पोटात सतत मीठ जातंय?... मग वेळीच सावध व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 06:13 PM2018-02-21T18:13:22+5:302018-02-23T16:04:19+5:30
शरीराच्या सुपरवायझरचं काम बिघडलं की मूड बदलणारच!
- यशपाल गोगटे
थायरॉईड.
तरुण मुलांच्या जगातही सध्या हा शब्द कानावर येतोच. ऐन तारुण्यात ज्यांना थायरॉईडचा त्रास सुरू होतो, त्यांची काळजी वाढते. जगामध्ये अंतर्स्रावी ग्रंथींच्या आजारामध्ये संख्येनं सर्वाधिक असणारा हा आजार थायरॉईड ग्रंथीचा असतो. फारसं या आजाराविषयी काही माहिती नसल्यानं त्याविषयी गैरसमजच अधिक दिसतात.
आपल्या शरीरात थायरॉईड ही ग्रंथी गळतील पुढील भागात फुलपाखराच्या दोन पंखांप्रमाणे स्थिरावलेली असते. आईच्या पोटात गर्भाचा विकास होत असताना थायरॉईड ग्रंथी तोंडामध्ये जिभेबरोबर वाढते. गर्भाचा पूर्ण विकास झाल्यावर हृदय या ग्रंथीला खालच्या दिशेनं ओढतं व ती गळ्यात येऊन विसावते. कधी-कधी मात्र काही विकृती असल्यास ही ग्रंथी जिभेवर किंवा खालच्या जबड्यावर राहून जाते. अशा विकृतीला एक्टोपिक थायरॉईड असे म्हणतात. ज्या बालकांमध्ये जन्मत: हृदय विकार आढळून येतात, त्या बालकांमध्ये थायरॉईडची विकृतीही असण्याची शक्यता असते.
जंक फूड किती खाताय?
थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी आयोडीनची गरज असते. पूर्वीच्या काळी खाण्यामधून आयोडीनची कमतरता झाल्यास थायरॉईडचे आजार होत असत. आयोडीनयुक्त मीठाचा वापर सुरू केल्यापासून हे आजार जवळ जवळ नाहीसे झाले आहेत. मात्र याचीच दुसरी बाजू लक्षात घेता आयोडीनयुक्त मिठाचे सेवन अधिक झाल्यास रक्तातील आयोडीनचे प्रमाण वाढते. काही तज्ज्ञांच्या मतानुसार थायरॉईड ग्रंथीच्या वाढत्या आजारांना हे जास्त असलेले आयोडीन कारणीभूत ठरते. हल्ली विशेषकरून जंक फूड किंवा फास्ट फूडमध्ये वाजवीपेक्षा अधिक मिठाचा वापर होतो. यामुळे अप्रत्यक्षरीतीने शरीरात आयोडीनचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून आयोडीनयुक्त मिठाचा वापर बंद न करता एकूणच खाद्यपदार्थातील मिठाचेच प्रमाण कमी करणे आवश्यक आहे.
आखरी दम तक...
टी ३, टी ४ या हार्मोन्सचं कार्य गर्भाच्या वाढीपासून ते शेवटच्या श्वासापर्यंत सुरू असतं. गर्भावस्थेत मेंदूचा विकास, शरीराची वाढ व श्रवणशक्तीच्या विकासात या हार्मोन्सचा मोलाचा वाटा असतो. बाल्यावस्थेत मेंदूचा विकास व उंची या हार्मोन्सवर निर्भर असते. किशोरावस्थेत खास करून वयात येताना अपेक्षित बदल घडवून आणण्यास हे हार्मोन्स मदत करतात. स्त्रियांमधील पाळीच्या नियमिततेकरताही हे हार्मोन्स जबाबदार असतात. हृदयाची स्पंदनं नियंत्रित ठेवणं, मेंदूचा तल्लखपणा, शरीरातील चयापचय व चित्त अर्थात मूड यासाठीही हे हार्मोन्स कार्य करत असतात. जीवनासाठी अत्यावश्यक असणाºया या थायरॉईडच्या हार्मोनचे प्रमाण थोडा कम थोडा ज्यादा झाल्यास त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो याविषयी पुढच्या लेखात..
थायरॉईड ग्रंथीचा कारखाना
थायरॉईड ग्रंथीमधून ट्राय-आयोडो-थायरॉनीन (टी ३) व थायरॉक्सिन (टी ४) नावाची हार्मोन्स तयार होत असतात. एखाद्या अविरत चालणाºया कारखान्याप्रमाणे उत्पादनाचे हे कार्य अव्याहत चालू असते. या हार्मोन्सच्या निर्मितीसाठी खाण्यातून मिळणारं आयोडीन आवश्यक आहे. थायरॉईड ग्रंथीमध्ये आयोडीनची जोडणी एका प्रथिनाशी करून ही हार्मोन्स बनतात. या हार्मोन्समधील प्रथिनांच्या संख्येनुसार त्यांची नावे टी ३ व टी ४ अशी आहेत. या दोन्ही पैकी टी ३ हे मुख्य हार्मोन्स असून, शरीरातील पेशी रक्तातील टी ४ चे रूपांतर गरजेनुसार टी ३ मध्ये करतात. या कारखान्याचे व्यवस्थापन पूर्णत: पिट्युटरी ग्रंथीतून निघणाºया टीएसएच या हार्मोन्सचे असते. त्यामुळे थायरॉईडचे आजार ओळखण्यासाठी आपण रक्तामध्ये टी ३ व टी ४ व त्याचबरोबर टीसीएचची तपासणी करतो. या दोहोंमधील कमी-जास्त झालेल्या प्रमाणावरून आपल्याला थायरॉईडचे आजार ओळखता येतात.