त्या
By admin | Published: September 8, 2016 12:50 PM2016-09-08T12:50:30+5:302016-09-08T13:30:17+5:30
विदर्भातल्या ११ जिल्ह्यातल्या त्या मुली. कायद्यानं ‘काळजी व संरक्षणाची’ गरज असलेल्या. त्यांना भेटायला, लाईफ स्किल्स शिकवायला जाऊ लागले.. तेव्हा कळलं की, त्यांच्या जगात जरा वेगळ्या वाटेनं शिरायला हवं..
- पल्लवी मालशे (निर्माण 5)
रिसोर्स सेल फॉर ज्युवेनाइल जस्टीस (फउखख) मध्ये काम करणाऱ्या ज्योत्स्ना मेहकरे आणि माझ्या संस्थेचे डायरेक्टर प्रवीण खांडपासोळे यांच्यासोबत मी अमरावतीतल्या मुलींच्या शासकीय निरीक्षणगृहात गेले. आणि तिथल्या सुपरवायझरशी झालेल्या चर्चेत सरांनी मुलींसाठी ‘जीवन कौशल्य’ अर्थात लाइफ स्कील्स या विषयावर नियमित उपक्र म घ्यायचं ठरवलं आणि तिथेच ती जबाबदारी माझ्यावर सोपवली !
मग मला मुलींचा अंदाज येण्यासाठी ज्योत्स्ना मॅडमच्या त्या दिवशीच्या सेशनसाठी तिथे थांबायला सांगितलं. ‘बाल-हक्क’ याविषयावर त्यांचं सेशन होतं.
ते स्वच्छ आॅफिस, मोकळं, हवेशीर गार वातावरण. त्यात कळलं की ही बिल्डिंग नवीनच बांधलेली आहे. त्यामुळे मुलींची राहण्याची सोयपण अशीच ‘हवेशीर आणि छान असणार असं वाटलं.
वरच्या मजल्यावर गेल्यावर मात्र थोडं वेगळं चित्र होतं ! प्रवेश करण्याच्या ठिकाणी एक भलामोठा ग्रीलचा दरवाजा, त्याला बाहेरून कुलूप ! आम्ही गेल्यावर आमच्यापुरतं कुलूप उघडलं गेलं, आम्ही आत गेल्यावर पुन्हा बाहेरून कुलूप ! मला पहिल्यांदा थोडी भीतीच वाटली ! आणि माझ्या स्वातंत्र्यावर अतिक्र मण होतंय असं वाटलं ! पण नंतर मला कळलं की, अकरा जिल्ह्यातल्या ‘काळजी व संरक्षणाची’ गरज असलेल्या मुलींची जबाबदारी असल्यामुळे निरीक्षणगृहात अशी दक्षता घेतली जाते.
ज्युवेनाइल जस्टीस अॅक्टमध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेली मुलं, विधिसंघर्षग्रस्त बालके यांच्या पुनर्वसनासाठी तरतुदी केल्या आहेत. ‘निरीक्षणगृह’ ही त्यातलीच एक तरतूद.
अमरावतीच्या निरीक्षणगृहात विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशीम, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर या ११ जिल्ह्यातून ‘काळजी व संरक्षणाची’ गरज असलेल्या मुली येतात. (वयोगट ६ ते १८ ). त्यांची संख्या नेहमी कमी-जास्त होत असते; पण साधारणपणे सरासरी ३५ मुली असतात.
इथे येणाऱ्या मुली खूपच वेगवेगळ्या बॅकग्राउण्डसच्या असतात. काही मजुरी करताना आढळलेल्या किंवा घरातून काढून टाकलेल्या, प्रेमप्रकरणात घरातून पळालेल्या आणि त्यावरील पोलीस तक्र ारीमुळे न्याययंत्रणेत आलेल्या, अपंग, मतिमंद, मूकबधिर, अनाथ, हरवलेल्या. प्रत्येकीचं एक दु:खद पूर्वायुष्य असतं; जे पूर्ण ऐकण्याचे धाडस मला अजून झालेलं नाही (म्हणूनच की काय, मी आतापर्यंत एकीलाही तिच्या वैयक्तिक, पूर्वायुष्याबद्दल विचारलेलं नाही; सेशनदरम्यान त्या स्वत:हून जेवढं सांगतील तेवढंच..)
त्यादिवशीच्या ‘बालहक्कांवरील’ सेशनमुळे मला मुलींच्या हुशारीची कल्पना आली. त्यांच्यासाठी ‘स्टीफन कोवे’ यांचे सुपुत्र सीन कोवे यांनी लिहिलेलं ‘सेव्हन हॅबिट्स आॅफ हायली इफेक्टिव्ह टीन्स’ आणि त्यावर आधारित वर्कबुकमधील अॅक्टिव्हिटीज घेण्याची कल्पना मनात होती.
त्यानुसार पहिली अॅक्टिव्हिटी छान पार पडली; पण शेवटी गाणं म्हणायचा आग्रह सुरू झाला ! मग मला कळले की त्या सात दिवस चोवीस तास त्याच ठिकाणी असल्यामुळे, त्यांना चित्र काढणं, गाणं म्हणणं, पिक्चर पाहणं, नाचणं, अशा गोष्टी हव्या असतात, आणि आपण गेल्यावरपण त्या मग तीच गाणी म्हणत राहतात, नाचतात त्यामुळे एकदा एका सेशनमध्ये म्हटलेलं गाणं नेक्स्ट टाइम त्यांना पाठ असतं!
