बिनभांडवली आयडिया
By Admin | Published: May 9, 2014 12:11 PM2014-05-09T12:11:32+5:302014-05-09T13:33:35+5:30
पैसे नाही फक्त मेहनत आणि कल्पकता गुंतवली तरी सुरू होतील अशा व्यवसायांच्या या काही कल्पना.
हॅपिनेस प्लॅनर्स
इव्हेण्ट मॅनेजमेण्ट, वेडिंग प्लॅनर, हे शब्द तर तुम्ही ऐकलेत.
पण हॅपिनेस प्लॅनर हा शब्द ऐकलाय.
तो या इव्हेण्टवाल्यांचाच सख्खा चुलतभाऊ.
ज्यांना बडेबडे इव्हेण्ट मॅनेजमेण्टवाले परवडत नाहीत, त्यांच्यासाठीचे हे हॅपिनेस प्लॅनर.
इव्हेण्ट मॅनेजमेण्टचा कोर्स केलेले काही जण सुरुवातीला अनुभव म्हणून सध्या हे काम अगदी छोट्या वतरुळापुरतं करताना दिसतात.
म्हणजे काय तर कुणाचं डोहाळेजेवण, बारसं, किटी पार्टी, भिशी पार्टी, पिकनिक, छोटी बर्थडे पार्टी प्लॅन करून देतात. शक्य तेवढा आनंद आणि शक्य तेवढी मजा या पारंपरिक कार्यक्रमात करता यावी, असा त्यांचा प्रयत्न.
म्हणूनच त्यांना म्हणतात, हॅपिनेस प्लॅनर.
बिनभांडवली हा व्यवसाय, हवं फक्त गोड बोलण्याचं आणि माणसं जोडण्याचं कसब.
डोमेस्टिक कॉण्ट्रॅक्टर
रोजची धावपळ, अनेकांच्या बिलं भरण्याच्या वेळा हमखास चुकतात. फोनबिल, लाईटबिल भरणं राहून जातं. शंभर वेळा फोन करा किरकोळ कामासाठी प्लंबर, सुतार, इलेक्ट्रिशियन काही केल्या येत नाहीत. म्हातारे आजी-आजोबा काही ठिकाणी एकटे राहतात, त्यांना भाजी आणून द्यायला, औषधं आणून द्यायला, बिलं भरायला कुणी मदतीला मिळतच नाही.
अशी मदत जर एखाद्यानं व्यवसाय म्हणून सुरू केली तर.
काही जण करतात, हल्ली तर मोठमोठय़ा कंपन्याच अशी कामं घेतात. अनेकांची अमेरिकेत असलेली मुलं आपल्या आईबाबांची कामं करण्यासाठी अशा कंपन्यांना वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतात.
हे काम कुणालाही आपल्या एरियात करता येईल. एक नेटवर्क तर बांधायचं, सगळी छोटी-मोठी कामं करणारी माणसं जोडायची आणि आपला नंबर गुंतवणूक म्हणून वापरायचा.
लोक फोनवर कामं सांगतील, ती कामं केली की जे पैसे मिळतील त्यात अशा कॉण्ट्रॅक्टरचं कमिशन निघतं.
या कामाला हल्ली म्हणतात, डोमेस्टिक हेल्प कॉण्ट्रॅक्टर. जो फक्त एका फोनवर सगळी कामं करतो, करवून देतो.
पर्सनल ब्यूटिशियन
ब्यूटिपार्लरचे कोर्स तर हल्ली गल्लोगल्ली चालतात. काही जणी किंवा काही जणही, कोर्स झाला की कुठल्यातरी ब्यूटिपार्लरमध्ये नोकरी करतात. का? तर आपलं पार्लर सुरू करायला पैसे नाहीत.
कुणी सांगितलं की आपलं पार्लरच सुरू करायला पाहिजे. सध्याच्या धकाधकीच्या आणि वेळच नसल्याची रड असलेल्या या काळात अनेक मुली/बायका केवळ पार्लरची वेळ जुळत नाही म्हणून पार्लरला जात नाहीत.
इथंच तर कामाची संधी आहे, कारण त्या पार्लरमध्ये जात नसतील तर पार्लर तर त्यांच्या घरी जाऊ शकतं ना.? आपलं पार्लरचं सगळं साहित्य, सगळी यंत्रसामग्री घेऊन काही जणी मोबाइल फोनवर अपॉईण्टमेण्ट घेऊन ठरल्यावेळी घरी जाऊन ब्यूटि ट्रीटमेण्टस, हेअरकट करून देतात.
छोट्या-मोठय़ा शहरात असं काम करणार्या या मुलींना आता म्हणतात, पर्सनल ब्यूटिशियन.