सांगा कसं जगायचं? कण्हत की गाणं म्हणत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 07:55 AM2020-12-31T07:55:03+5:302020-12-31T08:00:16+5:30

मान्य आहे की परिस्थिती आपल्या हातात नसते, ती वाईटही असते पण आपले विचार तर आपण बदलू शकतो!

Tell me how to live Singing or singing? | सांगा कसं जगायचं? कण्हत की गाणं म्हणत?

सांगा कसं जगायचं? कण्हत की गाणं म्हणत?

Next

- स्वप्निल कुलकर्णी.

आपल्याही नकळत आपल्या मनात हजारो विचार येत असतात. काही विचार चांगले, सकारात्मक, आनंद निर्माण करणारे आणि जीवन समृद्ध करणारे असतात. काही विचार नकारात्मक, नैराश्य निर्माण करणारे असतात. कोरोना काळात २०२० मध्ये आपण सर्वांनीच हा अनुभव घेतला. अनेकदा परिस्थिती आपल्या हातात नसते, पण विचार करणं, प्रतिक्रिया आणि प्रतिसाद देणं हे तर आपल्याच हातात असतं. सकारात्मक आणि नकारात्मक. विचारांच्या या दोन बाजू. या विचारांवर आपला दृष्टिकोन किंवा व्यवहार अवलंबून असतो. प्रतिक्रियाही ठरते. विशेष म्हणजे आपण जसा विचार करतो, तसेच आपण बनत जातो. आपण जर काळ्या रंगाचा चष्मा लावला असेल तर सर्वत्र काळे दिसेल आणि लाल रंगाचा असेल तर लाल दिसेल. याचप्रकारे नकारात्मक विचारांमुळे आपल्याला सर्वत्र नैराश्य, दु:ख आणि असंतोष दिसते आणि सकारात्मक विचारांनी आपल्याला कायम आशा, सुख आणि समाधानच दिसते. आता आपण हे ठरवायचे आहे की, सकारात्मक चष्मा लावून जगाकडे पाहायचे की, नकारात्मक चष्म्याने पाहायचे. जर आपण सकारात्मकतेचा चष्मा लावला तर आपल्याला काहीतरी करावे, आनंदी जगावे असे वाटेल.

पण सकारात्मक राहायचं तर नक्की काय करायचं?

१. चारही बाजूंनी अंधार असेल आणि काहीच दिसत नसेल तर आपण लहानसा दिवा लावतो, स्वत:पुरता उजेड शोधतो. हा दिवा काय उजेड पाडणार म्हणून अंधारात बसत नाही. तो दिवा म्हणजे आपली ताकद आहे असं समजून मोठ्या अंधाराशी लढणं म्हणजे सकारात्मक विचार. छोटी पॉझिटिव्ह कृती हीच मग मोठी ताकद बनू लागते.

२. अनेकांना असं वाटतं की, उत्तम शिक्षण आणि मेहनत यांच्या मदतीने यशाच्या शिखरापर्यंत पोहचता येतं. मात्र त्यासोबत विचारही सकारात्मक हवे. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना आपली कार्यनीती बनवली पाहिजे. आपल्या कमकुवत पैलू ओळखून त्या दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. वेळोवेळी आपल्या प्रगतीचा लेखा-जोखा मांडला पाहिजे. या कालावधीत चुका झाल्या तर त्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सर्वात म्हणजे स्वत:वर विश्‍वास ठेवला पाहिजे.

३. दुसऱ्यांबद्दल द्वेष, मत्सर, हेवा, बदला घेण्याची भावना असे नकारात्मक विचार आपली वाट अडवतात. दुसऱ्यांबद्दल चांगले विचार उलट उत्साह वाढवतील. जे मनात पेराल ते उगवेल.

४. समजूतदारपणा कामात आणून आपल्या कमकुवत पैलू जाणून घ्या. आपल्या उणिवा, कमतरता जाणून घेण्यासाठी आपल्या आई-वडिलांची आणि मित्र, शिक्षक यांची मदत घ्यायला शिकायला हवं. त्याचबरोबर स्वत:देखील आपल्या मनाला प्रश्‍न विचारून कोणत्या आपल्या उणिवा आहेत आणि त्या आपल्या यशाच्या मार्गात अडथळे आणतात का, याचा विचार केला तर पुढे जाणं अजून सोपं होतं.

( लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.)

kulkarni.swapnil85@gmail.com

Web Title: Tell me how to live Singing or singing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.