सेयनबोऊ ! निराधार महिलांचा आवाज बुलंद करणारी आफ्रिकन गोष्ट.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 03:12 PM2019-11-14T15:12:36+5:302019-11-14T15:23:35+5:30
कॉँगोतल्या या महिला पोलीस अधिकारी त्यांनी अत्याचारग्रस्त महिलांना जे आत्मभान दिलं, त्याची ही गोष्ट.
- कलीम अजीम
एकत्र येऊन काम केलं, संघटित राहिलं तर शांतता राखण्यासाठीची पायाभूत जबाबदारी पूर्ण केली जाऊ शकते. एकाच्या प्रयत्नामुळे कामाची सुरुवात होते. पण संघटितपणे ते केल्यानं त्याला गती येते.
रिपब्लिक ऑफ काँगोच्या मेजर सेयनबोऊ डिऔफ या महिला पोलीस अधिकार्यांचं हे विधान आहे. 5 नोव्हेंबरला संयुक्त राष्ट्राकडून सर्वश्रेष्ठ महिला पोलीस अधिकारी म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
मध्य आफ्रिकेतील कॉँगो देशात मेजर सेयनबोऊ डिऔफ सक्रिय आहेत. संयुक्त राष्ट्राच्या बहुसंख्य महिला पोलीस अधिकार्यांपैकीच त्या एक. त्यांनी शोषित महिलांसाठी केलेलं काम अतुलनीय मानलं जातं. संयुक्त राष्ट्राकडून संचलित होणार्या यूएन न्यूज या वेबसाइटवर मेजर डिऔफ यांच्या कामाची पूर्ण प्रोफाइल दिलेली आहे. निराधार व असाहाय्य महिलांचा आवाज अशा शब्दांत त्यांची तारिफ होते. इतकंच नाही तर त्यांनी महिला पोलीस अधिकार्यांचं नेटवर्क तयार करण्याचं उत्तम काम केलंय.
लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांना केवळ मेजर डिऔफ यांनी आधारच दिलेला नाही, तर अशा घटना रोखण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी व शाश्वत प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांची दखल जागतिक मीडियाने घेतली आहे. पीडित महिलांना कणखर बनवून आत्मभान जागं करण्याचं काम केलं म्हणून त्यांच्या या विशेष कामाचा गौरव संयुक्त राष्ट्राकडून करण्यात आलेला आहे.
पूर्व आफ्रिकेतील सेनेगल राष्ट्रीय पोलीस यंत्रणेशी संबंध असणार्या मेजर डिऔफ या अशा टास्क फोर्सचं नेतृत्व करतात, जो काँगो रिपब्लिकमध्ये लैंगिक हिंसा आणि र्दुव्यवहार रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. शिवाय त्या काँगोच्या महिला पोलीस नेटवर्कचं व्यवस्थापनदेखील सांभाळतात. हे नेटवर्क कामकाज करणार्या महिलांना साहाय्यता प्रदान करते.
या पुरस्कारासाठी संयुक्त राष्ट्राच्या वेगवेगळ्या मिशन अंतर्गत चालणार्या जगभरातील 30 महिला पोलीस अधिकार्यांचं नामांकन करण्यात आलं होतं. निवड समितीने असाधारण कर्तृत्व गाजविणार्या मेजर डिऔफ यांची निवड केली. संयुक्त राष्ट्रसंघात या पुरस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
जगभरात शांतता प्रस्थापित करण्याच्या वेगवेगळ्या प्रयत्नाला प्रोत्साहन म्हणून संयुक्त राष्ट्राकडून हा सन्मान दिला जातो. सध्या संयुक्त राष्ट्रात सध्या 1400 महिला पोलीस अधिकारी कार्यरत आहेत. ज्या जगभरात सक्रिय आहेत. 2028 र्पयत संयुक्त राष्ट्र महिला पोलीस अधिकार्यांची संख्या 30 टक्क्यार्पयत वाढविण्यात येणार आहे.