वीरनारी ! सैन्यात काम करणार्‍यांचे संसार पेलणार्‍या शौर्यगाथा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 07:00 AM2019-03-07T07:00:00+5:302019-03-07T07:00:02+5:30

सैन्यात काम करणाऱ्यांचे संसार पेलणाऱ्या तरुणींच्या जगण्याची न दिसणारी शौर्यगाथा...

Veeranari! brave world of army women. | वीरनारी ! सैन्यात काम करणार्‍यांचे संसार पेलणार्‍या शौर्यगाथा!

वीरनारी ! सैन्यात काम करणार्‍यांचे संसार पेलणार्‍या शौर्यगाथा!

ठळक मुद्देघरातला एक पुरुष जेव्हा सैन्यात जातो तेव्हा त्याच्या मागे घरी किमान 8-10 माणसं आयुष्यभर वेगळीच लढाई लढत असतात. विरह हा तर सैन्यातील संसारात अनिवार्य भाग. वर्षानुवर्षे हे संसार असेच चालतात.

- संयोगिता ढमढेरे

सीमेवर युद्धसदृश्य परिस्थिती तयार झाली, की तिथल्या घमासान चकमकीत लढणारे, कधी प्राण गमावून शवपेटीतून घरी येणारे तरुण जवान देशाच्या नजरेसमोर लखलखत राहातात. पण त्यांच्या मागे त्यांच्या घरी एक व्यक्ती असते. एकटीने आयुष्याला भिडणारी तरुण पत्नी! 

अलीकडच्या चकमकीत शहीद झालेल्या नाशिकच्या निनाद मांडवगणे या वायुसेनेतल्या पायलटची पत्नी विजेता मांडवगणे आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्यांत शहीद झालेले सीआरपीएफचे जवान बबलू संतरा यांची पत्नी मीता संतरा या दोघी विशेष लक्षात राहिल्या, त्या त्यांनी घेतलेल्या सडेतोड आणि स्पष्ट भूमिकेमुळे! फेसबुकच्या भिंतीवर युद्धाच्या गजर्ना करणे सोपे आहे; पण युद्ध तुमच्या आयुष्यातून काय ओरबाडून नेते ते आम्हाला विचारा, असे या दोघींनी अख्ख्या देशाला ठणकावून सांगितले.  उद्याच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त या दोघींना कडक सॅल्यूट करून ऑक्सिजनची टीम तुम्हाला नेते आहे एका वेगळ्या जगात! सैनिकांच्या मागे एक वेगळी लढाई लढणार्‍या त्यांच्या कुटुंबात..! 

............

