कमी मार्क पडले म्हणजे कुणी मठ्ठं नसतं!

By admin | Published: June 18, 2015 05:16 PM2015-06-18T17:16:54+5:302015-06-18T17:16:54+5:30

पन्नास-साठ टक्क्यांच्या उंबरठय़ावर उभ्या ‘हुशार’ मुलांच्या जगातल्या सिक्रेट गप्पा

There is no mark in the middle of the lower middle! | कमी मार्क पडले म्हणजे कुणी मठ्ठं नसतं!

कमी मार्क पडले म्हणजे कुणी मठ्ठं नसतं!

Next

 शंभरात जेमतेम पन्नास-साठ टक्के मार्क मिळवणारे हे तरुण दोस्त. पण मार्क कमी पडलेत म्हणून ते ‘ढ’ नाहीत! मार्काच्या स्पर्धेबाहेरची  एक वाट त्यांनी निवडली आहे. कारण नेहमीच्या वाटा त्यांना हाका मारत नाही, गणित-विज्ञान-इतिहास-भूगोल त्यांना फारसे कळत नाही, विशेष आवडतही नाही.

अभ्यास करायला पाहिजे, उत्तम मार्क मिळालेच पाहिजेत, असं त्यांनाही वाटतं. मात्र, तरीही त्या विषयात त्यांचा जीव रमत नाही, आणि त्यांना जे विषय आवडतात, त्या विषयात ‘करिअर’ होऊ शकत नाही, असं समाजाला वाटतं! एक प्रकारची सामाजिक स्पर्धा असावी  तसं सगळा समाज दहावीकडे कर्तृत्वाची एक निशाणी म्हणून पाहतो! मात्र कर्तृत्वाची ओळख काही वेगळीही असू शकते, 
मार्कापलीकडच्या एका जगात, आवड-छंद-पॅशन यांचंही एक स्थान असतं आणि त्यातूनही घडतात 
कर्तबगारीचे नवे अविष्कार. सजतात नव्या स्वप्नांच्या वाटा त्याच वाटांवरचे हे तीन दोस्त. एकाचं तर नावही प्रसिद्ध करता येत नाहीये, कारण आजही त्याच्या आई-बाबांना त्याच्या ( नसलेल्या) मठ्ठपणाची लाज वाटतेय. पण दुसरे दोघं निराळे, सुदैवी. त्यांचे आई-बाबा त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिलेत
आणि त्यातून ही मुलं नव्या जगात  आपली ओळख निर्माण  करण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्या प्रयत्नांची ही एक त्यांनी आजवर कुणालाही न सांगितलेली गोष्ट
 
 
 
 
 
चित्रकार होऊ इच्छिणारा 
‘ढ’ मुलगा
 
‘‘इतरांचं डोकं जसं आणि ज्या दिशेनं चालतं तसं माझं डोकं चालत नाही, सिम्पल! मान्य करा हे एवढं,
आणि मग मला ‘मठ्ठ’ ठरवा!’’
 
