तुम्हाला नोकरी का मिळत नाही त्यामुळे काय होते? - बेरोजगारीतून राग, रागातून आळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 06:04 PM2019-03-07T18:04:30+5:302019-03-07T18:04:47+5:30
तुम्हाला नोकरी मिळत नाही, हा एकटय़ा तुमचा किंवा तुमच्या कुटुंबाचा, तुमच्यापुरता प्रश्न नसतो! हे एक चक्र आहे आणि त्या चक्राचे परिणाम अख्ख्या देशाला भोगावे लागतात!
राष्ट्रीय संख्याशास्त्रीय आयोगाने प्रकाशित करायचा ठरवलेला बेकारीविषयक राष्ट्रीय सर्वेक्षणाचा अहवाल सरकारी परवानगीशिवाय प्रकाशित झाला. बेरोजगारीचा हा कोंबडा, सरकारने झाकला तरी आरवण्याचा राहिला नाही! बेरोजगारी वाढली आहे ही बातमी अपेक्षितच होती; पण अहवालातील आकडेवारीनुसार बेरोजगारी ज्या प्रमाणात वाढली आहे ते निश्चितच धक्कादायक आहे. एकूण बेरोजगारांचे प्रमाण 2011-12 साली 2.1 दशांश टक्के होते ते 2017-18 साली 6.2 दशांश टक्के झाले; म्हणजे देशातील बेरोजगारांची संख्या जवळजवळ तिपटीने वाढली. अधिक वाईट गोष्ट म्हणजे तरु णांमधील बेकारीचे प्रमाण याहीपेक्षा खूप जास्त आहे; मग ते तरु ण-तरु णी ग्रामीण असोत की शहरी, पुरु ष असोत की स्त्री.
बेरोजगारांच्या या संख्या काही कोटीत आहेत. या कोटय़वधींच्या बेरोजगारीमुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात काही अब्ज कोटींची तूट निर्माण होते आहे. हे आकडे इतके मोठे आहेत की ते माझ्या आणि इतर सर्वसामान्यांच्या ‘अर्थ’पूर्ण आकलनाच्या पलीकडचे आहेत. त्यातून या प्रश्नाचे गांभीर्य आणि आपल्यावर त्याचे घडणारे परिणाम हे लक्षात येत नाहीत. या मोठय़ा प्रमाणावर आणि सार्वत्रिक पसरलेल्या बेरोजगारीचे आपल्या जगण्यावर, आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहेत?
बेरोजगार तरुण-तरुणी संघटित होऊन आपल्या प्रश्नावर दाद मागतील, हे अवघड का आहे?
त्यांना राजकीय पाठबळ का नाही?
मोठय़ा प्रमाणावर वाढणारी बेरोजगारी हे फॅसिझमला निमंत्रण आहे का?
वाढत जाणार्या बेरोजगार तरु णांची दिशाभूल करून त्यांचे खच्चीकरण करण्याची प्रभावी तंत्रे अनेक वर्षे राबवली जात आहेत. ती कोणती?
- याविषयीचे विवेचन आपण गेल्या आठवडय़ात प्रसिद्ध झालेल्या या लेखाच्या पहिल्या भागात पाहिले.
बेरोजगारांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले, त्याची टिंगल केली, म्हणून वास्तवातील या प्रश्नाची विखारी तीव्रता कमी होत नाही, ती अधिकच विखारी बनते. बेरोजगारीच्या चक्र व्यूहात घुसलेला तरु ण एकटय़ाने जीवावर उदार होऊन लढत राहातो, हळूहळू थकत जातो. त्याचे खच्चीकरण होते. त्यातून होणारे परिणाम आता आपल्याला सभोवताली दिसू लागले आहेत.
बेरोजगारीमुळे देशात होणार्या महत्त्वाच्या परिणामांची फक्त जंत्रीच देणे या लेखाच्या शब्दमर्यादेत शक्य आहे. तरु णांमधील वाढता वैताग, बेरोजगारीतून सुरू झालेले पत्रकारितेचे आणि राजकारणाचे व्यापारीकरण, वाढती हिंसक मनोवृत्ती, तिला खतपाणी घालून वाढवण्यात येणारी संघटित जातीय आणि धार्मिक हिंसा, यामुळे लोकशाही कंगाल होत आहे. हा मोठा धोका आहे.
परिणाम 1
श्रम-संधी
मिळत नाही!
सर्जनशील सामाजोपयोगी श्रम करणे यात माणसाचे माणूसपण आहे. म्हणूनच, भारताच्या संविधानांच्या निर्देशक तत्त्वांमध्ये, कलम 41 मध्ये, नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी शासनाने धोरणे अवलंबावित असे सांगितले आहे. बेरोजगार माणूस हा सामाजोपयोगी
श्रम करण्याच्या संधीपासून वंचित होतो.
परिणाम 2
जगण्याची क्षमता
खालावते!
श्रम केल्याने श्रम करण्यातील कौशल्य वाढते. रोजगार शोधण्यात जितकी वर्षे जातील, जितके अपयश पदरात येईल तितका चांगला रोजगार करण्याची त्या बेरोजगार तरु ण-तरु णीची क्षमता कमी होत जाते. मग त्या बेरोजगार
तरु णांना रोजगार मिळणे अधिकाधिक कठीण होते. बेरोजगार हे हळूहळू पण निश्चितपणे त्यांची माणूस म्हणून जगण्याची क्षमता गमावतात.