सैन्यात सामील होतात ते वीर आणि त्यांच्या पत्नी म्हणजे वीरनारी. जवानांच्या पत्नीला वीरनारी म्हटलं जातं ते काही खोटं नाही. इतर स्रियांपेक्षा या वीरनारीचा संसार नक्कीच वेगळा असतो. नवर्‍याबरोबर, नवर्‍याशिवाय आणि त्याच्या पश्चातही तिला खूपच धीरानं त्याची साथ निभवावी लागते. सैन्यात अनेक औपचारिक कार्यक्र मात लग्नाची जोडीदार बरोबर असणं अपेक्षित असतं. तसेच तिन्ही सेवांमध्ये नवर्‍याच्या पदाप्रमाणे काही विशिष्ट अधिकार आणि मान ‘तिला’ मिळत असतो.
इतर महिलांप्रमाणे वैयक्तिक-कौटुंबिक जबाबदार्‍या तर तिला पार पाडाव्या लागतातच; मात्र त्याचवेळी आपल्या बटालियनच्या किंवा नवर्‍याची जिथं बदली झाली आहे त्या ठिकाणच्या व्यापक कुटुंबांच्या जबाबदार्‍याही तिला तिच्या नात्याप्रमाणं निभवायला लागतात.
मी अशा अनेकींना भेटले आहे. 
वयाच्या जेमतेम विशीत असलेल्याही अनेकजणी. काही तर त्याच वयात पती शहीद झाल्यानं एकेकटय़ा संसाराचा गाडा ओढणार्‍या, खमक्या. 
सैन्यामध्ये बहुतांश लोक पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल या उत्तरेकडच्या राज्यातले असतात. हे जीवन परिचयाचं असलेल्या, लष्करी वातावरणातच वाढलेल्या इथल्या अनेक मुलींचाही कल सैन्यातलाच नवरा करण्याकडे असतो. अनेकजणींची आपल्या मुलांनाही सैन्यातच पाठविण्याची इच्छा असते. पिढय़ान्पिढय़ा सैन्यात असणारी अशी अनेक घराणी भारतात आहेत. मुलांना सैन्यात पाठवायचंच हा एक वेगळाच समाज आहे असं म्हटलं तरी चालेल. 
या भागात अनेक मुली सैन्य किंवा सनदी अधिकार्‍यांची पत्नी होण्यासाठीच घडवल्या जातात. पतीचं पद आणि उत्कर्ष हीच त्यांची ओळख आणि महत्त्वाकांक्षाही असते. अनेक मुली/महिला शक्यतो बी.एड. करतात कारण जिथं नवर्‍याची बदली होईल तिथं शाळेत शिकवणं हे एकच करिअर किंवा नोकरी करणं सहज शक्य असतं.
तसं पाहिलं तर घरातला एक पुरु ष जेव्हा सैन्यात जातो तेव्हा त्याच्या मागे घरी किमान 8-10 माणसं आयुष्यभर वेगळीच लढाई लढत असतात. त्याची पत्नी आणि मुलं यांना कधी ना कधी त्याच्यापासून दूर राहावं लागतं. इतरवेळीही नातेवाईक आणि आपलं मूळ गाव, शहर, घर सोडून जावं लागतं. वेगवेगळं हवामान, भाषा, भौगोलिक परिस्थिती हे सारं स्वीकारत दर दोन वर्षानी घर बदलत राहावं लागतं. एअर फोर्स, नेव्ही असो की आर्मी, जवान असोत की अधिकारी, त्यांच्या पत्नी आणि मुलं यांचं जीवन सारखंच असतं.
दर दोन ते तीन वर्षात बदली होते, ती कुठं होणार याची पूर्वकल्पना नसते. फिल्ड म्हणजे अशांत क्षेत्रात बदली झाली तर कुटुंबाला बरोबर राहता येत नाही अशावेळी त्यांना जवळच्या एखाद्या कॅम्पमध्ये ‘सेपरेट फॅमिली अकोमोडेशन’ या सरकारी निवासात राहावं लागतं. नाही तर मग सासर, माहेर किंवा मुलं जिथे शिक्षण घेत असतील तिथे घर करून राहावं लागतं. हे सारं सतत बदलत असतं.
सैन्यात काम करणार्‍याही अनेक महिला आहेत. नर्स, डॉक्टर,अधिकारी या पदावर काम करणार्‍या 90 टक्के महिलांचे पती हे लष्करी सेवेतलेच असतात. एकमेकांबरोबर राहता यावं म्हणून अधूनमधून बदलीचे प्रयत्न करून बघतात. ते झालं तर ठीक. बरेचदा  ठरावीक काळानं नर्स आणि अधिकारी महिला आपली नोकरी सोडून नवरा जिथं जाईल तिथं जाऊन संसार करण्याचा पर्याय स्वीकारतात. 
आपला संसार असतोच; पण ‘युनिट’ हे मोठं संयुक्त कुटुंब मानलं जातं आणि गणवेश ही नवर्‍याची पहिली बायको! पूर्वी जवान कमी शिक्षित आणि त्यांच्या पत्नी आणखी कमी शिक्षित असत. काही अधिकार्‍यांच्या प}ीही गावातूनच आलेल्या असत. लग्न करून आलेल्या या नव्या मुलीला मग युनिट नावाच्या कुटुंबातल्या वरिष्ठ महिला कुटुंबातल्या नव्या सुनेला घडवावं तसे सगळे उपचार शिकवत. नवीन आलेल्या अधिकार्‍याला वरिष्ठ अधिकारी शिस्त लावतात तर छोटा दीर किंवा मुलाप्रमाणे वरिष्ठ अधिकार्‍याची पत्नी लाड करते. वरिष्ठ पदावर असलेल्यांच्या पत्नी कनिष्ठ पदावर असलेल्याच्या बायकांना आरोग्य, कायदा याविषयीची माहिती, कौशल्य विकास, कौटुंबिक सल्ला, इतर प्रश्न सोडवणं याबाबत मदत करतात. इतर कोणी मोठय़ा पाहुण्या आल्या की त्यांचा आदरसत्कार करतात. हे सारं आजही नियमित फॅमिली वेल्फेअर म्हणून चालू आहे. ‘लेडीज मीट’मध्ये अधिकार्‍यांच्या पत्नी एकत्र येऊन काही खेळ खेळतात, सण साजरे करतात इतर औपचारिक पाटर्य़ा आणि कार्यक्र मातही त्यांना उपस्थित राहावं लागतं. 
आर्मी वॉर विडो असोसिएशन (आवा)च्या माध्यमातून शहीद झालेल्या सैनिकांच्या पत्नी आणि मुलांसाठी अनेक उपक्रम चालवले जातात. 
अर्थात गेल्या दहा-पंधरा वर्षात ही परिस्थिती बदलते आहे. जवान आणि त्यांच्या पत्नीही आता उच्चशिक्षित असतात. त्यांची मुलं यशस्वी करिअर घडवताना दिसतात. अधिकार्‍यांच्या पत्नीही इतर व्यावसायिक करिअर करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या पारंपरिक भूमिका त्या आता निभावू शकत नाहीत. हा बदल स्वीकारला जात आहे. मुलं माध्यमिक वर्गात गेल्यावर मुलांचं शिक्षण आणि  स्वतर्‍चं करिअर करण्यासाठी अनेकजणी स्वतंत्र  राहू लागल्या आहेत.
तसाही विरह हा सैन्यातल्या संसारातला अनिवार्य भाग आहे. मोबाइल आल्यानंतर आजकाल रोज संवाद होऊ शकत असला तरी आजही अनेकदा हवामान, दुर्गम प्रदेश आणि सुरक्षेच्या कारणामुळे नागरी जीवनात जितका सहज संवाद होतो तितका सहज तो या कुटुंबात होत नाही. जो संवाद होतो त्यातही सगळ्या गोष्टी बोलता येतच नाहीत. तिकडून वस्तुस्थिती सांगता येत नाही तसंच इकडून छोटय़ा चिंता किंवा किरकोळ समस्या तिकडे कळवणं फोल ठरतं. 
वर्षानुवर्षे हे संसार असेच चालतात.
आणि सैन्यात असणार्‍यांच्या प}ी कुटुंबासह अनेक लढाया लढत असतात.
त्यांचं शौर्य आणि धैर्य विलक्षण असतं.!

