स्पर्धा परीक्षा देणार्यांच्या स्वप्नांचं दिल्लीतलं गॅस चेम्बर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 08:00 AM2019-02-21T08:00:00+5:302019-02-21T08:00:02+5:30
युपीएससी क्रॅक करण्याच्या ध्यासाने झपाटून तारुण्य जाळणार्या मुलामुलींच्या अखंड धास्तावलेल्या, अगतिक आणि चोहीकडून लुटल्या जाणार्या आयुष्याची दिल्लीच्या कुबट, गजबजत्या गल्ल्यांमध्ये कोंबून भरलेली चित्तरकथा
-शर्मिष्ठा भोसले
दिल्ली. करोल बाग मेट्रो स्टेशन. इथला कल्लोळ अभूतपूर्व असाच केवळ.
एरवी आपला ‘विषय’ शोधत जावं लागतं, इथे माझा ‘विषय’च माझ्यावर थेट चाल करून आलेला.
हा खास युपीएससीवाल्यांचा इलाका. मेट्रो स्टेशनच्या कॉरीडॉरमध्ये दोन्ही बाजूंनी स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या जाहिराती लागलेल्या. सगळ्या भिंती पोस्टर्सनी भरून गेलेल्या. एका मोठय़ा कॉम्प्लेक्समध्ये अर्धीअधिक शटर्स क्लासेसवाल्यांची. आसपास सगळे पाठीवर बॅगा लटकवलेले, हातात जाडजूड पुस्तकं घेतलेली पोरंपोरी. चहा आणि चाटवाल्यांच्या अवतीभोवती ऐकू येणार्या सिन्सियर-स्कॉलर चर्चा आणि सगळे सायकलरिक्षावाले ‘चलो, राजिंदर नगर छोड दूं मैडम?’ विचारणारे.
एका सायकरिक्षावाल्याला ‘ओल्ड राजेंद्र नगर चलिये’ म्हणत मी रिक्षात बसते. वाटेत त्याच्याशी गप्पा.
‘तो आप इधरही होते है?’
‘हांजी, हम तो इधरही रिक्षा चलाते है।’
‘कहां से हो आप?’
‘जी हम मध्य प्रदेस से है। ईश्वरलाल हमारा नाम।’
‘ये इतने सारे बच्चे इधर क्यूं आते है?’
‘वो तो आते है जी अफसर बनने! आप किसलीये आई हो?’
‘मै इन बच्चोंकी दुनिया समझने आई हूं, भैय्या। महाराष्ट्रसे हूं। ’
‘हां, महाराष्ट्रा से भी बच्चे आते है इधर।’
‘आपको क्या लगता है, इतने सारे बच्चों को अफसर क्यूं बनना है? बन सकेंगे सब अफसर?’
यावर ईश्वरजी हसतात, ‘वो तो भगवानही जाने, पर सरकार तो सभी को कुछ न कुछ नोकरी देती होगी ना, तभी तो आते है! वरना हम देखो, रिक्षा चलाते रह गये उमरभर.. लो आ गया जी ओल्ड राजिंदर नगर। ’
- मी खाली उतरून वीस रूपये देत मान डोलावली.
‘... मैडमजी, कमरा चाहिये? आईये दिखा देते है..’
‘ अरे, इधर आओ हमारे साथ, अच्छा और सस्तावाला दिखा देते है।’
‘ज्ये हमाराभी कार्ड रख लो.’
‘ अरे, हमाराभी रखलो मैडम..’
- काही कळायच्या आतच पाच-सहा जणांचा घोळका माझ्याभोवती जमला. मी विचारलं ‘कौनसा कमरा?’ तर एक जण म्हणाला ‘हम इस्टेट एजन्ट है। इधर आप परीक्षा देने आई हो ना? आपको रूम दिला देंगे।’ मी म्हणलं, ‘परीक्षा देने तो नहीं पर देनेवालोंके बारे में जानने आयी हूं। आप के बारेमें बताऐंगे कुछ?’
काही जणांनी इकडे ‘बिजनेसवाली बात’ होत नसून नुसत्याच गप्पा होणारेत म्हणल्यावर लगेच काढता पाय घेतला. तीन-चार उरलेले लोक आणि मी. सोबत चहा प्यायला गेलो.
प्रतापगढचा राहुल पांडे आठवीर्पयत शिकलाय. राहुल सांगतो, ‘मां-बापकी हालत नही थी पढाने जैसी तो उन्होने एक रिश्तेदारके साथ दिल्ली भेज दिया। तबसे दिल्लीमे छोटे-बडे काम करते-करते इधरको आ गया। पुरे नौ घंटे काम करना होता है। खडे-खडे मेहनत जादा और सैलरी कम। गाव पैसा भेजना होता है। क्या करे चल रहा है जैसे-तैसे।’
‘शादी हुई है आपकी?’
