तिघींची नवी ‘स्पेस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 08:35 AM2018-03-29T08:35:52+5:302018-03-29T08:35:52+5:30
कोल्हापूरच्या अनिशा राजमानेला फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन विद्यापीठाची कल्पना चावला फेलोशिप यंदा जाहीर झाली, कशी केली तिनं या शिष्यवृत्तीची तयारी..
अकोल्याची सोनल बाबरेवाल आणि कोल्हापूरची अनिशा राजमाने. या दोघींना अनुक्रमे २०१७ आणि २०१८ सालची कल्पना चावला आंतरराष्ट्रीय फेलोशिप मिळाली आहे. फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन विद्यापीठाच्या वतीने ही प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती दिली जाते. भारतीय आणि विशेषत: दोन मराठी मुलींना सलग दोन वर्षे ही शिष्यवृत्ती मिळाली. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पुण्याच्या लीना बोकील. त्या सांगताहेत, लहान शहरातल्या जिद्दीच्या या मुलींची ताºयांपर्यंत पोहचण्याच्या करिअरची एक नवी वाट. आणि इकडे इसरोत शास्त्रज्ञ म्हणून रुजू होतेय मुंबईतल्या बोरिवलीची दिव्यश्री शिंदे. बहुराष्ट्रीय कंपनीतली उत्तम पगाराची नोकरी सोडून तिनं इसरोच्या अवघड परीक्षेला स्वत:ला बसवलं. देशात तिसरी तर मुलींमध्ये पहिली येत तिनं इसरोच्या अत्युच्च स्तरावर काम करण्यासाठी स्वत:ला सिद्ध केलं. आपलं आकाशच उंचावणाºया या तीन मुलींची ही खास भेट...
कोल्हापूरची अनिशा
कोल्हापूरच्या अनिशा राजमानेला फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन विद्यापीठाची कल्पना चावला फेलोशिप यंदा जाहीर झाली, कशी केली तिनं या शिष्यवृत्तीची तयारी..
- संदीप आडनाईक
तिचं वय अवघं २३. पण अवकाशाला गवसणी घालायचं स्वप्न ती आता खरोखर जगायला निघाली आहे.
कोल्हापूरच्या अनिशा अशोक राजमानेची ही गोष्ट. तिला नुकतीच प्रतिष्ठेची कल्पना चावला आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आहे. आणि स्पेस सायन्स शिकायला ती आता थेट फ्रान्सला जायची आहे. अनिशा चारचौघींसारखीच इंजिनिअर झाली. मात्र या नव्या वाटेवर तिच्या स्वप्नांना खरोखरच पंख फुटले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातल्या हालोंडी गावचं हे शेतकरी कुटुंब. घरची परिस्थिती मुळातच बेताची. त्यावेळी शेती आणि नोकरी या दोन्हीही मळलेल्या वाटा टाळून अनिशाच्या वडिलांनी व्यवसाय करायचं ठरवलं. त्यांना दोन मुलं. मोठी अनिशा. धाकटा सातवीत शिकतोय. अनिशाची आई डिप्लोमा इंजिनिअर. मुलांच्या अभ्यासातल्या प्रगतीकडे त्यांनी उत्तम लक्ष दिले. त्यातून अनिशाला अभ्यासाची गोडी लागली, शिकवण्याचा रट्टा न लावता विषय नीट समजून घेणं सुरू झालं. कॉन्व्हेन्ट स्कूलमधील मिशन आविष्कारसारख्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमातून अनिशाला अंतराळ विश्वाबद्दल माहिती कळली. इयत्ता पहिलीपासूनच या विषयाशी संबंधित माहिती तिच्या कानावर पडत राहिली. कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये रेड, ग्रीन, ब्ल्यू अशा हाउसचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मुलांवरच दिली जाते. त्यातून त्यांच्या आवडीनिवडी जोपासल्या जाव्यात हा उद्देश. अनिशालाही तिच्या स्कूलमधील तिच्या वर्गाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तिच्याकडे जे ब्ल्यू हाउस होते, त्याची पेट्रन होती कल्पना चावला. त्यातून अनिशाला कल्पना चावलाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. अवकाश विश्व उलगडत गेलं. भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांबद्दल माहिती मिळत गेली.
कोल्हापूरच्याच केआयटी कॉलेजमध्ये तिनं प्रॉडक्शन इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर काही काळ नोकरी केली. मात्र तिच्या आईची वर्गमैत्रीण आणि पुण्यात नासा या अवकाश संशोधन संस्थेच्या एज्युकेटर म्हणून काम करणाºया लीना बोकील यांच्यामुळे अनिशाला अवकाश संशोधन क्षेत्रातील नवनव्या संधीची माहिती मिळाली. या जगात आपण शिकायला जावं असं तिला वाटलं. त्यातूनच तिनं या प्रतिष्ठेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. अवकाश संशोधन क्षेत्रात पुढे काय काय संधी आहेत, करिअरच्या दृष्टीने काय भविष्य आहे, याची माहिती लीना बोकील यांच्याकडून मिळत गेली. ही सारी प्रक्रिया दहा महिन्यांपूर्वी सुरू झाली. ही शिष्यवृत्ती मिळवायची या दृष्टीने अनिशाने अभ्यास सुरू केला. आॅक्टोबरमध्ये प्रत्यक्ष अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर अनेकदा तिच्याकडून अवकाश संशोधन संदर्भातील आणि तिच्या सध्याच्या शिक्षणाची सांगड घालणारी माहिती ती अपडेट करत गेली. सतत संदर्भ शोधत राहणं, लिहिणं, टिपण काढणं त्याचा संदर्भमूल्य म्हणून आणि पुराव्याच्या आधारावर ती माहिती जमा करत गेली. व्यक्तिमत्त्व विकासाच्या कसोट्यांची चाचपणीही झाली. या सगळ्या अथक प्रयत्नानंतर तिचा अवकाश संशोधनाविषयाची निबंध सिद्ध झाला.
अवघ्या पाचशे शब्दात हा निबंध सादर करायचा होता. अचूक आणि नेमकी माहिती देण्यासाठी मोठा झगडाच करावा लागला. प्रॉडक्शन इंजिनिअरिंगचा संबंध अवकाश संशोधन क्षेत्राशी कसा जोडता येतो, कोणतं अॅप्लिकेशन फायदेशीर ठरू शकतं यासंदर्भात तिनं हा निबंध सादर केला. अखेर फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठाची कल्पना चावला शिष्यवृत्ती तिला मिळाली. अनिशाला १७ हजार ५०० युरोची ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. आता फ्रान्सला जाण्याची तयारी सुरू झाली आहे.
सध्या अनिशा कोल्हापुरातील सायबर कॉलेजमध्ये एमबीए करतेय. २५ जून ते २४ ऑगस्ट या काळात नेदरलँड येथे होत असलेल्या ३१व्या वार्षिक अंतराळ संशोधन कार्यक्रमासाठीही तिला जायचं आहे.अनिशा सांगते, अशक्यच वाटावं असं हे स्वप्न होतं, आता ते पूर्ण होतंय. अवकाश संशोधन क्षेत्रात शिकण्याची, अभ्यास करण्याची संधी मिळणं हीच एक मोठी गोष्ट आहे. ती संधी मिळतेय, याचा आनंदच मोठा आहे.
(लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत.)