तंत्रसंस्कृती - प्रगतीच्या वाटेवरची ५ सूत्रं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 06:00 AM2017-09-28T06:00:00+5:302017-09-28T06:00:00+5:30

आपल्याकडे मोबाइल आहे. त्यावर इंटरनेट आहे. त्यात सोशल मीडिया अर्थात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आहे. आपल्याला ते वापरता येतं. पण मग त्याचा उपयोग काय इतरांच्या पोस्ट्स वाचण्यासाठी आणि राजकीय वाद घालण्यासाठीच करणार? म्हणजे ते सारं करावं, करू नये असं नाही; पण त्यापेक्षा त्याचा आपल्या प्रगतीसाठी कसा वापर करून घेता येईल याचा विचार करावा

Technologies - 5 sources of progress | तंत्रसंस्कृती - प्रगतीच्या वाटेवरची ५ सूत्रं

तंत्रसंस्कृती - प्रगतीच्या वाटेवरची ५ सूत्रं

Next

आपल्याकडे मोबाइल आहे. त्यावर इंटरनेट आहे. त्यात सोशल मीडिया अर्थात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आहे. आपल्याला ते वापरता येतं. पण मग त्याचा उपयोग काय इतरांच्या पोस्ट्स वाचण्यासाठी आणि राजकीय वाद घालण्यासाठीच करणार? म्हणजे ते सारं करावं, करू नये असं नाही; पण त्यापेक्षा त्याचा आपल्या प्रगतीसाठी कसा वापर करून घेता येईल याचा विचार करावा. आणि तो विचारच नाही तर कृतीही या समाजमाध्यमांनी आपल्या आवाक्यात आणून ठेवली आहे.
त्यासाठीची ही काही सूत्रं. ती वापरली तर आपण आपल्याच परिघातून बाहेर पडत नव्या वर्तुळात, नव्या अधिक समाधानकारक आयुष्यात आणि प्रगतिपथावर नक्की जाऊ शकू.

१) बॉर्न डिजिटल

ही एक नवीन कल्पना आहे. म्हणजे सध्या जन्माला येणारी नवी पिढी, आताची लहानगी मुलं हे बॉर्न डिजिटल आहे. म्हणजेच जन्मत: त्यांची हाती डिजिटल ताकद आहे. आज विशी-पंचविशीच्या आत असलेले तरुण मुलं त्यांच्या थोडेसे पुढे आहेत. गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी कम्प्युटर क्लासेसमध्ये कमी आणि घरातल्या उपकरणांवर जास्त शिकला. मोबाइल किंवा कम्प्युटर आॅपरेट करणं त्यांना कुणी शिकवलेलं नाही. जर आपण या पिढीतले आहोत तर आपल्याला डिजिटल वापर करून आपल्या ज्ञानाच्या कक्षेत भर घालायला हवी. कॉपी-पेस्टच्या पलीकडे जाऊन इंटरनेटवरच्या माहितीचा अभ्यासासाठी वापर करायला हवा. गुगलवरून तर माहिती कोणीही देऊ शकतो; पण त्या माहितीचं ज्ञानात परिवर्तन करता यायला हवं. ते जमलं तर हातात माहितीचा खजिना आणि डोकं वापरून त्या माहितीचा उत्तम वापर आपल्या प्रगतीला पोषक ठरू शकते.