‘अरे नहीं-नहीं। अपनाही खर्चा झेल नही पाते, बिवीको कहांसे खिलाएंगे? ये शामकुमार तिवाडीजीसे बात किजीये। पढेलिख्खे है और इन का शादीभी हुआ है!’
चाळीशीतले शामकुमार जरा संकोचतात. मी विचारते, ‘बताइये तो बात क्या है?’
त्यावर सांगू लागतात, ‘क्या है, के हम है एम.ए. हिंदी पढे हुये। अवध युनिव्र्हसिटीसे पढे है। इधर सब हमें ग्रेजुएट एजंट बुलाते है. उधर नोकरीका कुछ जुगाड हो ना सका तो आ गये इस लाइनमें। ये करते-करते किधर कोई इश्तीहार निकल आता है तो चले जाते है साक्षात्कार देने।’
.. बाजूचा म्हणतो, ‘नोकरीतो चिडीया है जैसे, जरा हाथ बढाओ तो फुर्र हो जावे।’
दुसरा म्हणतो, ‘अरे दाना डालो दाना। फिर तुम्हारेही आंगनमें चहकेगी! दाना समजती है ना मैडम? डोनिसन!’
.. आम्ही सगळे हसतो.
यांच्यातला लालू यादव बिहारच्या बाका जिल्ह्यातला. एका क्लासच्या मार्केटिंगचं काम करतो. मार्केटिंग म्हणजे काय? तर क्लासच्या बाहेर उभं राहून पत्नकं वाटणं, तोंडी जाहिरात करताना उन्हातान्हात ओरडत राहणं.. जरा लहान वयाचा. बारावीर्पयत जेमतेम शिकलेला. कामाच्या शोधात दिल्लीत आला. छोटंसं काम होतं, ते नोटबंदीनंतर सुटलं. बरोबरचे लोक गावाला परत गेले. हा दिल्लीतच थांबला. आता युपीएससीच्या क्लासेसचं मार्केटिंग करतो असं रस्तोरस्ती फिरून. पगार जेमतेम. खायचे वांदेच.
‘ पर करे क्या? मेरा भाई मुखर्जी नगरमें आयएएसकी पढाई करता है। उसका खर्चा भी मै उठाता हूं।’
ऐंशीच्या दशकातल्या सिनेमामधला दो भाईवाला मेलोड्रामा राजिंदर नगरच्या सडकांवरही भेटेल, अशी कल्पना नव्हती केली.
त्यात लालूचा रायबरेलीहून आलेला मित्न अजयकांत अजून फिल्मी बोलतो, ‘मैडम, ये सब जुऐ जैसा है, जो जीतता है, खुस होगा, हारनेवाला मुं छुपाके लौटेगा! दुनिया तो जितनेवालेको देखेगी, ना के हारनेवालेको!’
मनोज अग्रवाल राजस्थानच्या झुंझुनूजवळच्या कोपरखेतडीचे. सांगतात, ‘मैडम नोटबंदी के बाद तो सारा काम बर्बाद हो गया। पहले दो टाइम खाते थे अब एक टाइम खाते है। गाव में खेती वगैरा तो है नहीं। पानीभी पांच रूपये मटका खरीदना पडता है। वापसभी जा नही सकते। हमारे मालिक और कोठीके ओनर बच्चों को बस लुटते है जी! देखो, बिजली है 3 रु पये युनिट, तो बच्चोसे ये वसूलते है 8 या कभी कभी 10-12रु पये एक युनिटके लिये! पानीका बिल पुछो तो छे महिनेका 200 रु पये है, ये लेंगे महिनेका सौ रूपये!’
- हे सगळे एजंट. युपीएससीचे क्लासेस करायला देशभरातून येणारी मुलं आणि त्यांच्यासाठी सोयीसुविधा पुरवणारे ‘प्रोव्हायर्डर्स’ यांच्यामधले बिचौले.
या सगळ्या एजंट लोकांसाठी मे-जून-जुलै हा तीन महिने ‘सीजन’ असतो. या काळात युपीएससी परीक्षेच्या वेळापत्नकानुसार सगळ्या आसपासच्या भागांत चहलपहल वाढते. कमाईचा काळ. एखाद्याशी सौदा करून ‘कोठी’ अर्थात रूम फिक्स केली की मालक एक महिन्याचा किराया त्या मुलाकडून कमिशन म्हणून वसूलतो. त्यातले दोन-तीन टक्के या एजंटांच्या हातावर टेकवले जातात. हे सगळे एजंट लोक पैसे नसल्यानं वर्षानुवर्ष गावी जात नाहीत. म्हणतात, ‘परिवारको इधर लानेका मनभी करता है, पर फिर तो भूखे मरना पडेगा!’
जगण्याचे इतके वांदे असतानाही मला अजिबातच चहाचे पैसे न देऊ देता ‘आपने हमसे बात की, कोई तो है हमारी सुननेवाला, अच्छा लगा!’ असं म्हणत या एजंट लोकांनी माझा निरोप घेतला.
