आधी दीपिका, आता विराट! इतक्या यशस्वी स्टार्सना डिप्रेशन कशाचे / का येते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 08:11 AM2019-11-21T08:11:00+5:302019-11-21T08:15:01+5:30

विराट कोहली म्हटले की आपल्यासमोर काय प्रतिमा असते? शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा अतिशय फिट, अत्यंत यशस्वी, प्रसिद्धीच्या वलयातला, श्रीमंत आणि कुणालाही हेवा वाटावा अशा कीर्तीचा खेळाडू! त्याच्या या प्रतिमेला पूर्ण छेद देणार्‍या, अगदी विरु द्ध अशा गोष्टी विराटने जाहीरपणे सांगितल्या! इतका यशस्वी क्रिकेटपटू, भरपूर आर्थिक उत्पन्न, अनुष्का शर्मासारखी बहुगुणी अभिनेत्री पत्नी आणि तरीपण विराटला डिप्रेशन?

virat kohali, deepika padukon: & story of their depression? & speaking about it openly.. | आधी दीपिका, आता विराट! इतक्या यशस्वी स्टार्सना डिप्रेशन कशाचे / का येते?

आधी दीपिका, आता विराट! इतक्या यशस्वी स्टार्सना डिप्रेशन कशाचे / का येते?

Next
ठळक मुद्देविराट कोहली, दीपिका पदुकोणसारखे ‘स्टार’ आपल्याला आलेल्या डिप्रेशनविषयी जाहीर बोलतात ही खूप महत्त्वाची  गोष्ट आहे !

डॉ. हमीद दाभोलकर

भारतीय किक्रेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची मागच्या आठवडय़ातील मुलाखत ऐकलीत का तुम्ही? 
त्या मुलाखतीत विराट म्हणाला, ‘क्रि केट खेळताना माझ्या आयुष्यात असे दिवस आले होते की, मला खूप निराशा आली होती, काही सुचत नव्हते. जणू आपले आयुष्य आता संपले आहे अशी भावना होत होती, आत्मविश्वास एकदम कमी झाला होता. मला डिप्रेशन आले होते.’ 
- विराट कोहली म्हटले की आपल्यासमोर काय प्रतिमा असते? शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा अतिशय फिट, अत्यंत यशस्वी, प्रसिद्धीच्या वलयातला, श्रीमंत आणि कुणालाही हेवा वाटावा अशा कीर्तीचा खेळाडू! त्याच्या या प्रतिमेला पूर्ण छेद देणार्‍या, अगदी विरु द्ध अशा गोष्टी विराटने जाहीरपणे सांगितल्या! इतका यशस्वी क्रिकेटपटू, भरपूर आर्थिक उत्पन्न, अनुष्का शर्मासारखी बहुगुणी अभिनेत्री पत्नी आणि तरीपण विराटला डिप्रेशन?
 आश्चर्य वाटले की नाही? काही वर्षापूर्वी दीपिका पदुकोणनेदेखील असेच आपल्या डिप्रेशनविषयी सांगितले होते. तुमच्यापैकी काही जणांना तर वाटेल, 
‘हे काय चारचौघांत बोलायची गरज आहे का?’
‘लोक त्याला नावं ठेवणार नाहीत का?’
किंवा काही जणांना असेदेखील वाटेल की,‘अरे माझ्या मनातदेखील असेच विचार येतात सध्या.!’
सध्याच्या तरुण मुलामुलींमध्ये टेंशन-डिप्रेशनची जणू एक सुप्त साथ दिसून येते, या माझ्या विधानाशी तुमच्यातील अनेकजण सहमत होतील याची मला खात्नी  आहे; पण आपली अडचण अशी  आहे की त्या विषयी बोलणे किंवा मदत मागणे हे आपल्या समाजात खूप कमीपणाचे समजले जाते. त्यामुळे आपले खूप मित्र-मैत्रिणी मनाचा हा त्नास सहन करत राहतात. काही वेळा त्नास सहन झाला नाही तर आत्महत्येसारखा अत्यंत टोकाचा निर्णय घेतात. 
ह्या पाश्र्वभूमीवर विराट कोहली, दीपिका पदुकोणसारखे ‘स्टार’ आपल्याला आलेल्या डिप्रेशनविषयी जाहीर बोलतात ही खूप महत्त्वाची  गोष्ट आहे ! त्यानिमित्ताने आपण पण जरा टेन्शन आणि डिप्रेशनविषयी समजून घेऊया ( चौकटी पाहा).
बहुतांश वेळा घरातील जवळच्या व्यक्तीने थोडय़ा समंजसपणे हा त्नास असलेल्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतले, थोडा आधार दिला आणि अपेक्षेचे ओझे कमी केले तर ही लक्षणं कमी होऊ शकतात. जर त्याने लक्षणं कमी होऊ शकली नाहीत तर मात्न समुपदेशक अथवा मनोविकारतज्ज्ञाची मदत घ्यायला हवी.  
महाविद्यालयीन मुलामुलींच्या मधील वाढते ताणतणावांचे प्रमाण पाहता, जसे शाळेत शारीरिक प्रशिक्षणाचे शिक्षक असतात तसे मानसिक आरोग्य चांगले ठेवायला मदत करणारे कोच किंवा समुपदेशक असायला काय हरकत आहे ?
योग्य वेळी, कमी खर्चात आणि योग्य उपचार मिळाले तर बहुतांश मानसिक आजार आटोक्यात येऊ शकतात.  मानसिक आजारी व्यक्तीदेखील उपचाराच्या मदतीने सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगू शकते, मानसिक आरोग्याविषयी जोरकस प्रबोधन केले तर लोक योग्य वेळी मदत घेऊ लागतात. कुटुंब शासन आणि समाज ह्यांनी एकत्रित प्रयत्न केले तर मानसिक आजारसारख्या दुर्लक्षित विषयामध्येदेखील सघन काम होऊ शकते. 
मानसिक आरोग्याच्या क्षेत्नात काम करण्याची अनेक जणांना इच्छा असते, पण मार्ग माहीत नसतो.  खरे तर अनेक तरु ण मुले-मुलीच पालक आणि वडीलधार्‍या माणसांच्यापेक्षा हे काम अधिक चांगले करू शकतात. आपल्या समवयस्कांशी मनमोकळे करणे अधिक सोपेदेखील असते. आत्महत्येच्या विरोधी जनजागृती करणे ह्यासाठी हे युवा मानस मित्न/मैत्रिणी सोशल मीडियावर मोहीम चालवू शकतात. त्याचा फायदा ह्या विषयीचे  गैरसमज दूर होण्यासाठी आणि डिप्रेशनच्या मळभात जगणार्‍या अनेकांना योग्य वेळी मदत मिळण्यासाठी होऊ शकतो. 
तुम्हाला मानस मैत्नीच्या कामात सहभागी व्हायचे असेल तर फेसबुकवर मानस मैत्री हे पेज लाइक करा!

