मग अजून काय? बोल ना काहीतरी..
By admin | Published: January 14, 2016 09:16 PM2016-01-14T21:16:37+5:302016-01-14T21:16:37+5:30
काय झालं? कुठे होतीस? काय खाल्लंस? कोण बोललं? आठवण येतेय, सेल्फी पाठव, रिप्लाय का नाही केला?
Next
अनघा पाठक ( अनघा लोकमत टाइम्स वृत्तपत्रात सहायक उपसंपादक आहे.)
काय झालं?
कुठे होतीस?
काय खाल्लंस?
कोण बोललं?
आठवण येतेय,
सेल्फी पाठव,
रिप्लाय का नाही केला?
- या प्रश्नापासून ते
आज थंडी आहे, आणि
सकाळी पोट साफ झालं नाही
इथपर्यंतचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं.
सतत बोलतोय आपण एकमेकांशी,
बोलतच सुटलोय.
पण त्या बोलण्यानं
नात्यातला गोडवा पार पुसून टाकलाय
त्याचं काय?
‘‘खूप बोलतोय आपण.. गरज असताना, नसताना, गरजेपेक्षा जास्त, इकडंच, तिकडंच, महत्त्वाचं, बिन महत्त्वाचं, रिकामटेकडं. दोन दिवस झाले तुला हे सांगायचा प्रयत्न करतेय की, आता नको बोलूयात! आपण बोलायला लागलो की भांडतोच. भांडलो नाही तरी नवीन नसतं आपल्याकडे सांगायला. मग नुस्तं आपलं ‘मग अजून? अजून काय? बोल की पुढे’ च्या दोऱ्या वळायच्या. तेच ते अन् तेच ते. बोलायला लागलं तरी अंगावर येतं. इतकं प्रचंड बोलून पण काहीच सांगितलं नाही असं वाटतंय. आणि आता काही सांगायला शिल्लकच नाही असंही वाटतंय. खरंतर एकाने बोलायचं असतं अन् दुसऱ्यानं ऐकायचं. मात्र दोघं बोलायला लागलो तर ऐकणार कोण? आणि ऐकलंच, तरी कधी? त्यापेक्षा आता नकोच बोलायला. तुटलो तर आहोतच, यापुढे बोललो तर संपून जाऊ.’’
समीराने आराध्यसाठी पत्र लिहिलं. व्हॉट्सअॅप, फोन, जीमेल, चॅट, स्काइप, फेसबुक, इन्स्टंट मेसेजिंग, व्ही चॅट, हाइक असलं काहीही न वापरता तिने सरळ चार ओळी खरडल्या. निदान यातून तरी मला जे म्हणायचं ते, तसंच आणि तेवढंच त्याच्यापर्यंत पोहचू दे असं म्हणत, शेवटी लिहिलंच!
समीरा-आराध्यसारखी कितीतरी तरुण जोडपी आहेत.. काही तुटेपर्यंत ताणली गेलेली, काही काडीमोड घेऊन पुनश्च सुरुवात करणारी आणि उरलेली अधे-मधे लटकणारी.. विसंवादाची नाही तर अतिसंवादाची बळी ठरलेली.
तंत्रज्ञानानं माणसं अंतरानं जवळ आली पण मनानं दुरावली, असली टाळीबाज वाक्यं ऐकायला लागूनसुद्धा एक-दोन दशकं उलटली. या दोन दशकांत माणसाच्या चौथ्या मूलभूत गरजेच्या, संवादाच्या नाना तऱ्हा समोर आल्या. ज्यांच्याशी बोलावंसं वाटतंय, जिथून बोलावंसं वाटतंय तिथून मनसोक्त बोला. नो एक्स्ट्रा चार्जेस! मग तुम्ही जमिनीवर असा आणि तुमचा कोणी हवेत किंवा समुद्रात.. संवादाला अडचण नाही.
