पिअर प्रेशरचे बळी !, चिडवाचिडवी ते जीवघेणी स्पर्धा यात मुलं होरपळताहेत... ते कसं टाळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 01:57 PM2017-10-25T13:57:06+5:302017-10-26T09:38:18+5:30

अलीकडच्याच दोन घटना. अस्वस्थ करणा-या. वर्गातल्या मुलांनी चिडवून हैराण केल्यानंनागपुरात १५ वर्षाच्या मुलीनं शाळेच्या इमारतीवरूनच उडी मारली आणि जीव गमावला. दुसरी घटना मुंबईतली. ७ वर्षाचा हुशार मुलगा.खेळातही टॉपर. त्यानं मित्रांशी पैज लावली तीन दिवसात १० किलो वजन कमी करून दाखवण्याची.त्यासाठी जीवतोड व्यायाम केला, अन्न नाकारलं आणि त्यानं त्याचा मृत्यू ओढावला.

Victims of press-age! How to avoid them? | पिअर प्रेशरचे बळी !, चिडवाचिडवी ते जीवघेणी स्पर्धा यात मुलं होरपळताहेत... ते कसं टाळणार?

पिअर प्रेशरचे बळी !, चिडवाचिडवी ते जीवघेणी स्पर्धा यात मुलं होरपळताहेत... ते कसं टाळणार?

Next

- मानसी जोशी 

अलीकडच्याच दोन घटना. अस्वस्थ करणा-या. वर्गातल्या मुलांनी चिडवून हैराण केल्यानंनागपुरात १५ वर्षाच्या मुलीनं शाळेच्या इमारतीवरूनच उडी मारली आणि जीव गमावला. दुसरी घटना मुंबईतली. १७ वर्षाचा हुशार मुलगा.खेळातही टॉपर. त्यानं मित्रांशी पैज लावली तीन दिवसात १० किलो वजन कमी करून दाखवण्याची.त्यासाठी जीवतोड व्यायाम केला, अन्न नाकारलं आणि त्यानं त्याचा मृत्यू ओढावला.  समवयस्क मुलांचा दबाव, त्यांची चिडवाचिडवी, लठ्ठ-बारीक असणं, गोरं-काळं, उंच-बारीक, गरीब-श्रीमंत या साºयावरून होणारी टिंगल अनेकदा पिअर प्रेशरमुळे जीवघेणी ठरते.आणि हे सारं घडतं तेव्हा पालक अनेकदा अंधारात असतात. किंवा मुलांच्या तक्रारीकडे क्षुल्लक म्हणून दुर्लक्ष करतात. चिडवाचिडवी ते जीवघेणी स्पर्धा यात मुलं होरपळताहेत..ते कसं टाळणार? 