मला दहावीला फक्त 48 टक्के मार्क होते.
आणि हे सांगण्यात मला काहीही कमीपणा वाटत नाही. माझ्या आई-बाबांना मात्र माझी लाज वाटते. तुलनात्मक विचार केला तर फारच लाजीरवाणं वाटतं त्यांना, कारण माझ्या मोठय़ा बहिणीला दोनच वर्षे आधी 92.79 टक्के मार्क पडले होते. त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की, आमच्या घराण्याला मी किती कलंक वाटू शकतो ते!
माझ्या आई-बाबांनी लहानपणापासून माझ्यावर बरेच उपचारही केले. मी स्लो लर्नर असेल, डिसलेक्सिक असेल इथपासून शंका घेतल्या. पण दुर्दैवानं मी ‘नॉर्मल’ होतो, आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच की, अभ्यासात माझं मन कधी रमलं नाही. माझं चित्त फक्त दोनच गोष्टीत, एक म्हणजे मला खेळायला आवडायचं. पण ते ही क्रिकेट नाही, टेबल टेनिस. किती प्रयत्न केले घरच्यांनी की, खेळ आवडतो ना मग किमान क्रिकेट किंवा बॅडमिण्टन, टेनिस तरी खेळ. पण मला त्यात काही रस नव्हता. मी टेबल टेनिस खेळायचो आणि ‘गोटय़ा’ खेळायचो. आणि दुसरं म्हणजे मला चित्रकला आवडते. मी तासन्तास एका जागी बसून चित्र काढायचो.
एक चित्रकलेचा तास सोडला तर मला कुठलाच तास आवडायचा नाही. मला भाषा-गणित आणि सायन्स यातलं काहीही कळायचं नाही. त्यातल्या त्यात मराठीच्या कविता आवडायच्या, पण तेवढंच!
शाळेतही चित्र मी माझ्या डोक्यानं काढायचं. काही चित्रकला शिक्षकांना ते आवडायचं, काहींना वाटायचं की त्यांनी ठरवून दिलंय तसंच चित्र काढलं पाहिजे! म्हणजे तिथंही वैताग.
मुद्दा काय, मी सगळ्यांच्या लेखी एकदम ‘भंगार’ होतो.
दहावीला तर मी गटांगळीच खाणार अशीच सगळ्यांची खात्री होती. पण तो ही अंदाज चुकला आणि मी चक्क 48 टक्केगुण मिळवून पास झालो. कुठं धड अॅडमिशन मिळेना. 
मी कळवळून सांगत होतो की, मला चित्रकला महाविद्यालयात जाऊ द्या. नाही मिळाली जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला अॅडमिशन तर मी त्यासाठी नंतर प्रयत्न करतो.  सध्या तरी मला स्थानिक महाविद्यालयात जाऊ द्या!
मात्र, माझ्या आई-बाबांना ते मान्य नव्हतं. त्यांनी मला आर्ट्सला घातलं. आता मी जमेल तशी चित्र काढतोय. मनात एकच स्वप्न आहे कधी तरी जे. जे. मध्ये अॅडमिशन मिळेल. मी मोठा चित्रकार होईन. पैसापण कमवीन कारण, त्याशिवाय माझ्या कलेचं महत्त्व कळणारच नाही कुणाला ना!
माझा एक साधा प्रश्न आहे, सगळ्या मुलांनी डॉक्टर-इंजिनिअर व्हायलाच पाहिजे हा काही नियम आहे का? सगळ्यांनाच गणित-सायन्स आलंच पाहिजे का?
मला जे आवडतं ते शिकवा, शिकू द्या. त्यात मला परफेक्शन शिकवा, नाही जमलं तर चांगलं सोलून काढा! मात्र एरव्ही कौतुक करायचं की, ‘ड्रॉईंग चांगलंय तुझं’, आणि माघारी म्हणायचं ‘तसा तो ‘ढ’च आहे.’ मला या ढोंगीपणाचा खूप राग येतो.
मी एकच सांगतो यार, मी मठ्ठं नाही, पण तुमचं डोकं जसं आणि ज्या दिशेनं चालतं तसं माझं डोकं चालत नाही, सिम्पल! मान्य करा हे एवढं!!
यंदा मी बारावी पास झालोय आणि आता प्रयत्न करतोय माझ्या स्वप्नातल्या कॉलेजात अॅडमिशन मिळवण्यासाठी! जे होईल ते होईल, पण मी चित्रच काढीन!!
 
- एक चित्रकार होऊ इच्छिणारा मुलगा
( माझं नाव आणि फोटो छापू नका, असं या मित्रनं कळवळून सांगितलं, म्हणून त्याचे नाव प्रसिद्ध करण्याचे टाळत आहोत.)

Web Title: There is no mark in the middle of the lower middle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.