काम्यूचं जरमॉ सरांना पत्र - येत्या शिक्षकदिनानिमित्त.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 03:10 PM2020-09-03T15:10:31+5:302020-09-03T15:12:02+5:30

काम्यू हा नोबेल विजेता फ्रेंच कादंबरीकार. गुलामी आणि गरिबी या दोन जगात वाढलेला कॉम्यू. त्याच्या शिक्षकांनी त्याला हात दिला आणि हा मुलगा महान लेखक झाला. त्यानं हे त्याच्या सरांना लिहिलेलं पत्र

Teachers Day -Albert Camus's letter to his teacher. | काम्यूचं जरमॉ सरांना पत्र - येत्या शिक्षकदिनानिमित्त.

काम्यूचं जरमॉ सरांना पत्र - येत्या शिक्षकदिनानिमित्त.

Next
ठळक मुद्देएवढी वर्षे उलटल्यानंतरही मी स्वतर्‍ला आपला कृतज्ञ शिष्य मानत आलेलो आहे.

-लीना पांढरे
धडपडणार्‍या मुलांवर वात्सल्याची पाखर घालणारे साने गुरुजी विदेशातील मातीतही जन्माला येतात. 
अल्बैर काम्यू या फ्रेंच नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकाला असेच गुरु जी भेटले होते. द आऊटसाइडर, द प्लेग, द फॉल या कादंबर्‍या, द मिथ ऑफ सिसिफस, द रिबेल हे निबंध, द स्टेट ऑफ सीज, द जस्ट असासीन्स ही नाटकं आणि अल्जिरियन
क्रॉनिकल्ससारखं जगाला शांततेचं आवाहन करणारं महत्त्वपूर्ण पुस्तक एवढा समृद्ध ऐवज निर्मिलेल्या या फ्रेंच लेखकाचा जन्म 1913 साली फ्रान्सच्या आधिपत्याखाली असणार्‍या अल्जिरिया या गुलाम देशात झाला. 
हिंसा, दमन, रक्तपात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी या साखळदंडात जखडलेल्या भूमीवर कॉम्यू जन्मला होता, त्यामुळे त्याच्या साहित्यातून त्याने या बंधनांच्या विरुद्ध सतत आवाज उठवलेला आहे. या जगण्यातील विसंगती /अ‍ॅब्सिर्डिटी दाखवून दिली.


