उंबरठा - आतबाहेरचा झगडा मांडणारी ही शॉर्टफिल्म पाहिली का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 04:34 PM2018-07-05T16:34:48+5:302018-07-05T16:34:54+5:30

घरातलं आणि घराबाहेरचं जगणं, मर्यादा, गरजा, यांचा झगडा हे सारं उंबरठय़ाच्या आतबाहेर कसं निभवायचं?

Umbaratha - A must watch shortfilm | उंबरठा - आतबाहेरचा झगडा मांडणारी ही शॉर्टफिल्म पाहिली का?

उंबरठा - आतबाहेरचा झगडा मांडणारी ही शॉर्टफिल्म पाहिली का?

Next
ठळक मुद्देसुमित वंजारीनं पुणे विद्यापीठात ‘डिपार्टमेण्ट ऑफ कम्युनिकेशन स्टडिज’मध्ये व्हिडीओ प्रोडक्शनची डिग्री मिळवताना केलेला प्रोजेक्ट म्हणजे ‘उंबरठा’ ही नऊ मिनिटांची शॉर्ट फिल्म.

- माधुरी  पेठकर 

उंबरठा. खरं तर घराचा अगदीच छोटासा भाग. पण आपल्याला आतबाहेरची स्पष्ट जाणीव करून देतो तो उंबरठाच. हा उंबरठाच आपल्याला आपल्या मर्यादांची, जबाबदार्‍यांची जाणीव करून देतो. आपल्या ताकदीची, सामथ्र्याची ओळख करून देऊन उंबरठय़ापलीकडच्या जगाचं स्वप्नंही दाखवतो. मुक्त होण्याची मूक परवानगीही देतो. स्त्रियांच्या जगण्याशी, इच्छा-आकांक्षांशी,  स्वप्नांशी, ते कोमेजून जाण्याशी आणि उमलून येण्याशीही हा घराचा उंबरठा प्रतीकात्मरीत्या पूर्वीही जोडलेला होता आणि आजही. उंबरठय़ाच्या आतबाहेरचा झगडा सुरूच असतो. उंबरठय़ाबाहेर स्त्रीनं पाऊल टाकलं म्हणजे तिचा आतला झगडा संपतो, तिची घुसमट थांबते असं नाही. कधी कधी उंबरठय़ाआतचं जगणं स्त्रीला उंबरठय़ाबाहेरचं जग मुक्तपणे उपभोगू द्यायची परवानगी देत नाही.
सुमित वंजारीलिखित दिग्दर्शित ‘उंबरठा’ या लघुपटात सुधाची हीच बाजू समोर येते. या लघुपटात मध्यमवयीन सुधाकडे बघण्याच्या तीन नजरा आहेत. एक तिची स्वतर्‍ची. दुसरी तिच्या लहान लेकाची आणि तिसरी समाजातल्या पुरुषांची. 
संगणक शिक्षिका असलेली सुधा जगण्याच्या विटलेल्या रंगांना लपेटून जीवन जगत असते. नवरा अकाली गेल्यानं मुलाच्या जबाबदारीनं दडपून गेलेली असते. घर, मुलगा आणि नोकरीत बांधली गेलेली सुधा. पैसे कमावणं, मुलाला मोठं करणं आता हीच तिची जबाबदारी. ती आणि मुलगा हेच तिचं जग. यापलीकडे काहीच नाही. सुधाला जवळून- दुरून ओळखणारे, तिच्याशी संबंधित असणारे सगळ्यांसाठी आता सुधाचं हेच आयुष्य. सुधा एक विधवा स्त्री. एकटी राहणारी. म्हणून तिच्याविषयी वाईट साईट बोलणं, तिच्यावर वाईट नजरा पडणं हेच तिचं आयुष्य.
