सातपुडय़ातले अस्वस्थ बाल-पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 04:48 PM2019-07-03T16:48:08+5:302019-07-03T16:49:09+5:30
सातपुडय़ाच्या रांगात, आदिवासी पाडय़ात बालविवाह तर मोठय़ा प्रमाणात होतातच, पाळणाही दरवर्षी हलतो आणि अल्पवयीन मातांच्या समस्या वाढतात.
-रमाकांत पाटील,
कुपोषण हा शब्द पाठ सोडत नाही आणि दरवर्षीच छळतो, तो सातपुडय़ात. सातपुडय़ाच्या रांगांमध्ये शेकडो आदिवासी पाडे आहेत. जगापासून, विकासापासून, नव्या जगापासून दूर. नव्या जगाशी ते काय कनेक्ट सांगणार, या पाडय़ांर्पयत पोहोचण्यासाठी अद्यापही रस्तेच नाहीत. मग विकासाच्या वाटेवर सुसाट चालणारी गाडी इथं कशी पोहचणार? ती पोहचत नाही त्यामुळे साहजिकच अज्ञान आणि दारिद्रय़ यांचं प्रमाण मोठं आहे.
पिढय़ान्पिढय़ा हे असंच चाललेलं असलं तरी आजचं तारुण्यही त्यापायी आपल्यापुढे जगण्याचे अनेक प्रश्न घेऊन उभं आहे.
या भागात बालविवाहाचा प्रमाण आजही जास्त आहे. विवाह लवकर होतात आणि संतती नियमनाची काही माहितीच पोहचत नाही त्यामुळे संततीचे प्रमाणही जास्त आहे. कुपोषणाचा प्रश्न या भागात जास्त दिसतो कारण अल्पवयीन माता, त्यांचे नियमित हलणारे पाळणे, अपत्य संख्या जास्त आणि त्या बाळांना योग्य पोषण न मिळणं हा येथील मुख्य प्रश्न आहे.
आजही या भागात विवाहाची 100 टक्के नोंदणी होत नाही. मात्र तरीही एका सव्रेक्षणानुसार येथे बालविवाहाचे प्रमाण 26 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्याचप्रमाणे पाचपेक्षा अधिक अपत्य असणार्या मातांची संख्या जवळपास 35 टक्के आहे. एवढेच नव्हे तर या भागात फिरताना 15 पेक्षा अधिक अपत्य असणार्या माताही भेटतात. जन्माला आलेली सर्वच अपत्य पाच वर्षापेक्षा अधिक आयुष्य जगतात असं नाही. त्यामुळे बालमृत्यूचं प्रमाणही जास्त आहे.
म्हणजे एकीकडे बालविवाह, वयाची 18 वर्षेही पूर्ण न झालेल्या दोन-तीन मुलांच्या माता यांची संख्या येथे जास्त आहे. आरोग्यशास्ननुसार बाळाला जन्म देण्यासाठी आईचे किमान वय 20 तरी असावे पण इथं प्रत्यक्षात 18 पेक्षा कमीच वयात मुली बाळंतीण होतात. त्यांचं पोषण होत नाही, त्यामुळे बाळंही कमी वजनाची जन्माला येतात. त्यांना अनेक आजारांची लागणही होते. साहजिकच अशा स्थितीत बाळ दगावण्याची शक्यता जास्त असते किंवा ते कायमस्वरूपी कुपोषित राहण्याची शक्यताही असते.
दुसरी बाब म्हणजे अपत्य संख्या जास्त असल्याने तरुण माता आपल्या बाळाच्या योग्य पद्धतीने सांभाळ करू शकत नाही. अशा मातांमध्ये दोन अपत्यातील अंतरही कमी असते. परिणामी कमी वजनाची व पुरेसे पोषण न झालेले बाळ जन्माला येत राहतात.
बालविवाह आणि लहान वयात जास्त अपत्य ही समस्या आजही सातपुडय़ात मोठी आहे.
(लेखक लोकमतचे नंदुरबारचे प्रतिनिधी आहेत.)