रिओ ऑलिम्पिकचे व्हॉलेण्टिअर्स

By admin | Published: August 4, 2016 04:56 PM2016-08-04T16:56:44+5:302016-08-04T16:56:44+5:30

सर्वोच्च आणि सर्वोत्तम गुणवत्तेचा आविष्कार म्हणून ज्या ऑलिम्पिककडे पाहिलं जातं. त्यातलाच एक भाग म्हणजे ऑलिम्पिकमधले व्हॉलेण्टिअर्स!

Volleyballs of Rio Olympics | रिओ ऑलिम्पिकचे व्हॉलेण्टिअर्स

रिओ ऑलिम्पिकचे व्हॉलेण्टिअर्स

Next
>मेघना ढोके, माधुरी पेठकर 
(मुलाखती आणि शब्दांकन)
 
सर्वोच्च आणि सर्वोत्तम गुणवत्तेचा आविष्कार म्हणून ज्या ऑलिम्पिककडे पाहिलं जातं. त्यातलाच एक भाग म्हणजे ऑलिम्पिकमधले व्हॉलेण्टिअर्स! स्वखर्चानं जगभरातून आलेले हे हौशी कार्यकर्ते त्याच सर्वोत्तम ध्यासानं ऑलिम्पिक स्पर्धांचा गाडा हाकतात. अव्वल गुणवत्ता आणि परिश्रमपूर्वक ऑलिम्पिक सामन्यांचं नियोजन तडीस नेतात. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत व्हॉलेण्टिअर म्हणून काम करण्याची संधी मिळणं हेसुद्धा एखाद्या पदकासारखंच असतं! जागतिक स्तरावर निवडल्या गेलेल्या आणि ऑलिम्पिक स्पर्धेत काम करण्यासाठी रवाना होणाऱ्या या तरुण व्हॉलेण्टिअर्सची या खास गप्पा..
 
अव्वल दर्जाचा खेळ पाहणं, याहून मोठं स्वप्न ते काय?
उल्हास शाह
कलोल व्हाया टोराण्टो रिओ
 
१) स्वत:बद्दल प्लीज काही सांग, तू करतोस काय?
- मी जन्मलो, वाढलो गुजरातमधल्या कलोल नावाच्या छोट्या शहरात. अहमदाबादमध्ये एमबीए केलं आणि संधी मिळाली म्हणून थेट कॅनडात पुढच्या शिक्षणासाठी आलो. मागच्याच वर्षी मला कॅनडाचा कायमस्वरूपी निवासी व्हिसा मिळालाय. 
शाळा-कॉलेजात मी व्हॉलीबॉल, क्रिकेट, बॅडमिण्टन खेळायचो. खेळाची प्रचंड आवड होती. स्टेट लेव्हलपर्यंत खेळलो. पुढे शिक्षण सुरू राहिलं आणि खेळ काहीसा मागे पडला.
सध्या मी टोराण्टोत पिझा हटमध्ये मॅनेजर म्हणून काम करतोय.
 
२) मग एकदम रिओला जावं, थेट आॅलिम्पिकमध्ये व्हॉलेण्टिअर म्हणून हे कसं काय घडलं?
माझे गुरु-मार्गदर्शक भरत ठाकोर हे नवगुजराथ कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक होते. २०१२मध्ये ते लंडन आॅलिम्पिक पहायला गेले होते. तेही वयाच्या सत्तराव्या वर्षी. ते परत आल्यावर आॅलिम्पिकच्या अनेक गोष्टी अत्यंत उत्साहानं सांगत होते.
आणि मला म्हणाले, ‘उल्हास आयुष्यात एकदा तरी या दर्जाचा खेळ पहायलाच हवा, आॅलिम्पिक हा सर्वोत्तमतेचा एक वेगळाच टप्पा आहे, तो अनुभवणं हा कुठल्याही खेळाडूच्या आयुष्यातला सुवर्णक्षण असतो..’
त्याक्षणी मी ठरवलं की, काहीही झालं तरी मी २०१६च्या आॅलिम्पिकसाठी जाणारच! मी आॅनलाइन माहिती घेत होतो, तिकिटासाठी पैसे किती लागतील हे बघत होतो. तेव्हा मला कळलं की आॅलिम्पिकमध्ये व्हॉलेण्टिअर म्हणून काम करता येऊ शकतं!
तो एक क्षण, आणि मला वाटलं जिंकलोच!!
२०१४ मध्ये रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली. मग सगळ्या टेस्ट झाल्या, आॅनलाइन ग्रुप डिस्कशन झालं. आणि २०१६च्या आॅलिम्पिकसाठी माझं व्हॉलेण्टिअर म्हणून सिलेक्शन झालं.
 
