कासव
By admin | Published: April 7, 2017 06:35 PM2017-04-07T18:35:15+5:302017-04-07T18:35:15+5:30
कासव या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम सिनेमा म्हणून सुवर्णकमळ लाभलं, ही बातमी तुम्हाला कळलीच असेल! पण आज जागतिक आरोग्य दिनी
- आॅक्सिजन टीम
आपल्या अवतीभोवती, आपल्यातही असे काही मानव असतील..
आपण त्यांना कधी काढणार त्या काळोख्या गर्तेतून बाहेर?
कासव या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम सिनेमा म्हणून सुवर्णकमळ लाभलं, ही बातमी तुम्हाला कळलीच असेल! पण आज जागतिक आरोग्य दिनी आणि ज्या दिवसाची थीमच डिप्रेशनशी लढा अशी आहे त्यादिवशी हा पुरस्कार मिळणं हा एक विलक्षण योगायोग म्हणायला हवा..
आयुष्यात शिरलेल्या डिप्रेशन नावाच्या अस्वस्थ भावनेशी लढण्यासाठी ही एक प्रेरणाच म्हणायला हवी. कासव गतीनं का होईना आपण मन मोकळं करायला हवं. आपलं कुढणं थांबवून त्यासंदर्भात बोलायला हवं..
कासव सिनेमा हेच सांगतो..
जानकी. कासव संवर्धनासाठी एक प्रोजेक्ट करते आहे. समुद्रकिनारी दत्तूभाऊ कासवांच्या वाढीसाठी काम करत असतात. तिथं ती येवून पोहचते. तिथं ती मानव ला भेटते. मानव एक तरुण मुलगा. मात्र स्वत:च्याच कोशात हरवलेला. कासव जसं आपलं डोकं पाठीवरच्या कवचात ओढून घेतं तसा हा मानव, डिप्रेशनमध्ये हरवलेला. आनंदी जगणंच विसरलेला. जानकीला त्याच्याविषयी कणव वाटते. त्याला दोष न देता, टिका न करता, कुठल्याही प्रकारे जजमेण्टल न होता जानकी मानवला डिप्रेशनच्या गर्तेतून बाहेर येता येईल असं वातावरण तयार करते. तिचा ड्रायव्हर यदू, दत्ताभाऊ, घरातला कामाला असलेला बबल्या आणि रस्त्यावर राहणारा परशू हे सारे त्यासाठी मानवला मदत करतात. खरंतर त्यांचं परस्परांशी काही नातं नसतं पण तरीही एकमेकांच्या मदतीनं ते सारे मिळून मानवसाठी एक सपोर्ट सिस्टिम उभी करतात..
ते सारं कसं घडतं हे पाहणं म्हणजे हा चित्रपट.
आपल्या अवतीभोवती, आपल्यातही असे काही मानव असतील..
आपण त्यांना कधी काढणार त्या काळोख्या गर्तेतून बाहेर..
कधी जगण्याचा स्वीकार करुन उमलणार, बागडणार, स्वच्छंद होवून?
हाच प्रश्न आजचा जागतिक आरोग्य दिनही विचारतो आहे. म्हणतो आहे,
डिप्रेशन? लेट्स टॉक.
अलिकडेच केलेल्या मन की बात या आकाशवाणी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनीही हेच सांगितलं की, बोला. डिप्रेशनशी लढा द्या..
त्या टप्प्यावर कासव सारख्या सिनेमाला राष्ट्रीय ओळख मिळणं ही एक मोठीच गोेष्ट आहे..
आपणही जरा भिडूच वास्तवाला.. बोलू.. मनमोकळं करु!
कासवचा ट्रेलर पाहण्यासाठी ही लिंक पहा..
लहर समंदर तू रे..
हे ऐकताना जाणवेल आपल्यातलीच अस्वस्थ खळबळ..