एकदा एक १६ वर्षाची मुलगी तिच्या आजीबरोबर माझ्याकडे आली होती. आई-वडिलांमध्ये वाद होते आणि मुलगी आईबरोबर तिच्या आजोळी राहात होती. दहावीची परीक्षा जवळ आली होती आणि या बाईचे तर अभ्यासात अजिबात लक्ष नव्हते. अभ्यास तर लांब; पण तिच्या वर्तणुकीत कमालीचा अरेरावीपणा, उद्धटपणा आणि आक्रमकता होती. घरातून न सांगता पळून जाते, रात्र रात्र बाहेर राहाते, मनासारखे झाले नाही तर आदळआपट करते अशी सगळी वर्तनदोषांशी संबंधित लक्षणं तिची म्हातारी आजी सांगत होती. बिचारी अगदी जेरीस आली होती.
त्या मुलीला आत बोलावल्यावर सर्वात प्रथम लक्षात आला तो तिचा बेफिकीर चेहरा. आपल्यावर कसा अन्याय होतोय आणि त्यामुळे आपलं वागणं किती रास्त आहे याची ती मला खात्री करून देत होती. ती बोलत असताना माझं लक्ष सहज तिच्या हातांकडे गेलं.
पाहिलं तर तिच्या मनगटापासून कोपरापर्यंत हाताच्या आतल्या बाजूला ब्लेडच्या असंख्य खुणा होत्या!
त्याबद्दल विचारलं. तेव्हा कळलं की तिच्या मित्रमंडळींमध्ये याची पैज लागते की, कोण सर्वात जास्त अशा ब्लेडच्या खुणा करून घेतो ते..
नंतर बोलता बोलता आजीनंही सांगितलं की, ही फोनवरून सतत माझे १६ झाले आणि तुझे किती? असं विचारत असते. अशी चर्चा चालू असते.
ही गोष्ट आजपासून बरोब्बर नऊ वर्षांपूर्वीची आहे.
म्हणजे त्या काळी या वयातल्या मुलांच्या आयुष्यात आजच्या इतके सर्रास कॅमेरा असलेले स्मार्टफोन पोहोचलेले नव्हते. आणि कोणताही निळा मासा भारतात पोहत आलेला नव्हता की त्यांना टास्क देत नव्हता. तरीसुद्धा त्या वयात आपल्या मित्रमंडळीचा प्रभाव या मुलीच्या आयुष्यावर इतकाच भेदक होता.
आणि हीच मुलगी का, या वयातल्या अनेक मुला-मुलींच्या आयुष्यात मित्र काय सांगतात, काय म्हणतात, त्यांच्या मनात आपली प्रतिमा कशी उंचावेल याचा मोठा गुंता असतो. त्याची चर्चाही आताशा पिअर प्रेशर म्हणून होते.
हे पिअर प्रेशर म्हणजे नेमकं काय आणि ते कसं महत्त्वाचं ठरतं हे समजण्यासाठी आधी मुलांच्या मानसिक जडण-घडणीची थोडी माहिती करून घ्यायला हवी. मानसशास्त्रीय थिअरीनुसार, वयानुसार वाढीचे काही प्रमुख टप्पे मानले जातात. यामध्ये मतमतांतरे असली तरी थोड्याबहुत फरकाने हे जडण-घडणीचे टप्पे सारखेच आहेत. पाच वर्षाखालील मुलं ही सर्वसाधारणपणे बहुतांश बाबतीत पालकांवर अथवा वडीलधाºया व्यक्तींवर अवलंबून असतात. पाच वर्षाच्या आसपास मुलं विविध कौशल्ये शिकतात. औपचारिकदृष्ट्या शालेय शिक्षणाची खरी सुरुवात होते. वाचन, लेखन, मौखिक ज्ञान, कला आणि क्रीडा यामध्ये मुलं प्रथमच भाग घेत असतात. ही सगळी शालेय आणि सामाजिक कौशल्ये आत्मसात करण्याचा हा काळ त्यांच्यासाठी क्षमता सिद्ध करण्याचा काळ असतो. हे करत असताना साहजिकच त्यांना निरीक्षण आणि त्यातून सराव करत आपली क्षमता सिद्ध करायची असते. म्हणजे आपल्या वयाच्या इतर व्यक्ती एखादी गोष्ट जितक्या अचूक आणि सहज पद्धतीने करून दाखवतात तितकंच आपल्याला आलं पाहिजे तरच आपली कुवत सिद्ध होईल हे इतकं सोपं गणित मुलांच्या मनात असतं.
साधारण १० ते ११ वर्षे वयानंतर मुलांना त्यांची स्वतंत्र ओळख हवी असते.
अमुक अमुकचा मुलगा किंवा तमुक तमुकची मुलगी असं न ओळखलं जाता, आपली स्वत:ची एक स्वतंत्र ओळख असावी यासाठी त्यांचा अट्टाहास सुरू असतो. त्यामुळे त्यांच्या वयाची मुलं आणि मुली जसं वागतील तसं ते वागतात. आणि तसं वागलं नाही तर आपले समवयस्क आपल्याला वाळीत टाकतील किंवा कमी समजतील अशी मनोधारणा तयार होते. यातूनच मित्रमंडळ आणि गु्रप्स तयार होत असतात. जो आपल्यासारखा असेल तो आपल्या गटाचा सदस्य. मग आपल्या मित्रांच्या ग्रुपमधलं हे सदस्यत्व टिकविण्यासाठी खटाटोप सुरू होते आणि कळत नकळत मुलं या गटाच्या प्रभावाखालीच नव्हे तर दबावाखाली वागायला सुरुवात करतात. ते म्हणतील तसंही करतात.
