धमकी आणि धूम

By admin | Published: August 11, 2016 06:12 PM2016-08-11T18:12:44+5:302016-08-11T18:28:54+5:30

दारू पिऊन गाडी चालवल्यास दोन ऐवजी दहा हजार रुपये दंड होणार म्हणून पोरं जबाबदारीने वागतील? सिग्नल तोडल्यास शंभरऐवजी हजार रुपयांची पावती फाडावी लागेल म्हणून रेषेच्या आत मुकाट थांबतील? - दंड करून, लायसन्स जप्तीची धमकी देऊन बेदरकार तारुण्याला शिस्त लागेल?

Threats and Smokes | धमकी आणि धूम

धमकी आणि धूम

Next

- सुशांत मोरे 

रस्ते कशासाठी असतात? आणि वाहनं?  हे असे प्रश्न कुणी विचारले तर त्याला वेड्यात काढतील. रस्ते सुरळीत वाहतुकीसाठी आणि वाहनं एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवासासाठी असतात, ही झाली या साध्या प्रश्नाची साधी उत्तरं. पण कॉलेजात शिकणाऱ्या, स्वत:ची अशी स्टाईल मारण्याची प्रचंड हौस असलेल्या आणि स्वस्तातल्या शिवाय इन्स्टंट अशा थ्रीलची भूक लागलेल्या तरुण पोरांसाठी या प्रश्नांची उत्तरं इतकी साधी नाहीत. त्यांच्यासाठी रस्ते असतात ते जीवघेणे खेळ करण्यासाठी, वाहनांवर कसरती करून आजूबाजूच्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, वेगाची तहान भागवण्यासाठी आणि असले-नसलेले नियम मोडण्याची सुरसुरी भागवण्यासाठी! -शिवाय खिशात (पिताश्रींच्या कृपेने) पैसे खुळखुळत असतील आणि बुडाखाली परदेशी बनावटीची एखादी सेक्सी बाईक किंवा चारचाकी असेल, तर मग विचारूच नये. रात्री-बेरात्री-मध्यरात्री खानापिना आटोपल्यावर घरी जायची आठवण आलीच तर लागतात ना या सेक्सी गाड्या! या अशा बडे बापके बेट्यांनी भारतीय रस्ता सुरक्षेचे धिंडवडे काढायला घेतले त्यालाही आता काळ उलटला आहे. बातम्यांंमध्ये झळकणारा ‘हिट ऐण्ड रन’वाला सुपरस्टार लोकांच्या चर्चेचा, संतापाचा विषय होतो एवढंच, पण त्याला शिव्या घालण्याचं काम आटोपल्यावर बुडाखालच्या बाईकला कीक बसतेच... आणि तीही वारा पीत सुसाट सुटतेच! वाहतुकीचे नियम मोडण्यालाच मर्दानगी मानणाऱ्या आणि स्वत:सह दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालणाऱ्या या विक्रम-वीरांना आळा घालण्यासाठी नुकत्याच मंजूर झालेल्या सुधारित रस्ता सुरक्षा विधेयकातल्या दुरुस्त्यांचा उपयोग होईल का, हा सध्या चर्चेचा विषय आहे. या नव्या मोटार वाहन विधेयक २0१६ ला केंद्र सरकारने नुकतीच मान्यता दिली. नव्या विधेयकात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भरीव दंडाची तरतुद करण्यात आली आहे. देशातली रस्ता अपघातांची सध्याची आकडेवारी अत्यंत लाजीरवाणी आहे. 2015च्या आकडेवारीनुसार भारतात दर तासाला सरासरी 17 माणसे रस्ते अपघातात आपला जीव गमावतात. म्हणजे दिवसालासरासरी 400 बळी! हे अपघात घडवणाऱ्यांमध्ये तरुणांचा समावेश (अर्थातच) सर्वाधिक आहे. यातही बाईकवाले आघाडीवर! आता ही नियम मोडण्याची बेदरकारी करणाऱ्यांना चांगला भरभक्कम दंड केला जाणार आहे. पण दंडाच्या रकमेत वाढ केल्याने खरंच या हिरोगिरीला चाप बसेल? - तज्ञ म्हणतात, वाहन चालवणं ही जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे, हा संस्कार रुजवण्यातच आपण कमी पडतो आहोत. ते बदलत नाही, तोवर दंडाची रक्कम वाढवणं, लायसन्स तात्पुरतं जप्त किंवा कायमचं रद्द करण्याच्या धमक्या घालून फारसा परिणाम होणार नाही. तुम्हाला काय वाटतं?

 

..आपण का इतके बेदरकार?

तरुण वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांची, रस्त्यावरल्या जबाबदारीची जाणीव देण्याचा प्रारंभ म्हणजे वाहनचालकांना शास्त्रशुध्द प्रशिक्षण देणारी ड्रायव्हिंग स्कूल्स! आपल्याकडे या प्रशिक्षणाला गांभीर्याने घेतलं जात नाही, हे दुर्दैव आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन हेच आपल्या देशातल्या बहुतेक अपघातांमागचं कारण असतं. यात बेदरकारपणे व भरधाव वाहन चालवणं आणि दारु पिऊन वाहन चालवणं ही महत्वाची कारणं आहेत. १५ ते १६ वयोगटातील तरुणांना भरधाव वाहन चालविण्याची सवय लागते. मुळात या वयात त्यांना सुरक्षित वाहन चालवण्याचे धडे दिले पाहिजेत. ही जबाबदारी पालकांचीही आहे. अकरावी किंवा बारावीत गेल्यानंतर पालकांकडूनच अल्पवयीन मुलांच्या हातात थेट वाहनाची चावी दिली जाते. पूर्वी ग्रॅज्युएट झाल्यानंतर वाहन मिळत असे. आता अकरावीतच मुलं आणी मुलंही आपापलं वाहन चालवायला लागतात. शिक्षणातूनही वाहतूक नियमांचे धडे द्यायला हवेत. आता पर्यावरणासारखे विषय अभ्यासाचा भाग झालेच आहेत ना, वाहतुकीचे नियमही आता औपचारिक शिक्षणाच्या परिघात आणले पाहिजेत. परदेशात शाळेपासूनच हे धडे सुरू होतात. आपण त्याबाबतीत अजूनही खूपच मागे आहोत.

- डॉ. रश्मी करंदीकर पोलिस उपायुक्त, मुख्यालय,ठाणे. राज्य महामार्ग पोलीस अधिक्षक असताना तरुणांंमधील जागृतीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या प्रयोगशील अधिकारी

दर तीन मिनिटाला एक मृत्यू

देशात दर तीन मिनिटाला एकाचा मृत्यू होतो. प्रत्येक वर्षी जवळपास १ लाख ६३ हजार जणांचा रस्ते अपघातांत मृत्यू होत असून यात साडे पाच लाखांपेक्षा जास्त गंभीर जखमींची नोंद होते. गंभीर जखमींना झालेल्या दुखापतीमुळे कायमचं अपंगत्वही येतं. यात तरुणांचं प्रमाण (अर्थातच) अधिक आहे. 

२0 ते ४0 दारु पिऊन वाहन चालविणे,

भरधाव वेगाने वाहन चालवणे, हेल्मेट न वापरण्याचे प्रकार हे २0 ते ४0 या वयोगटातल्या वाहनचालकांकडून सर्वाधिक होतात.

( ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक,वार्ताहर आहे)

Web Title: Threats and Smokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.