३) रिओ आणि आॅलिम्पिक या दोन शब्दातच थरार आहे; पण तुला तिथं जाऊन काय काय पाहण्यात, करण्यात जास्त रस आहे?
- आॅलिम्पिकच्या कहाण्या शतकानुशकतं लोकांच्या लक्षात राहतात. तो खेळाचा अव्वल दर्जा आहे. आपण त्या त्या क्षणांचे साक्षीदार असू ही भावनाच सगळ्यात जास्त वेड लावणारी आहे. खेळाडू म्हणून आॅलिम्पिकला जाणं हे माझं स्वप्नच होतं. आणि आता ते पूर्ण होतंय, मी या आॅलिम्पिकचा एक भाग आहे. हजारो खेळाडू आॅलिम्पिकला जाण्यासाठी जिवाचं रान करतात, काहीजण तर हा अव्वल दर्जाचा एक खेळ पाहण्यासाठीही धडपड करतात. आणि मी तर अनेक गेम्स लाईव्ह माझ्या डोळ्यांनी पाहणार आहे. बॅडमिण्टन याच खेळासाठी माझं पोस्टिंग असल्यानं मी सायना नेहवाल, ज्वाला गुट्टा यांचे गेम्स पाहू शकेन.. त्यांना भेटूही शकेन.. अजून काय हवं?
 
४) नोकरी, काम, तिथली धावपळ आणि ही आॅलिम्पिकसाठी सुटी, प्रवास आणि खेळाचं पॅशन, हे सारं एकावेळी जमतं..? तू कसं जमवलंस?
- सोपं नाहीच ते! असेलही कसं? पण जमवावं तर लागतंच! म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग, हीच शाळकरी म्हण कामाला आली आहे! मी कितीतरी तास जास्त काम केलं आहे. रिओला जायची तजबीज केली. आणि एक स्वप्न पूर्ण केलं, अर्थात मरण्यापूर्वी पूर्ण करण्याची अशी बरीच स्वप्न आहे, त्यासाठी मेहनत करून पैसा उभा करत राहीनच मी याहीपुढे! मनापासून सांगतो, मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यानं मला पैशाची किंमत कळते. पैसे नसल्यानं मी खेळ बाजूला ठेवला नि एमबीए केलं; पण म्हणून मी माझी स्वप्न बाजूला ठेवलेली नाहीत. शक्य आहे तेवढा मी प्रवास करणार आहे, जग पाहणार आहे. फक्त पैसा कमवणं हेच माझ्या जन्माचं लक्ष्य नाही. जगात थरारक, सुंदर अशा अनेक गोष्टी आहेत, त्या मला हाका मारतातच..
त्यातलीच एक रिओ आॅलिम्पिक!!
 
रोमांचकारी अनुभवांच्या थरारक वाटेवरचं वळण
सोनाली केळकर
वेड? -अजून काय??
१) स्वत:बद्दल प्लीज काही सांग, तू करतेस काय?
- मी मुंबईची. मी लीडरशिप कन्सल्टण्ट आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत काम करते. अधिकाधिक चांगल्या गुणवत्तेसाठी कसं काम करायचं हे लोकांना, ट्रेनर्सना शिकवते. माझ्या कामासाठी मी जगभर फिरते. भरपूर प्रवास करावा लागतो. अनेक क्रीडा प्रकार मी खेळतेही. मी पूर्णवेळ नोकरी करत नाही. स्वतंत्र काम करते. त्यामुळेच मला माझ्या आवडीनिवडी, प्रवास आणि कुटुंब या साऱ्यासाठीच्या प्रवासाचं नियोजन करता येऊ शकतं.
 