रोजच युद्ध
असं नाही तर तसं.

युद्ध होतं, तणाव असतो किंवा कुणी शहीद होतं तेव्हा त्यांच्या बातम्या होतात. पण  केवळ युद्धातच नाहीतर सीमेवर, अशांत प्रदेशात, परदेशात, अतिगरम, अतिथंड, अतिउंच आणि अतिदुर्गम भागात, मानवी आणि नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी झालेली नेमणूक, वारंवार करावी लागणारी प्रशिक्षणं, अभ्यासक्र म, सराव यासार्‍यातही लष्करी सेवेत असणार्‍या लोकांच्या आरोग्य आणि जिवाला अनेक धोके संभवतात. निवृत्त होईर्पयत यापैकी एका ना एका कारणामुळे बहुतांश लोकांची काही ना काही हानी झालेलीच असते. अनेक र्वष प्रत्यक्ष युद्ध झालं नाही असं चित्र दिसत असलं तरी आपल्या देशांतर्गत कुठं ना कुठं युद्धजन्य परिस्थिती असतेच. तिथं सेवादलात काम करणारे कार्यरत असतात. आणि या सर्वाशी त्यांच्या पत्नी, मुलं, कुटुंबीयांना जमवून घ्यावं लागतं. लष्कराशी संबंधित इथल्या अनेक रूढी परंपरा, रिवाज, पदाची उतरंड समजून घ्यावी लागते. त्यामुळे सैन्यातल्या मुलांना अपवादानेच लष्करी वातावरणाबाहेरची मुलगी मिळते किंवा केली जाते.

***

कांचन रामकली आणि चाम्पादेवी

पती शहीद होतो मात्र त्या सासरच्यांशी असलेलं नातं तोडत नाहीत,
उलट जगत राहतात. लढत राहतात!

