नकार देणार्‍या ‘प्रेमा’चा जाळून कोळसा करणारी क्रूर बीभत्सता तारुण्याला का डसली?

By meghana.dhoke | Published: February 13, 2020 07:00 AM2020-02-13T07:00:00+5:302020-02-13T07:00:02+5:30

खेडय़ापाडय़ासह शहरांत मुलामुलींच्या नात्यांत नक्की काय सुरू आहे हे पाहण्याची खिडकीही या अंकात सापडेल..

Valentine's day - love, relationship ,stress, break up; what is burning in young lives & why? | नकार देणार्‍या ‘प्रेमा’चा जाळून कोळसा करणारी क्रूर बीभत्सता तारुण्याला का डसली?

नकार देणार्‍या ‘प्रेमा’चा जाळून कोळसा करणारी क्रूर बीभत्सता तारुण्याला का डसली?

Next
ठळक मुद्देआज आधी प्रेमाच्या गळ्याला लागलेली बीभत्स क्रौर्याची नखं शोधू, म्हणून ‘ऑक्सिजन’ने नव्या प्रेमाची रक्तरंजित, अस्वस्थ, खदखदती आणि जळा-जाळायला निघालेली गोष्ट खणून काढली आहे.

हिंगणघाटच्या घटनेनं सारा महाराष्ट्र हादरला.
एकतर्फी प्रेमातून थेट मुलीला जाळून टाकलं जातं, या माहितीनेच पोटात भीतीने खड्डा पडला. राज्यभरात मुली आणि त्यांचे पालकही या भयानक घटनेनं धास्तावले. ‘शिक्षणासाठी, नोकरीसाठी घराबाहेर पडणार्‍या मुली सुरक्षित आहेत का?’ या चर्चेनं पुन्हा उचल खाल्ली. आपल्या समाजात खोल काहीतरी पोखरलेलं आहे, वाळवीनं पोखरून भुसभुशीत झालेलं आहे. त्यातून अशा घटना भसकन वर येतात तेव्हा त्या आगीची धग अख्ख्या समाजाचं मन करपवून टाकेल एवढी उग्र असते. एरव्ही मात्र तरुण मनांत चाललेली खदखद, खवळलेल्या आणि उसळणार्‍या भावना यांची समाजाला गंधवार्तासुद्धा नसते. काही आलंच उसळून वर तर ते शक्य तो दाबून टाकलं जातं.
त्या सार्‍याविषयी बोललं पाहिजे. प्रश्न असतील, आहेतच तर ते विचारले पाहिजेत, सोडवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत; म्हणून हा खास अंक.
गेली किमान 20 वर्षे महाराष्ट्रातलं तारुण्य ऑक्सिजनशी आपलं जगणं वाटून घेतं आहे, त्यातून हाती लागलेले त्यांच्या प्रेमात पडण्यापासून लगAार्पयतचे अस्वस्थ विषय या अंकात पहिल्या पानावर आहेत, तर ‘पुरुष असा का वागतो?’ याचं उत्तर शोधण्याचाही प्रय} आहे. खेडय़ापाडय़ासह शहरांत मुलामुलींच्या नात्यांत नक्की काय सुरू आहे हे पाहण्याची खिडकीही या अंकात सापडेल..
हा अंक वाचून अस्वस्थ वाटलं. तर अस्वस्थ व्हा! या अस्वस्थतेला पर्याय नाही.
बाकी उद्या, व्हॅलेण्टाइन्स डे! त्याचं सेलिब्रेशन करणारा अंक आज प्रसिद्ध व्हायला हवा होता. होणारही होता; पण हिंगणघाटच्या ज्वाळांमध्ये प्रेमाच्या गोड-गुलाबी पाकळ्या पार होरपळून गेलेल्या असताना, त्या फुलांनी कुणाला आनंद दिला असता? 
- आज आधी प्रेमाच्या गळ्याला लागलेली बीभत्स क्रौर्याची नखं शोधू, म्हणून ‘ऑक्सिजन’ने नव्या प्रेमाची रक्तरंजित, अस्वस्थ, खदखदती आणि जळा-जाळायला निघालेली गोष्ट खणून काढली आहे.
हे वाचा, आणि आरशात स्वतर्‍ला पाहा.
****
1. दोन निळ्या टिक्स

