ग्रामीण भारताला ‘चवदार ऊर्जा’
By admin | Published: March 16, 2017 10:51 PM2017-03-16T22:51:19+5:302017-03-16T22:51:19+5:30
देशातली ही सर्वसामान्य माणसं. त्यांच्या त्यांच्या गरजेतून त्यांनी काही संशोधन सुरू केलं. रुढार्थानं यातील कोणीही संशोधक नाही. काही तर अगदी अल्पशिक्षित.
(लेखांक : सहा)
#Innovationscholars- 6
‘घरगुती गॅस’ साठवू शकणारं, हाताच्या ऊर्जेवरही चालू शकणारं अजयचं युनिट
देशातली ही सर्वसामान्य माणसं. त्यांच्या त्यांच्या गरजेतून त्यांनी काही संशोधन सुरू केलं. रुढार्थानं यातील कोणीही संशोधक नाही. काही तर अगदी अल्पशिक्षित. पण ही संशोधनं त्यांच्यापुरती मर्यादित न राहता हजारो लोकांसाठी उपकारक ठरली.त्यांच्या या नाविन्यपूर्ण शोधानिमित्त राष्ट्रपतींनीही त्याचा गौरव केला आणि राष्ट्रपती भवनात त्यांच्या या उपयुक्त संशोधनाचं प्रदर्शन भरवलं. अशा प्रतिभावंतांची ही ओळख..
ग्रामीण भागात ऊर्जेची मोठी गरज असते, विशेषत: स्वयंपाकासाठी. गॅस परवडत नाही आणि बहुतांश ठिकाणी आजही चुलीला पर्याय नाही. त्यासाठीचा लाकूडफाटा मिळणंही आता तितकंसं सोपंही राहिलेलं नाही आणि तो स्वस्तही नाही. शिवाय स्वयंपाकासाठी चुलीत लाकडं जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होतं ते वेगळंच. सतत धुराजवळ बसल्यामुळे तर ग्रामीण भागातल्या बायकांच्या आरोग्यावर त्याचा खूप मोठा आणि दूरगामी वाईट परिणाम होत आहे.
खरंतर बायोगॅस प्लान्ट्समुळे ग्रामीण भागातील ऊर्जेची गरज मोठ्या प्रमाणात भागू शकते.
त्यांची ऊर्जेची गरज कमी व्हावी आणि त्यांना, त्यांच्या घराजवळच ही ऊर्जा मिळाली तर त्यांचे अनेक प्रश्न सुटतील, पर्यायी ऊर्जाही तयार होईल या हेतूनं बायोगॅस प्लान्ट्सची निर्मिती ठिकठिकाणी सुरू झाली. त्याच्या उत्पादनासाठी सरकारनं मोठ्या प्रमाणात प्रोत्साहनही दिलं.
ग्रामीण भागात ‘बायोमास’ म्हणजे जैविक इंधन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतं, असंही ते वायाच जातं, त्याचं ऊर्जेत रुपांतर करून स्वयंपाकासाठी निर्धोक अशी यंत्रणा बायोगॅस प्लान्ट्समुळे अस्तित्वात आली आणि दुसरं म्हणजे लोकांच्या, शेतकऱ्यांच्या अंगणातच ही ऊर्जा निर्माण होऊ लागल्यामुळे त्यांची मोठीच सोय झाली. ज्यांनी हे प्लान्ट्स बसवले त्यांच्या कुटुंबातले आरोग्याचे प्रश्नही बऱ्यापैकी कमी झाले.
मात्र एक मुख्य त्रुटी या बायोगॅस प्लान्ट्समध्ये होती आणि आजही आहे ती म्हणजे, या प्लान्ट्सपासून तुमचं घरं किंवा स्वयंपाकाची खोली जर जास्त लांब असेल तर या प्लान्टचा तुम्हला फारसा उपयोग नाही. शिवाय या ‘बायोगॅस प्लान्ट्स’मधून तयार होणारा गॅस साठवायची कोणतीच सोय त्यात नाही.
