टीव्ही डे साजरा केला का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 03:11 PM2018-11-22T15:11:20+5:302018-11-22T15:11:26+5:30
टीव्हीच्या प्रचारासाठी जागतिक टेलिव्हिजन दिन साजरा होतो; पण मग तरी टीव्ही पाहणं बंद करा, असा प्रचारही सुरूच असतो. ते का?
- अनन्या भारद्वाज
टीव्हीच्या प्रचारासाठी एकेकाळी जगभर जागतिक टेलिव्हिजन डे साजरा करणं सुरू झालं, यावर आज आपण विश्वास ठेवू का?
पण तो एकेकाळही काही फार लांब नाही. 1996 साली संयुक्त राष्ट्र संघानं जागतिक टेलिव्हिजन दिवस साजरा करण्याचं ठरवलं. सुरुवातीला 21 आणि 22 नोव्हेंबर अशा दोन दिवसांत तो विभागून साजरा व्हायचा, आता 21 नोव्हेंबर रोजी साजरा होतो. त्याकाळी माहिती, मनोरंजन, लोकशिक्षण, सरकारी योजनांचा प्रचार यासह लोकसंवाद आणि जनजागृतीसाठी टीव्ही वापरला जावा, अशी जगभर अपेक्षा होती. त्यातून हा दिवस आकारास आला.
आता काळ इतका बदलला की, टीव्ही केवळ मनोरंजनापुरता उरला आणि एकेकाळी टीव्ही पहा असा प्रचार होत होता आता टीव्ही कमी पहा, त्यातून अनेक आजार बळावतात. तासन्तास टीव्ही पाहिल्यानं कोच पोटॅटो अर्थात वजन वाढून बटाटे झालेले गोळे आणि डोळ्यांना चष्मे आलेली माणसं वाढली तेव्हा टीव्ही कमी पहा, बाहेर पडा असा प्रचार होऊ लागला. काळ किती झपाटय़ानं बदलला याचं हे उदाहरण..
आपल्याकडेही एकेकाळी रामायण महाभारत टीव्हीवर सुरू होतं त्याकाळात रस्ते ओस पडत. पुढं अनेक चॅनल आले आणि आताही टीव्ही सिरीअल्सचा रतीब घरोघर सुरूच आहे. तरुण मुलं आताशा कमी टीव्ही पाहू लागली आहेत, अशी जगभर चर्चा आहे. मात्र तो वेळ सोशल मीडिया आणि यू टय़ूबवर जाऊ लागला याचीही चिंता आहेत.
जगभरातले टेलिव्हिजन वर्तनाचे म्हणजेच टीव्हीमुळं झालेल्या माणसांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे अनेक अभ्यासक सांगतात की, 7 गोष्टी आहेत, ज्यासाठी तुम्ही टीव्ही कमी पहावा किंवा खरं तर अजिबात पाहू नये.
त्या या 7 गोष्टी.
1. वेळ वाया जातो, काय सकस पाहिलं टीव्हीवर याचं उत्तर जगभरात आज कुणाकडेही नाही.
2. टीव्हीवरचे कार्यक्रम, बातम्या, चर्चा यातून सकारात्मकता लाभण्यापेक्षा नकारात्मकता वाढीस लागते, असाही एक आक्षेप आहेच.
3. आपली विचारपद्धती, धारणा आणि चांगुलपणावरची श्रद्धाही टीव्हीवरच्या सतत नकारात्मकतेमुळे बदलते.
4. आपल्या जगण्याकडून, समाजाकडून आणि स्वतर्कडूनही अवास्तव अपेक्षा वाढीस लागतात.
5. जाहिरातींच्या मार्यानं आपण अकारण गरजा निर्माण करतो, त्या वाढवतो.
6. शिस्त आणि स्वतर्वरचं नियंत्रण या गोष्टी सुटतात, पाहण्याचं व्यसन लागतं.
7. रिलॅक्स होत नाहीच. मेंदू शांत होत नाही. त्यामुळे त्या वेळातून आपल्याला विश्रांतीही मिळत नाही.