‘औटऑफरीच’ जाण्याचं टेन्शन 
आणि त्यापायीची तगमग


दहाएक र्वषच झाली असतील.. ‘ऑक्सिजन’ला (आणि त्याहीपूर्वी मैत्रला) फार भावव्याकुळ पत्र येत. ‘आमचं एकमेकांवर प्रेम आहे. मात्र ती वेगळ्या गावात शिकतेय, मी वेगळ्या गावात. आम्ही एकमेकांना पत्रंही पाठवू शकत नाही. फोनवरही बोलणं शक्य नाही. तरी आमचं प्रेम आहे. आणि आमचं शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागली की आम्ही घरी लगAाचं सांगणार आहोत!’
पहाटे जाणार्‍या दुधाच्या गाडीत बसून मैत्रिणीला कॉलेजात भेटायला जाणार्‍या, ज्या एसटीने गेला त्याच एसटीने परत आला, भेट फक्त स्टॅण्डवर पाच मिनिटं अशा ‘रोमॅण्टिक’ कहाण्या सांगणारी पत्रं तर किती येत!! 
- मोबाइल हातोहात नव्हते, तेव्हाचा आणि डेटापॅक हा शब्दच शब्दकोशात नव्हता तेव्हाचा हा काळ. आता फार जुना वाटतो.
कारण बघता बघता सगळंच झरझर बदललं. पत्रांची जागा ई-मेल्सनी घेतली. त्यात विरहाची हुरहुर नाही, मनात कसलं काहूर नाही. असेल तर ते काहुर भलतंच आहे. आपल्या कनेक्टिव्हिटीच्या खुंटय़ाला बांधलेला तो किंवा ती ‘औटऑफरीच’ जातात की काय याचंच टेन्शन जास्त.
हल्ली कायम तक्रारी दिसतात की, मी पाठवलेल्या मेसेजच्या दोन निळ्या टिक्स दिसतात. पण रिप्लाय येत नाही. ‘तो’ असं का करत असेल? आणि त्यानं मेसेज केल्या केल्या मी रिप्लाय दिला नाही की तो माझ्यावर चिडतो, भांडतो, हे असं का?
‘ती’ रात्री 2 र्पयत ऑनलाइन होती, लास्टसिन तसं सांगतंय, ती कुणाशी बोलत असेल, मला डबल क्रॉसतर करत नसेल असे सवाल तर रोजच ऐकतो, वाचतो आम्ही!
एकमेकांच्या प्रेमात आहोत असं म्हणवणार्‍या अनेकांचं नातं, दोन निळ्या टिकल्यांच्या टेकूवर उभं आहे. त्यातून या मुलामुलींमध्ये भयंकर अस्वस्थता, अविश्वास आणि सतत परस्परांचा पिच्छा पुरवण्याची जीवघेणी स्पर्धा दिसते. ऑलवेज ऑनलाइन ‘कनेक्टेड’ पण बाकी प्रेम, नातं, घरातली अन्य नाती आणि वास्तव यातला डिसकनेक्ट यातली खदखद आणि घुसमट ऑक्सिजनचे वाचक सतत जगताना दिसतात.

2. प्यारके लिए भी पैसा चाहिए.
‘स्पेशल फील करवाय’च्या 
पीडीएला पैसे तर लागतातच!

