खरंच दम आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 07:54 AM2021-01-28T07:54:08+5:302021-01-28T07:55:06+5:30

परिवर्तन वगैरे करायचे म्हणता गावात? पण ‘हे’ अडथळे आहेत, तुमच्या वाटेत, पाहा झेपतील का?

Is there really Dare to make a change in village? | खरंच दम आहे का?

खरंच दम आहे का?

Next

-मिलिंद थत्ते

दोस्तांनो, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलात. मनःपूर्वक अभिनंदन!

निवडून येण्यासाठी काय काय करावे लागले असेल, ते तुमचे तुम्हालाच माहीत, पण तो जुगाड तुम्ही जिंकलात. तारेवरच्या कसरतीला आता खरी सुरुवात होणार आहे, त्यासाठी शुभेच्छा!

तारेवरची कसरत म्हणजे असं की, तुमच्या भावकीच्या अपेक्षा, जातवाल्यांच्या अपेक्षा, तुमच्या पॅनलवर निवडून आलेल्या इतर सदस्यांच्या अपेक्षा, पक्षवाले, पैसेवाले आणि राहिलाच थोडा बॅलन्स तर तुमच्या मतदारांच्याही अपेक्षा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. यातल्या ज्यांच्या-ज्यांच्या अपेक्षा अपूर्ण राहतील, त्यांच्या शिव्या तुम्हाला खायच्या आहेत. अपमान झेलायचे आहेत, लाखो रुपयांच्या चेकवर तुम्ही सह्या करणार आहात आणि तुम्हाला पगार मात्र नसणार. फुटकळ प्रवास भत्ता मिळेल आणि लोकांची कामे करत दिवसच्या दिवस तर घालावे लागतील. लोक वाटेल, तेव्हा घरी येतील. लहानसहान भांडणांपासून मोठ्या विकास कामांच्या टेंडरांपर्यंत सगळ्याचा चिवडा तुमच्या डोक्यात होईल. तेव्हा या सगळ्याची तयारी ठेवा.

काही वाटेवरचे गुरू तुम्हाला भेटतील. अनुभवी ग्रामसेवक, जुने मुरब्बी राजकारणी, चतुर कंत्राटदार हे सगळे तुम्हाला काही ना काही शिकवतील. तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीच्या बाहेरच्या चहा टपरीवर या गुरूंचे ज्ञानाचे तुषार उडत असतील. कुणाचे काय ऐकायचे आणि काय ऐकल्यासारखे करून सोडून द्यायचे हे तुम्हालाच ठरवावे लागणार आहे. तुम्ही जर महिला असाल, तर या चहा-टपरी ज्ञानातून सुटू शकता, पण पुरुष असाल, तर या खड्ड्यात पडण्याचा धोका अधिक. तू फक्त सही कर बाकी समदं मी करून देतो, असा मंत्र हे गुरू वारंवार जपतील.

हा धोपटमार्ग आहे. आधीचे सगळे याच मळवाटेने गेलेत. चार पैसे कमवून आता घरी बसलेत किंवा आणखी पैसे कमवायला पुढच्या खड्ड्यात गेलेत. तुम्हीही तसं करू शकता. सोप्पं असतं त्ये!

पण तुम्ही म्हणे तरुण तडफदार! परिवर्तन वगैरे करायचे म्हणता गावात?

खरंच दम आहे का की, उगा नुसती तोंड फुशारकी? आरशात पाहून विचारा हे प्रश्न… जोरात!

काय उत्तर आदळतंय कानावर?

परिवर्तन खरेच घडवायचे, तर थोडा अभ्यास करावा लागेल, हिंमतही लागेल, कामे उत्तम दर्जाची करून स्वतः पैसे कमावण्याची शक्कलही साधावी लागेल.

आम्ही मदत करू, पण हिंमत आणि नियत तुमची असेल तर…

 

 

कार्यकर्ता, वयम चळवळ

Web Title: Is there really Dare to make a change in village?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.