दुर्मिळ होत चाललेल्या फिशिंग कॅटच्या शोधात फिरणारी तियासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 03:06 PM2018-06-28T15:06:18+5:302018-06-28T15:10:13+5:30

मनीमाऊ म्हणजे वाघाची मावशी; पण या मावशीचे अनेक भाच्चेही आपल्या देशात राहतात. आता त्यांची संख्या कमी होतेय. त्यातलीच एक फिशिंग कॅट. मासे मारून खाणारा छोटा वाघच. त्यांच्या शोधात फिरणार्‍या तियासा आद्या या तरुणीला त्यांचं भन्नाट जग उलगडत गेलं.

Tiaasa, who is in search of a rare fishing cat | दुर्मिळ होत चाललेल्या फिशिंग कॅटच्या शोधात फिरणारी तियासा

दुर्मिळ होत चाललेल्या फिशिंग कॅटच्या शोधात फिरणारी तियासा

Next
ठळक मुद्देमार्जारकुळातल्या जवळ जवळ 15 रानटी प्रजाती भारतामध्ये राहातात. एकेकाळी भारतात चित्तासुद्धा आढळत असे मात्र आता तो आपल्या देशातून पूर्ण नामशेष झाला आहे. मनीमाऊच्या या मोठय़ा कुटुंबातला फिशिंग कॅट हा सदस्य भारतात काही संरक्षित वनांमध्ये आणि आंध्र प्रदेश व पश्च

ओंकार करंबेळकर

मनीमाऊ म्हणजे वाघाची मावशी आहे, असं आपण म्हणतो. पण भारतात  वाघ, सिंह, बिबटय़ा, हिमबिबळ्या, क्लाउडेड लेपर्ड, गोल्डन कॅट, मार्बल्ड कॅट, गोल्डन कॅट, जंगल कॅट, डेझर्ट कॅट, पॅलास कॅट, फिशिंग कॅट, रस्टी स्पॉटेड कॅट, कॅराकल, लिंक्स असे तिचे अनेक भाचे राहातात हे तुम्हाला माहिती आहेत का? - हे सारं म्हणजे मार्जारकुळ. या  मार्जारकुळातल्या जवळ जवळ 15 रानटी प्रजाती भारतामध्ये राहातात. एकेकाळी भारतात चित्तासुद्धा आढळत असे मात्र आता तो आपल्या देशातून पूर्ण नामशेष झाला आहे. मनीमाऊच्या या मोठय़ा कुटुंबातला फिशिंग कॅट हा सदस्य भारतात काही संरक्षित वनांमध्ये आणि आंध्र प्रदेश व पश्चिम बंगालच्या पाणथळ जागांमध्ये आढळतो. फिशिंग कॅट हे नावच त्याच्या आहारावरून पडलेलं आहे. मासे पकडणारं मांजर ही या प्राण्याची प्रमुख ओळख. काही ठिकाणी त्याला फिशर कॅट म्हणतात, तर बंगाली भाषेत माछा कॅट म्हटलं जात. इतर अनेक प्रजातींबरोबर माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे माछा कॅटचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये याच माछा कॅटचा अभ्यास तियासा आद्या नावाची तरुणी करते  आहे.