सोना नहीं, चांदी नहीं, प्यार तो मिला, असं गाणं एकेकाळी प्रेमवीरांच्या पत्रात दिसायचं. प्रेमात पडलं की, कुठंतरी हॉटेलात जा, चहा प्या, वडापाव खा आणि व्हॅलेण्टाइन डे किंवा फार तर वाढदिवसाला गिफ्ट द्या इतपत खर्च प्रेमात होतोच.
अलीकडेच आलेली एका तरुण दोस्ताची ई-मेल मात्र भलतंच सांगते, ‘तिचा वाढदिवस आहे, ती म्हणते मला ‘स्पेशल फील करव !’ त्याचा अर्थ एकच की, तिच्यासाठी मोठी पार्टी, महागडं गिफ्ट, खूप सारे फ्रेण्ड्स, फुलं, डेकोरेशन किंवा मग कुठल्या तरी रिसॉर्टला पार्टी असं सगळं करावं लागणार! माझे अनेक मित्र हे सहज करतात. मीपण गेल्या वर्षी केलं; पण त्यासाठी दहा हजार रुपये उधारी झाली. आता तेच पैसे फिटले नाहीत तर परत कुठून उधारी मागू? घरचे तर काहीच देणार नाहीत, त्यांच्याकडे पैसेच नाहीत. आणि मी हे सगळं नाही केलं तर ती मला सोडणार. ती म्हणते, माझं पैशावर प्रेम नाही; पण हे आपले लाइफचे दिवस परत येणार नाही, सेलिब्रेट करून घेऊ! मला कळत नाही, काय करू.’
ही ई-मेल हा अर्थातच अपवाद नाही! नात्याचं ‘सेलिब्रेशन’ आणि मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर करता येईल इतपत पीडीए करायचं तर खर्च आवश्यक असतो.
हा खर्च फक्त मुलगेच करतात असं नाही तर मुलीही करतात. कारण परस्परांना ‘स्पेशल फील करवायचं’ तर एवढं करावंच लागतं म्हणतात.
ही गोष्ट शहरांतली नाही तर निमशहरांतही हे चित्र सर्रास आहे असं ऑक्सिजनला येणारा प्रतिसाद सांगतो.
त्यातून उधारीपाधारी, इकडून तिकडे पैसे फिरवणे, तर घरात मागणे, त्यासाठी भांडणे असे सगळे प्रय} केले जातात.
त्याचा तणाव आणि त्यातून होणारी पराकोटीची भांडणं हा अनेकांच्या डोक्याला लागलेला भुंगा दिसतो.

3. टचपण  नाय केलं!

प्रेमात आहोत तर शारीरिक जवळीक असणारच, ना?


‘ती सोडून गेली त्या वळणावर.’ असं व्याकूळ होऊन लिहिलेल्या पत्रांत अगदी 4-5 वर्षापूर्वीर्पयत काही तरुण मुलगे अगदी आवजरून लिहीत की, माझं तिच्यावर इतकं पवित्र प्रेम होतं की, मी तिला कधी ‘टच’पण नाही केलं. आमचं प्रेम अत्यंत पवित्र होतं, तिचा फायदा घ्यायचा विचारसुद्धा पाप होता.
आता हे लिहिलेलं खरं असे की खोटं, केवळ सांगायचं म्हणून सांगत ही गोष्ट अलहिदा. मात्र तरीही आपलं प्रेम ‘प्लेटॉनिक’ आहे, आपल्या प्रेमाला शारीर वासनेचा ऊत नव्हता असं निदान सांगितलं तरी जायचं.
आता मोकळेपणा किंवा अधिक खरेपणा म्हणावा तर बहुतांश मुलामुलींचे येणारे पत्र, ई-मेल्स आणि फोन तर सहज सांगतात, ‘प्रेमात आहोत, शारीरिक जवळीक तर पार्टच आहे ना प्रेमाचा, त्यात काय एवढं, फक्त त्यानं किंवा तिनं फसवलं आणि पुढं कुणाला कळलं तर काय?’
प्रेमात असताना किंवा रिलेशनशिप कमिट केली की शारीरिक जवळीक आणि त्यासाठीच्या जागा शोधणं, आवश्यक ती खबरदारीची साधनं वापरणं, इंटरनेटवर जे काहीबाही दिसतं किंवा सिनेमात जो मोकळेपणा दिसतो तो आपल्या आयुष्यातही यायला हवा ही धडपड मोठी दिसते.
त्यातून आपलं प्रेम लगAार्पयत नाहीच पोहोचलं आणि लगA दुसर्‍याशी ठरलं तर आता त्याला आपली ‘हिस्ट्री’ सांगू की नको असं विचारणारे फोनही आता अपवाद उरलेले नाहीत.
घरच्यांनाच काय जवळच्या मित्रमैत्रिणींनाही माहीत नसलेलं असं बरंच काही मग आम्हाला येणार्‍या ईमेल्समध्ये दिसतं.. आणि हो, त्यामध्ये शारीरिक जवळिकीतून, सततच्या लैंगिक संबंधातून होणारे गुंते फार फार किचकट होत चालले आहेत. 

