उभ्या उभ्या काम

By admin | Published: June 11, 2015 02:46 PM2015-06-11T14:46:06+5:302015-06-11T14:46:06+5:30

तासन्तास एकाजागी बसून काम करायचं, डोळ्याची पापणीही न लवू देता कॉम्प्युटरमध्ये डोकं घालायचं आणि मग सुटलेली पोटं, वाढती वजनं घेऊन बैठय़ा कामाला दोष द्यायचा! हे चित्रच आता बदलू घातलं आहे. कारण आकार घेताहेत स्टॅण्डअप वर्क स्टेशन्स!

Vertical vertical work | उभ्या उभ्या काम

उभ्या उभ्या काम

Next
ऑफिसात उभ्यानं काम करण्याचा एक नवा कार्पोरेट ट्रेण्ड!
 
शाळेत एखाद्या विद्याथ्र्याने गृहपाठ केलेला नसला किंवा कुठलाही शिस्तभंग केला तर त्याला वर्गात बेंचवर किंवा वर्गाबाहेर उभं राहण्याची शिक्षा करण्यात येते. सगळीकडे बसायला जागा मिळण्यासाठी आपली धडपड. उभं राहणं ही ज्याला त्याला शिक्षाच. किंबहुना कुठंही उभं राहायला लागणं या क्रियेशी एक नकारात्मक दृष्टिकोनच जोडला गेला आहे.
परंतु आता परिस्थिती बदलतेय. बसून काम करण्यापेक्षा उभ्या उभ्या काम करण्याचे दिवस येऊ घातलेत. अनेक कंपन्यांमध्ये काम करण्याच्या जागी टेबल आणि खुर्चीच्या ऐवजी खास उभं राहून काम करण्यासाठी म्हणून वर्क स्टेशन्स डिझाईन केली जात आहेत. पाश्चिमात्य देशांमध्ये असलेला हा ट्रेण्ड आता हळूहळू भारतातही रुजू लागला आहे.
ेस्टॅण्डिंग वर्क स्टेशनचा किंवा उभे राहून काम करण्याचा ट्रेण्ड हा अगदी नवीन नाही. 18व्या आणि 19व्या शतकातही याचे दाखले मिळतात. ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल, लेखिका व्हजिर्निया वूल्फ, गीतकार ऑस्कर हॅमरस्टीन, लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे, अमेरिकेचे माजी संरक्षण सचिव डोनाल्ड रुम्सफेल्ड आणि अमेरिकेचे जनक बेंजामिन फ्रँकलिन या व्यक्ती स्टॅण्डिंग वर्कस्टेशन्सवर काम करीत असत. मधल्या काळात विस्मरणात गेलेली ही पद्धत गेल्या तीन-चार वर्षापासून पुन्हा एकदा रूढ होऊ पाहत आहे.
बैठय़ा जीवनशैलीचे धोके सगळ्यांनाच जाणवू लागले आहेत. संगणकामुळे तासन्तास एकाच ठिकाणी बसून काम केल्याने पचनक्रिया, रक्ताभिसरण, हृदयाची कार्यक्षमता या सगळ्यांवरच परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे उभं राहून काम करण्याला अनेकजण प्राधान्य देत आहेत.
कशी असतात स्टॅण्डअप वर्क स्टेशन्स
नावाप्रमाणो स्टॅण्ड अप वर्क स्टेशन्स ही उभ्यानं काम करण्यासाठी डिझाईन केलेली असतात. त्यांची उंची 36 इंचांपासून ते 5क् इंचांर्पयत असते. प्रत्येकाने आपापल्या उंचीनुसार ती अॅडजस्ट करून घ्यायची असतात. पण उभं राहून काम करणं हा उद्देश असल्यानं घरच्या घरीही आपण स्टॅण्ड अप वर्क स्टेशन तयार करू शकतो. कारण भारतीयांना तसंही ‘जुगाड’ कसा करायचा हे वेगळं सांगायची गरज नसते. त्यामुळे सध्या तुमच्याकडे असलेल्या टेबलवर एखादे छोटे टेबल ठेवूनही स्टॅण्डअप वर्क स्टेशन तयार करताय येऊ शकते. भारतात क्वचित अशी स्टेशन्स तयार केली जातात. भारताबाहेर साधारण 200 डॉलरपासून ही वर्क स्टेशन्स मिळतात. 
 
उभं राहून काम करण्याचे फायदे
उभं राहून काम करताना ऊर्जा जास्त असते. थकवा कमी येतो, असा अनेकांचा अनुभव आहे. उभे राहून काम केल्याने दुपारच्या जेवणानंतर पेंग येण्याचे प्रमाण कमी होते. स्टॅण्डअप वर्क स्टेशनमुळे पाठदुखीसारख्या समस्या कमी झाल्याचाही काहींचा अनुभव आहे.
अर्थात याची सवय व्हायला थोडा वेळ लागतो. तसंही कुठलीही सवय जडण्यासाठी किमान आठ आठवडय़ांचा कालावधी लागतो, असे तज्ज्ञ सांगतात. 
भारतात याचं प्रमाण अत्यंत तुरळक असले तरी हळूहळू बडय़ा कॉर्पोरेट असोसिएटमधील कर्मचारी वैयक्तिक पातळीवर स्टॅण्डिंग डेस्कचा वापर करू लागले आहेत. बैठय़ा जीवनशैलीमुळे आरोग्याला निर्माण होत असलेले धोके कमी करण्यासाठी स्टॅण्डअप जीवनशैली स्वीकारण्याकडे कल दिसतो आहे. प्रत्येक कार्यालयात हे शक्य नसलं तरी घरच्या घरी असे उभ्या उभ्याचे प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे?
 
ट्रेडमिल वर्क स्टेशन
स्टॅण्डअप वर्क स्टेशनच्या एक पाऊल पुढे जाऊन काही जण तर ट्रेडमिल वर्क स्टेशनवर काम करणं पसंत करतात. ट्रेडमिल डेस्कमध्ये माणसे ट्रेडमिलवर चालता चालता संगणकावर काम करतात. अर्थात त्यांच्या चालण्याचा वेग अत्यंत कमी (तासाला साधारण दोन मैल) इतका असतो. डॉ. सेथ रॉबर्ट्स यांनी 1996 साली ट्रेडमिल डेस्क डिझाइन करून त्याचा वापर करण्यास सुरुवात केली होती.
 
 
-सुनील डिंगणकर

 

Web Title: Vertical vertical work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.