दिल्लीतली UPSCची मंडई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 08:43 AM2018-03-15T08:43:04+5:302018-03-15T08:43:04+5:30

यूपीएससी क्रॅक करण्याचा हमखास यशाचा ‘दिल्ली फॉर्म्युला’ मराठी मुलांना हाका मारतो. पण तो भोवरा आहे, त्यातून बाहेर पडणारे मोजकेच.. बाकीचे? ते सांगतात फक्त, दिल्लीत यूपीएससी करतोय..

UPSC board in Delhi | दिल्लीतली UPSCची मंडई

दिल्लीतली UPSCची मंडई

googlenewsNext

- अमृता कदम

दिल्लीमध्ये बाहेरून येणाऱ्यांना करोल बाग माहीत आहे, ते इथल्या प्रसिद्ध मार्केटसाठी. ब्रॅण्डेड गोष्टींपासून स्ट्रीट शॉपिंगपर्यंत ‘सबकुछ’ असं हे मार्केट आहे. पण याच परिसरात अजून एक मार्केट आहे, ज्याची फार कमी लोकांना माहिती असते. हे मार्केट आहे ‘स्वप्नांचं’...
या मार्केटमध्ये तुम्हाला यशाची १०० टक्के ‘गॅरण्टी’ दिली जाते आणि देशभरातील हजारो तरु ण आपलं स्वप्नं साकार करण्याच्या ध्यासानं इथे येतात. देशातील सर्वांत कठीण समजल्या जाणाºया केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अर्थात यूपीएससीच्या तयारीसाठी. दिल्लीमधील राजेंद्रनगर, करोल बाग, मुखर्जी नगर, जीटीबी नगर हे आता स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि क्लासेसचे ‘हब’ बनले आहेत. साधारणपणे देशभरातून आलेले पंधरा ते वीस हजार विद्यार्थी इथे यूपीएससीची तयारी करतात. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून एक अर्थव्यवस्थाच या भागात पद्धतशीरपणे तयार उभी राहत गेली आहे.
करोल बाग मेट्रो स्टेशनला उतरल्यावरच ‘व्हीजन आयएएस’ची भव्य इमारत आणि अगदी सकाळी ६ वाजल्यापासूनच तिथे असलेली विद्यार्थ्यांची गर्दी दिसते. इथून आपण या भागात जसजसे आत आत जातो तसतशी क्लासेसची नावं दिसायला लागतात. प्रत्येक इमारतीवर कोणत्या ना कोणत्या विषयाच्या मार्गदर्शनाची जाहिरात दिसते. लक्ष, संकल्प, मिशन अशा नावांमधून विद्यार्थ्यांना सतत त्यांच्या ध्येयाचं स्मरण राहील, याची काळजी हे क्लासेस घेत असतात. खरं तर मुखर्जी नगर, बेर सराय भागातही यूपीएससीचे क्लासेस आहेत. पण विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर कळलं, की हिंदी माध्यमातून परीक्षा देणारे बहुतांश विद्यार्थी या भागात राहतात. राजेंद्र नगर, करोल बागमध्ये साउथ इंडियन आणि मराठी मुलांची संख्या अधिक आहे. दिल्लीमध्ये यूपीएससीसाठी आलेल्या मराठी मुलांचा आकडाच साधारण साडेतीन-चार हजारांच्या घरात आहे.