उत्तर प्रदेशातल्या अजयकुमार शर्मा या तरुणानं हीच गैरसोय नेमकी ओळखली आणि बायोगॅस युनिटपासून तयार होणारा गॅस सिलिंडरमध्ये साठविण्याची एक नवी पद्धत विकसित केली. हे सिलिंडर कुठेही नेता येऊ शकत असल्याने आणि अतिरिक्त गॅस तयार झाल्यास तो दुसऱ्या ठिकाणी वापरण्याचीही मोठी सोय झाली.
यामुळे ‘बायोगॅस प्लान्ट’ तुमच्या अंगणातच असण्याची गरजही संपली. वैयक्तिक गरजेपोटी केलेल्या या संशोधनातून संपूर्ण ग्रामीण भारताला त्याचा उपयोग होऊ शकतो.
अजयनं त्यासाठी काय केलं?
त्यानं तयार केलं एक छोटंसं बायोगॅस कॉम्प्रेसर मशीन. ते ऊर्जेची बचत करणारं तर आहेच, पण तुलनेनं स्वस्तही आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या अंगणात बसवलेल्या ‘बायोगॅस प्लान्ट’मधून तयार होणारा गॅस साठवून ठेवण्याची कोणतीच सोय पूर्वी नव्हती, अजयनं तयार केलेल्या या कॉम्प्रेसर मशीनमुळे हा गॅस भरून ठेवता येण्याची खूप मोठ्ठी सोय झाली.
कमीत कमी जागेत जास्तीत जास्त गॅस या सिलिंडर्समध्ये बसवता यावा अशीही सोय अजयनं आपल्या मशीनद्वारे करून दिली आहे. एक इंच जागेत तब्बल दोनशे पाऊंड गॅस या यंत्रामुळे बसवता येऊ शकतो.
अजयनं आपल्या युनिटला दीड हॉसपॉवरची मोटर बसवली असून तीन हॉर्सपॉवरचं कॉम्प्रेसर त्यावर चालू शकतं. त्याशिवाय बॅटरीवरही चालू शकणारी एक हजार वॅटेजची डीसी मोटर या युनिटला जोडलेली आहे. कुठल्याही कारणानं हे युनिट बंद राहू नये यासाठी सोलर एनर्जीवर हे युनिट चालवण्याची सोयही अजयनं करून ठेवली आहे. हे कमी म्हणून की काय, या युनिटला त्यानं एक फ्लाय व्हीलही बसवलेलं आहे. समजा वीज नसेल, तुमच्याकडे बॅटरी नसेल आणि सूर्यप्रकाशही नसेल, तरीही तुमचं काही अडू नये यासाठी त्यानं आपल्या युनिटला दोन गिअर, एक पुली आणि एक फ्लाय व्हील बसवलेलं आहे. हातानं हे व्हील फिरवलं की तुमचं काम झालं! कुठल्या इतर ऊर्जेचीही मग तुम्हाला गरज नाही. तुमची शारीरिक ऊर्जा तुम्हाला ‘नवी ऊर्जा’ मिळवून देईल.
तयार होणारा गॅस कोणत्याही कारणानं दुषित किंवा कमी प्रतिचा राहू नये यासाठी बायोगॅस अगोदर फिल्टर केला जातो, पाणी आणि लिंबानं तो स्वच्छ केला जातो. त्यामुळे त्यातील दुषित वायू आणि कार्बन डायआॅक्साईड निघून जातो. त्यानंतरच हा गॅस कॉम्प्रेसरद्वारे त्यावर दाब देऊन कमी जागेत बसवला जातो.
स्वयंपाकासाठी तयार झालेला हा गॅस सहजपणे भरता यावा यासाठीचे सिलिंडर्सही अजयनं विकसित केले आहेत. यासाठीही विजेची गरज भासू नये याचीही त्यानं काळजी घेतली आहे.
अजयनं तयार केलेल्या या बहुपयोगी युनिटमुळे ग्रामीण भागाला नवी ऊर्जा मिळाली नाही तरच नवल!
अजयच्या याच करिश्म्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते नुकतंच गौरवण्यात आलं.
- प्रतिनिधी