जगप्रवासाला निघालेला विष्णूदास चापके म्हणतो, घुमने में क्या जाता है ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 05:14 PM2018-09-28T17:14:51+5:302018-09-28T17:15:34+5:30
फिरायला पैसा नाही, इच्छा लागते. जग पहायची ऊर्मी ही आपली ताकद बनते. मला वाटतं, माणसाचं आयुष्य हीच एक संधी आहे, त्याचं सोनं करायला पाहिजे.
विष्णुदास चापके
एवढं जग फिरतो आहेस तू, किती देश पाहिले, किती माणसं भेटली.
काय सांगशील तुझ्या दोस्तांना.?
असं विचारतं कुणी तेव्हा मी एकच वाक्य सांगेन, ‘फिरायला लागा!’ घुमने में क्या जाता है!
- पण फिरायचं म्हणजे मनात पहिला प्रश्न येतो की, पैसा कुठून आणायचा? त्याविषयी मी नंतर बोलतो; पण मी आधी काहीतरी वेगळं शेअर करीन म्हणतो.
मी मूळचा कातनेश्वर गावचा. (जिल्हा परभणी) आता प्रवासात आहे; पण गावातले दोस्त, व्हॉट्सअॅपवर संपर्कात आहे. अनेक ग्रुपवरच्या चर्चाही वाचत असतो. अलीकडेच एक फोटो मला दिसला. गावातले गॉगल लावलेले तरुण त्यात. आपण कसे ‘रॉयल’ वगैरे अशी त्यावर कॅप्शन. ते पाहून मी जरा विचारात पडलो. वाटलं, आमच्या गावाकडे आईवडील शेतात राबतात. पिकं गेली, पावसानं दगा दिला तर ते कष्ट वाया जातात. आणि तरुण मुलं घरबसल्या फोटो काढून स्वतर्ला रॉयल म्हणतात, हे कसं काय? अनेक पालक तर शेतमजूर. आईवडिलांनी एखादा आठवडा जरी शेतात मजुरी केली नाही तरी घरात चूल पेटणार नाही. पण तरी त्यांनी मुलांना शिकवलं, जेमतेम दहावीर्पयत जाऊन काहींनी शाळा सोडल्या. आता कुठल्या तरी राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेण्यात ते पुढे सरसावतात. त्यावरून वादावादी, भांडणं, मारामारी होते. हे चित्र मला अस्वस्थ वाटतं, त्या माझ्या दोस्तांना सांगावंसं वाटतं की, जग खूप मोठं आहे. ते पहा.
त्यासाठी प्रवास करा, आपलं गाव सोडून पहा तरी बाहेरचं जग कसं चाललंय, माणसं कशी जगत आहेत?
जगात किंवा देशात शक्य नसेल तर किमान राज्यात तरी फिरा. आपल्या पंचक्रोशीपासून सुरुवात करा. पालकांनाही विनंती की, या मुलांना घरात बसून ठेवण्यापेक्षा स्वतर्ची रोजीरोटी शोधायला जाऊ द्या घरातून बाहेर. त्यासाठी प्रोत्साहन द्या.
एकदा मी माझ्या काकांना असंच सांगितलं की, त्यांच्या मुलाला जाऊ द्या गावाबाहेर नोकरी शोधायला. जाऊ द्या शहरात. पण काकांना मुलाचं शहरात काही बरंवाईट होईल का अशी भीती वाटत होती. त्यांची ही निराधार भीती काढताना मी म्हणालो, बरंवाईट काही व्हायचंच असेल तर ते खेडय़ातही होऊ शकतं. ते टाळणं शक्य नाही; परंतु तेवढय़ासाठी त्यानं गावातच राहावं हे काही बरोबर नाही.
खरं सांगायचं तर या गावातल्या जगण्याचा मीही कधीकाळी भाग होतो. कॅनॉलच्या कडेला मारामारीत मी एकाच्या डोक्यात फावडं मारलं होतं. त्याला रक्तबंबाळ केलं होतं. तो पोलिसांत गेला असता तर माझं भवितव्य वेगळ्या वाटेनं गेलं असतं. एक मात्न बरं झालं त्या गोष्टीला घाबरून मी गाव सोडून आलो आणि जग प्रवासाच्या वाटेवर पोहचलो. म्हणून माझ्या दोस्तांना मी एकच सांगतो, नवीन जग अनुभवा. प्रवास करा. माणसांना भेटा. तर आपल्या अनुभवाच्या खिडक्या उघडतील. नजर बदलेल. समज वाढेल.
आता प्रश्न पैशांचा. प्रवासाला पैसा लागतो का, तर लागतो. पण आज इतका प्रवास केल्यावर मला जाणवतंय की इतरांना मदत करायला चांगल्या लोकांची जगात कमी नाही. मात्र जेव्हा तुम्ही प्रवास सुरू करता तेव्हा धर्म, पंथ, गर्व हे मागेच ठेवा. समजून घ्यायला शिकलं तर गोष्टी सोप्या होतात. त्याला आता तंत्रज्ञानाचीही मदत मिळते आहे.
मला वाटतं घरातील कमीत कमी एका व्यक्तीने गावची वेस ओलांडून शहरात गेलं पाहिजे. प्रवास करून, जग पहायची ऊर्मी जपली पाहिजे. माणसाचं आयुष्य हीच एक संधी आहे त्याचं सोनं करायला पाहिजे..
(जग प्रवासाला निघालेल्या विष्णुदासने लिस्बन, पोर्तुगाल येथून लिहिलेला हा लेख. हा लेख लिहिला तो त्याच्या जग प्रवासाचा 915वा दिवस होता.)
(शब्दांकन : अमोल जाधव)