4. खानदान की इज्जत का सवाल

घरच्यांना नाही फसवणार, दी एण्ड!

‘पळून जाऊन लगA’ असा एक विशेषांक ऑक्सिजनने केला होता, त्या अंकात अनेक जोडप्यांनी आपण पळून गेलो, त्यानंतर काय आणि कुठल्या अडचणींवर मात करून आम्ही संसार मांडला, मग घरच्यांनी कसं स्वीकारलं याच्या कहाण्या लिहिल्या होत्या. पळून जाण्याची धमक स्वतंत्र जगण्याची किंमत मोजायला लावते असं अभिमानाने सांगणारेही अनेकजण होतेच.
आम्ही हिंमत केली; पण पळून जाऊ शकलो नाही. पण पळायची इच्छा होती हे सांगणारेही होते.
अलीकडे येणार्‍या ई-मेल्स मात्र स्वच्छ सांगतात, पळून जाऊन लगA करणार नाही. घरच्यांना फसवणार नाही.
असं का?
याच्या शोधात गेलं तर चित्र असंही दिसतं की जातिपातीचे काच जास्त वाढले आहेत. जातीबाहेर, धर्माबाहेर लगA केलेल्यांच्या वाटय़ाला येणारा संघर्ष आपल्याला झेपणार नाही असं वाटून किंवा त्याची भीतीच वाटून अनेकजण पालकांच्या इमोशनल पदरामागे लपतात.
मात्र त्याहून दोन गोष्टी जास्त स्पष्ट दिसतात. ज्या कटु आहेत, आणि अतिशय प्रॅक्टिकलही.
अनेक मुली ई-मेल्समध्ये सांगतात, ‘मी त्याला फसवलं नाही. माझं प्रेम खरंच होतं. पण प्रेम वेगळं आणि लग्न वेगळं ना! लगA करताना प्रॅक्टिकल व्हावं लागतं, पैशाचा-सेटलमेंटचा विचार करावा लागतो. त्याच्याकडे नोकरी नव्हती, घर नव्हतं, आमचं पुढं कसं निभणार म्हणून मीच त्याला म्हटलं आपण थांबू.’
असं थांबत, घरच्यांनी निवडलेल्या ‘उत्तम’ स्थळाच्या नावानं काहीजणी कुंकू लावतात. 
तेच मुलगेही सांगतात, घरच्यांच्या विरोधात जाऊन लगA केलं तरी तिला घेऊन जायचं कुठं, खायचं काय? तोकडय़ा पगारात कुठं भागवणार, त्यापेक्षा नकोच म्हणून थांबलो.
मात्र ही कारणंही वरवर दिसतात तेवढी सोपी-सहज नाही.
अनेक मुलींशी बोलल्यावर हे लक्षात येतं की, घरच्यांनी थाटामाटात केलेलं लगA, दिलेले दागिने-वस्तू-कौतुक, उत्तम स्थळ याचा भविष्याच्या दृष्टीने प्रॅक्टिकल विचार अनेकजणी करतात.
मुलग्यांचंही तेच, त्यांना आपल्यावर जबाबदारी नको असते. पळून गेलो तर घरचा आर्थिक आधार संपेल. ते त्यांना सोडायचं नसतं.
अनेकजण आपल्या ई-मेल्समध्ये सतत फिरणार्‍या फॉरवर्ड लाइन्स सहज लिहितात, प्यार किया नहीं जाता, हो जाता है, पर शादी तो सोच समझकर करनी पडती है.
पालकांना उगीच वाटतं, आपल्यावरच्या प्रेमापोटी मुलं आपलं ऐकतात!