एवढे विद्यार्थी असल्याने स्वाभाविकपणे त्यांच्या राहण्या-खाण्यापासून सर्वच गरजेच्या गोष्टी पुरविणारी साखळी इथे आहे. सुरुवात अगदी प्रॉपर्टी एजंटपासून होते. राजेंद्र नगर, करोल बाग भागामध्ये दिल्लीच्या भाषेत ज्याला ‘कोठी’ म्हणतात, अशी घरं आहेत. इथल्या अनेक कोठी मालकांच्या उत्पन्नाचे स्रोत घरभाडं हाच आहे. दिल्लीत दोन-तीन वर्षे राहायचं नियोजन करून येणारी बहुतांशी मुलं ही आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतीलच असतात. त्यामुळे आपल्याकडे ज्याला वन बीएचके म्हणतात अशा घरामध्ये शेअरिंग बेसिसवर राहणं त्यांना परवडतं. मुलांना आवश्यक तेवढ्या सुखसोयींची तजवीज घरमालक करून देतात. या भागातील सध्याची परिस्थिती अशी आहे, की अनेक लोक कुटुंबापेक्षा विद्यार्थ्यांना प्राधान्य देतात. करार केला तरी चांगलं, नाही केला तरी मुलं कटकट करत नाहीत. त्यांच्याकडून घरभाडंही जास्त घेता येतं. शिवाय ही मुलं दिवसभर बाहेर राहतात, त्यामुळे त्यांच्यासाठी ते ‘घर’ नसतं, रूम असते. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा कमी; तक्रारी कमी. आलेला प्रत्येक विद्यार्थी इथे किमान दोन वर्षे तरी राहतोच आणि प्रत्येक परीक्षेच्या आधी येणारा विद्यार्थ्यांचा लोंढा असतोच. त्यामुळे ब्रोकर्सची चांदी होते. ‘जशी फळं, भाज्यांची मंडई असते, तशी ही आयएएसची मंडई आहे,’ बावा प्रॉपर्टीच्या कुलजित बावा यांचं हे म्हणणं ध्येयं, उद्दिष्ट वगैरे शब्द ऐकून तृप्त झालेल्या कानांना कसंतरीच वाटू शकतं. पण हीच इथली वस्तुस्थिती बनली आहे.
राहण्यासोबतची महत्त्वाची गरज म्हणजे खाणं. वेगवेगळ्या भागातून येणाºया विद्यार्थ्यांची दिल्लीतल्या जेवणाची क्रेझ थोड्याच दिवसांत कमी होते आणि मग घरचं जेवण आठवायला लागतं. साउथ इंडियन मुलांचं ठीक आहे. कारण इडली, वडा, डोसा वगैरे पदार्थ सगळीकडे पसरले आहेत. पण मराठी मुलांचे खाण्याचे हाल व्हायचे. हे लक्षात आल्यावर राजेंद्र नगरमध्ये घरगुती पद्धतीचे जेवण देणाºया मेस सुरू झाल्या. त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. पण मुलांना आपल्या घराच्या आठवणींना जोडणारा तेवढा धागाही पुरेसा ठरतो. शालिनी राठोड यांच्या मेसमध्ये मुलांसाठी पुरणपोळीपासून अगदी नॉन-व्हेज जेवणापर्यंत पदार्थ केले जातात. मुलांना सणवार असताना गोडधोड खायला मिळालं की बरं वाटतं, असं शालिनी यांना वाटतं. मराठी मुलांसाठी मराठी खाण्यापिण्याची हौस भागविणारं अजून एक हक्काचं ठिकाण म्हणजे ‘मराठी कट्टा.’ या भागातली व्यवसायाची संधी हेरून ब्रिजेश दिघे या मराठी तरुणाने सुरू केलेलं हे छोटेखानी हॉटेल. अर्थात, हे झाले अपवाद. एरवी या मुलांना त्यांच्या टिफिन सर्व्हिसेसचा आधार. स्टडी रूममध्ये दिवसाचे बारा ते चौदा तास अभ्यास करताना खाण्यापिण्याचे चोचले पुरवायला वेळ कुणाला आहे, म्हणा !

दोन महिन्यांपूर्वी दिल्लीमधल्या यूपीएससीच्या क्लासेसवर कारवाईची बातमी आली होती. कारण अनेक क्लासेस आणि स्टडी रूम निवासी भागात चालवले जातात आणि निवासी भागात कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल, तर अधिक पैसे मोजावे लागतात, जे या क्लासेसने केले नव्हते. अर्थात नंतर लक्षात आलं, की कारवाईमुळे क्लासेसवाल्यांना काही फरक पडणार नाही. कारण जास्तीचे पैसे ते स्वत:च्या खिशातून थोडीच मोजणार होते. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या खिशातच हात जाणार. आधीच एवढं उच्च शिक्षण घेऊन आपण काम न करता अभ्यासच करतोय, घरच्यांवर अवलंबून आहोत, असे अपराधी भाव मनात बाळगणा ºया विद्यार्थ्यांवरचा आर्थिक भारच त्यामुळे वाढणार!
क्लासेसची फी, राहण्या-खाण्यावर खर्च होणारा पैसाच इतका असतो की, यूपीएससीच्या तयारीसाठी लागणाºया बेसिक पुस्तकांव्यतिरिक्त इतर स्टडी मटेरियलसाठी काहीतरी जुगाड करायला हवाच ! राजेंद्र नगरमधल्या क्लासेस आणि स्टेशनरीवाल्यांनी तो केलाही. क्लासेसच्या नोट्स, प्रश्नपत्रिका, पुस्तकं सगळ्याच्या फोटोकॉपीची (झेरॉक्सला दिल्लीत फोटो कॉपी म्हणतात) दुकानंच ओळीनं पहायला मिळतात. नेमकं कोणतं मटेरियल निवडायचं, असा प्रश्न पडतो. मग भारंभार वाचत जायचं. या नोट्समधला एक प्रश्न गेल्यावर्षी आला होता, त्या नोट्समध्ये जीके खूप चांगलं असतं. यादी वाढतच जाते. पण यशाचा हमखास फॉर्म्युला कोणत्याही एका पुस्तकात आयताच नाही ना सापडत!

