भिजक्या पावसातली छत्री
By admin | Published: October 27, 2016 04:01 PM2016-10-27T16:01:01+5:302016-10-27T16:01:01+5:30
काय कमवलं म्हणजे आपण खूप श्रीमंत होऊ? -पैसा!! तो तर लागतोच! पैशाची श्रीमंती कमी कोण लेखेल? लक्ष्मीची पूजा तर आवसेलाही करतो आपण आणि उजळवून टाकतो सारी आवस!! कष्टानं कमावलेला, चांगल्या कामातून, घामाच्या धारांतून फुललेला पैसा श्रीमंती आणतो, सुबत्ता आणतो.. जगण्याला स्थैर्य आणि सुरक्षितताही देतो मान-सन्मान-प्रतिष्ठा-अधिकार सारं काही देतो तो हा पैसा..
काय कमवलं म्हणजे आपण खूप श्रीमंत होऊ? -पैसा!! तो तर लागतोच! पैशाची श्रीमंती कमी कोण लेखेल? लक्ष्मीची पूजा तर आवसेलाही करतो आपण आणि उजळवून टाकतो सारी आवस!!
कष्टानं कमावलेला, चांगल्या कामातून, घामाच्या धारांतून फुललेला पैसा श्रीमंती आणतो, सुबत्ता आणतो.. जगण्याला स्थैर्य आणि सुरक्षितताही देतो मान-सन्मान-प्रतिष्ठा-अधिकार सारं काही देतो तो हा पैसा..
पण पैशापाशी येऊन कमाईची
आणि श्रीमंतीची व्याख्या थांबली तर
पुरेसं श्रीमंत होणं नाही जमत..
त्यासाठी अजून काही पुंजी आपल्यापाशी हवीच..
वयाचा आकडा काहीही म्हणो,
लहान मुलासारखं खळखळून, भरपूर
हसता यायला हवं..
अंगाचं मुटकुळं करून बिनघोर,
शांत, ढाराढूर झोपता यायला हवं..
चार चांगल्या हुशार, विद्वान माणसांना
आपल्याविषयी आदर वाटावा,
माया वाटावी असं वागता यायला हवं..
आपल्यावर सडकून टीका करतील,
आपला कान धरतील आणि
फटकारून काढतील चुकलं तर
अशी माणसं कमावता यायला हवीत..
सच्चे मित्र आणि बोलघेवडे,
दिखावू मित्र यातला फरक समजायला हवा..
आणि सच्च्या, दिलदार मित्रांसाठी देता यायला हवा
प्रसंगी जीवही काढून,
मग बाकी वेळ-पैसा काय चीज आहे?
जे जे सुंदर, श्रेष्ठ ते ते सारं जपता यावं आपल्याला,
रसास्वाद घेता यावा आपल्याला..
चित्रांचे रंग कळावेत,
फुलांची भाषा उमगावी
आणि सप्त सुरातून उलगडणारी मैफल
ैआपल्याही कानात उतरावी..
पावसात भिजत असताना
दुसऱ्याच्या डोक्यावर धरता यावी छत्री
आणि भिजक्या पावसात नाचता यावं
स्वत:सह जगालाही विसरून..
एकतरी झाडं रुजावं,
मोठं व्हावं आपल्या हातून
आणि एका तरी लेकराच्या चेहऱ्यावर फुलावं
आपल्यामुळे हसू..
आपण आलो तेव्हा जग जसं होतं,
त्यापेक्षा ते सुंदर बनवण्याची असावी मनात धमक
आणि सगळ्यांना घेता येईल मोकळा श्वास म्हणून
करता यावी मनापासून धडपड..
जगण्याची ही श्रीमंती
पगाराच्या चेकसोबत बॅँकेत जमा होत नाही..
ती कमवावीच लागते..
आणि कमवली तरी टिकवावी लागते..
ती टिको.. वाढो.. जगो..
आणि साऱ्यांना श्रीमंत करत
भरभरून उरो..