पण खरं तर यापलीकडेही सुधाचं आयुष्य आहे. तिच्या इच्छा-आकांक्षा आहे. पण त्याला समाजमान्यता मात्र अजिबात नाही. नवरा अकाली गेला म्हणून तिचं वैवाहिक आयुष्य संपुष्टात आलं ते समाजासाठी. पण तिचं काय? तिच्या शरीराच्या गरजा तिला जाणवतात आणि बोचतातही. तिलाही सोबतीची गरज भासते. ती गरज पूर्ण करण्यासाठी तिला उंबरठा ओलांडावा लागतो. पण चोरून लपून. लोकांच्या नजरा चुकवून. मनात अपराधी भाव ठेवत.
आशिष. सुधाचा मुलगा. त्याच्या निरागस मनाला आईच्या मनातल्या झगडय़ाची जाणीव नसते. आईकडे आपले बालसुलभ गोळ्या चॉकलेटचे, तिच्यासोबत बाहेर फिरण्याचे हट्ट करत राहातो. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाघरी गेलेल्या बाबांची परत येण्याची वाट पहात असतो.  आईनं घरात बसून राहायला लावलं की निमूट घरात बसून राहातो. पण त्यालाही उबरंठय़ाबाहेर पडायचं असतं. मोकळं खेळायचं असतं. पण आई परवानगी देत नाही. शेजारी राहणारी ताई. मधून मधून त्याच्याशी बोलायला येते. त्याला हवं असलेलं चॉकलेट देते. आशिष एकदा तिच्यासोबत हट्टानं बाहेर जातो. आणि त्याला आईच्या उंबरठय़ाबाहेरचं जग दिसतं. पण जे त्याच्या नजरेला पडतं त्याचे तो बालसुलभ अर्थ काढून मोकळा होतो.  त्याच्यासोबतच्या ताईला जे दिसलं, जे कळलं ते आशिषर्पयत पोहोचू द्यायचं नसतं. ती त्याच्या बालसुलभ जाणिवेला गोंजारत त्याला चॉकलेट देऊन गप्प करते आणि खूशही.
सुधाला आशिषच्या मनातले भाव कळतंच नाही. तिच्या पाठीमागे आशिषचं बाहेर जाणं, त्याच्या हातातलं चॉकलेट तिच्या मस्तकात तिडीक आणतं. ती आशिषला मारते. जाब विचारते. पण आशिषला जे दिसलं आणि त्यानं त्याचा काढलेला अर्थ जाणून सुधा निर्‍शब्द होते. त्याक्षणाला तिला पुन्हा एकदा नवरा गेल्याची तीव्र जाणीव होते. ती संकोचते. स्वतर्‍च्याच नजरेत पडल्याची  वेदना तिच्या चेहेर्‍यावर उमटते. तिच्या मांडीवर डोकं ठेवून आशिष शांत झोपी जातो. पण सुधाच्या मनातली घुसमट, संकोच मात्र त्या  रात्री पेटून उठतो.
हे सारं पाहताना आपणही अस्वस्थ होत जातो.
सुमित वंजारीनं पुणे विद्यापीठात  ‘डिपार्टमेण्ट ऑफ कम्युनिकेशन स्टडिज’मध्ये व्हिडीओ प्रोडक्शनची डिग्री मिळवताना केलेला प्रोजेक्ट म्हणजे ‘उंबरठा’ ही नऊ मिनिटांची शॉर्ट फिल्म. 
सुमित म्हणतो की, ‘लेखक-दिग्दर्शकाच्या मनात फिल्मचे विषय आकाशातून पडत नाहीत. ते त्याच्या आजूबाजूलाच असतात. कधी जवळून अनुभवलेले असतात, तर कधी लांबून पाहिलेले असतात.’  ‘उंबरठा’ या फिल्मनं एक जगणं मांडण्याची संधी आपल्याला दिली असं सुमित सांगतो. 
 ही फिल्म पाहण्यासाठी लिंक
https://youtu.be/u7QcIOU3Pes 

Web Title: Umbaratha - A must watch shortfilm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.