5. रोटी, कपडा और प्यार

सिनेमात घडतं तसं कधी होतं का, 
लगAाची ‘ऐपतच’ नसेल, तर ब्रेकपच!


स्वतर्‍हून ज्यांनी ब्रेकअप केला (हल्ली ब्रेकअप म्हणजे प्रेमभंग ठरवून केले जातात, होत नाहीत.) त्यापैकी काही तरुण मुलांच्या ई-मेल्स ब्रेकअपचा दोष आपल्या बेरोजगारीला किंवा कमी पगाराच्या नोकरीला देतात.
कॉलेजात प्रेमात पडलो तरी आपल्याला कधी नोकरी मिळेल, कधी बरा पगार मिळेल याची काहीच शाश्वती नाही. तोवर मुलीच्या घरचे तिच्यासाठी स्थळं पाहणं सुरू करतात. तू काहीतरी हालचाल लवकर कर म्हणून ती लकडा लावते. पण मला नोकरीच नाही तर खाणार काय लगA करून असं म्हणत अनेकजण शेवटी ब्रेकअप करून आपल्या वाटा वेगळ्या करून घेतात.
जालीम जमाना, घरचे, जातपात यासह आता नोकरी नसणं किंवा बर्‍या पगाराची नोकरी नसणं, घर घेण्याची ऐपत नसणं आणि हिंमत करावी इतपत मनगटात बळ किंवा स्वतर्‍वर विश्वास नसणं, एकूणच ‘ऐपत नसणं’ हे कारण देऊन ब्रेकअप केल्याच्या कहाण्या अगदी आम आहेत.

6. मेरी बंदी है! मेरी है तो मेरी बनके रह, 
 

कबीर सिंग तरुण मुलामुलींना भारी आवडला. त्याचं वर्गात जाणं, सगळ्यांना ठणकावून सांगणं की, वो मेरी बंदी है!
या वाक्यावरून मोठा गहजब झाला. मात्र बहुसंख्य तरुण मुलामुलींना या डायलॉगमध्ये काहीच आक्षेपार्ह वाटलं नाही. किंवा हा डायलॉग काही वेगळा आहे, आपण पहिल्यांदाच ऐकला असंही काही झालं नाही.
त्याचं कारण असं की, एकमेकांना इतकं स्वतर्‍च्या ‘मालकीचं’ समजणं हे नव्या नात्यांमध्ये अत्यंत सर्रास होताना दिसतं. त्यासाठी उपयोगी येतात मोबाइल.
तू मेरी है तो मेरी सून, मै बोलू वो कर, नाहीतर बघ असं तो नेहमी म्हणतो; पण मला त्याचं पझेसिव्ह होणं सुरुवातीला आवडायचं असं म्हणत सुरू होणार्‍या ई-मेल्स पुढे कहाणी सांगतात की तो माझ्या फोनची कॉल लिस्ट चेक करतो, माझे व्हॉट्सअ‍ॅप पाहतो, मी रात्री उशिरा ऑनलाइन दिसले की चिडतो, कुणा मुलाची फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारली तर भांडतो, प्रसंगी मारतो. आणि हे सारं तो माझी काळजी आहे म्हणून करतो असं सांगतो. तर हे सगळं बरोबर आहे का? माझ्यावर असा मोबाइल पहारा मला सहन होत नाही. माझं स्वातंत्र्यच संपलं.’
- असं सांगणार्‍या  इमेल्स आणि फोनकॉल्स आमच्यार्पयत येतात तेव्हा अगदी सुशिक्षित मॉडर्न म्हणवणार्‍या मुलींच्या वाटय़ाला येणारी ही नवीन गुलामी सहज दिसते.
मुलींच्या वाटय़ाला मात्र मोबाइलच्या रूपात एक भलताच लगाम आलेला दिसतो. जो चिंताजनक आहे.