कशामुळे येते टेन्शन/ डिप्रेशन?


1. आपल्या आयुष्यात निर्माण झालेली टोकाची ‘स्पर्धात्मकता’ हे त्या मागचे एक महत्त्वाचे कारण आहे. 
2. स्पर्धा करणे हा माणसाचा जैविक गुणधर्म आहे. प्रगतीसाठी एका मर्यादेर्पयत स्पर्धा आवश्यकदेखील आहे, पण दुसर्‍याशी स्पर्धा करणे हेच जर आपल्या आयुष्याचे इतिकर्तव्य झाले तर मात्न त्यामधून अडचणीचे प्रश्न निर्माण होतात.
3. आपल्या स्वतर्‍च्या म्हणून खास अशा क्षमता कोणत्या आहेत आणि त्या क्षमतांचा अधिक  चांगला विकास  कसा करता येईल, ह्या उद्दिष्टाऐवजी शेजारच्याच्या तुलनेत आपल्याला कमी तर मिळणार नाही ना किंवा अधिक कसे मिळेल, हा विचार एका बाजूला आपण करीत असलेल्या अभ्यासाच्या मधील आनंद संपवून टाकते. त्या जागी पूर्णपणे अनावश्यक ताण-तणाव निर्माण करते आणि अंतिमतर्‍ आपला परफॉर्मन्सदेखील रसातळाला नेते. 
4. दुसरा मुद्दा आहे ‘संधी’विषयक आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या गैरसमजाचा.Opportunity knocks your door only once  हा तो गैरसमज. प्रत्यक्षात आयुष्य प्रत्येक माणसाला परत परत संधी देत असते. आयुष्यात एक संधी चुकली तर दुसरी मिळत असते. आपला बघण्याचा दृष्टिकोन आपण त्यासाठी सकारात्मक ठेवला पाहिजे. आपली एक संधी गेली म्हणजे पूर्ण आयुष्याच वाया गेले असा गैरसमज आपण करून घेतो आणि अनावश्यक ओझे डोक्यावर वागवू लागतो. 
5. पालकांच्या ‘अपेक्षांचे ओझे’ ही पण एक परीक्षेचा ताण वाढवणारी बाब. अनेक पालक स्वतर्‍ची अपूर्ण स्वप्ने मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. खरे तर आपल्या मुलाचा नैसर्गिक कल काय आहे ह्याचा अंदाज घेऊन, मुलाला त्याचे स्वप्न शोधायला पाठबळ  देणे ही पालकांची भूमिका असायला पाहिजे. पालकांचा जीवनातील अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्या जीवनातील स्पर्धात्मकता, अपूर्ण स्वप्ने ह्यांचा मुलाच्या मनावर व्यक्त-अव्यक्त पातळीवर मोठा प्रभाव पडत असतो. ह्या विषयी पालक म्हणून आपण जागरूक नसलो तर त्याचा मुलाच्या मानसिक स्वास्थ्यावर नक्कीच परिणाम होतो आणि ह्याचा परिणाम ताण वाढण्यात होतो.
6. ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनदेखील काही वेळा टेन्शन येऊ शकते. प्रत्येक  वेळी बाह्य परिस्थितीच टेन्शनला कारणीभूत असते असे नाही, तर काही मुलांचा मूळ स्वभावदेखील पटकन ताण घेण्याकडे कल असलेला असू शकतो.
7. काही वेळा कोणतेच सामाजिक कारण नसतानादेखील केवळ मेंदूत केमिकल लोचा झाल्यामुळेदेखील टेन्शन/डिप्रेशन येऊ शकते. 