देशात दिल्ली हे यूपीएससी परीक्षांच्या तयारीचे केंद्र बनलं आहे. अगदी दोन-तीन वर्षे नाही; पण पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा किंवा मुलाखत कुठल्या तरी एका टप्प्यावर तयारीसाठी दिल्लीत आलंच पाहिजे अशी अनेकांची ठाम समजूत झाली आहे. दिल्लीत कसं या परीक्षांसाठीचं वातावरण आहे, इथं परीक्षा ‘क्र ॅक’ कशी करायची याचं तंत्र शिकवलं जातं वगैरे गोष्टी आधीच्या विद्यार्थ्यांकडून ऐकलेल्याही असतात. स्थानिक वृत्तपत्रात बड्या क्लासेसच्या जाहिराती दिसतात. हमखास यश मिळणार म्हणून पाऊल थेट दिल्लीकडे वळतात. मुळात यूपीएससीच्या जागा असतात हजार (यावर्षी तर त्या ७८२ आहेत). त्यातही आयएएस, आयपीएस, आयएफएसच्या जागा मोजून दोनशे-तीनशे. त्यासाठी बसणारे विद्यार्थी लाखो. अशा परिस्थितीत खरं तर हमखास यशाच्या ‘दिल्ली फॉर्म्युल्या’ची टक्केवारी तपासून पाहणे गरजेचं असतं. पण ते करण्याच्या म्मानसिकतेत विद्यार्थी नसतात.

‘दिल्लीत’ राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करतो, हे उत्तर त्यांना आश्वस्त करणारं वाटतं. स्वप्नं पाहणं चुकीचे नाही; पण परतीचे सगळेच मार्ग बंद करण्यात शहाणपण नाही, हे अनेकांना लक्षात येत नाही; अपयश आलं तरी स्वीकारण्याची मानसिकता नसते. आपल्यासोबत स्टडी रूममध्ये बसणारे काही जण पद मिळवतात आणि आपण तिथेच आहोत, हा विचारही त्रास देतो. बरेच जण मग दिल्लीलाच शरण जातात. परत जाऊन प्रश्नांना उत्तर देणं किंवा शोधण्यापेक्षा इथे राहून क्लासेसमध्ये, लायब्ररीमध्ये, यूपीएससीसाठीचे स्टडी मटेरिअल बनविणाºया प्रकाशन संस्थांमध्ये राहून कोणत्या ना कोणत्या पद्धतीने या प्रक्रि येचा भाग बनून राहणं पसंत करतात.

आणि मग दिल्लीच्या त्या गर्दीत काही चेहरे वर्षानुवर्षे भेटतात, ते आयएएसचे ते कधीच होत नाही.. पण सांगतात, दिल्लीत आहे, यूपीएससी करतोय !


दिल्लीला जायचंय? हे माहिती आहे..
* यूपीएससीसाठी क्लास लावायचा म्हटलं तर किमान दोन लाख रुपयांची तयारी हवी. दिल्लीतील प्रसिद्ध क्लासची पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या तयारीची फी आहे दोन लाख वीस हजार रुपये. इतर क्लासेसच्या फीचे आकडेही साधारणपणे एका बॅचला एक लाख पंचाहत्तर हजार, एक लाख पंचाण्णव हजार असेच आहेत. शिवाय वैकल्पिक विषयाचा क्लास लावल्यास त्याची वेगळी फी. साधारणपणे तीन महिन्यांच्या बॅचसाठी वीस ते पंचवीस हजार मोजावे लागतात. नुसती टेस्ट सीरिज लावायची म्हटली तर खर्च वेगळा.
* राजेंद्र नगरमध्ये तीन खोल्यांच्या घराचे भाडे किमान २५ हजार आहे. चार ते पाच जणांनी रूम शेअर केली तर तो खर्च पाच हजारांपर्यंत येतो. शिवाय लाइट बिल, पाणी बिल वेगळे. म्हणजेच राहण्याचा एका मुलाचा किमान खर्च विचारात घेतला तर तो साधारणपणे सात ते दहा हजार रुपयांपर्यंत होऊ शकतो.
* राजेंद्र नगरात टिफिन सर्व्हिसेस आहेत. नुसता दोन वेळेचा डबा लावायचा म्हटलं तरी किमान चार हजार रुपये हवेतच. तुमचा चहा, नास्ता हा खर्च वेगळाच आहे.
* विद्यार्थ्यांचे दुसरे घर असलेल्या स्टडी रूमचे दर तिथल्या सोयी सुविधा आणि तुम्ही किती तासांची स्टडी रूम घेता यावर अवलंबून असते. पण सरासरी काढली तर महिन्याला साडेतीन हजार रुपये स्टडीसाठी मोजावे लागतातच.

(अमृता लोकमतच्या दिल्ली आवृत्तीत वार्ताहर आहे.)

Web Title: UPSC board in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.