२) मग एकदम रिओला जावं, थेट आॅलिम्पिकमध्ये व्हॉलेण्टिअर म्हणून हे कसं काय घडलं?
- मुळात आॅलिम्पिकमध्ये व्हॉलेण्टिअर्स असतात आणि तसं काही काम करण्याची संधी आपल्यालाही मिळू शकते असं काही मला माहितीही नव्हतं. मात्र गेल्या सप्टेंबरमध्ये माझी एक मैत्रीण म्हणाली की, तुला माहितीये का, हू रन धीस आॅलिम्पिक? -व्हॉलेण्टिअर्स. जास्त काम तेच करतात. मला तर ही कन्सेप्टच माहिती नव्हती. ती म्हणाली, आपण जाऊया का? मी म्हटलं जाऊ. लगेच आॅनलाइन अर्जही भरून टाकला. आॅनलाइन प्रोसेस सोपी नव्हती. अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार होती. ती देत देत एकेक टप्पा आम्ही पुढे सरकत होतो. दरम्यान, मैत्रिणीकडे काही न टाळता येण्यासारखं काम आल्यानं तिचं जाणं रद्द झालं. आणि मी एकटी पडले. जावं की न जावं काही कळेना. पण मग ठरवलं की, एकटं तर एकटं; पण आता जायचं. याविषयाच्या संदर्भात खूप वाचलं, तेव्हा लक्षात आलं की आॅलिम्पिकमध्ये व्हॉलेण्टिअर म्हणून काम करायला मिळणं हीच एक लाइफटाइम अपॉर्च्युनिटी आहे. आणि ती मिळाली तर सोडायची नाही. अवघड होतंच, पण अशक्य नाही असं ठरवलं. एक्साईटमेण्ट तर आहेच अजूनही, मात्र जबाबदारीही वाटते. दोन-तीन महिन्यांपूर्वीच मला माझं व्हॉलेण्टिअर म्हणून सिलेक्शन झाल्याचं पत्र मिळालं. सेलिंगमध्ये माझं पोस्टिंग आहे हे कळलं, त्यानंतर मग बुकिंग करणं सुरू झालं. विमानाच्या तिकिटाची सोय आधीचे माईल्स वापरून झाली. पण तिथं राहण्याची सोय करायची होती. ती आॅनलाइन शोधाशोध करून केली आणि रिओला आपण जाणार हे नक्की केलं!
 
३) रिओ आणि आॅलिम्पिक या दोन शब्दातच थरार आहे; पण तुला तिथं जाऊन काय काय पाहण्यात, करण्यात जास्त रस आहे?
- आॅलिम्पिकचे गेम पाहणं हीच एक थरारक स्वप्नवत गोष्ट आहे. त्यामुळे मी ती पूर्ण एन्जॉय करणार, तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मनापासून जगून घेणार! आणि ते आॅलिम्पिक संपलं की मी चिली नावाच्या देशात परस्पर जाणार आहे. तिथं माझी एक मैत्रीण राहते. ती म्हणाली की, तिथल्या जागृत ज्वालामुखीभोवती होणारं मॅराथॉन याच दरम्यान आहे. तीसुद्धा एक लाइफटाइम संधी आहे. त्या जागृत ज्वालामुखीभोवती मी हाफ मॅराथॉन धावणार आहे.
इतकं रोमांचकारी काय काय आयुष्यात घडतं आहे.
 
४) नोकरी, काम, तिथली धावपळ आणि ही आॅलिम्पिकसाठी सुटी, प्रवास आणि खेळाचं पॅशन, हे सारं एकावेळी जमतं..? तू कसं जमवलंस?
- मी ठरावीक वेळेची नोकरी करत नाही. स्वतंत्र काम करते. त्यामुळे मला अशी दीर्घ सुट्टी घेणं शक्य झालं. घरच्यांचा पाठिंबाही आहेच. आणि प्रवासाची आवड आहे, म्हणून हे जमलं आहे. धावपळ होते; पण जो अनुभव मिळतो तो लाखमोलाचा आहे.
 