दिल्लीतल्या युपीएससीच्या दुनियेचा मी घेतलेला पहिला कोरा अनुभव!
***
मेट्रो स्टेशनच्या बाहेर पडले, तर वाजीराम अॅन्ड रवी, श्रीराम, नेक्स्ट आयएएस, व्हिजन आयएएस, ब्रेनी आयएएस एवढंच काय, तर जस्ट आयएएस अशा सगळ्या एकामागोमाग एक पाटय़ा लागलेल्या.
एका भव्य क्लासबाहेर तिथल्या नोटीस बोर्डनं लक्ष वेधून घेतलं. ‘रूम चाहिये’, ‘रूममेट चाहिये’, ‘स्टडी टेबल बेचना है’ अशा हिंदीतल्या आणि इंग्रजीतल्याही केवढय़ा काही जाहिराती.. काही हस्ताक्षरातल्या तर काही टाईप केलेल्या.
‘साऊथ इंडियन रूममेट पाहिजे, बाकीच्यांनी अजिबात विचारणा करू नये’ अशा आशयाची एक जाहिरात वाचताना मी थबकलेच!
‘याच क्लासची येत्या महिन्यात सुरू होणारी बॅच जॉइन करणारी रूममेट पाहिजे आहे. सोबत अभ्यास करता येईल.’
अशा केवढय़ा काही नोटीसा.. वाचताना बाजूला उभ्या असलेल्या मुलाकडे लक्ष गेलं. त्याच्या लुकवरून तो काश्मिरी असल्याचा अंदाज सहज बांधता येत होता. मी जरा अडखळतच विचारलं, ‘आप काश्मीर से हो?’ तो म्हणाला, ‘जी, हां’. मी माझ्याबद्दल जरा सांगत पुढचा प्रश्न विचारला,
‘यहां क्या युपीएससी की तय्यारी करने आये हो?’ त्यानं होकार भरला तसं मी ‘थोडंसं बोलू शकू का’ अशी विचारणा केली. त्यावर त्याचं उत्तर होतं,
‘जरूर क्यू नहीं! वैसे काश्मिरी युथको सब पत्थरबाज कहके चल देते है। आप बात करना चाहती है सुनके अच्छा लगा। मेरा नाम अंबर खान, बट आय अॅम नॉट अ टेररीस्ट!’
फिल्मी अंदाजात बोलणार्या अंबरसोबत चहा घेत गप्पा सुरू झाल्या. त्यानं आपली कहाणी सांगितली,
‘स्कुल मे एक टीचर हमेशा कहते थे बडा ख्वाब देखो। पर बडा ख्वाब क्या होता है ये पता चलने तक तो कॉलेज भी खतम हो गया। काश्मीर युनिव्र्हसिटी से मैने बी.ए. किया. हमारे काश्मीर से फैसल शाह, आमीर आथार युपीएससी में नंबर ले आये। माहोल एकदम बदल गया। मुझे लगा मै भी कुछ कर सकता हूं। इसलिये निकल पडा। वैसे भी उधर माहोल खराब चल रहा है। रोजगार तो है नही। जान को खतरा जरूर है! इधर एक फ्लॅट लेकर मै अकेला रहता हूं। 20 हजार किराया है। मेरे और भी बहुतसे दोस्त इधर आके तैयारी करना चाहते है, पर उनके परिवार कमजोर है। मेरे मम्मी-पापाने मुझे हमेशा सपोर्ट किया।’
अंबरचा निरोप घेत मी निघते तर वाटेतच पाऊस लागतो. आडोशाला थांबल्यावर एक मुलगी बाजूला असते. हातात जाडजूड पुस्तकं, डोळ्याला चष्मा. गंभीर मुद्रा. जरा अंदाज घेत मी तिलाही तोच प्रश्न टाकते. ती आत खूप काही साचलेलं असल्यागत बोलून मोकळी होते. बिहारच्या पटना शहरातून आलीय. मधुश्री. आई-वडील दोघंही सरकारी क्लास वन अधिकारी आहेत. ती सध्या आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय घेऊन एम.ए. करते आहे. राज्यसभा सचिवालयात प्रशिक्षणार्थीही आहे. तिला त्याच विषयात पुढे जायचंय. पण आई-वडिलांनी तिच्यासाठी आयएएसचं स्वप्न आधीच पाहून ठेवलंय.
ती म्हणते, ‘कैसे है ना, कभी-कभी मां-बाप हमारे हिस्से की जिंदगीभी उनकी समझ के जीना चाहते है! वो घर-परिवार में सबको बता चुके है, ‘बेटी तो आयएएस बनके ही लौटेगी!’
***
(...पुढे ? वाचा उद्या इथेच .. "
क्रमशः भाग १
( लोकमत दीपोत्सव २०१८ दिवाळी अंकात "स्वप्नांचे गॅस चेंबर" हा लेख प्रसिद्ध झाला आहे. )