आपल्याला इतरांनी चांगलं म्हणावं, कौतुक करावं, त्यांच्यात सामावून घ्यावं ही भावना माणूस म्हणून अतिशय वास्तव आहे. मानवाच्या सामाजिक जडण-घडणीत महत्त्वाची सुद्धा आहे. मात्र १२ ते १९ हे असं वय असतं की त्यात हे वास्तव अधिक गंभीर असतं. कारण याच वयात ‘स्वत्वाची जाणीव’ प्रथमच होत असते. ही भावना अतिशय सुंदरसुद्धा असते. आपल्या मागच्या पिढीपेक्षा साहजिकच मग आपल्या पिढीशी आपलं जास्त पटणं, त्यांच्याकडून आपण नवीन जगाची माहिती करून घेणं सुरू होतं. मुलं कौशल्य शिकतात, नवीन अभ्यासक्र मांची माहिती करून घेतात. साहित्याची आवड निर्माण होते, एखाद्या खेळामध्ये रस वाटायला लागतो, वाचनाची, लिखाणाची गोडी लागते, काही गट सामाजिक कार्य करतात, एकत्र मिळून कामाचा ध्यास घेतात, यातून सृजनात्मक काम होतं. त्यामुळे गटानं केलेली कामं किंवा मुळात गटाचा सदस्य असणं सकारात्मक आणि विधायकही असू शकते यात अजिबात शंका नाही.
जी गोष्ट वडीलधाºया व्यक्तींनी सांगून पटत नाही तीच मित्रानं सांगितली की लगेच पटते, कारण तो आपल्या ‘गटाचा सदस्य’ असतो. येणाºया काळाचा तो नवा शिलेदार असतो. तो माझ्याशी ‘मी’ म्हणून बोलतो, अमुकचा मुलगा किंवा मुलगी म्हणून नाही, त्याच्याशी माझे माझ्या कुटुंबीयांशिवायचं असं स्वतंत्र नातं असतं, त्याने माझा हुरूप वाढतो, आत्मविश्वास वाढतो. माझी स्वत:ची स्वतंत्र ओळख तो मला देतो असं मुलांना वाटतं.
ते स्वत:ची स्वतंत्र प्रतिमा तयार करत असतात.
आणि त्यात शरीरप्रतिमा तर अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते.
पौगंडावस्थेत प्रवेश करताना, म्हणजे साधारण दहा वर्षानंतर मुला-मुलींमध्ये जसे हे सगळे मानसिकबदल होतात तसे असंख्य शारीरिक बदल होतच असतात.
या वयात मुली मुलांपेक्षा मोठ्या दिसतात, मुलं थोडी बुटकुली तर मुली शरीराने भरत असतात. कारण मुलांपेक्षा मुलींमध्ये परिपक्वता लवकर येते. मुलींना मासिक पाळी येणं, नितंब आणि छाती गोलाकार होणं असे बदल पचवायचे असतात तसे मुलांना आवाज बदलणं, मिश्या फुटणं अशा बदलांना सामोरं जायचं असतं.
या बदलांचा वेग केवळ मुला आणि मुलीत वेगळा नसतो तर प्रत्येक मूल वेगळ्या वेगानं वाढतं. काहींची उंची उशिरा वाढते किंवा आवाज लवकर घोगरा होतो.
मात्र गटागटामधल्या या राजकारणात या बदलांवरून चिडवाचिडवी सुरू होते.
मुलींना जाडेपणाची लाज वाटायला लागते तर मिशी न फुटलेले मुलगे बायले म्हणून हिणवले जातात. प्रसारमाध्यमं, माध्यमांमधील त्यांचे रोल मॉडेल या सा-याला इंधन पुरवत असतातच.
मुलगी असेल तर ती सुबक-सुडौल-गोरी आणि बारीक असावी आणि हिरो कसा डॅशिंग, मॅचो मॅन आणि सिक्स पॅक असलेला पाहिजेच. तरच वो दुश्मन का सामना कर पायेगा न!
बेढब दिसणारी हिरोईन आणि लुकडा-सुकडा किंवा बुटका हिरो असे कधी आदर्श असतात का?
मग या साच्यात बसण्यासाठी मुलं वाट्टेल ते करायला तयार होतात. शिवाय भिन्नलिंगी आकर्षणसुद्धा या वयात निर्माण होत असतं त्यामुळे जर आपण समोरच्या व्यक्तीला आवडण्यासारखे दिसलो नाही तर आपल्याला आपल्या मित्रासारखे किंवा मैत्रिणीसारखे जोडीदार मिळणार नाहीत ही भीती आहेच. कारण आजकाल हे जोडीदार मिळवण्याचं वयदेखील खाली खाली येत चाललं आहे. माझी ओळख मग मी कोण आहे यावर अवलंबून न राहता मला किती जोडीदार आहेत, मी कसा दिसतो किंवा किती तडफदार आहे आणि काय काय धोके पत्करू शकतो यावर अवलंबून ठरते. आणि जर माझ्या वयाच्या आणि माझ्या गटातल्या इतर व्यक्ती ते करू शकत असतील तर मला ते केलंच पाहिजे अशी ठाम धारणा तयार होते.
गंमत अशी आहे की ही ओळख निर्माण करण्याच्या कासोशीच्या प्रयत्नातच मी इतका त्या ‘गटाचा सदस्य’ होऊन जातो कीपुन्हा माझी म्हणून वेगळी ओळख उरत नाही!
खरी समस्या इथं निर्माण होते.
गटाचा प्रभाव असणं यात अजिबातच काळजीचं कारण नाही. प्रश्न दबावाचा आहे.
तो गट मला वाळीत टाकेल, माझी चेष्टा करेल, त्यांच्यात सामावून घेणार नाही या भयापोटी जेव्हा मुलं वाट्टेल ते करायला तयार होतात तिथे काळजी निर्माण होते.
आणि मग मुलं पिअर प्रेशरपायी वाट्टेल ते करायला जातात.
संगतीनं बिघडला - असा दोष दिला तरी त्यामुळे मुलांच्या स्व-प्रतिमेचे प्रश्न काही सुटत नाही. त्यासाठी मुलांनी आणि पालकांनीही एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे.