 सर्व बंधनं नाकारणार्‍या कॉम्यूने म्हटलं होतं की ‘लेखकाच्या काळजात एक दर्या सतत उधाणलेला असतो. या दर्याच्या पाण्याने तो आयुष्यभर आपल्या सर्जनाची तल्लखी मिटवत राहातो; पण जर त्या दर्यालाच ओहोटी लागली तर त्याच्या सृजनशील लेखनाची भूमी रेताड व नापीक होऊन जाईल आणि मग लेखनाच्या यात्रेत दमला, भागलेला हा लेखक किंवा कलाकार विस्कटलेल्या केसाने आणि सुकलेल्या ओठांनी कायमचा मुका होऊन जाईल किंवा सभासंमेलनातील एक उत्तम वक्ता बनेल; पण तो सृजनशील, निर्मिक कलाकार राहणार नाही.’
या सृजनाच्या ऊर्मीतून लिहिलेल्या ‘द आऊटसायडर’ या कादंबरीला कॉम्यूला वयाच्या 45व्या वर्षी जागतिक पातळीवरील सर्वोच्च नोबेल पुरस्कार लाभला आणि त्यानंतर दोन वर्षातच वयाच्या 47व्या वर्षी एका कार दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. ही जीवनातील विसंगती आणि अर्थहीनता नाही तर दुसरं काय?
कॉम्यूचे वडील शेतमजूर होते; पण नंतर ते स्वखुशीने सैन्यात भरती झाले आणि मृत्युमुखी पडले. तेव्हा कॉम्यू जेमतेम एक वर्षाचासुद्धा नव्हता. 
तो आणि त्याचा थोरला भाऊ यांना त्यांच्या अशिक्षित आणि जवळपास बहिर्‍या असणार्‍या आईने आणि अत्यंत खाष्ट आजीने दारिद्रय़ाशी झगडत लहानाचं मोठं केलं. 
लहानग्या कॉम्यूच्या जगण्याच्या खडतर प्रवासात त्याला बोटाला धरून रस्ता दाखवणारे, त्याच्या वाटेवरील काटेकुटे दूर करणारे, नुसता हात पुढे करताच त्यावर उबदार ऊन पडावं त्याप्रमाणे स्वच्छ मोकळ्या मनाने जिव्हाळ्याचा शब्द देणारे असे शिक्षक कॉम्यूला लाभले होते.
‘प्राणांवर नभ धरणार्‍या’ या शिक्षकांचं नाव होतं लुईस जरमॉ. 
या शिक्षकांनी आपल्या या विद्याथ्र्यामधील  तीव्र बुद्धिमत्ता ओळखली. कॉम्यूला त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून दिली. त्यामुळे कॉम्यूचे पुढील शिक्षण होऊ शकले. कॉम्यू ही मदत कधीही विसरला नाही आणि  प्रत्येक पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्याची पहिली प्रत त्यांनी आपल्या या शिक्षकांना पाठवली. नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर काम्यूने जी दोन व्याख्याने दिली ती त्याने आपल्या या गुरुंनाच समर्पित केलेली आहेत.
आपल्या शिक्षकापासून दूर गेल्यानंतर, उणी पुरी तीन दशके उलटल्यानंतर कॉम्यूला नोबेल पारितोषिक मिळाले तेव्हाही हा विद्यार्थी आपल्या गुरुंचे ऋण विसरला नव्हता. तेव्हा त्यांनी आपल्या गुरुजींना लिहिलेलं पत्र जगविख्यात आहे.
त्या पत्रात तो जे म्हणतो ते शिक्षक आणि विद्यार्थी या नात्यानं कायम लक्षात ठेवण्यासारखं आहे.
येत्या शिक्षणदिनानिमित्त कॉम्यूचं हे शिक्षकांना लिहिलेलं पत्र जरूर वाचा..
*************

प्रिय जरमॉ,
गेल्या काही दिवसातील गडबड थोडी निवळल्यानंतर मी आपल्याला अगदी मनापासून पत्र लिहितो आहे.
मी स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती किंवा अजिबात प्रयत्नही केले नव्हते, पण तरीही हा मोठा नोबेल पुरस्कार मला नुकताच मिळाला आहे. 
मला ही बातमी समजली तेव्हा पहिल्यांदा आईची आणि नंतर आपलीच आठवण आली. 
माझ्यासारख्या एका गरीब लहान मुलाला आपण तेव्हा जर मदतीचा हात देऊ केला नसतात तर माझ्या बाबतीत काहीच घडलं नसतं. 
तुम्ही दिलेलं शिक्षण आणि तुमचा आदर्श समोर ठेवला नसता तर मला इथर्पयत पोहोचताच आलं नसतं. 
मी या पुरस्काराला फार महत्त्व देत नाही; पण यानिमित्ताने आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची मला संधी मिळाली. 
आपण आपल्या छोटय़ा छोटय़ा विद्याथ्र्यासाठी अपार कष्ट घेतलेत त्यामुळे इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही तुमच्या असंख्य विद्याथ्र्याच्या स्मरणात तुम्ही कायमचे वाटले गेला आहात.
 आजही या विद्याथ्र्यामध्ये तुमचंच कनवाळू, प्रेमळ हृदय धडधडत आहे.
एवढी वर्षे उलटल्यानंतरही मी स्वतर्‍ला आपला कृतज्ञ शिष्य मानत आलेलो आहे. मी अंतकरणापासून आपल्याला आलिंगन देतो.
                              -  अल्बैर कॉम्यू. 


( लेखिका प्राध्यापक आहेत.)

 

Web Title: Teachers Day -Albert Camus's letter to his teacher.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.