सोशल मीडीयातल्या या चार चुगल्या तुमची नोकरी घालवू शकतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 01:03 PM2019-11-01T13:03:12+5:302019-11-01T13:03:27+5:30

सोशल मीडियात आपण काय कमेंट्स करतो याचा आणि नोकरी मिळण्याचा काय संबंध?

These four sticks on social media can cost you your job! | सोशल मीडीयातल्या या चार चुगल्या तुमची नोकरी घालवू शकतात!

सोशल मीडीयातल्या या चार चुगल्या तुमची नोकरी घालवू शकतात!

Next
ठळक मुद्दे अटेन्शन सिकर लोकांनाही काम देण्यात कुणाला रस नसतो. त्यामुळे जरा जपून!

- निशांत महाजन

नुकतीच निवडणूक झाली. निकाल लागले. कोण जिंकलं, कोण हरलं यावर आपण सार्‍यांनी हिरिरीने वाद घातले, कमेंट्स केल्या.
मग ते होत असतानाच पाऊस सुरू होता, तर त्यावरही आपण पोस्ट केल्या.
ते सुरूच असताना दिवाळी सुरू झाली. मग पुढचे पाच दिवस आपण तेजानं दिवे उजळले. आपले, फराळाचे आणि अजून कसकसले फोटो टाकले. पोस्ट लिहिल्या, इतरांच्या पोस्टवर आपण लाइकठोकले, कमेंट्स केल्या. आपण चर्चा केली, गप्पा मारल्या.
हे सारं छान झालं की नाही, आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं म्हणून आनंद वाटला की नाही. मुळात आपल्याला प्रत्येक गोष्टीवर मतं आहेत आणि ती आपण बेधडक व्यक्त करतो. कुणाची पाबंदी नाही हे सारंही आपल्याला महत्त्वाचंच वाटतं. हीच तर सोशल मीडियाची खरी ताकद आहे.
हे सारं इथवर ठीकच आहे. त्यात गैर किंवा चुकीचं काही नाही.
मात्र हा सारा जो काही डेटा आपण ऑनलाइन तयार करून ठेवतो आहोत, त्यातून उद्या आपल्याला नोकरीची संधी मिळणार असेल किंवा हातची जाणार असेल तर?
तुम्हाला तर माहितीच आहे, आता ते काही ओपन सीक्रिट उरलेलं नाही की हल्ली नोकरी देतानाच काय पण लग्नासाठी स्थळाला होकार देतानाही लोक इतरांचे सोशल मीडिया अकाउण्ट आधी तपासून पाहतात. कोण बोलतंय, कुणाशी बोलतंय, किती जवळकीने गप्पा होत आहे, त्यातली भाषा कशी आहे, शब्दांची निवड कशी आहे, किती सलगी आहे, फोटोत कपडे कसे घातले आहेत हे सारं तपासलं जातं. इतरांकडे काय बोट दाखवायचं हे सारं आपणही करतोच.
तेच आता नोकरी देतानाही होत आहे, या एकाच मुद्दय़ाकडे मात्र लक्ष द्यायला हवं. आणि आपल्याला नोकरी मिळणार की आपण कटाप होणार हे सारं बर्‍यापैकी इथल्या पोस्ट्सवरही ठरणार असतं हे लक्षात ठेवलेलं बरं!
आता तुम्ही विचाराल की, मग काय सोशल मीडियात काही बोलायचंच नाही का? मग नेटवर्किग कसं होणार? मुळात हातात साधन आहे तर ते वापरायचं नाही का?
तर वापरायचं.
पण सजगपणे वापरायचं.
आणि चार मुख्य चुका करायच्या नाहीत.
अलीकडेच एन्फ्ल्युएन्स नावाच्या एका बडय़ा मार्केटिंग कंपनीनं एक सव्र्हे केला. सोशल मीडियात व्यक्त होताना किंवा आपल्याविषयी बोलताना लोक काय चुका करतात आणि त्यांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या ओळखीवर, करिअरवर आणि एकूणच त्यांच्याकडे पाहण्याच्या लोकांच्या नजरेवर काय परिणाम होतो यासंदर्भात ते काळजी व्यक्त करतात. आणि सांगतात की, या चार गोष्टी सांभाळा, अन्यथा करिअरवर दुष्परिणाम होऊ शकतात.
त्या 4 चुका कोणत्या?

1. इतरांच्या कमेंट्सवर आक्रमण
कुणीतरी एखादी पोस्ट लिहितं, ती आपल्याला पटत नाही. आपण आपलं मत मांडतो इथवर ठीक. मात्र त्याचं बुलिंग करायचं, शिव्याशाप द्यायचे, भाषा पातळी सोडून वापरायची, मुद्दा मिटवायचाच नाही, खेचत राहायचा आणि दुसर्‍या माणसाला नकोसं करून सोडायचं. हे असं ‘बुलिंग’ तुम्ही करत असाल तर सावधान. तुम्हाला मार वाटतही असेल की आपली बाजू योग्य आहे, तो माणूस चुकतोय पण किती ताणायचं आणि काय भाषेत बोलायचं याचं भान राखलं नाही, तर हेकेखोर आणि ट्रोलच लेबल लागू शकते. शक्यतो अशा बुलिंग करणार्‍यांना, ट्रोलर्सना कुणी नोकरी देईल अशी आता परिस्थिती नाही.


2. भेदभाव करणार्‍या पोस्ट
अनेकांना वाटतं, आपला स्वभाव फार मिश्कील, मग बायकांवर कमेंट्स करणार्‍या पोस्ट लिहिल्या जातात, जोक मारले जातात. कधी तरुणांवर, कधी राजकीय कार्यकत्र्यावर तर कधी रंगावरून, जातीवरून, धर्मावरून पोस्ट लिहिल्या जातात. भेदभाव करणार्‍या, जाहीर अशी भूमिका घेऊन इतरांना कमी करणार्‍या, रेशियल किंवा जेंडर बायस पोस्ट करणार्‍यांना यापुढे कार्यालयीन कामकाज संस्कृतीतून वगळलं जाण्याचीच शक्यता आहे.

3. अतिआक्रमक लेखन


काहीजणांना फार भारी वाटतं, ते सोशल मीडियावर तलवार घेऊनच येतात. कुणालाही काहीही बोलतात, अपमान करतात, उद्धटासारखं बोलतात. त्यांना इतर लोक लाइक करतात, ते वाद घालतात, त्याचीही चर्चा होते. मात्र अशा अतिआक्रमक आणि बेताल बोलणार्‍यांनाही नोकरीच्या संधी दुर्मीळ होत जातील.

4. अतिपर्सनल शेअरिंग


ही गोष्ट खरं तर कॉमनसेन्स आहे. खासगी आयुष्याची जाहिरात सोशल मीडियात किती करायची याची एक मर्यादा हवी. अतीच खासगी माहिती, रडगाणी अगदी सर्दी- खोकला झाला, आज काय खाल्लं, आज कोण काय म्हणालं हे लिहिणारे अटेन्शन सिकर ठरतात. अशा अटेन्शन सिकर लोकांनाही काम देण्यात कुणाला रस नसतो. त्यामुळे जरा जपून!

 

Web Title: These four sticks on social media can cost you your job!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.