाण्याचा मूड, त्याची भाषा, त्यातून काय संदेश द्यायचाय, याचा अभ्यास करून त्या गाण्याचा संपूर्ण माहोलच आम्हाला डान्स स्टेप्समध्ये निर्माण करायचा असतो. त्यानंतर महत्त्वाचं काम असतं ते ग्रुप तयार करण्याचं अन् टीम लीडर ठरवण्याचं. समजा, एखाद्या संगीत कार्यक्रमासाठी १00 जण नृत्य शिकायला आले असतील, तर आमच्या १0 सहकार्यांच्या ग्रुपमध्ये या १00 जणांचे वाटप करून मगच पुढचं काम सुरू होतं.. बॉलिवूड, टॉलिवूड, हीपहॉप, सालसा, बॅले असे नृत्याचे अनेक प्रकार आहेत. जो डान्स शिकवायचाय त्यानुसार गाणं निवडलं जातं. लहान मुलांनासुद्धा शिकवायचं असल्यास डान्स स्टेप दाखवली अन् ‘करा बरं इतकं’ असं करून चालत नाही. सगळं त्यांच्या कलाने घ्यावं लागतं. मग मुलांसाठी आम्ही शाळेसारखी पद्धत अवलंबतो. शाळेत जसं मुलांना कळेल या दृष्टीने प्रत्येक गोष्ट सोपी करून सांगितली जाते तसं करीत मुलांसाठी स्टेप्स ठरवल्या जातात.
आम्हा कोरिओग्राफर्सना दोन आघाड्यांवर काम करावं लागतं. क्लास आणि इव्हेंट. टीम लीडर निवडणे हे दोन्ही आघाड्यांतलं महत्त्वाचं काम. टीम लीडर जर कॉन्फिडंट असेल तर पुढचं सगळं ठीक होतं.
सध्या मी कॉलेज करतोय आणि डान्सदेखील. मी एक, दोन किंवा तीन दिवसही कॉलेजला गेलो नाही तर काही वाटत नाही; पण एक दिवसही डान्स केला नाही, तो शिकवला नाही, तर मला तो दिवसच अपूर्ण वाटतो.. काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. नृत्याच्या नशेत बेहोश होण्याचा आनंद हेच माझे पॅशन बनले आहे..
- अभिजित रॉय-चौधरी, कोरिओग्राफर
एका ‘इव्हेण्ट’ची झिंग
ज्यांना नाचून पहायचंय, त्यांना नाचण्याचा आनंद देणं सगळ्यात महत्त्वाचं.
डान्सची आवड शाळेपासूनच होती; पण डान्स वगैरे म्हणजे तद्दन फालतूपणा, असा एक गैरसमज त्या काळात होता. त्यामुळे क्लास वगैरे लावून डान्स शिकण्याचा प्रश्नच नव्हता. पण मी माझी आवड सोडली नाही. शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायचो. त्यातून ‘आपण फार वाईट डान्स करत नाही’ असा विश्वास निर्माण झाला. तोपर्यंत डान्स निव्वळ आवडीपुरता होता. मला खरं तर आयपीएस अधिकारी व्हायचं होतं. त्याचा अभ्यासही सुरू होता. पण दुसरीकडे डान्सही सुटत नव्हता. हळूहळू डान्सच माझे पॅशन बनला.
डान्ससाठी जे कल्चर, जी झिंग लागते, ती तेव्हा नाशकात नव्हती. त्यामुळं नाशकात राहून मला फारसं काही करता येणार नव्हतं. म्हणून मुंबई आणि गुजरातमध्ये नृत्य शिकलो. वेस्टर्न, लोकनृत्य असे सगळेच प्रकार अभ्यासले. तिकडे मी पाहिलं की, तिथल्या लोकांच्या जगण्यात नृत्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हा तसं आपल्याकडं नव्हतं. डान्स केला काय किंवा नाही केला काय, कोणाला फारसा फरक पडत नसे. हाच दृष्टिकोन मला बदलायचा होता. तोपर्यंत ‘बुगी-वुगी’सारख्या रिअँलिटी शोज्मुळे डान्सची क्रेझ घराघरांत पोहोचली होती.
