खुंटीला लटकलेला उत्साह

By admin | Published: April 5, 2017 03:50 PM2017-04-05T15:50:39+5:302017-04-05T17:41:43+5:30

परीक्षेनंतर हे करू-ते करूच्या कितीही गमजा मारल्या तरी प्रत्यक्षात आपली गाडी सायडिंगलाच लागते, तिची बॅटरी उतरतेच आणि मग आपण उदास होतो. आणि कुणी आपल्याला धक्का मारेल का म्हणून हतबल मदत शोधतो. असं का होतं?

The throbbing enthusiasm | खुंटीला लटकलेला उत्साह

खुंटीला लटकलेला उत्साह

Next
>- प्राची पाठक
 
परीक्षेची कसून तयारी सुरू असतानाचे क्षण. 
आपण दरवेळी परीक्षेच्या आधी ‘एकदाचं सुटू दे या कचाट्यातून’ अशा हवालदिल अवस्थेत असतो. ‘परीक्षा झाली ना, की करेनच’ या हिरवळीकडे बघून मनातच सुखावत राहतो. प्रत्यक्ष परीक्षा संपली की ती हिरवळ मृगजळ ठरते. मिळालेला निवांत वेळ केवळ आणि निव्वळ वाया जातो! असा कसा वेळ निघून गेला, हे लक्षात येत नाही तोवर नवीन रु टीन लागलेलं असतं.
आयुष्य पुढं सरकतं पण फक्त कॅलेंडरवर! 
‘हे झालं की ते करेनच’ हे चक्र काही संपत नाही. परीक्षेसाठी, नोकरीच्या मुलाखतीसाठी नाइट्स ‘मारलेल्या’ असतात. सगळा अभ्यास-तयारी आदल्या रात्रीची. रबर एकदम ताणलेलं. सर्व परीक्षा होईपर्यंत ते तसंच ताणलेलं राहतं. ‘परीक्षा झाली नं’ स्वप्नं रिपीट मोडला सुरूच. परीक्षा होऊन जाते. नोकरीच्या मुलाखतींचा अभ्यास होऊन मुलाखती पार पडलेल्या असतात. नवीन काहीतरी डोक्यात ठेवून आपण ‘दोन दिवस तरी आराम करू’ म्हणून वेगळे काढतो. त्या दोन दिवस आराम करण्याच्या गडबडीतच आपला फोकस सुटलेला असतो. 
ताणलेलं रबर एकदम सोडलं, एकदम रिलॅक्स झालं की त्याचा ताणच निघून गेल्यानं सुटीतल्या सगळ्या प्लॅन्सवर पाणी फिरू शकतं. खरंतर आपल्या प्लॅन्सवर आळस मात करतो. रुटीन बेताल होऊन जातं. बॉडी क्लॉकदेखील एकदम बदलून जातं. ना धड आराम, ना काही नवीन शिकणं, ना वेळेचा सदुपयोग असा तो ट्रॅप असतो.
आपल्या गाडीचा स्पीड शंभरवरून एकदम दहा वर आणायचा नाही. हळूहळू स्पीड कमी करायचा आणि वाढवायचादेखील हळूहळूच. नाहीतर गिअर अडकला म्हणून समजाच. किंवा गाडी एकाच जागी पार्क झाली, फिरलीच नाही असंही होणारच. बॅटरी उतरते. ‘धक्का द्या यार मला’ असं मग वाटायला लागते. मोटिव्हेशल पुस्तकं आलीच मग हातात! प्रेरणेचा बूस्टर डोस पिऊन गाडी थोडी चालते मग. डोस संपला की परत गाडी पार्क. एका जागी ठप्प. परत ढकलगाडी. ‘मी एक दिवस व्यायाम करायला सुरुवात करणारच’ हे चक्र जिथे अडकलेलं असतं तिथेच ‘मी एक दिवस प्रेरणा घेऊन काम करेन’ हे चक्र पण अडकलेलं असतं. प्रेरणा काही हाती लागत नाही. आपण स्वप्नातच बॉडी बिल्ड करतो! स्वप्नं पाहतच राहतो. 
पण प्रत्यक्षात कधी येणार की नाहीत ती स्वप्नं?
यायला तर हवीत पण करायचं काय नक्की त्यासाठी? 
सोपा उपाय. सीधी बात! 
एकदम मोठा डोंगर चढायला जायचं नाही. आधी टेकड्या चढायच्या, लहान सहान. टेकड्या चढायचा वेग हळूहळू वाढवायचा. असं सातत्यानं काही काळ केल्यावर मोठा डोंगर चढायला घ्यायचं. तो आपण कितपत चढू शकतोय, याचा अंदाज येईल. पूर्ण करू शकतो की नाही, ते कळेल. हाच डोंगर चढायचा की वेगळं काही करायचं, वेगळा डोंगर निवडायचा याचं भान येईल. आता डोंगर आणि टेकडीच्या जागी तुमची कोणतीही ‘भिजत घोंगडी’ इच्छा टाका. छोटे छोटे गोल्स समोर ठेवा. प्रत्येक छोटा टप्पा पार पाडला की स्वत:ला शाबासकी द्या. 
आता थोडंच तर राहिलं आहे.. 
मी करणारच, असा दिलासा द्या. 
त्याच मार्गाने जाणाऱ्या एक दोन मित्रांना सोबत घ्या. त्यासाठी ‘चला, लगेच एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप काढू’ अशी आरंभशूर सुरुवात टाळा. नाहीतर, ग्रुप काढला, झालं. संपली तिथेच अचिव्हमेंट असंच अनेकदा होतं. काहीतरी मिळवायचं समाधान आणि जिगर ग्रुप फॉर्म करण्यातच शोषली जाते. 
प्रत्यक्ष काम शून्य! 
आता जे कोणी एक दोन मित्र आहेत, त्यात एकमेकांना छोटी छोटी आव्हानं द्या. त्याबद्दल गप्पा मारा. एकेक टप्प्याचं नियोजन करा. थांबा-पाहा-जा मंत्र सुरू ठेवा. 
जात राहा. 
सुटीचा उपयोग असाही करता येईल याचा विचार करा. सुटी नुस्ती कॉलेजला नसते तर आपण जो टिपिकल विचार करतो, त्यापलीकडे जाण्याची एक संधी असते..
ट्राय इट!
 
(मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेच, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)

Web Title: The throbbing enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.