आपलं काहीतरी चुकतं आहे, हे मुलांनी कसं ओळखायचं?

* जे मित्र तुम्हाला धोकादायक, नकोशी कामं करायला ‘भरीस पडतात’, जी तुम्हाला चुकीची किंवा धोकादायक वाटतात त्या मित्रमंडळीपासून दूर राहा.
* असुरक्षित वाटेल, अस्वस्थ वाटेल किंवा भिती वाटेल अशा परिस्थितीमध्ये ‘नाही’ म्हणायला शिका.
* जी मुलं अशा दबावाखाली येत नाहीत अशा एका तरी मुलाशी अथवा मुलीशी मैत्री करा.
* तुमचे मित्र तुम्हाला दबावाखाली आणत असतील, त्रास देत असतील, चिडवत असतील तर शिक्षक, पालक किंवा इतर कोणत्याही प्रौढ व्यक्तीची मदत घ्या.
* अशी असुरक्षित वेळ कधीच सांगून येत नाही. व्यसनं, शारीरिक स्व-हानी, स्वत:च्या किंवा इतरांच्या वैयक्तिक मालमत्तेचे नुकसान, चोरी, खोटं बोलणे, लबाडी, लैंगिक छळ अशी कामं जर आपण हे मित्र बरोबर नसताना करू शकत नसू आणि ते असताना करायची भीती चेपत असेल तर आपण मित्रांच्या दबावाला बळी पडतो आहोत हे ओळखलं पाहिजे.

