जगभर फोटो व्हायरल झालेल्या अफगाणी मुलीची दुर्दैवी कहाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 05:09 PM2020-08-06T17:09:12+5:302020-08-06T17:12:05+5:30

तिचा फोटो जगभर व्हायरल झाला, तिनं दोन तालिबान्यांना मारलं म्हणून अनेकांनी तिच्या शौर्याचं कौतुक केलं, प्रत्यक्षात मात्र ती बरंच काही गमवून बसली आहे.

The unfortunate story of an Afghan girl kills-two-taliban-after-parents-murdered | जगभर फोटो व्हायरल झालेल्या अफगाणी मुलीची दुर्दैवी कहाणी 

जगभर फोटो व्हायरल झालेल्या अफगाणी मुलीची दुर्दैवी कहाणी 

googlenewsNext
ठळक मुद्देअफगाणी कमर गुल

कलीम अजीम

गेल्या महिन्यात सोशल मीडियात एक फोटो व्हायरल होता. जगभर.
‘माय हिरो’ या नावानं काही लाख लोकांनी तो फोटो सोशल मीडियात शेअर केला.
फोटोत एक मुलगी हातात रायफल्स घेऊन हताश चेह:यानं बसलेली दिसते. सोबत मेसेज- ‘या मुलीने दोन तालिबानी अतिरेक्यांना ठार केलं!’
या व्हायरल फोटोचीही शोधलं तर एक कहाणी आहे. 
कौटुंबिक हिंसाचारातून घडलेली एक दुर्दैवी घटना.
न्यू यॉर्क टाइम्सने प्रकाशित केलेली ती खरीखुरी कथा.  
22 जुलैला न्यू यॉर्क टाइम्सच्या स्थानिक रिपोर्टरने दिलेली कथा अशी, अफगाणिस्तानच्या घोर प्रांतातील गिरिहाह गावी नईम आणि रहिमी गुल नावाचे दोघे, एकमेकांचे मित्र. नईमला कर्ज हवं होतं. मित्रत्वाच्या नात्याने रहिमीने त्याला 3 हजार डॉलरचं कर्ज देऊ केलं; पण त्या मोबदल्यात आपल्या मुलीशी लग्नाची अट घातली. नईम तयार झाला. कालांतराने रहिमीची मागणी वाढली आणि त्याने नईमच्या किशोरवयीन भाचीशीही लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली.

