मन की बात
By admin | Published: June 21, 2016 08:28 AM2016-06-21T08:28:33+5:302016-06-21T08:28:33+5:30
एका गावात एक गुरुजी राहत असत. साधे. प्रसन्न. हसरे.लोक त्यांच्याकडे येत. सतत आपली गाऱ्हाणी सांगत.
-ऊर्जा
एका गावात एक गुरुजी राहत असत. साधे. प्रसन्न. हसरे.
लोक त्यांच्याकडे येत. सतत आपली गाऱ्हाणी सांगत. सतत कुरकुर. आपल्या आयुष्याचं रडगाणं.
एकदा काही लोक गुुरुजींकडे आले. आपलं नेहमीचं दु:खं, वेदना, गाऱ्हाणी सांगू लागले.
थोड्या वेळानं गुरुजींनी त्यांना एक किस्सा सांगितला. विनोदी होता. लोक हसून हसून लोटपोट झाले.
मग गुरुजींनी लोकांना थोडा वेळ बसवून ठेवलं. आणि मग पुन्हा तोच किस्सा सांगितला. काही लोक हसले. काही जेमतेम हसले.
मग गुरुजी त्या लोकांना अजून जरा वेळ बसा म्हणाले.
मग परत त्यांनी तोच किस्सा सांगितला.
फारसं कुणी हसलंच नाही.
मग गुरुजी म्हणाले, ज्या विनोदावर एकदा तुम्ही खूप हसलात त्याच विनोदावर जर तुम्हाला पुन्हा पुन्हा तेवढंच हसता येत नाही तर मग त्याच त्या दुखण्यांवर, काळज्यांवर, पुन्हा पुन्हा तेच ते किंवा जास्तीत जास्त दु:ख का करता? तेच ते का उगाळता? का सतत रडता? कुढता?’