मन की बात
By admin | Published: June 28, 2016 12:50 PM2016-06-28T12:50:53+5:302016-06-28T12:50:53+5:30
पाऊस आला की काय वाटतं? नाही म्हणजे काय आठवतं? रिपरिप? चिखल? चिकचिक? ओली छत्री? खराब होणारे कपडे? रस्त्यावरचे खड्डे? बंद पडणाऱ्या गाड्या? की फक्त चहाभजी? -नेमकं काय??
Next
हे सारं आठवणं चूक नाही,
नसतंच!
पण आपल्याला का आठवू नये
पाऊस म्हटल्यावर सरसर बरसणाऱ्या
रेशीमधारांमधला सुंदर स्पर्श..
जो घननिळा मंगेश पाडगावकरांना
त्यांच्या कवितेत भेटतो, तो आपल्याला
का भेटू नये?
का येऊ नयेत आपल्याला
दूर डोंगरावरुन हाका
का येऊ नयेत डोळ्यासमोर
डोंगरावरुन धावत येणारे
ओढाळ निर्झर
का दिसू नये
त्यांचं अवखळ खळखळतं हसू?
***
आपण आपलं आपल्यालाच
विचारू की,
आपल्या मनातला रोमान्स
असा रोजच्या रिपरिपीत
का हरवतोय?
का चिकचिक करतोय आपण?
***
आणि आपल्याला नेमकं
कसं दिसायला हवंय जग..
रिपरिपीनं चिकचिकलेलं
की
सुंदर रेशीमधारांनी
न्हाऊन निघत ओलं, नवंनवं झालेलं?
-ऊर्जा