 
प्रवासाचं वेड आहेच, आता यादगार अनुभवही हवेत!
रेणुका गद्दे
संधी! वेगळ्या जगण्याची!
१) स्वत:बद्दल प्लीज काही सांग, तू करतेस काय?
मी चेन्नईची. पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर चेन्नईमध्येच एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरीला लागले. एक मॅनेजर म्हणून कंपनीमध्ये काम करताना दररोज एक वेगळं आव्हान स्वीकारावं लागतं. सतत डोक्यात आउटपूटचा विचार असतो. रोजच्या मीटिंग, प्रेझेन्टेशन यामुळे दिवस कुठे उगवतो आणि कधी मावळतो ते कळतही नाही.
पण या संपूर्ण व्यस्त दिनचर्येत मला माझे छंद खूप मदत करतात. मला फिरण्याची प्रचंड आवड आहे. लहानपणापासून मला असलेलं हे फिरण्याचं वेड मला वेगळीच एनर्जी देतं. कामाच्या निमित्तानं मी युरोप खूप फिरले आहे. नॉर्वे आणि फिनलंडसारखे छोटे देशही फिरले आहे. त्या त्या देशातली स्थानिक संस्कृती, तिथला निसर्ग आणि लोकं यांचं मला प्रचंड आकर्षण आहे. हीच ओढ मला देशोदेशीचा प्रवास करायला भाग पाडते. बाहेरचे देश फिरून आलं की माझ्यात एक वेगळाच उत्साह संचारतो. शरीरावरचा, मनावरचा सर्व ताण गळून पडतो. मला फिरण्यासोबतच खेळाचंही आकर्षण आहे. पण मला खेळायला नाही तर खेळ पाहायला खूप आवडतात. फुटबॉल, टेनिस, बॅडमिण्टन आणि आॅफकोर्स क्रिकेट हेही माझे आवडीचे खेळ. 
२) मग एकदम रिओला जावं, थेट आॅलिम्पिकमध्ये व्हॉलेण्टिअर म्हणून हे कसं काय घडलं?
- २०१४ चे फिफाचे फुटबॉल विश्वकपचे सामने सुरू होते. त्यादरम्यान मी एक लेख वाचला. लेखाचा विषय मला खूपच इंटरेस्टिंग वाटला. फिफा वर्ल्ड कपमध्ये व्हॉलेण्टिअर म्हणून काम करणाऱ्यांचे अनुभव त्या लेखामध्ये मांडण्यात आले होते. जागतिक स्पर्धांमध्ये व्हॉलेण्टिअर म्हणून काम करणं हे मला फारच एक्सायटिंग वाटलं. आपणही हा अनुभव घेऊन पाहावा असं वाटून गेलं. आता पुढची संधी शोधायला हवी म्हणून जरा इंटरनेटवर गूगल करून बघितलं तर माझ्यासाठी संधी होतीच. २०१६ सालचं रिओ मधलं आॅलिम्पिक माझ्या मनातल्या इच्छापूर्तीसाठी उत्तम संधी होती. मी जरा याविषयाचा खोलात जाऊन अभ्यास केला. मला रिओ आॅलिम्पिकची आॅफिशियल वेबसाइट मिळाली. त्या वेबसाइटचा अभ्यास केला आणि मला तिथलं व्हॉलेण्टिअरचं आवाहन दिसलं. मी जराही वेळ न दवडता आॅनलाइन फॉर्म भरून टाकला. आॅगस्ट २०१४ मध्ये म्हणजे जवळ जवळ दोन वर्षापूर्वीच माझी व्हॉलेण्टिअर म्हणून रिओ वारी निश्चित झाली होती. माझ्यासोबत माझे घरचे, माझे मित्र-मैत्रिणी, माझ्या कंपनीतले सर्व सहकारी हे खूपच एक्साइटेड झाले होते. मी काहीतरी वेगळं करणार आणि अनुभवणार हा आनंद माझ्यासोबत या सर्वांनाही होता. दोन वर्षापासून रिओवारी म्हणून मी अक्षरश: नाचत होते. 
दरम्यान, व्हॉलेण्टिअर म्हणून माझा प्रवेश निश्चित झाल्यानंतर मी कुठल्या क्षेत्रात काम करू इच्छिते याचीही तिकडून विचारणा झाली. मी माझे इंटरेस्ट सांगितल्यानंतर मला अ‍ॅक्वेटिक्स पार्कमध्ये (जिथे स्विमिंगमधल्या स्पर्धा पार पडणार आहे ते ठिकाण) मला व्हॉलेण्टिअर म्हणून काम करायला मिळणार आहे. 
 