पण हे सतत बोलण्याचं दडपण घेऊन जगणं किती भयानक असतं हे कुठं आपल्या लक्षात येतंय? बोलू शकतो म्हणजे बोललं पाहिजेच असं नाही. पण बोललो नाही तर लोक आपल्याला विसरतील ही भीती. ह्या भीतीपायीच जगभरातली समस्त तरुण मंडळी झोप, अभ्यास, खाणं-पिणं, खेळ, आयुष्य जे काही महत्त्वाचं आहे ते सोडून नुस्ती एकमेकांशी बोलतच सुटली आहेत. सगळेच बोलतात, कुणीच ऐकत नाही अशा परिस्थितीत दिवसागणिक जास्त एकाकी वाटू लागलंय, हे कसं काय?
‘कनेक्टिव्हिटी’ असं गोंडस नाव असणाऱ्या व्यवस्थेचं हे एक भयानक वास्तव! या सततच्या बोलण्यानं संवादाचे सगळे मापदंड बदलून टाकलेत. पोरं आजकाल तोंडानं कमी आणि बोटांनी जास्त बोलतात. टेक्स्टिंग, मग ते व्हॉट्सअॅप किंवा तत्सम इन्स्टण्ट मेसेजिंग असो वा फेसबुक, जी मेलचे मेसेंजर वा चॅट, हा जगभरातल्या तरुणाईचा संवाद(?) साधण्याचा मुख्य रस्ता आहे. बरं ही साधनं फक्त टेक्स्ट मेसेजिंगची सुविधा देतात असं नाही.. त्याबरोबरीने फोटो शेअर करणं, व्हिडीओ शेअर करणं, लोकेशन कनेक्ट करणं असले फॅमिली पॅक पण येतात. म्हणजे सतत टेक्स्ट करा, त्याबरोबरीने फोटो-व्हिडीओ शेअर करा आणि तुमच्या जवळच्यांना (त्यांची इच्छा नसतानाही) संभाषणात ओढून घ्या. आणि बोलत राहा, बोलत राहा!
दिल को दिल, जिगर को जिगर देणाऱ्या दोस्तांची ही कथा, तर त्याच्या आणि तिच्या हळुवार नात्याविषयी काय बोलावं? ह्या सततच्या ओव्हर कम्युनिकेशनने सगळ्यात जास्त कशाचा कचरा केला असेल तर रोमान्सचा. अमेरिकेतल्या एका टीनएज मुलानं ‘मला माझी गर्लफ्रेण्ड नेहमी व्हॉट्सअॅपच्या इमेजिंगसारखी दिसते’ असं विधान केल्यावर तिकडची मंडळी खडबडून जागी झाली आणि ह्या विषयावर अभ्यास सुरू झाला. तेव्हा लक्षात आलं की, सततचं संभाषण नात्यांमधला हळुवारपणा संपवून टाकतंय. सारखं, काय झालं? कुठे होतीस? काय खाल्लंस? कोण बोललं? तुझी आठवण येतेय, सेल्फी पाठव, रिप्लाय का नाही केला इथपासून ते पोट साफ झालं नाही आज सकाळी इथपर्यंतचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं.
प्रश्न विचारणारा/विचारणारी किंवा उत्तर देणारा/ देणारी दुसऱ्याच गोष्टीत गुंतलेले असू शकतात. वेगळ्या विचारात असू शकतात हे कुणी ध्यानात घ्यायला तयार नाही. आपण बोललो की आपल्याच मूडमध्ये स्वत:ला ट्यून करत समोरच्यानं बोलावं ही अव्यक्त सक्तीच! पण तसं घडत नाही. मग सततच भांडण. रिप्लाय का केला नाही, केला तर उशिरा का केला, अर्धाच का केला.. सुरूच सरबत्ती!
सगळा वेळ बोलण्यात जातो. बोलणं होतं, पण काय बोलले तर काहीच नाही. नात्यात मिनिंगफुल कम्युनिकेशन नाहीच.
बरीच जोडपी नुस्ती बोलत (खरंतर भांडत) असतात. दोघांपैकी एक जरी काही काळासाठी दूर गेला तरी तीच संभाषणं चालतात, तो परत आला तरी तीच संभाषणं. दोघं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टाइमझोनमध्ये असले तरी संभाषण सुरूच. बदलत काहीच नाही.
