बन लाटा आणि उलटवेणी

By admin | Published: July 28, 2016 05:11 PM2016-07-28T17:11:55+5:302016-07-28T17:46:13+5:30

पावसाळ्यात केस गळ्यात घेऊन फिरणं फार सोयीचं नसतंच, ओल्या केसांचा लगदा डोक्यावर म्हणजे आजारालाही आमंत्रण आणि डोक्यालाही भार! मात्र एकच एक टिपिकल वेणीही नको वाटते, म्हणून त्यावर फॅशनेबल असे हे हेअर स्टायलिंगचे पर्याय! सध्या पेज थ्रीवालेही या स्टायलिंगच्या मोहात दिसतात...

Turn waves and reversal | बन लाटा आणि उलटवेणी

बन लाटा आणि उलटवेणी

Next

 - सारिका पूरकर-गुजराथी 

पावसाचं धूमशान गेले काही दिवस चांगलंच सुरू आहे. 
मस्त पाऊस झाल्यामुळे सगळं कसं हिरवकंच झालंय! अनेक शहरातल्या, जवळपासच्या धबधब्यांवर तरुणाईची गर्दीही वाढू लागलीय, तर अशा या मस्त पावसाचं स्वागत तुम्ही केलं की नाही अजून? 
मनसोक्त भिजणं, पावसाळी सहल, बाईकवरची सुसाट रपेट, गरमागरम मक्याची कणसं, भजी, वडे, चहा आणि मस्त भटकंती !
हे सारं करताना अजून एक गोष्ट विशेषत: मुलींच्या मनात येतेच!
पावसाळी पिकनिकला जाताना केसांचं काय करायचं? 
केस मोकळे सोडून फिरणं, फोटोबिटोत चांगलं दिसत असलं तरी तसं करणं काही जमत नाही. वेणी, अंबाडा, बुचडा असंच काहीतरी चांगलं घट्टमुट्टंच बांधावं लागतं. तर ते ओले केस आवाक्यात राहतात.
आणि त्यामुळेच पावसाळी पिकनिकलाच नाहीतर पावसाळ्यात रोजही घालता येतील अशा काही वेण्या, काही मॉडर्न लूकच; पण साधंसं हेअरस्टायलिंग जमलं ना तर ओल्या केसांचा गचगचीत प्रश्नही सुटू शकतो. बोनस, सुंदर दिसता येतंच!
म्हणून जमल्यास पावसापाण्याच्या या दिवसात जरा आपल्या केसांनाही थोडी स्टायलिंगची आझादी देऊन पहाच..

१) दीपिकाचा बन
रामलीला या सुपरडुपर हिट चित्रपटातील दीपिकाची ही स्टाईल जाम फेमस झाली होती. सुरुवातीला काहींनी म्हटले की ही काय स्टाईल आहे का? नुसता अंबाडा तर घातलाय! पण दीपिकाचा हाच अंबाडा नंतर रामलीला बन नावानं हिट झाला.
हा करायला अगदी सोपा प्रकार आहे. 
याकरिता केसांचे समोरून दोन समान भाग करा, म्हणजेच मधला भांग पाडा. आता उजव्या व डावीकडील केसांचे छोटे छोटे समान भाग (कानापर्यंत) हातात घेऊन त्यावर मागच्या बाजूने वरून खाली असे विंचरून घ्या, यालाच बॅक कोम्बिंग म्हणतात. बॅक कोम्बिंग केल्यामुळे केस दाट दिसतात. यामुळे स्टाईलला उठाव मिळतो. केसांचे छोटे भाग पूर्ण बॅक कोम्बिंग करून झाल्यावर केस पुढच्या बाजूने हलक्या हाताने एकसारखे विंचरून (भांग न पाडता) मागच्या बाजूला घ्या व मागे घेऊन त्यास पिना लावा. जसं आपण क्लचर लावून बाकी केस मोकळे सोडतो तसे. बॅक कोम्बिंग केल्यामुळे पुढचा भाग छान फुगीर दिसेल. आता मागे उरलेल्या केसांची हलक्या हाताने पोनिटेल घालून त्याला पीळ द्या. हा पीळ डावीकडून उजवीकडे फिरवत चला, म्हणजे अंबाड्याचा आकार त्यास येईल. पूर्ण केस गुंडाळून झाले की, शेवटचे टोक आतल्या एका पिळात अडकवा. बाकीचे केसही आकडे लावून चांगले फिट करा. पण हलक्या हातानेच हे करायचे आहे म्हणजे अंबाडा थोडा सैलसर दिसेल व दीपिका स्टाईलचा कॅज्युअल लूक त्यास येईल. झाला दीपिका-रामलीला बन तयार ! 

२) प्रियंका चोप्राच्या लाटा
देसी गर्ल प्रियंका चोप्राची ही हेअरस्टाईल लहान-मोठ्या दोन्ही केसांवर छान दिसते. केसांचा मधला भांग पाडा. दोन्ही भागातील केसांचे कानापर्यंत छोटे छोटे भाग करून त्यावर केस कुरळे करण्याच्या मशीननं अगदी हलकेच दाबून कुरळे करा. केसांवर किंचित दाब पडून लाटांसारखे वर-खाली भाग दिसतील एवढेच कुरळे व्हायला हवेत. त्याला टॉँग करणं म्हणतात. केस टॉँग करून झाले की त्यावर मिस्ट स्प्रे करा. आणि हलके विंचरून काढा. केसांच्या लाटा अंगा-खांद्यावर मिरवा !

३) सोनाक्षीची उलटी सागरवेणी 
आपण नेहमी तीन पुडाची सागर वेणी घालतो तशीच ही वेणी घालायची आहे. मात्र ही घालताना तिचे पूड (वीण) उलटे घालायचे आहे म्हणजेच नेहमीच्या वेणीमध्ये आपण केसांचे तीन भाग करतो. मधला भाग खाली ठेवून उजवीकडचा व मग डावीकडचा भाग विणून घेतो. मात्र या वेणीत मधला भाग वरती ठेवून उजवीकडचा व डावीकडचा भाग विणून घ्यायचा! सरळ वेणीची सागरवेणी घालतो तशीच या उलट्या वेणीची सागरवेणी. झाली तुमची सोनाक्षीची डच हेअरस्टाईल रेडी!

४) आदिती राव-हैदरीची पोनीटेल
साडी, कुर्तीज, जीन्स अशा कोणत्याही पोशाखावर सूट होईल, अशी ही स्टाईल आहे. याकरिता केसांचा मधला भांग पाडा. पुढच्या बाजूने कानापर्यंत केसांचे समान दोन भाग करा, ते तसेच राहू द्या व उर्वरित केसांना बॅक कोम्बिंग करून घ्या. या केसांची पोनीटेल बांधून घ्या. या पोनीटेलवर हलकेच टॉँग मशीन फिरवून घ्या. आता पुढे कानापर्यंत जे केस बाजूला काढले होते, ते पण बॅक कोम्ंिबग करून घ्या. हलक्या हाताने एकसारखे विंचरून मागे घेऊन पिन करा. या केसांना पिंच करूनही वेगळा लूक देता येईल. 

( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

Web Title: Turn waves and reversal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.