फिल्मी दिसण्याची गोष्ट
By admin | Published: October 6, 2016 05:39 PM2016-10-06T17:39:44+5:302016-10-07T12:31:00+5:30
काळासावळा रंग असणं, त्यानं न्यूनगंड येणं, हेटाळणी, टिंगलटवाळी,चेष्टा होणं हे काही नवीन नाही.. मात्र गेल्या आठवड्यातल्या दोन घटनांनी हा विषय पुन्हा ऐरणीवर आणला. तनिष्ठा चॅटर्जी या अभिनेत्रीवर रंगावरून झालेली टिप्पणी आणि अभिनेत्री सोनम कपूरचा लेख.. ज्यात ती म्हणतेय की, फिल्मस्टार सारखं दिसायचं खूळ बाळगू नका, ते दिसणं खरं नसतं.. त्यानिमित्तानं ही चर्चा..दिसण्या-असण्याची..
Next
> डार्क इज ब्यूटिफुल!
तनिष्ठा चॅटर्जी नावाच्या अभिनेत्रीने घेतलेल्या जाहीर भूमिकेमुळे मागच्या आठवड्यात चांगलीच खळबळ उडाली. एका कॉमेडी शोमध्ये ती अन्य तारकांसोबत सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेली होती. आणि त्या कॉमेडी शोमध्ये मात्र विनोद म्हणून आपल्या रंगावरच टिप्पणी करण्यात आली, अशी तक्रार आणि संताप तिनं फेसबुकवर जाहीर पोस्ट लिहून व्यक्त केला.
त्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘सुरुवात कशानं झाली तर, ‘आप को जामून बहौत पसंद होगा जरुर, कितना जामून खाया आपने बचपन से? ते ऐकून मी हादरले, पण गप्प बसले. माझ्यावर विनोद करताना, कमेण्ट करताना त्यांना माझ्या काळयसावळ्या रंगापलीकडे दुसरं काहीच दिसू नये? मुंबईसारख्या शहरात, २०१६ साल सुरू असताना, खुशाल एका महिलेला रंगावरून टोमणे मारले जावेत? मला असह्य झालं ते, तसं मी आयोजकांना सांगितलंही. पण ते म्हणाले हे सारं विनोदानं घ्या! माझे काही मित्र-मैत्रिणीही म्हणाले की, सोडून दे, कॉमेडी शो होता, एवढं काय मनावर घ्यायचं ते? मात्र कुणाच्या रंगावरून जोक करणं मला तरी जोक वाटत नाही. आपल्या देशात आपण काय दाखवतोय की, तुमचा रंग गोरा नाही, उजळ नाही म्हणून मुलांना नोकरी मिळत नाही, मुलींना चांगलं स्थळ मिळत नाही. आपला रंग काळा आहे यानं आत्मविश्वास गमावून बसतात अनेकजण त्याचं काय? रंगावरून असा दुजाभाव, भेदभाव हे आपल्या समाजात फार खोलवर रुजलेले आहेत.
माझ्यावर जोक झाले म्हणून मी चिडलेय असं नाही, तर अजूनही आपल्या देशात कुणाच्या रंगावरून जोक्स मारले जातात, त्यांना कमी लेखलं जातं. रंग हा कमीपणाचा विषय कसा काय ठरू शकतो? हे पांढऱ्या रंगाचा एवढा हॅँगओव्हर कशासाठी? आपल्या देशातले बहुतांश लोक हे वर्णानं काळेसावळे असूनही आपण आपला रंग का स्वीकारत नाही. राष्ट्र म्हणून आपला अभिमान एरव्ही कुठं जातो? आडनावावरून जात, जातीवरून रंगाचे तर्क लावले जातात.
कुठल्या काळात जगतोय आपण? कशासाठी आपण इतके रंगासंदर्भात धास्तावलेले आहोत?
- याचा विचार करायला हवा..’
तनिष्ठानं अशी बरीच तपशीलवार नोट लिहिली आहे. सिनेमाचं प्रमोशन करत असल्याचे आरोपही त्यासंदर्भात झाले, पण म्हणून तिनं विचारलेले प्रश्न काही गैरलागू ठरत नाही.
कसे ठरतील?
आपल्या देशात आजही लग्नासाठीच्या म्हणून जाहिरातीत ‘गोरी वधू पाहिजे’ असं ठळकपणे लिहिलेलं असतं. टीव्हीवरही रंग उजळण्याच्या जाहिरातीत रंगाचा संबंध थेट आत्मविश्वासाशी आणि प्रगतीशी लावला जातो.
म्हणजे केवळ रंग काळासावळा असणं हे कसं काय आत्मविश्वासाला मारक ठरू शकतं?
याच प्रश्नाचं उत्तर आणि तनिष्ठाच्या संतापाची नोंद अभिनेत्री नंदिता दासनंही आपल्या फेसबुक पोस्टवर घेतली आहे. ‘डार्क इज ब्यूटिफुल’या कॅम्पेनची ती ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. काळासावळा रंगही सुंदरच असतो हे ती शाळा-कॉलेजात जाऊन मुलींना पटवून देते.
