‘चलता है का जमाना चला गया है। इसकी जगह पर बदल रहा है, बदल गया का जमाना और विश्वास लाना है...’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 01:32 PM2017-08-31T13:32:00+5:302017-08-31T13:32:31+5:30
देशाच्या पंतप्रधानांनी अलीकडेच लाल किल्ल्यावरून आवाहन केलं की, ‘चलता है का जमाना चला गया है’! चालतं सगळं, ही वृत्ती सोडा.
- आॅक्सिजन टीम
कामं धकवून न्यायची, अगदी गळ्याशी आलं की कसंबसं कामं करायची, ठिगळं लावायची,काहीतरी जुगाड करायचा आणि वेळ मारून न्यायची ही आपली सवय. त्यातून ना आपण गुणवत्तेचा आदर करतो, ना आपल्या क्षमतांचा. केवळ आळस आपल्याला विळखा घालून बसतो आणि आपण आला दिवस रेटतो
हे आपण कधी मान्य करणार?
‘चलता है का जमाना चला गया है। इसकी जगह पर बदल रहा है, बदल गया का जमाना और विश्वास लाना है...’
- हे शब्द आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे. लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाला केलेल्या भाषणातले. त्यातलं पहिलं वाक्य पाहा, ते म्हणताहेत, ‘चलता है’ ही वृत्ती सोडा. तो काळ गेला आता. एरव्ही देशाचे पंतप्रधान ज्या भाषणात देशाच्या विकासाची सूत्रं मांडतात, धोरणं मांडतात त्याच भाषणात पंतप्रधानांनी देशातल्या तरुण मुलांना ‘चलता है’ वृत्ती सोडा असं सांगणं ही गोष्ट फार सूचक आहे. आपल्या मानसिकतेवरच त्यांनी अचूक बोट ठेवलं आहे.
आपल्यात ठासून भरलेली दिसते ही चलता है वृत्ती.
कामं धकवून न्यायची, अगदी गळ्याशी आलं की कसंबसं काम करायचं, ठिगळं लावायची, काहीतरी जुगाड करायचा आणि वेळ मारून न्यायची.
त्यातून ना त्या कामाचा आनंद, ना गुणवत्तेचा आग्रह, ना दर्जाची अचूकता. आपल्याच गुणवत्तेला, क्षमताना मारून टाकणारी ही वृत्ती आपला घात करते, आपला अचूकतेचा, अत्त्युमत्तेचा ध्यास मारून टाकते हे आपल्या लक्षातही येत नाही.
साध्या साध्या गोष्टींपासून अगदी मोठ्या, जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीतही आपण ‘चलता है’ असंच म्हणतो. साधं एखाद्या खोलीचं धाडकन दार लावून घेणं असो, की रंग उडालेला शर्ट इस्री न करता घालणं असो, सिग्नल तोडणं असो, की स्पेलचेकही न लावता कार्यालयीन कामाच्या मेल पाठवणं असो, की वेळ पाळणं असो, की कामाच्या वेळेत टाइमपास करणं असो. आपण गंभीर नसतोच कशाविषयीही.
आपलं पालूपद एकच, काही नाही होत रे, कोण बघतंय, सब चलता है..
कुणी बघावं, कुणाचं लक्ष असेल तरच कामं वेळेत, अचूक करावी असं का? आपल्या कामाचं परफेक्शन, त्याचा दर्जा, त्यातलं सौंदर्य, त्यातली अचूकता, वेळेचं काटेकोर नियोजन हे सारं आपणच सांभाळायची गरज असते. आणि त्यातून आपली आणि आपल्या कामाची ओळख निर्माण होते. मात्र त्यासाठीचा अभ्यास, विषयाला भिडण्याची तयारी, जीव तोडून मेहनत करत अचूकतेचा ध्यास घेणं हा सारं आपल्याला अंगी बाणवायला हवं...
मात्र ते आपण करत नाही...
जुगाड करतो आणि शोधतो शॉर्टकट. त्यावर मखलाशी करतो की, चलता है !
ही चलता है वृत्ती आपल्या जगण्यात मुरायला लागते, आणि आपण मध्यममार्गी मचूळ कोमट आयुष्य जगायला लागतो..
वाईट हेच की, असं होतंय हे आपल्या लक्षातही येत नाही..
ते यावं आणि आपण चलता है चा हात सोडून द्यावा, म्हणून आजची ही विशेष चर्चा.. नो मोअर चलता है !
oxygen@lokmat.com