् त्यातूनच अँकॅडमी सुरू झाली. शिवाय आम्ही ‘इव्हेण्ट’देखील सांभाळतो. कॉर्पोरेट इव्हेण्टस्, विवाह, फॅशन शो, गेम शो, बर्थडे पार्टी, लॉँचिंग समारंभ असे बरेच इव्हेण्ट करतो. देशभरात कार्यशाळा घेतो. प्रत्येकाचं एक वेगळं थ्रील असतं. या इव्हेण्टस्साठी बराच वेळ द्यावा लागतो. शिकायला येणार्यांसमोर ५-६ दिवसांत वेगवेगळ्या थीम्स ठेवतो. त्यांचा शारीरिक फिटनेस तयार करतो. बहुतेकदा शिकायला येणार्यांपैकी कोणालाच डान्स येत नसतो; पण त्यांच्याकडे इच्छाशक्ती असते. हाच मुख्य पॉइंट आहे. डान्स येतो की नाही हे आमच्यासाठी तेवढं मोलाचं नाही.. तुमची इच्छाशक्ती किी आहे, हे अधिक महत्त्वाचं असतं. त्यानंतर असतं ते स्टेप्स बसवणं. मी तर म्हणेन की हे ‘गॉड गिफ्ट’च असावं लागतं. आम्ही स्टेप्स तयार करतो, करून दाखवतो इथवर ठीक; पण आम्ही त्या समोरच्यावर लादू शकत नाही. आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही असंच केलं पाहिजे, असं आम्ही कधीच म्हणत नाही. तुमचा स्वत:चा आनंद त्यात आहे का, हे अधिक महत्त्वाचं असतं. अनेकदा स्टेप्स बदलाव्या लागतात. नव्याने मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी तुम्ही चांगले शिक्षक असावे लागतात. आपल्याला अन् समोरच्याला जे हवंय ते साध्य झालं की सोपं होतं सगळं..
आता तर नृत्याकडे व्यायामाच्या दृष्टिकोनातून बघितलं जाऊ लागलंय. अनेक जण फिटनेससाठी डान्स शिकायला येतात. त्यांना कोणत्याही स्पर्धेत, इव्हेण्टमध्ये सहभागी व्हायचं नसतं. फक्त शारीरिक तंदुरुस्ती हवी असते. पण त्यासाठी व्यायाम नकोसा वाटतो अन् डान्समधून व्यायाम करून ताजेतवाने व्हायला त्यांना आवडतं. यात महिलांची संख्या जास्त आहे. २५0 ते ३00 महिला माझ्याकडे शिकायला येतात. आता तर आम्ही ‘हसबंड बॅच’ सुरू केलीय. डान्स शिकायला येणार्या महिलांच्या पतीचं म्हणणं असं की, बायकोला डान्स येतो.. मला का नाही?
पूर्वी डान्स काहीच नव्हता अन् आता प्रत्येक जण डान्स शिकतोय; पण तरुणांनी एकदम एक्साइट होऊन, अतिउत्साहात, अतिआत्मविश्वासात राहून काम करू नये. यामुळं चुकीचं नृत्य शिकवलं जातं आणि हात-पाय मोडून घेण्याची वेळ येते. म्हणूनच आधी स्वत: परफेक्ट शिका अन् इतरांनाही तसंच शिकवा, असं मला वाटतं. मी अजूनही शिकतोय, येतं नाचता मला अशी स्टेज आयुष्यात कधीच येत नाही.येऊ नये.
- सचिन शिंदे, नृत्य प्रशिक्षक
चान्स पे डान्स
नाचता न येणार्यांची शिकवणी
डान्सबाबत काय सांगू? जगण्यासाठी आपल्याला जसं रोज जेवण लागतं ना तसंच माझं डान्सबाबत आहे. डान्स हे माझं सर्वस्व आहे.. माझा श्वास आहे. मी सध्या एका डान्स अँकॅडमीत कोरिओग्राफर म्हणून काम करतेय. नृत्यकलेचा वारसा मला माझ्या आईकडून मिळाला. तिला नृत्याची खूप आवड; पण आईला डान्स शिकण्याची परवानगी तिच्या घरातून कधी मिळालीच नाही. तिने हेच स्वप्न माझ्यात पाहिले अन् ते खरे करायचे ठरवले. आम्ही मूळ अकोला तालुक्यातले; पण माझ्या नृत्यकलेला अकोल्यात फारसा वाव मिळणार नाही, असं आईला वाटलं आणि तिने नाशिकला ‘सेटल’ व्हायचं ठरवलं.
