स्वप्नाचे सच्चे सोबती
By admin | Published: September 30, 2016 10:03 AM2016-09-30T10:03:21+5:302016-09-30T10:03:21+5:30
इंजिनिअर व्हायचं स्वप्न घेऊन आलेल्या एका गरीब दोस्ताला कॉलेज कॅम्पसनं दिलेल्या दिलदार साथीची गोष्ट...
- प्रा.डॉ. संदीप पांडुरंग ताटेवार दरवर्षीप्रमाणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया चालू होती. आज प्रवेश घेण्याची अंतिम फेरी होती. प्रवेश घेण्यासाठी गणेश नावाच्या मुलाचा पुकारा झाला होता. एकदम सर्वसाधारण कपडे घातलेला सोळा-सतरा वर्षांचा मुलगा आपल्या पायात स्लिपर घालून दाढी वाढलेल्या अशिक्षित वाटणाऱ्या वडिलांसोबत प्रवेश घेण्यासाठी आला. गणेश गाढवे त्याचं नाव. गणेशला सीएटी मध्ये १५१ मार्क मिळाले होते. भरपूर मार्क असल्यामुळे त्याला त्याच्या आवडीची शाखा व महाविद्यालय मिळाले होते. पण फी भरण्यासाठी त्याच्या वडिलांजवळ एवढे पैसे नव्हते. त्याचे वडील सांगत होते की मी खेड्यात मोलमजुरी करणारा माणूस आहे. एवढे पैसे मी कुठून आणू? त्यापेक्षा पोराला आय.टी.आय.मध्ये नाही तर बी.एड.ला प्रवेश देऊन टाकतो.’ गणेशचा चेहरा चिंतातुर झाला होता. अगतिक नजरेने तो वडिलांकडे पाहत होता. तो पार खचून गेला. त्यांनी केलेली मेहनत वाया जाणार होती. संपूर्ण प्रवेशप्रक्रियेमधील लोक आश्चर्य करीत होते की, एवढे चांगले मार्क असून पोराची संधी हुकणार.. पाहता पाहता ही वार्ता पूर्ण महाविद्यालयात पसरली. सगळेजण हळहळ करू लागले. शेवटी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेने पुढाकार घेतला व त्याची महाविद्यालयाची फी भरण्याची जबाबदारी घेतली. आता प्रश्न राहिला गणेशच्या वसतिगृहामधील जेवणाचा. काही प्राध्यापक वर्ग चहाच्या कॅन्टीनवर जमले. प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार करू लागले. महिना-दोन महिन्याचा खर्च एकेक करून देता येईल का यावर प्राध्यापकांची चर्चा चालली होती. खानावळीच्या ठेकेदाराला चर्चेत घ्यायचं ठरलं. तो यूपीवाला. त्याला सारे महाराज म्हणतात. आपल्या तुटक्याताटक्या लुनावर महाराज भाजीबाजारात गेले होते. त्यांना फोन लावला. परिस्थिती समजावून सांगितली तर चर्चाबिर्चा न करता ते पटकन म्हणाले, ‘किसीको ये बच्चे के खाने के पैसे देने की जरूरत नही है. मैं पुरे चार साल की खाने की जिम्मेदारी लेता हू, आप लोग निश्चिंत रहिये !’ सगळे जण आश्चर्यचकित झाले. रोज कारमधून महाविद्यालयात येणारे प्राध्यापक एक- दोन महिन्याचा जेवणाचा खर्च देण्यास हो नाही करीत होते, तर खटारा लुनावर फिरणारा महाराज कोणतेही आढेवढे न घेता संपूर्ण चार वर्षाच्या जेवणाची जबाबदारी घेत होता. मनात प्रश्न पडला की खरा श्रीमंत कोण, प्राध्यापक की महाराज? चार वर्षे फुकटात जेवण घालून उत्तर प्रदेशच्या महाराजला गणेशकडून काय मिळणार होतं. पण त्यानं दिलदारपणा दाखवला आणि एक स्वप्न पूर्ण होण्याच्या वाटेनं पुढे निघालं. गणेशच्या व त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडंत होता. त्याक्षणी आम्हा उपस्थितांचे डोळे केव्हा पाणावले हे आम्हालासुद्धा कळलेच नाही. मला नक्कीच माहीत आहे की गणेश जेव्हा भविष्यात समाजात एक यशस्वी अभियंता होईल, कोणत्याही उच्चस्थ पदावर जाईल व कितीही मोठा माणूस होईल तरी एक दिवस शोधत शोधत वसतिगृहातील महाराजाच्या पायावर डोकं ठेवायला नक्कीच येईल.
( लेखक अमरावतीमधील स्थापत्य अभियांत्रिकी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभागप्रमुख आहेत)