नंदिता म्हणते, ‘लिंगभेदी, वर्णभेदी, प्रतिगामीपण यावर विनोद करणं योग्य नाही. त्यात काहीही ‘कूल’ नाही. पण हल्ली पूर्वग्रहच असे शिरजोरपणे समोर येताना दिसतात. अर्थात तेही बरंच म्हणायचं, कारण निदान आता पूर्वीसारख्या या गोष्टी लपून तरी राहत नाहीत..
‘डार्क इज ब्यूटिफूल’ ही कॅम्पेन सुरू झाल्यापासून मी कितीतरी भयानक कहाण्या सतत ऐकतेय. तरुण मुलींच्या, महिलांच्या तर आहेतच; पण मुलांच्याही कहाण्या आहेत. रंगावरून छळ झाल्याच्या, शिवीगाळ, कमी लेखणे, चेष्टा, टर उडवणं हे सारं त्यात आहेच. आणि आता तर हे सारं सतत ऐकल्यानं मला त्यांचे धक्के बसणंही कमी झालंय, इतकं ते सर्रास अजूनही होतं आहे. आणि यासाऱ्याविरुद्ध अजूनही कुणी बोलत नाही. बोललं तरी गोष्टी बदलत नाही, असं का? आपण दुसऱ्याला रंगावरून कमी लेखतो, हे चूक आहे हे लोकांना कधी कळणार? - कळायला तर हवंच..’
नंदिता दाससारखी अभिनेत्री यासाऱ्याविषयी जेव्हा कळकळून बोलते तेव्हा निदान माध्यमात ते सारं छापून तरी येतं..
चर्चा होते. सोशल मीडियात चर्चा होते.
मात्र हे सारं थांबणार कधी?
आपल्याला का आपल्या काळ्यासावळ्या रंगाचा एवढा कॉम्प्लेक्स आहे?
आणि असलाच तर तो झटकणार कोण? कसा?
- कुणी शोधायची या प्रश्नांची उत्तरं..
प्रत्येक मुलीसारखं त्या काळी मी स्वत:ला आरशात पाहत असे..
तरुण होतानाचं अडनिडं वय, तासन्तास मी आरशासमोर उभी राहून पाहत असे आणि मला प्रश्न पडत, की मी अशी का दिसतेय? माझं पोट सतत सुटत का चाललंय? मी गोरीपान का नाही? माझ्या डोळ्यांखाली का ही काळी वर्तुळं येताहेत? माझ्या वयाच्या मुलांपेक्षाही मी का जास्त उंच आहे? ‘इतनी लंबी, इतनी काली..’ असं कौटुंबिक समारंभात माझ्याविषयी कानावर पडणंही काही नवीन नव्हतंच.. आणि मग महत्त्वाचा प्रश्न, ‘शादी कौन करेगा?’
वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत हे असंच चाललं होतं. त्या वयात काहीही कळत नव्हतं. पण एक गोष्ट माझी मलाच कळून चुकली होती की, काय वाट्टेल ते झालं तरी मी हिरॉईन नाही बनू शकणार!
मला आठवतंय, १३ वर्षांची होते मी, ट्रिपला घरच्यांसोबत गोव्याला गेले होते. ऐश्वर्या राय तिथं ट्रिपला आली होती. आम्हीही एका संध्याकाळी तिला भेटायला गेलो होतो. मला अजून ते चित्र डोळ्यासमोर दिसतं. निळी जिन्स, पांढरा टॅँक टॉप घातलेली ऐश्वर्या पाहून मी स्तब्धच झाले.
काही काळानं कसं काय चकं्र फिरली आणि संजय लीला भन्साळीने मला सांवरिया सिनेमात घेतलं. मला वाटलं होतं शक्यच नाही, मी हिरॉईन होऊच शकत नाही.
पण तरी मी डाएट सुरू केलं. भयानक डाएट्स. काय वाट्टेल ते मी केलं. एकदा तर मी फक्त अननस खाऊन राहिले होते काही दिवस. तासन्तास सलग योगा केलं. व्यायाम केला. वजन कमी करण्यासाठी कित्येक दिवस मी काही खात नसे. आणि त्या मूर्खपणामुळे माझ्यामागे अॅसिडीटी लागली ती कायमचीच!
सिनेमात काम करायला लागल्यावरही माझ्याविषयी काय काय लिहिलं-बोललं गेलं.
तसंही मुलींच्या स्त्रियांविषयी बोलणं, टिप्पण्या करणं काही नवीन नाही. सेलिब्रिटींच्या बाबतीत तर ते सर्रास होतंच, पण सामान्य मुलींनाही त्या साऱ्याचा सामना करावाच लागतो. खरं सांगा, कुणी कधी तुमच्या तब्येतीकडे पाहून म्हटलंय की, तू ‘हेल्दी’ दिसतेस? नाही!
नातेवाईक, मित्र-मैत्रिणीही फुकट सल्ले देतात, वजन कमी कर! सगळे सांगणार उन्हात जाऊ नकोस, आणखी काळी होशील. लोकांचे टोमणे ऐकून ऐकून स्वत:च्या शरीराचाच तिटकारा वाटू लागतो.