उत्तराखंड या राज्यात उद्योग किंवा इतर रोजगाराच्या संधी नसल्यानं शेती आणि सैन्यात भरती होणं हे दोनच रोजगाराचे मुख्य मार्ग आहेत. त्यामुळे इथं विधवा महिलांचं प्रमाणही जास्त आहे. अशा एकटय़ा झालेल्या महिलांसाठी पिथोरगढमध्ये एक होस्टेल चालवलं जातं. तिथं या वीरनारी आपल्या मुलांसह राहतात. त्यांना पेन्शन मिळतं, मुलं शाळेत शिकतात. कोणी आर्मी कॅन्टीनमध्ये तर कोणी इन्शुरन्स एजंटचे काम करतात. 
त्यांच्यापैकी एक कांचन. 
19व्या वर्षी लग्न झालं. त्यानंतर दीड महिना नवरा सुटीवर  होता. या दिवसात एकत्र कुटुंबात कांचनची त्याच्याशी नीट ओळखही झाली नाही. सहा महिन्यांनी तो सुटीवर येणार म्हणून ही सजून वाट बघत बसली होती. तो तिनं घरात त्याचं कलेवर येताना पाहिलं. तिची वाचाच गेली होती. त्यानंतर कित्येकांनी तिला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला. पण तिने ना लग्न केलं ना सासर सोडलं. नणंदेच्या मुलीला स्वतर्‍च्या मुलीप्रमाणे वाढवलं. तिचं लग्न करून दिलं. स्वतर्‍ पार्लरचा कोर्स करून पार्लर चालवत आनंदाने जगते आहे. 
कांचनसारख्या अनेकजणी तिथे आहेत. 
लग्नानंतर दोन वर्षात रामकलीचा नवरा वारला. 
या दोन वर्षात ते दोघे मोजून दोन महिनेही बरोबर राहिले नाहीत. 
आज पंधरा वर्षानंतरही ती सासरीच राहते. तिच्या दिराला शहीद भावाच्या नावानं रेशन दुकान मिळालं आहे. रामकलीने दिराचा मुलगा दत्तक घेतला तो गतिमंद आहे. त्याच्या उपचारासाठी रामकली मुंबईर्पयत जाऊन आली; पण यश आलं नाही. घरात सगळ्यांच्या अगोदर उठून शेवटी झोपणारी म्हणून रामकलीच्या कामसू वृत्तीचा सगळे आदर करतात. घरच्यांचं हे प्रेम आणि आदर यानंच ती भरून पावते. 
कांचनसारखं स्वातंत्र्य किंवा रामकलीसारखा मान अर्थात सगळ्यांना मिळत नाही. 
शत्रूशी लढत असताना वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांचा सन्मान होतो. त्यांना आर्थिक मदतही बरी मिळते. परंतु कर्तव्य निभावत असताना किंवा आजारी पडून किंवा अपघाताने मरण पावलेल्या सैनिकांच्या पत्नीला वेगळे फायदे मिळत नाही. त्यातही तिला मिळणार्‍या पेन्शन, पैशात इतरांना वाटा हवा असतो. भविष्यात उपयोगी पडतील म्हणून कुणाच्या तरी सांगण्यावरून गुंतवलेले पैसे कुणीतरी हडप करणं, त्या कंपन्या बंद पडतात असे अनुभव सर्रास येत असतात. 
गेल्या वर्षी मी उत्तराखंडात यासार्‍यांशी बोलत होते. अशाच एकदा आमच्या गप्पा चालू असताना कोपर्‍यात लक्ष गेलं तर चम्पादेवीच्या डोळ्यातून झरझर धारा वाहत होत्या. समोर पाहिलं तर टीव्हीवर श्रीदेवीची अंत्ययात्रा चालू होती. 
‘तुम्हाला श्रीदेवी खूप आवडायची का?’ मी विचारलं. 
तर तिला श्रीदेवी कोण हेपण माहीत नव्हतं. 
पण त्यामुळे 14 वर्षापूर्वीच्या तिच्या नवर्‍याच्या अंत्ययात्रेच्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. ज्या जखमेवर कधी खपली धरलीच नाही ती भळभळ वाहत होती. 
हे अनुभव नेहमीचे. कुणाचे वाहते डोळे तर कुणाची कोरडी ठक्क नजर.
तर कुणाची स्वत: आर्मीत सामील होण्याची जिद्द.
दुखाला वेगवेगळ्या वाटा करून देत अनेकजणी जगत आहेत. जगत राहतात. 

( लेखिका पत्रकार आहेत.)
mesanyogita@gmail.com

Web Title: Veeranari! brave world of army women.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.