२) डिजिटल फूटप्रिण्ट

आपण डिजिटल मीडियात जे लिहितो ना, ते कधीच पुसलं जात नाही. म्हणजे आपली एखादी कमेण्ट, व्हॉट्सअ‍ॅप चॅट, आपले जोक्स, आपण फॉरवर्ड केलेली माहिती हे सारं कुठं ना कुठं उपलब्ध असतंच. त्यामुळे सहज म्हणून आपण जे लिहितो, ज्या कमेण्ट करतो, जे बोलतो ते सारं आपल्या डिजिटल पाऊलखुणा म्हणून कायम राहतं. त्यामुळे लिहिण्यापूर्वी विचार करा, आॅनलाइन मतं मांडण्यापूर्वी, फोटो टाकण्यापूर्वी विचार करा. ते केलं नाही तर आपण चुकीची माहिती तर पसरवतोच, पुन्हा डिजिटल गुन्ह्यांतही कधी सापडू शकतोच. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण हे ठरवायला हवं की, आपल्या व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग असलेलं हे जग तिथं आपलं व्यक्तिमत्त्व जगाला कसं दिसणार आहे? उद्या नोकरी देताना कुणी आपलं फेसबुक अकाउण्ट पाहिलं तर ते आपल्याला नोकरी देतील, की नाकारतील?
३) सृजनशील, भन्नाट विचार

माहिती मिळतच नव्हती त्या काळात ज्याला जास्त माहिती, ज्याचं जास्त पाठांतर तो हुशार समजण्याचा एक काळ होता. आता माहिती पाठ केलेली, घोकलेली असणं याला काही फार भाव उरलेला नाही. कारण आपल्याला हवी ती माहिती एका क्लिकवर गूगल काही सेकंदात उपलब्ध करून देऊ शकतंच. मग हुशार कोण, ज्याला भन्नाट आयडिया सुचतात तो. त्या आयडिया वापरून वेगळं काम करू शकेल तो किंवा त्या आयडिया जोरदार उत्तम भाषेत सोशल मीडियात जो मांडू शकेल तो. तुम्हाला वेगळं काही सुचत असेल, दिसत असेल, तर ते बिनधास्त सोशल मीडियात मांडायला शिकायला हवं. जो बोलतो त्याचेच कुळीथ काय दगडही विकले जातात असा हा काळ आहे. फुकटात जाहिरात करायला सोशल मीडियात सोबत आहेच.

४) दु:खाच्या काळाखोतून बाहेर

ज्याला इंग्रजीत ब्रेकिंग स्टिग्मा असं म्हणतात. अनेक आजारांनी त्रासलेले युवक युवती असतात. कॅन्सर, एचआयव्ही, कोड, फिट्स येणं, अ‍ॅसिड अटॅक झालेल्या युवती या साºयांशी जिद्दीनं झुंजणारे अनेकजण असतात. ते आपल्या आजाराविषयी, परिस्थितीविषयी, त्यातून जगण्याच्या ऊर्मीविषयी मोकळेपणानं बोलतात. उपाय शेअर करतात. मानसिक झगड्यातून कसं बाहेर पडलो हे सांगतात. इतकंच कशाला काळ्या रंगाचा न्यूनगंड. उंचीचा, भाषेचा, दिसण्याचा, यासाºया न्यूनगंडाविषयी सोशल मीडियात उघड बोललं जातं. सपोर्ट ग्रुप उभे राहतात. आपल्याला अशी काही मदत हवी असेल तर ती इथं शोधता येते. इतरांना मदत करता येते. मनावरचा ताण हलका करून वाट काढायची उभारीही मिळू शकते.

५) प्रेरणादायी दोस्तांचं वर्तुळ

आपल्याला खूप काही करायचं असतं. पण तसे मित्रमैत्रिणी नसतात सोबत, आपल्या मित्रांना वेगळं काही करायचं नसतं. पण आता इथंच गोेष्ट संपत नाही. उलट आॅनलाइन असे अनेक ग्रुप्स असतात जे समविचारी असतात. एकमेकांना प्रेरणा देतात. विशिष्ट विचारांत एकत्र येऊन काम करतात. सायकलिगं, ट्रेकिंग, पुस्तक वाचन, ते सिनेमे पाहणं, स्वच्छता अभियान, झाडांची आवड, पक्षीनिरीक्षण अशा अनेक गोष्टींसाठी समविचारी, प्रेरणादायी दोस्तांचं वर्तुळ आॅनलाइन सापडू शकतं. ते शोधलं तर आपलाही एका नव्या वर्तुळात प्रवेश होऊच शकतो.

Web Title: Technologies - 5 sources of progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.