हे सौंदर्याचे निकषच इतके विचित्र आहेत की, कुणी कितीही सुंदर असलं तरी त्या निकषात ते सुंदर ठरतच नाहीत. अुनष्का शर्माला बारीक म्हणून, सोनाक्षी सिन्हाला जाडजूड म्हणून, कतरिना कैफला फिट म्हणून सतत हिणवलं जातंच ना.
त्या सुंदर नाहीत?
पण नाही, मुलींनी सुंदर दिसण्याच्या व्याख्या कायम भलतंच काहीतरी सांगत राहणार, ठरवणार!
बारा वर्षे होऊन गेली मला या इंडस्ट्रीत येऊन, आले तेव्हा आत्मविश्वास नावाची काही गोष्टच नव्हती माझ्यात. पण मला ज्यांनी सपोर्ट केला त्यांच्या मदतीनं मला ते बळ पुन्हा कमावता आलं. माझी मैत्रीण आणि मेकअप आर्टिस्ट नम्रता सोनी. ती तिच्या कलेनं माझ्या चेहऱ्यावर जादू करते. मी चिडचिडते अजूनही चेहऱ्यांवरच्या रेषा पाहून, काळी वर्तुळं पाहून तेव्हा ती शांतपणे सांगते की, हे अत्यंत नॅचरल आहे. आणि सुंदरच आहे.
तेच माझ्या बहिणीचंही, रेहा. ती अत्यंत सुंदर आहे. ती जे काही कपडे डिझाईन करते, ते घालून मी सुंदरच दिसते असं तिचं मत आहे. या सगळ्याजणींनी माझ्यात आत्मविश्वास भरला.
आज मी ३१ वर्षांची आहे. मला माझं शरीर आवडतं कारण मी हेल्दी आहे. आता मी माझं बारीक असणं, एकदम फ्लॉलेस असणं याची चिंताच करणं सोडलं आहे. मी उत्तम लाइफस्टाइल निवडली. उत्तम आणि व्यवस्थित जेवते. व्यायाम करते. आणि रोज सकाळी उठल्यावर मला छान उत्साही वाटतं. आळसटल्यासारखं होत नाही. सौंदर्य हे उत्तम तंदुरुस्त तब्येतीत असतं हे मला आता नीट कळून चुकलंय.
आता महत्त्वाचा प्रश्न, जो मलाही वयात येताना पडायचाच. मी फिल्मस्टार, हिरॉईनसारखी का नाही दिसत.
खरं सांगते, रोज सकाळी झोपेतून उठताना कुणीच तसं स्टारसारखं दिसत नाही. मी ही नाही.
(कुणीच नाही!)
कुठल्याही कार्यक्रमापूर्वी मी सलग ९० मिनिटं माझ्या मेकअप चेअरवर बसते. सहा लोक माझ्या केसांवर, मेकअपवर काम करतात. कुणीतरी माझ्या नखांना पेण्ट लावतो. कुणी आयब्रोल, कुणी काय नि कुणी काय. त्यामुळे हिरॉईनसारखी दिसण्यात यासाऱ्या मेकअपचे आणि तो करून देणाऱ्यांचे कष्ट असतातच.
मी काय करते, तर मी रोज सकाळी ६ वाजता उठते. साडेसातला जिममध्ये जाते. दीड तास व्यायाम करते. सकाळी जमलं नाही तर संध्याकाळी तरी व्यायाम करतेच. त्याशिवाय झोपत नाहीच. पण तरीही मी काय खायचं, काय खायचं नाही हे ठरवणं हेच काहीजणांचं फुल टाइम काम आहे. माझ्या खाण्यात जेवढे अन्नघटक नसतात, तेवढे माझ्या फेसपॅकमध्ये असतात. आणि एवढं करून जे फोटो निघतात, त्यात काही गडबड असेल तर फोटोशॉप आहेच..
मी पुन्हा सांगते, माणसांची फौज, पैसा, वेळ यातून हिरॉईन्स, सेलिब्रिटी यांचे लूक ठरतात. त्यामुळे त्यांचं ‘दिसणं’ खरं नसतं. तेव्हा ते ‘तसंच’ दिसण्यासाठी जीव काढून ठेवू नये, स्वत:ला छळू नये.
स्टारसारखं दिसण्याचा हट्ट सोडा..
झोपेतून उठताना मी स्टार दिसत नाही, ग्लॅमरस दिसत नाही.. हेच खरं आहे. बाकी माझा आणि अन्य हिरॉईन्सचाही ग्लॅमरस लूक ठरवण्यासाठी माणसांची फौज राबत असते, मेकअप करणाऱ्या हातांची जादू असते..त्यासाठी जीव काढून ‘तसंच’ दिसण्याचा हट्ट करू नका..‘ते दिसणं’ खरं नसतं..
- सोनम कपूर
( व्होग इंडियाने ऑनलाइन प्रसिद्ध केलेल्या सोनमच्या मुलाखतीचा संपादित- अनुवादित भाग संबंधितांच्या सौजन्याने.)