कस्सून सराव
By Admin | Published: August 7, 2014 09:37 PM2014-08-07T21:37:56+5:302014-08-07T21:37:56+5:30
चंद्रकांत मूळचा कुरुंदवाडजवळील तेरवाडचा. शिरोळ तालुक्यातील हे छोटंसं गाव. चंद्रकांतचा मोठा एकत्र परिवार येथे राहतो
चंद्रकांत मूळचा कुरुंदवाडजवळील तेरवाडचा. शिरोळ तालुक्यातील हे छोटंसं गाव. चंद्रकांतचा मोठा एकत्र परिवार येथे राहतो. त्याच्या कुटुंबात ३९ सदस्य एकत्र राहतात. त्याचे काका सदाशिव मारुती माळी हे कुटुंबप्रमुख आहेत. प्रगतिशील शेतकर्याचा पुरस्कारही त्यांनी मिळविला आहे. त्याचे वडील दादू आणि आई कांचन दोघंही अशिक्षित. शेती करतात. घरची व बाहेरची भाडेपट्टय़ानं कसायला घेतलेली अशी सुमारे ७0 ते ८0 एकर जमीन हे एकत्र कुटुंब कसते. त्यामुळे चंद्रकांतला खुराकची कमतरता कधीच भासली नाही. त्याच्या दुधाची व इतर खुराकाची व्यवस्था झाल्यामुळे असेल कदाचित त्यानं जोरदार मेहनत केली. आपली शारीरिक क्षमता वाढविण्यावर भर दिला. खरंतर त्याचा मोठा भाऊ रवी त्याला कायम या खेळासाठी प्रोत्साहन देत असे. पण दुर्दैवानं त्याचा अपघाती मृत्यू झाला.
चंद्रकांत वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच प्रदीप पाटील यांच्याकडे सराव करत होता. मात्र त्याची शरीरयष्टी कडक आणि उंच. वेटलिफ्टरला अजिबात न शोभणारी. त्यामुळे त्याला व्हॉलीबॉल खेळण्याचा सल्ला जो तो द्यायचा. त्याची त्याला चीड यायची. जिद्दीनं त्यानं वेटलिफ्टर होण्याचा चंग बांधला. तो रोज सहा सात तास सराव करायचा. दणकून खाणं आणि व्यायाम करून ते जिरवणं हा त्याचा ध्यास बनला. २00८ मधे कझाकिस्थानात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं भाग घेतला. २00९ मध्ये मलेशियात झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक मिळविलं. २0१0 च्या चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्यानं भाग घेतला. दक्षिण आफ्रिकेतील २0११ मध्ये राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत त्यानं रौप्यपदक मिळविलं. २0१२ मध्ये समोआ येथील कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेतही त्यानं रौप्यपदक मिळविलं होतं.
चंद्रकांत सध्या भारतीय सेना दलाच्या सेवेत आहे. यंदा त्याचा लग्नाचा विचार घरच्यांनी सुरूकेला होता, मात्र राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकण्याची त्याला खात्रीच होती. त्यामुळे आधी लगीन राष्ट्रकुलचं अशी प्रतिज्ञा करून त्यानं लग्नाला नकार दिला. मंगळवारी मध्यरात्री त्याचा खेळ सर्वांना पाहता यावा म्हणून त्याचे काका विष्णुपंत यांनी गावातील विठ्ठल मंदिर चौकात स्क्रीन लावला. त्याचे काका सदाशिव यांनी चंद्रकांतनं पदक जिंकताच प्रशिक्षक प्रदीप पाटील यांना चक्क उचलून घेतलं आणि मानाचा फेटा बांधला. आईवडील यांना तर मीडियाला प्रतिक्रिया द्यायची म्हणजे नक्की काय बोलावं हेही उमगत नव्हतं इतका आनंद झाला होता. आपल्या गावच्या पोरानं देशाचं नाव मोठं केलं हे पाहून ग्रामस्थांनी तर तेरवाडमध्ये माळी कुटुंबीयांची हत्तीवरून मिरवणूक काढली.