एकेकाळी स्थळ-काळ विरहित समोरच्याशी बोलायला मिळणं ही चैन होती. मग ती सहजसाध्य होता होता गरज झाली आणि आता तर व्यसनच झालंय तिचं. सध्या १५ ते ३५ च्या वयोगटातले तरुण हे या व्यसनाचे खरे बळी! स्वत:च्याच चौथ्या मूलभूत गरजेची आपण स्वत:च वाताहत करतोय, हे लक्षातही येत नाही.
पूर्वी ज्या जोडप्यांमध्ये विसंवाद व्हायचा त्यांना काऊन्सिलर्स सल्ला द्यायचे.. ‘न बोलून प्रश्न सुटत नसतील तर बोलून बघा’. आता नेमका उलटा सल्ला द्यायची वेळ आली आहे. ‘खूप बोलून प्रश्न वाढताहेत, तेव्हा न बोलून नातं सांभाळा!’ तरीही नाही जमलंच, तर कदाचित पुढे माणसांना मुकाट्यानं गप्प बसवणारंही एखादं अॅप तंत्रज्ञानाच्या पोटी जन्माला यायचं!
१) सगळ्यासोबत तरीही एकाकी
सतत मित्रमैत्रिणींच्या संपर्कात असूनही काही जणांना एकटं वाटतं याचं मुख्य कारण म्हणजे कितीही घनिष्ट मित्र असले तरी ग्रुप सेटिंग किंवा कॉलवर कुणीच आपलं म्हणणं नीट मांडू शकत नाही. सगळेच बोलत आहेत, कुणीच ऐकत नाही म्हटल्यावर सगळं संभाषणच मासळीबाजार होऊन बसतं. त्यामुळे सतत मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात राहूनही कुणी आपल्याला समजून घेत नाही ही भावना बळावते. म्हणूनच कितीही ‘घिसा-पीटा’ सल्ला वाटला तरी जवळच्या मित्रांसोबत ‘फेस-टु-फेस’ बोलणं ही सुखी संभाषणाची गुरुकिल्ली आहे.
२) क्या कर रहे हो जानू?
काही वर्षांपूर्वी एका सिनेमात हे पात्र दाखवलं होतं. ती मुलगी जानू जानू करत शंभर प्रश्न विचारून तिच्या बॉयफ्रेण्डला भंडावून सोडते. काही दिवसांपूर्वी एका मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीने अशीच जाहिरात केली होती. यात मात्र दोघं नायक-नायिका चोवीस तास एकमेकांना व्हिडीओ कॉल करून अपडेट देत असतात. पडद्यावर पाहताना विनोदी वाटलं तरी प्रत्यक्षात हे वास्तव गंभीर आहे. एकमेकांना क्षणाचीही उसंत न देणारी आणि अति संभाषणाच्या गर्तेत गुरफटत जाणारी जोडपी व्यसनाधीन तरुणाईचंच एक लक्षण आहे.
३) कोण (कोणास!) काय म्हणाले?
तंत्रज्ञानावर आधारित ह्या नव्या संभाषणाच्या साधनांचा वेग प्रचंड आहे. स्पेशली टेक्स्टिंगचा. बऱ्याचदा एकाचा एक मेसेज टाइप करून होईस्तोवर दुसऱ्याचे चार मेसेज सेण्ड करून होतात. त्यामुळे नक्की कोण काय म्हणालं हे कळत नाही आणि गोंधळ उडतो. दुसरं म्हणजे टेक्स्ट मेसेज करकरून बोलताना बोलणाऱ्याचा टोन लक्षात येत नाही. एखाद्याने प्रेमाने सांगितलेली गोष्ट दुसऱ्याला खवचट वाटू शकते. मग राडे ठरलेलेच! ते कमीच, नंतर सगळी चॅट हिस्ट्री फुरसतीत वाचून त्यावरून भांडण उकरून काढणारेही सध्या काही कमी नाहीत!