7. सेलिब्रेटिंग ब्रेकअप

केलं मी त्याला डम्प; मग?

पिझाची जाहिरात लागते आता टीव्हीवर, ती त्याला डम्प करून येते आणि मग त्या दोघी सेलिब्रेट करतात. लव्ह आज कल सिनेमातही ते ब्रेकअप पार्टी करतात. 
मग एकेकाळचा भावुक, प्रेमात स्वतर्‍ला उद्ध्वस्त करणारा देवदास गेला कुठं? आणि त्यानंतरचा देव डी? 
- तोही म्हाताराच झाला!
त्याचं कारण असं ब्रेकअप सर्रास होतात, नव्हे केले जातात ठरवून. आणि त्या निर्णयाचं दुर्‍ख कुणी करत बसत नाही, अगदीच फार टोकाची फसवणूक झाली नसेल तर!
काही इमेल्स आम्हाला सांगतात, की सुरुवातीला मला वाटलं की, मी त्याच्या प्रेमात आहे; पण नंतर कळलं नाही जमत मी केला ब्रेकअप.
कुणी मुलगा लिहितो, आमचं होतं प्रेम; पण फार पुढं जाण्यापूर्वीच लक्षात आलं की, आपल्या कास्टचा प्रॉब्लेम होणार, कशाला रिस्क घ्या, केलं ब्रेकअप.
पण ही कारणं तरी बरी, फेसबुक फ्रेण्ड्सवरून होणारी भांडणं, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये होणारे इगो इश्यू, लाइफस्टाइलमधला फरक यासह अनेक कारणांवरून ब्रेकअप सर्रास होतात.
आणि ब्रेकअप केला म्हणून रडत न बसता, नव्या नात्याचा शोधही सुरू होतो.
मात्र त्यातून येणारा स्ट्रेस, एकटेपणा, पिअर प्रेशर, मैत्रीतली भांडणं यांच्या कहाण्या अनेकांना पोखरत असतात.


8. चान्स रिलेशनशिप

ब्रेकअप के बाद भी, साथ भी

एका ई-मेलमध्ये उल्लेख होता, आमची चान्स रिलेशनशिप आहे. पण आता मला तीही तोडायची आहे तर मी तिला फसवलं असं तर नाही होणार, कारण आता माझं दुसरीवर प्रेम आहे. मात्र ती मुलगी आता मला ब्लॅकमेल करतेय की मी तुझ्याविषयी सगळ्यांना सांगेन.
बाकी सगळं ठीक; पण या चान्स रिलेशनशिपचा शोध घेतल्यावर असं लक्षात आलं की, ब्रेकअप होतं. किंवा ठरवून केलं जातं. ते दोघांना मान्य असतं किंवा एकजणानं नाइलाजानं स्वीकारलेलं असतं. पण म्हणून नातं संपवायचं नाही, एकमेकांचा चेहराच पहायचा नाही, चलो एक बार फिरसे अजनबी बन जाए असंही काही नाही..
ब्रेकअपनंतर सुरू होते ती चान्स रिलेशनशिप.
म्हणजे काय तर आपल्याला कुणी भेटलंच नाही किंवा पुन्हा वाटलं की, आपलं जमू शकेल तर त्यासाठीचा चान्स ठेवायचा. त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर बोलत राहायचं, अ‍ॅज अ फ्रेण्ड. भेटायचं; पण अ‍ॅज अ फ्रेण्ड.
आणि जमलंच तर पुन्हा चान्स द्यायचा.
मात्र होतं असं की, एकाच वेळी चान्स रिलेशनशिपही दोन-तीन असतात काहींच्या. त्यातून काहीजण ब्लॅकमेल केले जातात. काही मुलींच्या वाटय़ाला हॅरासमेण्ट येते. काहींना आपण फसवले गेलो हे फार उशीरा लक्षात येतं.
.