‘कमरसोबत लग्न करायचे असेल तर तुङया भाचीचाही निकाह माङयाशी लावावा लागेल’ अशी अट रहिमीने नईमला घातली. नईमला उसन्या घेतलेल्या पैशाच्या मोबदल्यात हा सौदा महाग नव्हता. त्याने होकार दिला. दोन्ही मुली अल्पवयीन असल्याने काही काळ प्रतीक्षा करावी लागली.
अखेर चार वर्षानंतर लग्न झालं. कालांतराने 4क् वर्षीय रहिमी गुलचे नववधूशी पटेनासे झाले. एके दिवशी रहिमीला सोडून त्याची दुसरी पत्नी म्हणजे नईमची भाची आपल्या घरी निघून गेली. बायको निघून गेल्याने रहिमी गुल नईमच्या घरी पोहोचला. पत्नी रहिमीसोबत जाण्यास तयार नव्हती. यावरून सासरा व जावई यांच्यात जोरदार वादावादी झाली. अखेर रहिमी सूड म्हणून आपल्या मुलीला म्हणजे नईमच्या पत्नीला कमरला घेऊन घरी आला.
नईमने वारंवार बोलणी करत व सामंजस्याने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला; परंतु रहिमी कुठलीही तडजोड स्वीकारण्यास तयार नव्हता. त्याला आपली किशोरवयीन पत्नी परत हवी होती. पण ती येण्यास तयार नसल्याने हा वाद वाढतच गेला. दरम्यान रहिमी गुलने नईमला उसने दिलेले पैसे मागण्यास सुरु वात केली. नईम बेरोजगार होता. त्याच्याकडे पैसे नव्हते. रहिमीचा वाढता तगादा पाहता नईमने एक शक्कल लढविली.
तो थेट स्थानिक तालिबानी सदस्याकडे गेला. त्याने रहिमी हा सरकार समर्थक असून, परदेशाहून आलेला निधी तो गावात वितरित करण्यास सरकारला मदत करतो, अशी कथा सांगितली. नईम तालिबानी ग्रुपच्या पूर्वीपासून संपर्कात असल्याने त्याची समस्या त्यांना माहीत होती.
गेल्या वर्षी अमेरिकेसोबत झालेल्या शांतता समझौत्यानंतर तालिबानी गट सत्तास्थापनेसाठी स्थानिक सरकारविरोधात मोटबांधणी करत आहेत. या संधीचा फायदा उचलत नईमला सहकार्य करण्याचे आश्वासन सशस्र तालिबानी नेत्यांनी दिलं. उसने पैसे परत करायचीही गरज नाही म्हणाले.
17 जुलैच्या मध्यरात्री सशस्र तालिबानी आणि नईमने कमर गुलच्या घराबाहेर येऊन गराडा घातला. नईम बाहेरून रहिमीला चेतवू लागला. काय गोंधळ आहे हे पाहण्यासाठी रहिमी घराबाहेर आला. तो दिसताच त्याला गोळ्या घातल्या गेल्या. बंदुकीचा आवाज ऐकून रहिमीची पहिली बायको फातिमा बाहेर आली. तीदेखील बंदुकीच्या गोळीने टिपली जाऊन कोसळली.  
बंदुकीच्या आवाजाने झोपलेली कमर जागी झाली. तिने खिडकीतून बाहेरचे दृश्य पाहिलं. बापाची रायफल घेऊन ती बाहेर आली. समोर असलेल्या हल्लेखोरावर तिने गोळ्या झाडल्या. त्यात एक जखमी झाला तर दुसरा मारला गेला. कमरने पुन्हा स्टेनगन उचलली व फैरी झाडल्या. त्यात नईम मारला गेला.
दरम्यान, गावातील लोक व सरकार समर्थक स्वयंसेवक (मिलिशिया) जमा झाले. त्यांनी तालिबानी गटाला चिथावणी दिली. उरलेल्या तालिबानी सदस्यांनी पळ काढला. दुस:या दिवशी सकाळी अफगाण सरकारच्या अधिका:यांनी कमरचा रायफलसोबतचा फोटो काढून प्रेस रिलीज जारी केलं. त्या दोन ओळीच्या कथेत लिहिलं होतं, ‘या धाडसी अल्पवयीन मुलीने दोन तालिबानी दहशतवाद्यांना ठार केलं.’
हीच कथा सर्व मीडियाने चालवली. कमरच्या एका गोळीनं नईम मारला गेला होता. एकीकडे आई-बाप गमावले तर दुसरीकडे पतीच्या मरणाचं दु:ख कमरच्या नशिबी आलं. कमरचं कुटुंब गमावल्याचं दु:ख शौर्यकथा म्हणून प्रसारित झालं.
 दि गार्डियनच्या मते, कमर गुल आपल्या 12 वर्षाच्या भावासोबत सरकारी सुरक्षेच्या देखरेखीत आहे.
एका पारिवारिक वादामुळे कमर गुलचं आयुष्य व कुटुंब दोन्ही उद्ध्वस्त झाले. एकीकडे तिच्या शौर्याच्या कहाण्या जगभर प्रकाशित केल्या जात होत्या, तर दुसरीकडे ती पोरकी व अनाथ झाल्याचं दु:ख पचवत होती. 
शौर्याच्या कहाण्या ऐकून राष्ट्रपती अशरफ गणी यांनी कमरला राष्ट्रपती भवनात आमंत्रित केलं.
इथूनच तिच्या मुलाखती जगभरात प्रसिद्ध झाल्या. आई-बापाच्या हत्येचा सूड घेतला, अशी प्रतिक्रिया तिनं एएफपी या वृत्तसंस्थेला दिली.
याच सुडाच्या भावनेपोटी कमर गुलवर पुन्हा तालिबानी गटाने हल्ला केला होता; परंतु ग्रामस्थांमुळे ती बचावली. पुन्हा असा हल्ला होईल अशी भीती तिने आपल्या प्रतिक्रि येत व्यक्त केली आहे. 
विशेष नोंद घेण्यासारखी बाब अशी की, तालिबानी संघटनांना अफगाणिस्तानात सत्ताधीश होण्याच्या विरोधात सर्वप्रथम अफगाणी मुलींनीच आवाज उठवलेला आहे. 2क्18 मध्ये झालेल्या तालिबान व अमेरिका शांतता बैठकीत स्थानिक महिला प्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे, अशी मागणी या तरु णींनी केली होती. त्यांच्या मते, तालिबानी गटांनी महिला हक्क व सुरक्षेसंदर्भात स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे व ती शांतता करार होण्यापूर्वी आम्हाला मान्य झाली पाहिजे, अशी अट त्यांनी घातली होती.
आपल्या मागणीला जगभरातून प्रतिसाद मिळावा यासाठी त्यांनी ‘माय रेड लाइन’ नावाची मोहीमही चालवली होती. परंतु दुर्दैव असे की महिलांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून अमेरिकेने तालिबानी गटांना काबूल करारामार्फत अफगाणिस्तानात सत्ता संपादनाला संमती दर्शवली.
आणि तिथल्या तरुण मुली त्या सा:यात अशा भरडल्या जात आहेत.

 


( कलीम मुक्त पत्रकार आहे.)

Web Title: The unfortunate story of an Afghan girl kills-two-taliban-after-parents-murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.