२00९ ची गोष्ट असेल. अशाच एका कार्यशाळेत दांडिया, गरबा नृत्यात मी सहभाग घेतला होता. तेथे मार्गदर्शन करण्यासाठी सचिन शिंदे आले होते. त्यांना माझ्या गरबाच्या स्टेप्स आवडल्या, डान्स आवडला आणि त्यांनी मला थेट त्यांच्या ग्रुपमध्येच सामावून घेतले. माझ्यासाठी ही खूप मोठी संधी होती. आईचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल होते. डान्स अँकॅडमीत जॉइन झाले अन् मग सगळेच एकदम बदलले. मी लहानशा गावातून आली असल्याने माझे राहणीमान, कपडे, चालण्या-बोलण्यात थोडासा गावरान बाज होता; पण सचिन सरांबरोबर काम करताना,‘पॅशन’ म्हणून डान्स शिकताना माझे व्यक्तिमत्त्व अंतर्बाह्य बदलून गेले. पूर्वी चार जण जमले की, माझी बोलती बंद व्हायची. चारचौघांत बोलायला मला जमायचेच नाही. सतत भीती वाटायची. नृत्याने मात्र मला नवा चेहरा, आत्मविश्वास दिला. कोणत्या प्रसंगाला कोणते कपडे घालावेत, इथपासून तर इतरांशी बोलताना काय काळजी घ्यावी, या रोजच्या जीवनातल्या अगदी बारीकसारीक गोष्टीही मी शिकले. काय सांगू? जादूची कांडी फिरावी तशी माझ्यातली भीती दूर पळाली आणि ‘डान्स पे चान्स मारले’ म्हणत मी डान्स, कोरिओग्राफी ‘एन्जॉय’ करू लागले.
आज मी इतरांना नृत्य शिकवतेय. आमच्याकडे सर्वच वयोगटांतील माणसे येतात. त्यांचे वय, आवड, कम्फर्ट झोन पाहून आम्हाला कोरिओग्राफी करायची असते. उदाहरणच द्यायचे झाल्यास आम्ही सकाळी महिलांची बॅच घेतो. डान्स शिकवणे म्हणजे नुसत्या स्टेप्स सांगणे किंवा करणे नव्हे. हे करताना तुम्ही त्या गाण्यात हरवून जायला हवे. अगदी धुंद व्हायला हवे. तुमच्या मनावर कोणतेही दडपण नसेल तेव्हाच हे शक्य असते. आमच्याकडे येणार्या महिलांबाबत आम्ही विचार करतो की, घर-ऑफिस अशी दुहेरी जबाबदारी सांभाळताना तारांबळ उडत असूनही त्यांना नृत्य शिकायचे असते.
एप्रिलमध्ये आम्ही लहान मुलांसाठी कार्यशाळा घेतो तेव्हाही असेच. मुले म्हटले की मूडीनेस, अवखळपणा हे सगळे आलेच. त्यांना शिकवायचे म्हणजे आपल्यालाही लहान व्हावे लागते. आम्ही हेच करतो. मुले रमतील, बागडतील असे गेम्स खेळतो. एकदा त्यांच्याशी ट्युनिंग जमले की मग आम्ही धम्माल डान्स मस्ती करतो त्यांच्याबरोबर! दुसरे असे की, समजा तुमच्याकडे दहा जण डान्स शिकायला आले; पण त्यांच्यापैकी पाच जणांना डान्स येतो अन् पाच जणांना अजिबात येत नाही. अशा वेळी आमच्यापुढे चॅलेंज असते ते या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना सहज जमेल अशी कोरिओग्राफी करण्याचे. दहा जणांचे फूटवर्क, त्यांची शरीरयष्टी, त्यांचा स्टॅमिना या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच स्टेप्स ठरविल्या जातात. डान्स शिकणार्याने गाण्याची आवड सांगितल्यानंतर आम्ही स्वत: ते गाणे जगतो. त्यावर डान्स बसवतो. एकदा तो करून दाखवतो. त्यानंतर खरी कोरिओग्राफी सुरू होते. कारण शिकणार्याला आमच्या डान्सविषयी काय वाटले? त्याला ते एन्जॉय करता येईल का, हे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे असते. मग त्यांच्याकडून काही सूचना येतात, त्यांना वेगळ्या स्टेप्स हव्या असतात, त्याचाही विचार केला जातो. कधी कधी गाणे फास्ट असेल तर स्टेप्सचा ‘काउंट’ वाढवतो. अवघड वाटणार्या स्टेप्सची जादा प्रॅक्टिस करवून घेतो. आमचा डान्स असा हळूहळू बहरत जातो.
- अंकिता गुजर, कोरिओग्राफर
शब्दांकन व मुलाखती - सारिका पूरकर-गुजराथी