तीन पिढय़ांची गोष्ट सांगतोय मुंबईचा डबेवाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 04:52 PM2018-10-04T16:52:31+5:302018-10-04T16:52:46+5:30

माझे आजोबा मुंबईत आले आणि मेहुण्यांच्या मदतीला डबे पोहोचवण्याच्या व्यवसायात उतरले. त्यानंतर आमच्या तीन पिढय़ांत हा व्यवसाय कसा बदलत गेला त्याची ही गोष्ट

Talking about the story of three generations, Mumbai's Dabwell | तीन पिढय़ांची गोष्ट सांगतोय मुंबईचा डबेवाला

तीन पिढय़ांची गोष्ट सांगतोय मुंबईचा डबेवाला

Next

- सुभाष गंगाराम तळेकर

साधारणतर्‍ विसाव्या शतकाचे पहिले दशक. माझे आजोबा लक्ष्मण तळेकर साधारणतर्‍ दहा/बारा वर्षाचे असतील. ते लहान असतानाच त्यांचे वडील  वारले. मोठय़ा बहिणीचे लग्न झाले होते. घरात अठराविसे  दारिद्रय़ व मागे चार भावंडांचा सांभाळ अशा स्थितीत गाव गडद, ता.खेड जि. पुणे येथे दिवस काढत होते.
गावात उपासमारीत दिवस काढण्यापेक्षा मुंबईत रोजगारासाठी गेलेले बरे असे म्हणून लक्ष्मण तळेकर यांनी साधारणतर्‍ 1915 च्या दरम्यान मुंबई गाठली. त्यांची मोठी बहीण ताई मुंबईत खेतवाडीत राहायला होती व तिचे यजमान तुकाराम वनाजी गडदे त्यावेळी मुंबईत जेवणाचे डबे पोहोचवायचे काम करत होते.
लक्ष्मण आपले दाजी तुकाराम यांना जेवणाचे डबे पोहोचवण्याच्या व्यवसायात मदत करू लागला. जसजसा मुंबईचा विकास होत गेला तसतसा मुंबईत जेवणाचे डबे पोहोचवण्याचा व्यवसाय वाढत गेला. दरम्यानच्या काळात तुकाराम गडदे यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यामुळे जेवणाचे डबे पोहोचवण्याच्या व्यवसायाचा सर्व भार लक्ष्मण यांच्या खांद्यावर आला.
लक्ष्मण डबे पोहोचवण्याचं काम उत्तमरीत्या करत असल्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढला. आता व्यवसायात जम बसू लागला होता. दरम्यानच्या काळात लग्न झाले नवरी मुलगी सखू ही मामाची मुलगी होती. 
मुंबई सेण्ट्रलला द्वारकादास जीवराज चाळीत संसार थाटला. व्यवसायाला माणसं कमी पडू लागली तसे भावंडांना मुंबईत कामासाठी बोलावलं. सोबत काम करण्यासाठी  सखूबाई होती. इमाने इतबारे व्यवसाय केला व्यवसाय इतका वाढला की 35 कामगार आजोबांकडे काम करत होते. 
आता आजोबा मुकादम झाले होते. 
गावाकडील ज्या लोकांना रोजगार नव्हता त्यांना ते आधार वाटायचे. थेट मुंबईला येऊन लक्ष्मण तळेकरकडे कामाला राहायचे. त्यांची राहायची व खाण्याची सोय आजी करायची. त्याकाळी चाळीतील जागा अपुरी होती; पण मनातील जागा मोठी असल्यामुळे कधी अडचण, गैरसोय झाली नाही. अशाप्रकारे गावाकडील लोकांना त्यांनी रोजगार दिला.

लक्ष्मण तळेकर यांना दोन मुलगे मोठा गंगाराम व दुसरा काशीनाथ. वडिलांच्या माघारी गंगाराम यांनी व्यवसाय सांभाळला. गंगाराम तळेकर यांच्याकडे नेतृत्व-वक्तृत्वगुण होते. नेतृत्वगुणामुळे ते डबेवाले संघटनेचे नेते झाले. जवळ जवळ पन्नास र्वष ते संघटनेचे नेते होते. त्यांच्या काळात त्यांनी संघटनेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. डबेवाले संघटनेचे नाव सर्वत्न झाले. ते उत्तम व्याख्यान देत असतं. 
आयआयटी, आयआयएम यासारख्या व अनेक संस्था, कार्पोरेट कंपन्या यांना वडील मॅनेजमेण्टची व्याख्याने देत असतं. वडिलांना कार्पोरेट जगतात मॅनेजमेण्ट गुरु म्हणून मान मिळाला. त्यांचे 2014  ला जेव्हा निधन झाले तेव्हा सर्व मीडियामध्ये मथळा होता. मॅनेजमेण्ट गुरु गंगाराम तळेकर यांचे निधन. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी गंगाराम तळेकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता.
त्यांच्या पश्चात त्यांनी स्थापन केलेल्या मुंबई डबेवाला असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे व देश-विदेशात मॅनेजमेण्ट या विषयावर व्याख्यानं देत आहे.
आमच्या तीन पिढय़ांचा हा प्रवास एका स्थलांतरानं केला, त्या वन वे तिकिटची ही गोष्ट.


अध्यक्ष ,मुंबई डबेवाला असोसिएशन 

Web Title: Talking about the story of three generations, Mumbai's Dabwell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.