तियासाचं बालपण अगदी चारचौघांसारखंच होतं. पण लहानपणापासून तिला वन्यजीवांची माहिती देणारी पुस्तकं वाचायला मिळाली. त्यातून ससा, मांजर, कुत्रा असे अनेक प्राणी घरी असल्यामुळं प्राण्यांबरोबर खेळायलाही आवडायचं. याच आवडीतून तिनं वन्यजीवांच्या संदर्भात काम करायचं ठरवलं. वाइल्डलाइफ हे माझं करिअर नाही तर ते माझं पॅशन आहे असं ती म्हणते. घराबाहेर पडल्यावर तिनं वन्यजीवांचा अभ्यास सुरू केला. त्यामध्येच तिला पश्चिम बंगालमधीलच फिशिंग कॅटबद्दल तिला समजलं. त्यामुळे या मांजराचा अभ्यास करायचं ठरवलं. 
या प्राण्याबद्दल ती सांगते, फिशिंग कॅटला मासे पकडण्यासाठी वेगळ्या प्रकारची हूकसारखी नखं असतात. त्यांच्या अंगावर वॉटरप्रूफ फर असते. माजरांना साधारणपणे पाण्याच्या जवळपास जाणं आवडत नाही, मात्र ही फिशिंग कॅट त्याला अपवाद आहेत. ही मांजरं पाण्याच्या जवळ जातात आणि मासे पकडतात. नदीच्या आजूबाजूस राहाणारे लोक याला छोटे वाघ असंच म्हणतात.
तियासानं सध्या द फिशिंग कॅट प्रोजेक्टमध्ये काम सुरू केलं आहे. हा प्रकल्प 2010 साली सुरू झाला. या प्रकल्पामध्ये फिशिंग कॅटचे अधिवास शोधणं, त्यांचा स्थानिक लोकांशी येणारा संबंध तपासणं आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणं अशा तीन प्रमुख उद्देशांचा समावेश आहे. हे मांजर पाणथळ जागांजवळच आढळतं. मात्र पाणथळ जागांचा आकार कमी होणं, नद्यांचं होणारं प्रदूषण, वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि काही ठिकाणी पर्यटनाचाही पाणथळ जागांवर परिणाम होतो. त्यामुळे नदी आणि नदीच्या आसपासचा प्रदेश अधिवास म्हणून वापरणार्‍या प्राण्यांच्या संख्येवर मोठा परिणाम झालेला दिसून येतो. फिशिंग कॅटची संख्या कमी असल्यामुळे तसेच सहजासहजी ते दिसत नसल्यामुळे त्याची माहिती गोळा करणं अत्यंत कठीण काम आहे. तियासा नदीच्या आजूबाजूस राहाणार्‍या लोकांचे प्रश्न जाणून घेते. फिशिंग कॅटची शिकार होणार नाही यासाठी प्रयत्न करते. अनेकवेळा फिशिंग कॅटच्या मार्गावरती सापळे लावलेले फोटो तिनं पाहिले आहेत. गैरसमजांमुळे फिशिंग कॅटसाठी सापळे लावले जातात आणि त्यांना मारून टाकलं जातं. हे थांबविण्यासाठी ती प्रबोधन करते.


तियासाच्या मते अजूनही पूर्ण क्षमतेनं काम करणं तिला शक्य झालेलं नाही. काही कारणांमुळे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यात मला दोनदा अपयश आलं. पण मी निवडलेल्या या करिअरमधून परत फिरण्याचा, येण्याचा विचार केला नाही. फिशिंग कॅटवर काम करताना सुरुवातीस घरच्या लोकांना थोडी काळजी वाटली होती. पण मी स्वतर्‍च्या पायावर उभी राहिलेलं पाहिल्यावर ते आता आनंदी आहेत. फिशिंग कॅटच्या अभ्यासाकडे मी करिअर म्हणून पाहातच नाही, मला वाटतं या सर्व वन्यजीव क्षेत्रानं माझ्या जगण्याला अर्थ प्राप्त करून दिला आहे. केवळ फिशिंग कॅटला वाचवणं हे माझं ध्येय नसून एकूणच वन्यजीव संवर्धनाचं महत्त्व लोकांना पटावं हे माझं ध्येय आहे असं ती म्हणते. फिशिंग कॅटसाठी तिनं काही माहितीपटांच्या निर्मितीसाठीही मदत केली आहे. ती सांगते, ‘अनेकदा तासन्तास थांबूनही फिशिंग कॅट दिसलेली नाही. अशावेळेस अगदी रात्रभर जागूनही आम्ही फिशिंग कॅट पाण्याजवळ येण्याची वाट पाहिली आहे. हे थकवणारं, चिकाटीची परीक्षा घेणारं असलं तरी तोंडात मासा घेऊन नुकतीच शिकार करून आलेली फिशिंग कॅट दिसली की सगळे श्रम विसरले जातात. 

 

Web Title: Tiaasa, who is in search of a rare fishing cat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.