 

आपल्याला  ‘हा’ त्रास होतो आहे, हे कसे ओळखायचे?


1. स्वतर्‍ला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला ओळखता येणे आवश्यक असते. खरे तर टेन्शन आलेले ओळखणे अजिबातच अवघड नाही. 
2. झोप कमी होणे, भूक कमी होणे, थोडय़ा अभ्यासाच्या नंतर थकल्यासारखे वाटणे, एकाग्रता कमी होणे, कारण नसताना चिडचिड होणे, छातीत धडधड होणे, सारखा घाम येणे किंवा शरीराला हलकासा कंप सुटणे अशी अनेक शारीरिक आणि मानसिक लक्षणे टेन्शन वाढल्याने जाणवू शकतात. कोणताही सामान्य माणूस ही लक्षणे सहज ओळखू शकतो.
3. अशी लक्षणे जाणवत असतील तर त्याविषयी मोकळेपणाने बोलायला आपण शिकले पाहिजे.
4. ही लक्षणे जाणवत असतील, तर आपल्यामध्ये काही कमी आहे अशा नजरेने त्याकडे न पाहता आपल्याला मदतीची गरज आहे, असा विचार करावा. त्यानुसार पुढे कृती करावी. मदत घ्यावी.
5. अशी लक्षणे आपल्या जवळच्या व्यक्तीमध्ये असतील, तर त्या व्यक्तीला मदत करण्यात जरूर पुढाकार घ्यावा.
6. वेळीच योग्य मदत घेतली तर ही सगळी लक्षणे कमी होऊन आपली मानसिक स्थिरता आपण पुन्हा मिळवू शकतो.

 

टेन्शन-डिप्रेशनवर उपचार घेता येतात का?


1. योग्य उपचार घेतल्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपला त्नास कमी होतो.
2. काही वेळा योग्य वेळी मदत न घेतल्याने मनाचा आजार बळावतो आणि त्यामधून पुढे आत्महत्येसारखे टोकाचे प्रसंग घडू शकतात.
3. मन स्थिर राहिले तर आपली शिक्षणातील प्रगती जोमाने होऊ शकते. नातेसंबध सुधारण्यासदेखील या गोष्टींचा फायदा होतो.
4. अगदी आर्थिक गणित  मांडायचे झाले तरी वल्र्ड बँकेचा नुकताच प्रसिद्ध झालेला एक अहवाल असे सांगतो की मानसिक आरोग्याच्या प्रश्नात जर समाजाने एक डॉलर गुंतवला तर त्यावर चार डॉलरचा परतावा मिळू शकतो. कारण सोपे आहे, व्यक्तीचे मन स्थिर राहिले तर स्वाभाविकपणे त्याची उत्पादन क्षमता वाढणार.  

 

  •   (लेखक ख्यातनाम मानसोपचारतज्ज्ञ आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते  आहेत)

Web Title: virat kohali, deepika padukon: & story of their depression? & speaking about it openly..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.