पालकांना काय करता येईल?

मुलांना ‘नाही’ म्हणायला शिकवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मुलं लहान असताना हाच शब्द पालकांना जेरीला आणत असतो. पालक सतत त्यांना नाही, हे करू नको म्हणत असतात; पण नाही शब्दात हो पेक्षा जास्त ताकद आहे. नाही म्हणण्याची आणि तो नकार स्वीकारायची सवय मुलांना लावायला हवी. त्यांच्याकडून येणाºया नकाराचासुद्धा आदर केला तर त्यांना नकार देण्यातली ताकद समजेल. संवादाची साधनं तर आपण मुलांना चिकार आणून दिली, स्मार्टफोन दिलाय, इंटरनेट आहेच, त्यामुळे ही मुलं उलट त्यांच्या मित्रांच्याच अधिक जवळ गेलीत कारण ते ही उपकरण सर्रास वापरतात; पण आपली मुलं आपल्या घरात राहतात त्यामुळे त्यांचा स्टेटस त्यांच्या फेसबुक किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर शोधू नये. तो प्रत्यक्ष संवादानेच तपासा.
मुलांना मोकळ्या संवादातून हा विश्वास द्या की परिस्थिती कितीही नाजूक असली तरी अशा दबावाखाली कामे करण्यापेक्षा तुम्ही त्यांचे आधारस्तंभ बनाल. त्यांना असा विश्वास द्या की, जरी ती एखाद्या कठीण प्रसंगात सापडली तरी त्या क्षणी कोणतेही प्रश्न न विचारता तुम्ही आधी त्यांची सुटका कराल, त्यांना सुरक्षित वाटेल अशी खात्री द्या,
मुलांमध्ये जर आत्मविश्वास असेल, त्यांचं स्वत:वर प्रेम असेल तर ती मुलं अशा दबावाला बळी पडायची शक्यता जवळपास शून्य आहे. मी जसा आहे किंवा जशी आहे ती छान आहे, इतरांना येणाºया काही गोष्टी मला येत नसतील कदाचित पण त्यांना न येणाºया अशा काही गोष्टी आहेत ज्या मला चांगल्या जमतात. आणि त्यानेच माझे वेगळेपण टिकून राहील. आणि माझी वेगळी ओळख निर्माण होईल. त्यांचा हा आत्मविश्वास टिकवण्याचे प्रयत्न करायला हवेत. सतत टीका करणं, चुका दाखवणं किंवा अपमान करणं यानं आपण त्यांचे भले करतो आहे असा जर पालकांचा समज असेल तर तो पूर्ण चुकीचा म्हणावा लागेल.
त्याने उलट मुलं आपल्यापासून दुरावतील आणि मग ‘वा! काय भारी जॅकेट आहे रे’ असं सहज म्हणून जाणारा मित्र जेव्हा सिगारेट आॅफर करेल तेव्हा तो साहजिकच आपल्यापेक्षा जवळचा ठरेल. त्यामुळे काय काय करायचं नाही यापेक्षा तीच गोष्ट कशी योग्य पद्धतीने करता येऊ शकेल ते सुचवा. ‘सुचवा’ म्हणजे आपले मत मांडा. नाही म्हणायचा अधिकार त्यांना राखून ठेवा. छोट्या-छोट्या चुकांमधून मुलं शिकतील आणि आपोआप पालकांवर अधिक विश्वास ठेवतील.

(मानसशास्त्रज्ञ, नायर हॉस्पिटल, मुंबई)

Web Title: Victims of press-age! How to avoid them?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.