9. कमिटमेण्ट फोबिया?

इन्स्टॉलमेण्टमध्ये कमिटमेण्टचं  नवंच त्रांगडं.

मिलेनिअल्सना कमिटमेण्ट फोबिया आहे. ते लॉँग टर्म कमिटमेण्ट करत नाहीत, म्हणून लगAाला, नात्यालाच नाही म्हणतात अशी चर्चा सर्रास दिसते.
मात्र गावखेडय़ातून, निमशहरांतून येणारी पत्रं आणि ई-मेल्स आम्हाला मात्र कमिटमेण्टची एक वेगळीच कहाणी सांगतात.
फोबिया कमिटमेण्टचा नाही तर भविष्याविषयी असुरक्षिततेचा आहे. त्यामुळे प्रेमात पडतानाही अनेकजण हल्ली डायरेक्ट जनम जनम का साथवालीच काय; पण लगAच करू, अशीही कमिटमेण्ट करत नाहीत.
‘आता आपण एकमेकांना हो म्हणू आणि रिलेशनशिपमध्ये राहू इतकीच कमिटमेण्ट केली होती, मात्र सेक्स लाइफची कमिटमेण्ट मी केलीच नव्हती, तो आता म्हणतो माझ्यावरचा विश्वास सिद्ध करायला तुला तेही करावंच लागेल, तर आता मी काय करू? कमिटमेण्ट तोडू का?’
- असा प्रश्न विचारणारी ई-मेल आमच्यार्पयत येते तेव्हा अनेकदा उत्तरांपेक्षाही प्रश्नच जास्त धास्तावणारे वाटतात. तुकडय़ा तुकडय़ात कमिटमेण्ट करून त्या तुकडय़ापुरतीच वफादार राहणारी प्रेमप्रकरणं हा भयंकर गुंतागुंतीचा विषय आहे.


10. ना मतलब हा!

  ‘नो मिन्स नो!’
- हे कुणाला कळतं?


हिंदी सिनेमांनी हे इतकं मनावर बिंबवलेलं आहे की, उसकी ना मतलब हा होता है, हसी तो फसी.
आता तर नव्या सोशल मीडियाच्या काळात एका मेसेजला रिप्लाय, एक स्मायली, एक लव्ह, एक पप्पी हे सारं इमोजी म्हणून इतकं फुकट उपलब्ध आहे की, त्या सगळ्याचा मतलब तिचा ‘होकार’ आहे असंच अनेक तरुण लावतात.
मुळात तिला ‘नाही’ म्हणण्याचा काही अधिकार आहे हेच अनेकांच्या गावीही नाही.
म्हणून तर इतक्या गोष्टी बदलल्या तरी, बसमध्ये मुलींचा पाठलाग, तिच्यासोबत रिक्षातला प्रवास, तिच्या मागेमागे रस्त्यानं जाणं, घरावरून चकरा, गावातल्या भिंतीवर आणि रस्त्यांवर लिहिलेली नावं, हे सारं अजूनही काही बदललेलं नाही. उलट वाढलेलं आहे.
यासार्‍यात मुलीची बदनामी झाली तर ती हो म्हणेल किंवा तिला आपल्या प्रेमाची तीव्रता कळेल असं अनेकांना वाटतं.
त्याउलट मुली,  कुणालाच हे सारं सांगता येत नाही म्हणून आम्हाला ज्या ई-मेल्स पाठवतात, त्यात हा पाठलाग, पिच्छा, धमक्या याचं भयंकर वर्णन करतात.
नो मिन्स नो, हे अजून मुलांच्या वतरुळापासून खूप लांब आहे, असंच दिसतं.


 

Web Title: Valentine's day - love, relationship ,stress, break up; what is burning in young lives & why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.