३) रिओ आणि आॅलिम्पिक या दोन शब्दातच थरार आहे; पण तुला तिथं जाऊन काय काय पाहण्यात, करण्यात जास्त रस आहे?
- रिओ आॅलिम्पिकच्या व्हॉलेण्टिअरीच्या निमित्ताने मी पहिल्यांदा दक्षिण अमेरिकेला जाणार आहे. सुंदर निसर्गप्रदेश, जैवविविधता, नॅचरल आणि अ‍ॅडव्हेन्चर पार्क हे दक्षिण अमेरिकेतल्या रिओ द जानेरिओ या शहराचं मुख्य वैशिष्ट्य. आता मला हे सर्व अनुभवायला मिळणार आहे. एका जागतिक स्पर्धेत मी एक व्हॉलेण्टिअर म्हणून जाणार आहे. या स्पर्धेचा मीही एक भाग असणार आहे. अर्थात तिथे मला आरामशीर बसून सामने पाहायचे नाहीये. काम करायचं आहे. पण एक जागतिक स्पर्धा आनंदानं, खेळीमेळीनं पार पडावी यासाठी जे हजारो हात झटणार आहेत त्यात दोन हात माझेही असणार आहेत. 
 
४) नोकरी, काम, तिथली धावपळ आणि ही आॅलिम्पिकसाठी सुटी, प्रवास आणि खेळाचं पॅशन, हे सारं एकावेळी जमतं..? तू कसं जमवलंस?
-माझी व्हॉलेण्टिअर म्हणून नोंदणी पक्की झाल्यावर मी जाण्याच्या तयारीला लागले आहे. आॅफिसमध्ये माझ्या अनुपस्थितीत काही गैरसोय होऊ नये म्हणून मी नऊ महिन्यांपूर्वीच एक महिन्याची रजा टाकून मंजूर करून घेतली आहे. मी एक महिन्यासाठी रिओला जाणार आहे. तिथे गेल्यावर नोंदणी, टे्रनिंग, जेट लॅग यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. एक व्हॉलेण्टिअर म्हणून प्रत्येकाला तिथे दहा दिवस काम करायचं आहे. त्यामुळे स्पर्धा पाहण्याची संधीही मिळणार आहे. एकटीनं दूरदूरच्या देशात प्रवास केल्यामुळे प्रवासाची भीती अजिबात नाहीये. पण हृदयाच्या ठोक्यांची गती वाढलीय. रिओला जाण्याचा क्षण जसजसा जवळ येतोय माझा उत्साह दुपटीनं वाढतोय. 
‘रिओ आॅलिम्पिक आणि मी’ खरंच खूपच एक्साइटिंग आहे हे !’ तिथून आल्यावर माझ्याकडे सांगण्यासारखं खूप काही असणार आहे हे नक्की !
 
खेळ हे माझं पॅशन आहे, ते मी जगतोय!
अभिजित देशमुख
मी भारताचा एक चेहरा
१) स्वत:बद्दल प्लीज काही सांग, तू करतोस काय?
मी मूळचा जालन्याचा. अभ्यासात कायमच टॉपर होतो. औरंगाबादला आयटी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. आणि आता गेली ९ वर्षे पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो आहे. खेळाची मला लहानपणापासून आवड. अंडर १७ क्रिकेट टीममध्ये मी खेळलोय. मी कराटे ब्ल्यू बेल्टपर्यंत शिकलोय. त्या खेळात अनेक बक्षिसंही जिंकली आहेत. कॉलेजमध्येही बास्केटबॉल खेळायचो. पुढे आयटीत काम सुरू केलं तरी खेळणं थांबलं नाही. कार्पोरेट टूर्नामेण्टमध्ये मी खेळतो आहे. २१ किलोमीटर पुणे मॅराथॉन मी धावलोय आणि ती आजवरची सगळ्यात भन्नाट गोष्ट आहे असं मला वाटतं. 
लहानपणापासून मी खेळ पाहतो. क्रिकेट तर होतंच. पण अन्य खेळांविषयी ओढ होती, त्यातलं जिकेही वाढत होतं. हे पॅशन जास्त वाढलं जेव्हा मी नोकरीला लागून बॅँगलोरला पोहोचलो. त्यानंतर मी अनेक सामन्यांना प्रत्यक्ष जायला सुरुवात केली. विम्बल्डन, दिल्लीतले कॉमनवेल्थ, श्रीलंकेतला वर्ल्डकप, सचिनची वानखेडेवरची शेवटची मॅच यासाऱ्या क्षणांचा मी साक्षीदार झालो. 
 