परिणाम 3
व्यसनांची वाळवी
पोखरू लागते!
असे निराश, हताश, रिकामे तरुण मग व्यसनाच्या आहारी जातात. चरस, गांजा, अफू यांची व्यसने लागतात. काही दारूही प्यायला लागतात. त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. व्यसनामुळे रोग झालेल्या पंजाबमधील तरु णांची संख्या वाढत आहे. पुण्यामध्ये काम करणारे समाजसेवक मला तरु णांमध्ये ही व्यसने मोठय़ा प्रमाणावर वाढत आहेत, असे चिंतातुर होऊन सांगतात.
परिणाम 4
लैंगिक उपासमार
असह्य होते!
रोजगार नाही म्हणून लग्न होत नाही. वय वाढत जाते. मग लैंगिक भुकेला पर्याय शोधले जातात. दिल्लीमध्ये आत्ताच दिवेलागणीनंतर रस्त्यावरून फिरणे तरु णींना अशक्य आहे. पुण्यातही लवकरच ती वेळ आल्यास आश्चर्य वाटू नये. वेश्याव्यवसाय वाढतो. गुप्तरोग वाढतात. औषधोपचार परवडत नाहीत. वैदूंचे फावते.
परिणाम 5
स्थलांतरित थवे
फुगत राहातात!
इथे नाही तर तेथे मिळेल या खोटय़ा आशेवर स्थलांतर वाढते. मुंबईत फिल्म सिटीच्या बाहेर अंधेरी ते बोरिवली परिसरात हजारो तरु ण-तरु णी निदान ‘छोटय़ा पडद्यावर एकदा दिसू’ या आशेवर गोळा होतात, काहीही करायला तयार होतात.
परिणाम 6
खोटय़ा आमिषांची
जाळी वाढतात!
आपण काहीतरी काम करतोच आहोत अशी स्वतर्ची फसवणूक करता येईल अशा प्रकारचे उद्योगधंदे तरु ण करू लागतात. त्यामध्ये खप कितीही कमी असला तरी वडापाव गाडी लावणे, पानपट्टी सुरु करणे यासारखे, इतरांना त्रास नसलेले, उद्योग येतात तसेच मल्टिलेव्हल मार्केटिंगसारखे फसवणुकीच्या जवळपास जाणारे व्यवसाय सुरू होतात. खोटी आमिषे दाखवून शुद्ध फसवणूक करणेही सुरू होते.
परिणाम 7
आळसाची चटक
आयुष्याला जडते!
काम न करण्याची सवय लागते, आळस करण्याची सवय लागते. मग काम मिळाले तरी आळसच बरा वाटतो. गावाकडे बरी शेती असली तरी नको वाटते. मग वडिलांनी कर्ज काढून घेऊन दिलेली रिक्षा चालवणारा गिर्हाईकाला नाकारून विडी फुकत बसतो. काम मिळाले तर उशिरा जातो, कामाच्या वेळात सारखा मोबाइलवर असतो’ मग त्याची नोकरी जाते. आधीचा बेरोजगार आता रोजगारासाठी अपात्र बनतो.
परिणाम 8
रिकाम्या डोक्यातून
हिंसाचार बळावतो!
नोकरी जाण्याच्या भीतीत वावरणारा नवरा घरी येऊन बायकोला मारहाण करतो. ‘फुटपाथवर मोटारसायकल का घातली?’ म्हणून विचारणार्या वृद्धाला तरु ण मोटारसायकलस्वार भोसकतो. बाजूला लावलेल्या वाहनांना आग लावणे हा ‘पास टाइम’ बनतो. गोरक्षक भक्ष्य शोधत फिरतात.
परिणाम 9
फुटकळ कामातली
किरकोळ प्रतिष्ठा बळावते!
जे रोजगार कमी कष्टाचे आणि सहज उपलब्ध होतात ते स्वीकारणे भाग पडते. फुटकळ पत्रकार होणे, राजकीय नेत्यांचे सहायक बनणे हे रोजगार आकर्षक वाटतात. सुरुवात 100 प्रतिखपाच्या दैनिकात खोटय़ा बातम्या छापण्यासाठी पैसे घेऊन होते किंवा सुरु वात नेत्याच्या सभेला माणसामागे शंभर रु पये घेऊन दहा श्रोते हजर करण्याचे कंत्राट घेऊन होते. हळूहळू राजकारण हा कुठल्या पक्षात गेल्यावर, कुणाच्या सेवेत रु जू झाल्यावर, किती फायदा एवढय़ाच हिशेबाने करायचा धंदा बनतो. पक्षाची वैचारिक बैठक वगैरे मुद्दे फिजूल ठरतात. मग याच तरु णातले काही मोजके हळूहळू अजून मोठे पत्रकार, किंवा अजून मोठे नेते बनतात; पण बेरोजगार असताना शिकलेले धडे ते विसरत नाहीत. मग पत्रकारिता, राजकारण हे धंदे बनतात.
(लेखक सावित्रीबाई फुले विद्यापीठ संलग्न इंडसर्च या संस्थेत
प्रोफेसर आहेत.)