पहिल्या वेळेस मला माहिती नसल्यामुळे त्यांनी माफ केलं आणि स्वत:च एक गाणं म्हटलं. दुसऱ्या - वेळचं सेशन मात्र मलाच आवडलं नाही. मला जो ‘कण्टेण्ट’ सांगायला निदान अर्धा तास लागेल असं वाटलं होतं, तो पंधरा मिनिटातच संपला. आणि बोलताना माझ्या असं लक्षात येत होतं, की यांनी अनुभवली असतील अशी उदाहरणच मला देता नाही येत आहेत.
कशी येणार? त्या ‘इथे’ असल्यापासून शाळेत जात नाहीत, पूर्वी शाळेत गेल्याच असतील याची खात्री नाही, कुटुंबव्यवस्थेत राहत नाहीत, सगळ्या मुलीमुलीच राहतात. बऱ्याच मुलींची भाषाही वेगळीच असते ! त्यामुळे आपण बोललेलं त्यांना काहीच कळत नसतं (हे खूपदा आपल्याला सेशनच्या शेवटी समजतं ! आणि आपल्याला समजणार नाही म्हणून त्या बोलण्याचे प्रयत्नच नाही करत. शिवाय अपंग, मूकबधिर, मतिमंद मुलींचे प्रश्न वेगळेच!)
इथे असेपर्यंत बंदिस्त जीवन जगत असताना त्यांना काही नवीन, शिकण्यास प्रवृत्त करणे, क्रि एटिव्हिटीला चालना देणारे काम करा म्हणणे, स्वत:चा विकास स्वत:च्याच हातात असतो, असे सांगणे कितपत अर्थपूर्ण आहे?
बाकी, इतक्या मर्यादांमध्ये स्वत:चा विकास करायचा आणि समृद्ध आयुष्य जगायचं म्हणजे तर क्रिएटिव्हीटीची पराकाष्ठाच लागणार !
माझ्या असंही लक्षात आलं की, त्यांच्या पूर्वायुष्यातील दु:खद घटनांमुळे बहुतेक मुलींना ‘ट्रॉमा’ आलेला असतो, मनावर मोठ्ठा ताण आलेला असतो, ज्याची फारशी कोणी दखल नाही घेत. कारण कदाचित ते ‘सिस्टिम’च्या आवाक्यात नसतं. पण जेव्हा साधारण तेरा वर्षाच्या माझ्याशी हसत-खेळत वागणाऱ्या मुलीचे काही केस पांढरे झालेले दिसतात, तेव्हा मात्र मला तो ‘अतितणावाचा’ परिणाम असेल असंच वाटतं. (पण मी डॉक्टर नाहीये त्यामुळे ठामपणे नाही सांगू शकत.)
आणि रिकामं मन शैतान का घर म्हणतात तशी काहीशी त्यांची गत झालेली असते. त्याच त्या मुलींसोबत ‘त्याच’ ठिकाणी रहायचं, ठरावीक वेळापत्रकानुसार जेवायचं, आंघोळ करायची वगैरे; पण मग रिकाम्या वेळात काय करणार? बाहेर जाता येत नाही, वाचनासाठी पुस्तकं नाहीत, अन्य कुठली ‘गुंतवून ठेवणारी’ साधनं नाहीत. माझ्यासारखेच अजून कोणी ना कोणी सोशल वर्कर येऊन ज्या विषयावर त्यांना बोलायचं असेल ते बोलून जातात! हेही नसे थोडके, म्हणून मुली मनोभावे ऐकतात! (कधीकधी झोपतातसुद्धा!)
मग अशा वेळेस जुन्या आठवणी काढणे, दु:ख उगाळणे, इतर मुलींशी भांडणे, नकारात्मक विचार करणे हे सहज शक्य होते! त्यावर त्यांना रागावणं, त्यांच्यावर ओरडून त्यांना घाबरवून गप्प करणं हा उपाय नाही असू शकत, पण हा सगळ्यात सोपा पर्याय वापरला जातो. अशाप्रकारे त्यांचा व्हर्बल अॅब्युज होतो, त्याने त्यांची स्वत:ची प्रतिमा ढासळते, खराब होते, असं माझं ठाम मत आहे.
त्या सेशनच्या शेवटी त्यांच्यातील काही मुलींनी जेव्हा ‘सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई, मैने खत मेहेबूब के नाम लिखा, शांताबाई, पिंगा इत्यादी गाण्यांवर नाच करून दाखवला तेव्हा मला धक्काच बसला.
पुढचे सेशन घेताना या मर्यादांवर काय उपाय काढावेत, या प्रश्नाने मी त्रस्त झाले होते. एका आठवड्याला तर गेलेच नाही. मग मात्र ‘सेव्हन हॅबिटस’ पुस्तकातल्या ‘पॅरॅडिगम शिफ्ट’साठी विचार करण्यास उद्युक्त करतील असे खेळ, गोष्टी (कथा) गोळा केल्या, दोन-तीन अॅक्टिव्हिटीजचा सिक्वेन्स लावला, त्यात चित्र काढण्यास स्कोप दिला, आणि नंतर अर्थातच गाणं म्हणण्यासाठी एक छानसं गाणं पाठ करून गेले !
त्या सेशनमध्ये मलाही मजा आली आणि मुलींनाही..
अशा सेटअपमध्ये प्रेरणा करण्यासाठी गोष्ट, किस्सा सांगणं हा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. चित्र काढायला, लिहायला सांगणं, सहज गप्पा मारणं हे चांगले उपाय आहेत असं मला जाणवलं.. पुढे काय करता येतंय ते पाहू !
पण हा अनुभव मलाच खूप शिकवतो आहे..
निर्माण उपक्रमाची सदस्य असलेली पल्लीवी दिशा फॉर व्हिक्टिम्स या संस्थेतर्फे निरीक्षण मुलांसाठी काम करते आहे.