२) मग एकदम रिओला जावं, थेट आॅलिम्पिकमध्ये व्हॉलेण्टिअर म्हणून हे कसं काय घडलं?
- २०१४मध्ये व्हॉलेण्टिअर म्हणून काम करण्यासाठी आॅनलाइन अप्लाय केलं. तो फॉर्म भरणं हेच एक मोठं चॅलेज होतं. त्यांनी त्यात अनेक गोष्टी विचारल्या होत्या. स्पोर्ट मॅनेजमेण्टचा अनुभव काय? तुम्ही कोणते खेळ खेळता? त्यानंतर आॅगस्ट २०१५मध्ये आॅनलाइन इण्टरव्ह्यू झाले. त्यात त्यांनी खेळाविषयी अनेक प्रश्न विचारले. टेनिस उत्तम खेळतो सांगिल्यावर त्यातले अनेक तांत्रिक प्रश्न विचारले. त्यांची उत्तरंही मी बरोबर दिली. मुलाखत चांगलीच झाली होती आणि आपलं सिलेक्शन होणार याविषयी माझी खात्री होती. आणि झालंही तसंच, मला टेनिस स्पर्धातच काम करण्याची संधी मिळाली आहे.
 
३) रिओ आणि आॅलिम्पिक या दोन शब्दातच थरार आहे; पण तुला तिथं जाऊन काय काय पाहण्यात, करण्यात जास्त रस आहे?
- खेळ हे माझं पॅशन आहे. आणि आॅलिम्पिक स्पर्धेत काम करण्याचा अनुभव आहे हे सर्टिफिकेटच यापुढे पुरेसं बोलकं असेल. आॅलिम्पिकमध्ये व्हॉलेण्टिअर म्हणून मी भारताचं प्रतिनिधित्व करतोय. खेळाच्या या आंतरराष्ट्रीय टप्प्यात भारतीय व्हॉलेण्टिअर म्हणूनही अग्रणी असले पाहिजे असं मला वाटतं! तिथं जाऊन मला आता वेगवेगळ्या देशातल्या माणसांशी, खेळाडूंशी बोलण्याची, भेटण्याची संधी मिळेल. माझ्या वागण्या-बोलण्यातून तेही भारतीय माणसांविषयी अंदाज बांधतील. त्यामुळे माझं वागणं, दुसऱ्यांशी आदरानं वागताना काम उत्तमच करणं हे सारं म्हणजे मी भारताचा तिथं एक चेहरा असल्यासारखंच आहे, असं मला वाटतं!
 
४) नोकरी, काम, तिथली धावपळ आणि ही आॅलिम्पिकसाठी सुटी, प्रवास आणि खेळाचं पॅशन, हे सारं एकावेळी जमतं..? तू कसं जमवलंस?
- सोपं नाही; पण अशक्यही नाही. मी आयटीत काम करतो, तिथं काम खूप असतं; पण मी अनेकदा सुट्टीच्या दिवशीही काम करतो. अनेकदा ३-४ तासच झोपतो. पण माझं खेळाचं पॅशन मात्र सोडत नाही. मी कदाचित खेळाडूही होऊ शकलो असतो; पण अभ्यासात हुशार होतो त्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनिअर झालो. पण म्हणून खेळ सुटलेला नाही. सुदैवानं मी जिथं काम करतो त्या कंपनीत खेळाला पोषक वातावरण आहे. उत्तम जिम आहे. झुंबा आणि योगाचे क्लासेस घेतले जातात. त्यामुळे आरोग्य उत्तम राहतं. आता रिओला जातानाही माझ्या कंपनीनं मला उत्तम पाठिंबा दिला. घरच्यांचा तर पाठिंबा आहेच..
त्यामुळेच रिओ आणि ऑलिम्पिकचं एक मोठं स्वप्न पूर्ण होतं आहे.

Web Title: Volleyballs of Rio Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.